

विशेष
डॉ. मीना वैशंपायन
महाराष्ट्राची, मराठी भाषिक समाजाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्यातही संपूर्ण भारतात एकमेव म्हणता येईल असे लक्षणीय वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दरवर्षी निघणारे दिवाळी अंक. मनोरंजन मासिकाचे संपादक का. र. मित्र यांनी १९०९ साली पहिला दिवाळी अंक काढला. तेव्हापासून ती एक परंपराच सुरू झाली आणि ती आजतागायत चालू आहे.
पंचवीसेक वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या शहरांतील रस्त्यांवरही येता-जाता कानांवर पडणा-या संवादांची भाषा मराठी असे आणि मनात एक आनंदाची लहर, आपलेपणा नकळत तरळत असे. अलीकडच्या दशकात मात्र असे होताना दिसत नाही. मराठी गीते वा मराठीतले संवाद हरवल्यासारखे झाले आहेत. मराठी लोकांना हे खटकते, सामान्य माणसे हतबल होताना दिसतात. राजकारणी आपल्या फायद्यासाठी भाषेचे राजकारण करताहेत. कविवर्य कुसुमाग्रजांनी ही अवस्था ओळखून म्हटलेच होते की, “माझी मराठी जरी राजभाषा असली, तिच्या अंगावर भरजरी वस्त्रे असली तरी ती सचिवालयाच्या दारात ‘माझे रक्षण करा’, असे विनवत उभी आहे.” आज तर तिची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे.
या स्थितीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय व त्यामुळे मराठी भाषेला, काही फायदा होईल का, आज मराठीला भवितव्य काय, ती लुप्त होईल की काय अशी चिंता अनेक जाणकारांना पडली आहे. त्याचा सांगोपांग विचार व्हावा, त्यातील अडचणी कोणत्या यासंबंधी अभ्यासकांचे म्हणणे काय हे वाचकांपुढे यावे या हेतूने या अंकातील लेखांची मांडणी केली आहे.
स्वतः संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. गणेश देवी, गेल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या आणि ज्येष्ठ पत्रकार महेंद्र पंढरपुरे यांनी साहित्यसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून मराठीची सद्यस्थिती, तिच्यापुढील नव्या युगाची आव्हाने, याबद्दल चर्चा झालेली आहे. डॉ. गणेश देवी यांच्या विवेचनातील महत्त्वाच्या मुद्यांमध्ये भाषेतील चातुर्वर्ण्य—त्यातील श्रेष्ठ-कनिष्ठत्व – टाळणे कसे आवश्यक आहे हे मांडले आहे. डॉ. भवाळकरांनी एकूण मराठी समाजाचे मराठीचा वापर करण्याबाबतीतले दुर्लक्ष, मराठी भाषेचे आपल्याच समाजाकडून होणारे अवमूल्यन याविषयीची तळमळ व्यक्त केली आहे. डॉ. मोरे यांनी मराठीचे पूर्वापार चालत आलेले वैभव वर्णन करत, वर्तमान परिस्थितीत भाषा वर्धिष्णू होण्यासाठी लोकसहभागाचे महत्त्व सांगितले आहे.
आजपर्यंत राज्य शासनाच्या मराठी भाषाविभागाला स्वतंत्र सचिवच नसल्याने शासकीय पातळीवरून मराठीच्या व्यवहारातील वापराबाबतीत काहीसे दुर्लक्ष होत होते. आता डॉ. किरण कुलकर्णी या कुशल प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. ते स्वतः एक साहित्यिक असून मराठीचे अभ्यासक आणि उपासकही आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी विविध पातळ्यांवरून या कामाला गती दिली आहे. मराठी जागतिक पातळीवरही उपयुक्त ठरावी यासाठी तिच्या आधुनिकीकरणासाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत. त्याचबरोबर आपल्या या भाषेचे पूर्ववैभव मोठे होते, ते जतन करण्यावरही भर दिला आहे. त्यासाठी उपयुक्त असे प्रकल्प योजून त्यापैकी काहींचे कामही जोरात सुरू झाले आहे. मराठी भाषा केवळ ‘अभिजात’ हा सन्मान मिरवीत राहू नये, ती प्रवाही राहून तिच्यात साहित्याची, विज्ञानविषयक ग्रंथांची भर पडावी आणि त्याचबरोबर ती सामान्य लोकांकडून अधिकाधिक उपयोगात आणली जावी, यासाठीही डॉ. कुलकर्णी यांनी अनेक योजनांना गती दिली आहे. मराठी भाषा विभागाच्या प्रत्यक्ष कृतीयोजनेची माहिती देणारी त्यांची विशेष मुलाखत हे या अंकाचे आकर्षण ठरावे.
केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभ्यासकांच्या पहिल्या समितीचे अध्यक्ष व लेखक स्व. हरी नरके यांच्या पूर्वप्रकाशित लेखातून वाचकांना मराठीच्या पुरातन व संपन्न वैभवाची कल्पना येते. तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या पूर्वप्रकाशित लेखातून भाषा आणि संस्कृती यांच्या नात्यातील विविध पैलूंचा परिचय होतो. संपादकांनी हे लेख मुद्दाम दिले आहेत.
कोणतीही भाषा ही आधी बोलली जाते आणि अनेक वर्षांनंतर तिला लिखित रूप प्राप्त होते, तसेच कालप्रवाहात तिचे रूप बदलत जाते हे आपण जाणतो; परंतु आरंभीचे मौखिक रूपही भाषेचे महत्त्वाचे, आवश्यक रूप आहे. सुदैवाने मराठीच्या अनेक अभ्यासकांनी मराठीच्या विविध रूपांचा, बोलींचा, अनेक पुराव्यांच्या मदतीने सखोल अभ्यास केलेला आहे. त्यातील लोकोक्ती, संतसाहित्य, महानुभावीय साहित्य यांचे मराठीतील योगदान फार मोलाचे आहे. त्या सा-यांचा विचार या अंकात डॉ. रमेश वरखेडे, ॲड. देवदत्त परुळेकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. सुनीला गोंधळेकर, डॉ. मोहनगुरू अमृते, प्रा. कमलकुमार जैन, प्रा. उषा परब आदींच्या अभ्यासपूर्ण लेखांतून केलेला दिसतो. हे सारेच फार वाचनीय आहे.
अडीच हजार वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्त्वात असणा-या मराठीबद्दल नुसता अभिमान असणे पुरेसे नाही. तिने ज्ञानभाषाही झाले पाहिजे, आधुनिक झाले पाहिजे, तरच ती समाजाला आपलीशी वाटेल, तिच्या द्वारे मिळालेले शिक्षण हे आपल्याला उपजीविकेसाठी काम मिळायला उपयुक्त झाले पाहिजे, हे मत अनेक तरूण अभ्यासकांनी व तंत्रज्ञानकुशल व्यक्तींनी सांगितले आहे. डॉ. विवेक सावंत, डॉ. जयंत गाडगीळ, डॉ. श्रीकांत जोशी यासारख्या अनुभवी अधिकारी लोकांचे लेख आपले तातडीचे कर्तव्य काय व का हे अतिशय उत्तम रीतीने सांगतात.
अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीचा सन्मान झाला आहे असे मराठी भाषिकांना वाटते ते योग्यच आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी, अस्तित्वासाठी मराठी भाषिकांनी स्वतः जागरूक राहून प्रयत्न केले पाहिजेत हे तर खरेच. त्यासाठी केवळ हा सन्मान मिळाला म्हणजे या गोष्टी आपोआप होणार नाहीत. काही विचारवंतांना, लेखकांना वाटते की, हा सन्मान मिळाला म्हणजे आता आपली जबाबदारी नाही, असे करून चालणार नाही. हा सन्मान मिळाला किंवा न मिळाला तरी त्यामुळे मराठीच्या सद्यस्थितीत बदल होणार नाही. आपणच त्यासाठी विविध प्रकारे जाणीवपूर्वक काम करत राहिले पाहिजे. अशीही दुसरी बाजू काहींनी मांडली आहे, आणि तिलाही या अंकात आवर्जून स्थान देण्यात आले आहे. या लेखकांमध्ये डॉ. प्रकाश परब यांच्यासारखे अनुभवी भाषातज्ज्ञ, डॉ. मिलिंद बोकीलांसारखे विचारशील लेखक व समाजशास्त्रज्ञ, डॉ. उमा कुलकर्णी यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुवादक, भाषातज्ज्ञ डॉ. चिन्मय धारूरकर, कादंबरीकार आणि मराठीचे अभ्यासक संग्राम गायकवाड, डॉ. विद्यागौरी टिळक, कवियत्री अंजली ढमाळ यांचा समावेश आहे.
एकूणच असे दिसते की अतिशय विचारपूर्वक मांडणी करत, सर्व पैलूंना स्थान देत व उत्तम निर्मितीमूल्ये सांभाळत वाचकांच्या हाती एक संग्राह्य अंक दिला आहे. यासाठी संपादक प्रकाश कुलकर्णी, कार्यकारी संपादक सुरेश वांदिले व सर्व अभ्यासक, लेखक तसेच अंकाचे देखणे मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार दत्तात्रय पाडेकर आदींचे मनापासून अभिनंदन! असे वाटले की यातील मुद्द्यांचा विचार गांभीर्याने झाला तर आजही आपण आणि भावी मराठी भाषक म्हणू शकू की, ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!’
हेमांगी अभिजात मराठी विशेषांक
संपादक: प्रकाश कुलकर्णी
पृष्ठे : १६०, मूल्य : रु. २००