

महेश्वरी
डॉ.महेश केळुसकर
मराठी साहित्यक्षेत्र दीर्घकाळ शांत आणि निष्क्रिय वाटत असताना, साताऱ्यात झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वाद, राडे आणि राजीनाम्यांनी ही शांतता अचानक भंग केली.
मराठी साहित्यक्षेत्र बरेच दिवस शांत आणि निवांत होतं. इतकं निवांत की, निपचित पडलेलं आहे असं वाटावं. पण सातारा इथं विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ९९व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात जे राडे झाले ते अजून गाजत आहेत आणि त्याचवेळी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मार्गदर्शक मंडळाच्या सदस्यांनी आपल्या पुरोगामीपणाचा डंका पिटत दिलेले राजीनामेसुद्धा चर्चेचा विषय झाले आणि अजून चर्चेत आहेत.
विश्वास पाटील हे मर्द मराठी लेखक असल्याने त्यांचा सगळा मामला रोखठोक असतो आणि आपण जे बोलतो त्याची जबाबदारीही ते घेतात. त्यांनी बोलता बोलता, कुलकर्णी आणि जोशींनी साहित्य संमेलनाचा गावगाडा सुधारण्यासाठी पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी केली अशा अर्थाचं विधान केलं आणि एकच गदारोळ उडाला. पाटलांच्या विरोधात असलेल्या एका गटाने पाटील जुन्या गावगाड्याचं समर्थन करत आहेत अशी ओरड केली. पण त्याला जबाब देताना आपण केलेलं विधान विनोदी अंगाने घ्यावं, असं पाटलांचं म्हणणं पडलं. कुठल्याही जुन्या गावगाड्याचं समर्थन आपण करत नाही तर नेहमी ग्रामीण वंचित आणि अभावग्रस्त लोकांच्या बाजूनं आपण प्रत्यक्ष जीवनात आणि साहित्यातही उभे राहिलेले आहोत असं अनेक उदाहरणं देऊन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
या साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासून ३ जानेवारी रोजी संदीप जाधव नावाच्या 'प्रज्ञा सूर्य' संस्थेच्या अध्यक्षाने राडा केला. शाहूपुरी पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विनोद कुलकर्णी हे साहित्य संमेलनाच्या नियोजित प्रकाशन कट्ट्यावरचा कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून खाली येत असतानाच 'प्रज्ञा सूर्य' सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव याने त्याच्याजवळील काळ्या रंगाची पावडर विनोद कुलकर्णी यांच्या तोंडावर टाकली. त्या पावडरमुळे विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्याला जळजळ होऊ लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संमेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. परंतु प्रसंगावधान राखत तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जाधव याला ताब्यात घेत त्याची पोलीस ठाण्यात रवानगी केली. विशेष म्हणजे संशयित संदीप जाधव याने कुलकर्णी यांच्यावर काळी पावडर फेकल्यानंतर संमेलन स्थळावरच 'जय जवान जय किसान' म्हणत तिथेच राष्ट्रगीत गायला प्रारंभ केला. हिंदी भाषा सक्ती आणि साहित्य क्षेत्रामध्ये राजकारणाचा हस्तक्षेप असू नये अशा दोन मुद्द्यावर माझी संघर्षाची भूमिका आहे आणि ती काहींना मान्य नसावी, म्हणून हा हल्ला झाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.
शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात केली. राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये आणि मराठी सक्ती असावी याचा पुनरुच्चार करत जोशी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबईत विशेष विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होणाऱ्या पुढच्या संमेलनात सर्व माजी अध्यक्षांना महादजी शिंदे यांच्या नावे एक लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत असल्याची घोषणा भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी या व्यासपीठावरून जाहीर केली. याशिवाय संमेलनासाठी ग. दि. माडगूळकर यांच्या नावे निधी जाहीर केला. यावेळी साहित्य परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहा वर्षापूर्वी मागितलेल्या ५० लाखाच्या रक्कमेत भर टाकून एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावरून असं दिसतंय की, संमेलनाचा गावगाडा सुधारण्यासाठी यापुढेही राजकीय मदत घ्यावी लागणार. हे असंच चालू राहणार. म्हणजे एकीकडे संमेलनाचे पदाधिकारी राजकारण्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ नये असं म्हणणार आणि त्याचवेळी त्यांच्याकडून मोठमोठ्या देणग्यांची अपेक्षा करणार आणि त्या वसूल करणार. महामंडळाचे अध्यक्ष जोशी असोत की कोषाध्यक्ष कुलकर्णी यांनी यापुढे साहित्य संमेलनासाठी आम्ही राजकीय पक्षांकडे किंवा सरकारकडे जाणार नाही असं म्हटलेलं नाही. शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तर जास्तीत जास्त निधी जमवण्याचा चंग महामंडळांनं बांधलेला असणार आणि त्यात काही तशी चूकही नाही. पण उगाचच तत्त्वनिष्ठेचा आव आणून राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, आम्ही ते सहन करणार नाही अशा पोकळ वल्गना करण्यात मतलब नाही. साहित्य संमेलनासाठी शासन मोठी देणगी देतं म्हणजे काय आमच्यावर उपकार करतं काय? ते पैसे जनतेने दिलेल्या करामधूनच दिले जातात. ते सरकारचे स्वतःचे थोडेच असतात? अशी बालिश मांडणी बऱ्याच वेळा केली जाते. पण वास्तवामध्ये, व्यवहारामध्ये, पैसे देणारा आणि पैसे घेणारा यांच्यात जे उच्च नीच असं नातं असतं तेच शासन आणि महामंडळ यांच्यात असतं. मराठी साहित्याच्या आणि भाषेच्या कार्यकर्त्यांनी आज तारखेला याची नोंद करून ठेवावी की शंभराव्या साहित्य संमेलनाच्या वेळी मंचावर आजपर्यंत कधीही झाली नाही अशी राजकीय गर्दी तुम्हाला दिसेल.
संमेलनकाळाच्या दरम्यान मराठी साहित्य क्षेत्रात आणखी एक मोठी घडामोड झाली ती म्हणजे राजीव नाईक, नितीन रिंढे, गणेश विसपुते आदी लेखकांनी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मार्गदर्शक मंडळाचा राजीनामा दिला. तो देताना सुप्रिया सुळे यांना जे पत्र या लेखकांनी पाठवलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या वैचारिक भूमिका गोंधळाचे प्रातिनिधिक चित्र म्हणावं लागेल. शरद पवारांना जे लोक ओळखतात त्यांना, त्यांचं राजकारण आणि उद्योगपतींशी असलेले संबंध पूर्वीपासून माहीत असतात. या मार्गदर्शक मंडळालाही ते अगदी कालपरवाच कळले आणि मग त्यानी बाणेदारपणे राजीनामे दिले, असं म्हणता येणार नाही. पवारांचे मुकेश अंबानी, विजय मल्ल्या, सुब्रतो राय यांच्याशीही पूर्वीपासून संबंध होते. मग गौतम अदानींचं त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बारामतीत स्वागत केलं, म्हणून लगेच शरद पवार हे हिंदुत्ववादी विचारधारेला शरण गेले,असा तर्क लावून राजीनामा देऊन मोकळं होण्यामुळे असा काय मोठा पुरोगामीपणा सिद्ध होणार! ( पीवर शंभर नंबरी पुरोगामी ही प्रजाती जवळ जवळ नष्ट झालेली आहे.)
मराठी साहित्याला गटातटांचं राजकारण आणि वशीलेबाजांचे चढ-उतार काही नवीन नाहीत. पण अशा वातावरणात कधी कधी 'गालिब हमे न छेड' यासारखे कार्यक्रम पाहण्याचा- ऐकण्याचा योग येतो आणि मनावरचं सावट दूर होतं. जाती-धर्मापलीकडचं माणुसकीचं तत्त्वज्ञान सांगत गझला लिहिणाऱ्या गालिब सारखा महाकवीचं जीवन चरित्र उलगडून दाखवणारा कार्यक्रम समीर सामंत यांनी लिहिला आहे. त्यात नाट्य आहे, संगीत आहे आणि ज्ञान आहे.
स्वतः समीर सामंत आणि ज्येष्ठ अभिनेते प्रसाद आठल्ये हे आपल्या उर्दू प्रचुर निवेदनामधून गालिबची जीवन कहाणी वाहती ठेवतात. काही नाट्यमय प्रसंग बसल्या बसल्या आपल्या स्वराभिनयातून आणि मुद्राभिनयातून सादर करून वाहवा मिळवतात. गायत्री सप्रे-ढवळे आणि शौनक कुलकर्णी यांच्या गळ्यामधून गालिबच्या गझला सुरेल होऊन रसिकांसमोर पेश होतात. सगळे वादक कलाकार आणि प्रकाश योजनाकार या कार्यक्रमाला उंचीवर नेऊन ठेवतात. अलीकडेच गोरेगावच्या नंदादीप विद्यालयात हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला आणि हा आनंद तुमच्याशी वाटून घ्यावा असं वाटलं म्हणून हे सांगितलं. ज्ञान, माहिती आणि रंजन हेच या सदराचं प्रयोजन आहे. आता भेटू पंधरा दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार!
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com