दिवाळी अंक २०२६ : मात

उपमुख्यमंत्री दिनकरभाई भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने मुख्यमंत्री विश्वासभाऊ आपटे अस्वस्थ झाले. त्यातच दिल्लीत मोहनलाल मेहता यांची दिनकरभाईंनी घेतलेली भेट ही तर राज्यातील नेतृत्वबदलाची जणू नांदीच होती. एनकाऊंटर स्पेशालिस्ट, सुपरकॉप संकेत भांबरेची मदत विश्वासभाऊंनी घेतली आणि एका धक्कादायक राजकीय कटकारस्थानाचा उलगडा झाला...
मात
मात
Published on: 

संदीप प्रधान

उपमुख्यमंत्री दिनकरभाई भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने मुख्यमंत्री विश्वासभाऊ आपटे अस्वस्थ झाले. त्यातच दिल्लीत मोहनलाल मेहता यांची दिनकरभाईंनी घेतलेली भेट ही तर राज्यातील नेतृत्वबदलाची जणू नांदीच होती. एनकाऊंटर स्पेशालिस्ट, सुपरकॉप संकेत भांबरेची मदत विश्वासभाऊंनी घेतली आणि एका धक्कादायक राजकीय कटकारस्थानाचा उलगडा झाला... विश्वासभाऊ आपटेंचे सरकार वाचणार की जाणार? दिनकरभाई भोसले सीएम होणार की त्यांचे स्वप्न मातीमोल होणार?

विश्वासभाऊ आपटे ‘वर्षा’वरील आपल्या अँटी चेंबरमध्ये येऊन बसले. गोरेगोमटे, बटबटीत डोळ्यांचे, काळ्याभोर केसांचे विश्वासराव आपले पँटीत न मावणारे पोट दोन्ही हातांनी दाबून धरत टेबल आणि खुर्चीच्या बेचक्यात अलगद जाऊन बसले. विश्वासभाऊ बेरकी आहेत. एखादी अप्रिय व्यक्ती किंवा विषयावर कुणी फार काळ बोलू लागला की, विश्वासभाऊ डोळे मिटून घेतात. कपाळावर बुक्के मारतात. दोन्ही हातांनी डोकं दाबून धरतात. विश्वासभाऊंच्या जॅकेटच्या दोन्ही खिशांत सुकामेवा भरलेला असतो. बैठक सुरू असताना किंवा अगदी कुठल्याही वेळी ते सुकामेवा चरतात. विश्वासभाऊंच्या दातांच्या फटीत अडकलेला सुकामेवा माधवनी पाहिला की, तो त्यांच्यापुढे पाण्याची बाटली धरतो. मग विश्वासभाऊ पटापट चूळ भरतात. आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि पोट सांभाळण्याची कसरत ते इतकी लीलया करतात की, त्यांचे कुठलेही विरोधक त्यांची खुर्ची खेचू शकले नाही किंवा त्यांच्या राजकीय पोटावर पाय देऊ शकले नाहीत. विश्वासभाऊंच्या पोटात इतकी राजकीय गुपितं दडलीयेत की, ज्या दिवशी त्यांचे पोट फुटेल त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात गुपितांची त्सुनामी येईल, असे त्यांचे कट्टर विरोधक खासगी गप्पांत आवर्जून सांगतात. विश्वासभाऊ खुर्चीवर बसताच माधव जोशीने सगळी वृत्तपत्रे आणून त्यांच्यापुढ्यात ठेवली आणि टीव्हीवर बातम्या सुरू केल्या. माधव हा विश्वासभाऊंचा खास, विश्वासू, जुना स्वीयकारी. माधव म्हणजे जणू विश्वासभाऊंची सावली. माधव दिसला म्हणजे विश्वासभाऊ आजूबाजूलाच आहेत, असे त्यांच्या पक्षाचे आमदार छातीठोकपणे सांगायचे. माधवची उंची बेताची. सावळा वर्ण. तो फिक्कट निळ्या किंवा बदामी रंगाचे अर्ध्या बाह्यांचे सदरे घालतो. खाली केवळ एकाच म्हणजे काळ्या रंगाची पँट. पायात चपला. त्याच्या हातात भलामोठा टॉवेल असतो. कुठल्याही ऋतूमध्ये त्याच्या अंगातून घामाच्या धारा पाझरतात. हातातला टॉवेल माधव स्वाभाविकपणे मानेखाली आणि अगदी काखांत फिरवतो. माधवच्या घामाचा चिकट, चिवट, उग्र वास तो जवळ आल्यावर मस्तकात भणभणतो. पण विश्वासभाऊंकडून कामं करवून घ्यायची तर माधव या नंदीच्या कानात कुजबुजायला लागतेच. माधव अविवाहित होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य पक्षाला अर्पण केले होते. पक्षाच्या कार्यालयातील सर्वात वरच्या मजल्यावर त्याच्याकरिता एक खोली बांधली होती. केवळ बांधली नव्हती तर चांगली सजवली होती. विश्वासभाऊ झोपी गेल्यावर माधव वर्षावरून तिकडे जाऊन बिछान्यावर अंग टाकायचा.

माधवनी समोर टाकलेली वृत्तपत्रे विश्वासभाऊंनी हातात घेतली. जवळपास सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर राज्याचे उपमुख्यमंत्री दिनकरभाई भोसले यांच्या वाढदिवसाची पानभर जाहिरात होती. ‘राज्याचे माजी आणि भावी सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री’ दिनकरभाई. लोकप्रियतेच्या शिखरावर दिनकरभाई असल्याचे दाखवण्याकरिता दिनकरभाईंना दहापैकी साडेनऊ गुण दिले होते आणि विश्वासभाऊंना सात गुण. अन् काही माजी मुख्यमंत्री दोन ते सहा गुणांत निपटून टाकले होते. विश्वासभाऊंनी खिशातील तीन-पाच बदाम जॅकेटच्या खिशातून काढून तोंडात कोंबले आणि रवंथ सुरू केला. दिनकरभाईंच्या त्या जाहिरातीवरील त्यांची नजर जळवेसारखी घट्ट चिकटली होती. विश्वासभाऊ त्या जाहिरातीने अस्वस्थ झाले होते. दिनकरभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता त्यांची भेटगाठ घ्यायची, असे खरे तर विश्वासभाऊंनी ठरवले होते. पण ही जाहिरात पाहिल्यावर त्यांचे मन उडाले. जॅकेटच्या खालून पोटावर हात नेत हळुवार खाजवत माधवकडे न पाहता विश्वासभाऊ म्हणाले की, संकेत भांबरेला फोन लाव. कुठे आहे विचार. लागलीच माधवने भांबरेला फोन लावला. संकेत भांबरे मुंबई पोलीस दलातील सुपरकॉप. एनकाऊंटर स्पेशालिस्ट. विश्वासभाऊंचा खासगी इंटेलिजन्स एजंट कम शूटर. विश्वासभाऊंच्या पाठिंब्यामुळे त्या भांबरेने अनेकांना टपकवलेय. एका विशिष्ट धर्माच्या गुन्हेगारी टोळीतील गुंडांना भांबरेने एनकाऊंटर करून संपवलेय. याखेरीज एका अभिनेत्रीच्या नवऱ्याचा संशयास्पद मृत्यू आणि एका पत्रकाराच्या हत्येत भांबरेचा हात असल्याची कुजबुज काल, आज होती. त्या अभिनेत्रीसोबत भांबरेची जीममध्ये गाठभेट झाली होती. दोघे पंधरा दिवस लंडनला एकत्र होते. ही गोष्ट त्या अभिनेत्रीच्या नवऱ्याला कळल्याने त्याने भांबरेची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. एका पार्टीत दारू पिऊन भांबरेची कॉलर धरली. त्याला जाब विचारला. पुढच्याच आठवड्यात लोणावळ्यातील एका रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये त्याची बॉडी सापडली. पत्रकाराचेही तेच. त्याने भांबरेच्या फेक एनकाऊंटरवर डिटेल कव्हरस्टोरी केली. त्यानंतर त्या पत्रकाराला डांबराच्या प्लांटमध्ये टाकून वितळून टाकल्याची वदंता होती. भांबरेला फोन लागताच माधवने तो विश्वासभाऊंकडे दिला. भांबरे डॉक्टर रात्री भेटायला ये... एक ऑपरेशन करायचेय अर्जंट. एवढे बोलून विश्वासभाऊंनी फोन बंद केला आणि मोबाईल माधवच्या दिशेने फेकला. माधवने तो अलगद झेलला. विश्वासभाऊ आणि माधव यांची केमिस्ट्री या मोबाईल फेकाफेकीत इतकी परफेक्ट होती की, विश्वासभाऊंनी फेकलेला मोबाईल माधव त्यांच्या शब्दासारखा झेलायचा.

आमदार, उद्योगपती, नेते, सनदी अधिकारी यांच्या भेटीगाठीत विश्वासभाऊ व्यस्त असताना एकदा माधव येऊन त्यांच्या कानात कुजबुजला. लागलीच आजूबाजूच्या मंडळींना कर्णाधारात कटवून विश्वासभाऊ जेवायला बसले. समोरच्या अतिभव्य टीव्ही स्क्रीनवर हसमुख दिनकरभाई दिसत होते. दिल्लीत मोहनलाल मेहता यांचा आशीर्वाद घेत होते. मोहनलाल मेहता हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते. परंतु पक्ष तेच चालवतात. कुठला मोहरा कुठे ठेवायचा आणि कुठला मोहरा कधी पणाला लावायचा, याचे सारे निर्णय तेच घेतात. विश्वासभाऊ आणि दिनकरभाईंच्या पक्षांचे युतीचे सरकार घडवण्याचे सारे नियोजन आणि अंमलबजावणी मोहनलाल यांनीच केली होती. विश्वासभाऊ टीव्हीवरील दृश्य पाहून अस्वस्थ झाले होते. अस्वस्थ झाल्यावर ते आपले दोन्ही दंड खाजवू लागतात हे माधवला माहीत होते.

रात्रीच्या वेळी ‘वर्षा’ बंगला केस मोकळे सोडून बसलेल्या बाईसारखा दिसत होता. विश्वासभाऊ भांबरेची वाट पाहत बसले होते. त्यांनी दुसरा पेग तोंडाला लावला तोच वर्षाच्या दरवाजात जग्वार येऊन थडकली. भांबरेला पाहून ड्युटीवरील हवालदाराने कडक सॅल्यूट ठोकला आणि वायुवेगाने दरवाजा उघडला. भांबरे विश्वासभाऊंच्या समोर जाऊन बसला. गुच्चीची जीन्स आणि लुई व्हुतॉनचा टी-शर्ट, सोबत अॅपल, व्हर्टूचे तीन मोबाईल आणि खोलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात दरवळणारा महागड्या परफ्युमचा सुगंध. भांबरे सहा फूट उंच होता. रोज जीममध्ये तीनेक तास घालवून त्याने एखाद्या फिल्मस्टारसारखी सिक्सपॅक अॅबवाली बॉडी केली होती. मामुली सीनियर इन्स्पेक्टर असलेला भांबरे मुंबईच्या पोलीस आयुक्तांसमोर मुद्दाम टी-शर्ट घालून जायचा आणि त्याला पाहून आयुक्त चिडून म्हणायचे की, ए भांबरे, मला बॉडीबिडी दाखवायला येत जाऊ नको. मी तुझा बॉस आहे. मग भांबरेचा इगो सुखावायचा. भांबरे आपला मोबाईल टेबलवर गरगर फिरवत होता. भांबरे, तुझा पगार एक लाख तरी आहे का?

विश्वासभाऊंनी नजर रोखून प्रश्न केला. भांबरे हसला आणि मानेनं नकार दिला. भांबरे दोनवेळा जेलमध्ये गेला होता. काही काळ सस्पेंड झाला होता. त्याची बढती, इन्क्रिमेंट रोखले गेले होते. मात्र भांबरे जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा त्याचा तामझाम एखाद्या उद्योगपतीलाही लाजवेल असा असायचा. विश्वासभाऊंनी विषय बदलला. भांबरे, मला तुला एका मिशनवर पाठवायचेय. आदेश सर, तुम्ही फक्त सांगा. तुमच्यासाठी जान हाजीर है, असे भांबरे बोलला. ए, जानबिन नकोय. आज दिवसभर टीव्ही पाहिलास का तू? विश्वासभाऊंनी प्रश्न केला. भांबरेने मानेने होकार भरला. दिनकरभाई आणि मोहनलाल भेट... सर, तुम्हाला या दोघांचा काय गेम सुरू आहे ते हवंय. चार-सहा दिवस द्या. सगळी खबर देतो. भांबरे उठला आणि सॅल्यूट ठोकून निघून गेला. विश्वासभाऊंना जरा हलके हलके वाटले. दिवसभर त्यांना खूप एकाकी वाटत होते. बहुमताच्या सरकारचे मुख्यमंत्री असतानाही एकाकी... असह्य... विश्वासभाऊंनी तिसरा पेग गपकन घशाखाली घातला आणि ते झोपायला गेले. ‘वर्षा’ आता बेडवर तळमळणाऱ्या मदालसेसारखा भासत होता.

दिनकरभाईंच्या यशस्वी दौऱ्याच्या बातम्या, व्हिडीओ, यूट्यूबवरील मुलाखती यामुळे राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला ऊत आला होता. विश्वासभाऊ जेथे जात तेथे चॅनेलवाले विश्वासभाऊंना ‘तुम्ही दिल्लीला कधी जाणार?’ हाच प्रश्न विचारून अक्षरशः पिच्छा पुरवत होते. दोन-चार संपादकांना विश्वासभाऊंनी जेवायला बोलावले तर तेही दिनकरभाईंनी दिल्लीत पूर्ण फिल्डिंग लावल्याचे छातीठोकपणे सांगून गेले. काही चॅनेलच्या मालकांना फोन करून विश्वासभाऊंनी आपल्या बदलाच्या बातम्यांतून पसरणारे नरेटिव्ह थांबवण्याची विनंती केली. मात्र दिनकरभाईंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यानंतर वाहिन्यांना एवढी मोठी पॅकेजेस दिली होती की त्या मालकांनी मुख्यमंत्र्यांच्याही विनंतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. विश्वासभाऊ देखील पॅकेज बिकेज देऊन बाजी आपल्या बाजूने फिरवू शकले असते. पण विश्वासभाऊ आणि दिनकरभाई यांच्यात पैशांचा धूर काढण्याची स्पर्धा लागली असती. त्यातून मीडिया गबर झाला असता. तो मार्ग आपण स्वीकारायचा नाही हे विश्वासभाऊंनी ठरवले होते. भांबरेचा फोन स्वीच ऑफ होता. चार-पाच केसचा ससेमिरा पाठीमागे असलेला भांबरे देश सोडून पळाला तर नाही ना? असा विचार त्यांच्या मनात आला.

विश्वासभाऊंच्या विश्वासातील डझनभर आमदार वर्षावर धडकले. त्यात अनेकजण विश्वासभाऊंनी अन्य पक्षातून मुद्दाम आपल्या पक्षात आणलेल्या आणि निवडून आणलेल्या आमदारांचा समावेश होता. साऱ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. काय रे असे सुतकी चेहरे करून का आलात, विश्वासभाऊंनी प्रश्न केला. चिंतामणी पाटील म्हणाला की, साहेब, असं बोलताय की जणू तुम्हाला काहीच ठाऊक नाही. का काय झालंय, विश्वासभाऊंनी नजर बारीक करून पुसले. राज्यात सगळीकडे नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी भावाला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची बिले काढून घ्यायला कलेक्टर ऑफिसला गेलो तर तिथला अधिकारी म्हणतो कसा, आमदार साहेब आता तुम्हाला नवे साहेब येणार. त्यांच्या सँक्शनखेरीज आता पुढची बिले निघणार नाहीत. मंत्रालयात, गावात, दिल्लीत, मीडियात सगळीकडे दिनकरभाई महिनाभरात पुन्हा सीएम होणार अशी चर्चा आहे. तुम्ही असेच हातावर हात देऊन बसणार की काही करणार? चिंतामणी पाटील कळवळून बोलला. विश्वासभाऊ खुर्चीत मागे रेलले. चिंतामणी, मी हातावर हात देऊन बसलो असेन असे का वाटतेय तुला? मी कामाला लागलोय. पण यावेळी परिस्थिती फार गंभीर आहे. तो खूप पुढे गेलाय. बहुधा हजारो कोटींचा सट्टा लावलाय त्याने. यावेळी त्याच्या गंडस्थळावर प्रहार करायचाय. थोडी कळ सोसा. विश्वासभाऊंनी आश्वस्त केल्यावर चिंतामणी आणि इतर आमदारांनी काढता पाय घेतला.

विश्वासभाऊ झोपले होते. त्यांचा डोळा लागला होता तेव्हा बेडरूमचा दरवाजा वाजला. दचकून जागे झालेल्या विश्वासभाऊंनी दरवाजा उघडला. शिपाई कानात कुजबुजला, भांबरे साहेब आलेत. विश्वासभाऊंच्या दमलेल्या शरीरात अचानक चेतनेचा करंट धावू लागला. ते झपाझप पावले टाकत ऑफिसात आले. भांबरे चक्क युनिफॉर्ममध्ये आला होता. भांबरे, काय खबर आणल्येस? गेले दोन दिवस डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहतोय. साहेब, काम फत्ते केल्याखेरीज हा भांबरे तोंड दाखवत नाही. मराठवाड्यातील गुंदली गावाचं नाव ऐकलंय तुम्ही सर? काही क्षण प्रश्नार्थक चेहरा करून विश्वासभाऊंनी पाहिलं. सर, त्या गुंदलीत गुरुबाळ घुले नावाचा एक बाबा आहे. त्याच्या आश्रमात गेल्या सहा महिन्यांत दोन जणांच्या फेऱ्या वाढल्यात. दिनकरभाईंनी घुलेच्या आश्रमाला सहा महिन्यांत ७७ वेळा भेट दिलेय. विश्वासभाऊ तुमच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा नयना राजाध्यक्ष त्या या घुलेच्या निस्सीम भक्त आहेत. नयना याच दिनकरभाईंना घेऊन घुलेकडे गेल्यात, अशी माझी माहिती आहे. घुलेच्या आश्रमात तुमच्या सरकारचे आणखी दोन-तीन मंत्री पायधूळ झाडतात. शिवाय होम सेक्रेटरी आणि इतर बडे अधिकारी सुद्धा घुलेपुढे लोटांगण घालतात. भांबरे, हा घुले म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातून लाच घेतल्याच्या प्रकरणात १७ वर्षांपूर्वी बडतर्फ झालेला इंजिनिअर आहे ना? विश्वासभाऊंनी प्रश्न केला. येस सर, अगदी बरोबर. या घुलेच्या आश्रमातून मनी लाँड्रिंग होते, अशी मला पक्की खबर आहे. शिवाय हा सेक्स रॅकेट सुद्धा चालवतो. मागे एका बड्या सराफा व्यापाऱ्याची सून एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत पळाली होती ते प्रकरण गाजले होते. आठवते सर? विश्वासभाऊंनी होकारार्थी मान हलवली. त्यांना या घुलेनीच त्याच्या गोव्यातील आश्रमात आश्रय दिला होता. भांबरे, म्हणजे राजाध्यक्ष आणि दिनकरभाई दोघे एकत्र आले आहेत तर... या राजाध्यक्षचा नवरा आर्म्स डीलर आहे. मोहनलाल यांचा खास आहे. आता खेळ हळूहळू माझ्या ध्यानात येतोय भांबरे. तू ग्रेट काम केलेस. सर, घुलेच्या आश्रमांवर छापे घालण्याचे आदेश द्या मला लागलीच. माझी टीम घेऊन लागलीच निघतो... आदेश हातात पडताच भांबरे रातोरात गुंदलीकडे रवाना झाला...

भांबरे आणि त्याच्या टीमने घुलेच्या आश्रमावर छापा घातला. घुलेला अक्षरशः फरफटत पोलिसांच्या गाडीत कोंबला. ही दृश्ये दिनकरभाईंनी पाहिली. आपल्या टकलावरून रुमाल फिरवत त्यांनी ओठ हलवत मनातल्या मनात मंत्रोच्चार केला. काहीसा सावळा वर्ण असलेले, गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा घातलेले, दंडाला ताईत बांधलेले दिनकरभाई ही दृश्ये पाहून अस्वस्थ झाले. घुलेची अशी वरात निघेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यांनी मोबाईल उचलून भांबरेला फोन लावला. भांबरे, तुझी किंमत बोल, दिनकरभाई जराशा घुश्श्यात बोलले. भांबरे पलीकडे हसला. साहेब, यावेळी बोली लावू नका. मी अगोदरच मांडवली करून मोकळा झालोय, असे म्हणून भांबरेने फोन कट केला. घुले अचानक झालेल्या या कारवाईने गळपाटला होता. त्याची पँट अक्षरशः ओली झाली होती. भांबरेने घुलेला चडीवर आणून आडवातिडवा सोलून काढला. मग घुले पोपटासारखा बोलू लागला. घुलेची पोपटपंची ऐकून भांबरे सुखावला.

भांबरेने वर्षा गाठला. विश्वासभाऊ त्याची वाटच पाहात होते. दोघांनी स्कॉचचे पेग भरले. साहेब, पाच हजार कोटींची सुपारी होती, भांबरे गंभीर स्वरात बोलला. विश्वासभाऊंच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. भांबरे म्हणाला की, सांगतो साहेब. दिनकरभाईंनी तुमच्या पक्षाच्या नयना राजाध्यक्ष यांना अगोदर फितवलं. त्यांच्याशी डील केल्यामुळे त्यांचे पती किशोर राजाध्यक्ष यांच्याशी दिनकरभाईंची चांगली गट्टी जमली. मोहनलाल आणि दिनकरभाई यांची जानपहचान होती. पण मुख्यमंत्रीपदाचे डील करण्याकरिता त्यांच्याशी थेट बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. ती गोष्ट राजाध्यक्षांमुळे सोपी झाली. कारण अलीकडेच राजाध्यक्ष आणि मोहनलाल हे फ्रान्सला लढाऊ विमानांच्या डीलकरिता गेले होते. दिनकरभाईंना सीएम केले तर लागलीच पाच हजार कोटी देण्याची ऑफर राजाध्यक्षांनीच मोहनलाल यांच्यापर्यंत पोहोचवली. मोहनलाल तयार झाल्यावर हे पैसे हवालामार्फत ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी घुलेला देण्याचा रस्ता नयना राजाध्यक्ष यांनीच दिनकरभाईंना दाखवला. पुढच्या महिन्याच्या सात तारखेला म्हणजे पुढच्या पाच दिवसांत ही रक्कम ट्रान्स्फर होणार होती. यापूर्वी तुम्ही मंत्री असताना घेतलेल्या तीन निर्णयांत घोटाळे झाल्याच्या बातम्या पाच चॅनल्स आणि चार प्रमुख वृत्तपत्रांत छापून आणण्याकरिता दिनकरभाईंनी फिल्डिंग लावली होती. सर, तुमच्या सरकारमधील होम सेक्रेटरी राघव गुप्ते आणि आणखी तीन बडे अधिकारी घुलेच्या संपर्कात होते. तुमच्या सरकारच्या विसर्जनाचा मुहूर्त निघाला होता आणि तयारीही झाली होती. भांबरेने तिसरा पेग संपवून ग्लास खाली ठेवला.

विश्वासभाऊंना त्या वातानुकूल दालनात घाम फुटला होता. संतापाने ते समोरील टेबलवर आपली नखं घासत होते. त्यांच्या पोटातील दारू त्यांच्या संतापलेल्या डोळ्यात उतरली होती. सर, या घुलेच्या आश्रमात तुमच्या मंत्रिमंडळातील दिनकरभाईंसह अन्य मंत्री, काही सनदी अधिकारी, उद्योगपती, बॉलिवूड हस्ती, बिल्डर, व्यापारी यांच्या सेक्स स्कँडलचे शेकडो व्हिडीओ आम्हाला मिळालेत. त्यात या घुलेच्या रासलीलांचेही व्हिडीओ आहेत. त्याचे हे पेन ड्राइव्ह तुमच्याकडे ठेवा. मुंबईसह महाराष्ट्रातील किमान दीडेकशे हुज हू तुमचे कायम मिंधे राहतील. तुम्ही फक्त ‘लावू का व्हिडीओ’ म्हणायची खोटी. पँटीत मुततील... भांबरे गडगडाटी हसला. पेन ड्राइव्ह हातात पडताच विश्वासभाऊंचा चेहरा खुलला. सर, पण हे व्हिडीओ घुलेने नाही काढलेत. घुले लोकांना आश्रमात बोलवायचा. मांडवल्या करून द्यायचा. हवालामार्फत पैसे फिरवायचा, मनी लाँड्रिंग करायचा, सुपाऱ्या वाजवायचा. पण हे व्हिडीओ काढण्याची कल्पना त्याची नाही. सर, तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुमचा माधव जोशी हाही घुलेच्या सतत टचमध्ये होता. राजाध्यक्ष बाईची मुलगी अर्चना आणि माधव यांचे अफेअर सुरू असल्याची तुम्हाला कल्पना आहे? विश्वासभाऊंनी नकारार्थी मान हलवली. याच माधव आणि अर्चनाने या साऱ्यांच्या सेक्स क्लिप रेकॉर्ड केल्या आणि ते या लोकांना ब्लॅकमेल करून कामं वाजवत होते. घुलेने कबुली दिल्यावर आम्ही माधवला उचललाय. त्याने सारे ओकलंय. पक्षासोबत आयुष्यभर निष्ठा राखून काय मिळाले? ना पद, ना पैसा. अर्चनाने हा मार्ग दाखवला माधवला. दिनकरभाई आणि नयना राजाध्यक्ष यांच्यात साटेलोटे घडवणारा हा तुमचा माधवच आहे. भांबरे बोलत असताना विश्वासभाऊ टेबलवर नखं रुतवून ओरबाडत होते. कुठल्याही क्षणी त्यांचा लालबुंद चेहरा फुग्यासारखा फुटेल, असे वाटत होते. सर, घुलेवर तर वेगवेगळ्या कलमाखाली केस दाखल केल्यात. तो आता आयुष्यभर जेलमध्ये सडेल. पण माधवचे काय?

एनकाऊंटर कर त्या भडव्याचं. आज रात्रीच. विश्वासभाऊ अत्यंत निर्विकारपणे बोलले. भांबरे उठून निघून गेला. रात्रीच्या अंधारात वर्षा बंगला सूडाने पेटलेल्या जखिणीसारखी भासत होती.

सकाळच्या वेळी माहीमच्या खाडीत एक मृतदेह सापडल्याची ब्रेकिंग न्यूज झळकली... मृतदेहाची ओळख माधव जोशी अशी पटली असून ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते... जोशीच्या मृत्यूकरिता अर्चना राजाध्यक्ष या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे... अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. जोशीच्या आकस्मिक मृत्यूची चौकशी करण्याकरिता सरकारने संकेत भांबरे यांची एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे... मंत्रिमंडळाच्या बैठकीकरिता विश्वासभाऊ आणि दिनकरभाई आज दीर्घकाळानंतर समोरासमोर येणार होते...