मिले सूर मेरा तुम्हारा

मालकीणबाई या नेमक्या कोण आहेत? असा प्रश्न एकदा मार्गारेट मनीमावशीस पडला. तिने तो रॉबिन्सन उंदीरमामाच्या पुढ्यात टाकला. हा प्रश्न ऐकून रॉबिन्सन बेशुध्दच पडला. ते बघून मावशी कावरीबावरी झाली. नेपोटल्या डॉगीलाही न घाबरणारा मामू एका क्षुल्लक प्रश्नामुळे बेशुध्द पडतो म्हणजे काय? तिने आभाळाकडे बघितलं. डोळे मिटले.
मिले सूर मेरा तुम्हारा
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाई या नेमक्या कोण आहेत? असा प्रश्न एकदा मार्गारेट मनीमावशीस पडला. तिने तो रॉबिन्सन उंदीरमामाच्या पुढ्यात टाकला. हा प्रश्न ऐकून रॉबिन्सन बेशुध्दच पडला. ते बघून मावशी कावरीबावरी झाली. नेपोटल्या डॉगीलाही न घाबरणारा मामू एका क्षुल्लक प्रश्नामुळे बेशुध्द पडतो म्हणजे काय? तिने आभाळाकडे बघितलं. डोळे मिटले. आपली कुलदैवता कॅटुलेश्वरीची प्रार्थना केली. मामूला काहीही होऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना केली.

ही प्रार्थना संपेत न संपते तोच रॉबिन्सन शुध्दीवर आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अविश्वास दिसत होता. त्याने हळूच मावशीच्या मिशीला उजवा पाय लावला. मग डावा पाय लावला. तिच्या पाठीमागे जाऊन शेपटीला चावा घेतला. रॉबिन्सनचं हे वागणं बघून मावशीला आश्चर्य वाटलं. तिने त्याला आपल्या जवळ घेत प्रेमानं विचारलं,

“रॉबू डिअर, अरे तू असा कसा बेशुध्द पडलास? माझा तर जीवच जाता जाता राहिला. आता शुध्दीवर आलास तर हे असं वेड्यासारखं वागणं. काय रे झालं तुला?”

“मावशे मावशे, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. काय ग झालं तुला?”

“म्हणजे?”

“मावशे, अगं, प्रश्न मला पडला पाहिजे, तुला नाही. मालकीणबाईंबद्दल प्रश्न तू माझ्या पुढ्यात टाकला. मग मी बेशुध्द पडणार नाही तर काय? तरी बरे मी जिवंत राहिलो.”

“खरच की.” मावशी म्हणाली. तिला आपली चूक उमगली. तिने मामाला ‘सॉरी’ म्हटलं.

“इट्स ओके मावशे, पण तुला हा प्रश्न पडला तरी का?”

“अरे रॉबू, या मालकीणबाई दुष्ट आहेत, भांडकुदळ आहेत, तुला-मला शिव्या देण्यात एक्स्पर्ट आहेत, छोट्या मुलांना गोष्टी सांगणाऱ्या आहेत, खादाड्या आहेत, झोपेत चालणाऱ्या आहेत, शिवाय अधूनमधून त्या लाकडाची नळी ओठांना लावून फुंकत बसणाऱ्या आहेत.”

“लाकडाची नळी? पण ही नळी जेव्हा मालकीणबाई तोंडाला लावतात, तेव्हा त्यातून किती छान संगीत कानावर पडतं. माझी तर ब्रम्हानंदी टाळीच लागते. काय रहस्य असेल बरं त्या नळीचं?” मामाने उत्सुकतेनं विचारलं.

“अरे, त्या नळीला हे मनुष्यप्राणी बासरी म्हणतात. मालकीणबाईंच्या ओठाला ही बासरी लागली की संगीताचे मधूर मधूर सूर बाहेर पडतात नि तुझ्यासारखीच मी हरखून जाते. म्हणूनच मला प्रश्न पडला रे, त्या बॉ नेमक्या आहेत तरी कोण?”

“मावशे, या बासरी का फासरीत मन प्रसन्न करणारे सूर असतात, हे मालकीणबाईंना कळलं कधी असेल ग?” आता रॉबिन्सनने मावशीच्या पुढ्यात प्रश्न टाकला. मावशीचे डोळे चकाकले. तिने कॅटुलेश्वरीदेवीचं स्मरण केलं नि तिच्या मेंदुला या प्रश्नाच्या उत्तरात दौडवायला सुरुवात केली.

तिच्या लक्षात आलं की मालकीणबाई जशा बासरी वाजवतात, तसंच त्यांच्यासारख्या इतर मनुष्यप्राण्यास हार्मोनियम, सतार, सरोद, तबला, ढोलक, बासरी, मृंदग, शहनाई अशी कितीतरी वाद्ये वाजवता येतात. हे मावशीने मामूच्या लक्षात आणून दिलं.

“मावशे, ही सगळी वाद्ये कशी काय, हा मनुष्यप्राणी वाजवू शकतो ग?”

“अरे, ती आहे वादनकला. हा मनुष्यप्राणी मोठ्ठाच कलाकार असल्याने त्याने ही कला शोधली.”

“हो का, पण त्याने ही कला कधी शोधली असेल ग?”

“वाव, दुसरा प्रश्न. याचा शोध घेतला पाहिजे.” मावशी आनंदून म्हणाली. तिने पुन्हा मेंदुला दौडवलं.

तिला दिसलं की जर्मनी नावाच्या राष्ट्रातील ट्यूबिन्गन विद्यापीठातील पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासकांना २००८ साली स्वाबियन ज्युरा भागातील होहल फेल्स या गुहांमध्ये तीन बासऱ्या मिळाल्या. याच गुहेत व्हीनस नावाच्या देवतेचं शिल्पही त्यांना मिळालं.

“मावशे या बासऱ्यांचा काळ-फाळ या उपदव्यापी माणसांनी शोधलाच असेलना?”

“हो ना, अरे या बासऱ्या ३५ हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजे अप्पर पॅलिओलिथिक (वरचे पुराश्यमयुग) काळातील असल्याचा पुरावा त्यांना आढळला.”

“ओ माय रॅटुलेश्वर! काय ग मावशे, या व्हिनस देवतेची मूर्ती आणि बासरीचा काही संबंध असेल का ग?”

“या देवतेची आराधना करण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी या बासरीचा उपयोग मनुष्यप्राण्याने कदाचित केला असेल.”

“फारच भारी.”

“भारी म्हणजे या मनुष्यप्राण्याचं सारंच काही लयभारी असतं. अरे, या संशोधकांनी शोधलेली एक २० सेंटिमीटर लांबीची बासरी ग्रिफिन जातीच्या गिधाडाच्या पंखाला स्ट्राँग करणाऱ्या हाडापासून बनलेली होती. तिच्यावर पाच छिद्रं होती. दुसरी बासरी होती हत्तीच्या दातापासून बनवलेली. तो हत्तोबा कोण होता, ठाऊकाय का तुला?”

“कोण होता ग?”

“अरे आत्ताचा, आपला जो ‘हाथी मेरे साथी’ आहे ना, त्याचा अतिमहाकाय पूर्वज असलेल्या मॅम्मथचे ते दात होते.”

“बापरे!”

“या मनुष्यप्राण्याने अशा हस्तीदंताच्या आठ बासऱ्या शोधून काढल्या. त्यामुळे संगीतकलेचा उदय ४० ते ५० हजार वर्षांपूर्वी झाल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला.”

“मावशे मावशे, हे सगळे या रिकामटेकड्यांचे उद्योगच नाहीत का ग?”

“रॉब्या, मनुष्यप्राणी रिकामटेकडा असेल तर आपणतूपण काय कमी रिकामटेकडे आहोत. पण आपल्याला कुठे शोधता आलं असं काही? मनुष्यप्राणी आपल्यातुपल्यानंतर या पृथ्वीवर जन्मला. पण तो असे वेगवेगळे उपद्व्याप करत राहिला नि त्यातून संगीतकला त्याला अवगत झाली. तो वेगवेगळ्या प्रसंगासाठी, सणांसाठी, उत्सवांसाठी वेगवेगळी वाद्ये वाजवू लागला. नवी नवी संगीत वाद्ये त्याने शोधली.”

“मावशे, एक मात्र खरं की, मालकीणबाई जेव्हा बासरी वाजवतात तेव्हा किती प्रेमळ नि एखाद्या देवीसमानच भासतात. आपल्या पाठीमागची कटकट कमी होण्यासाठी त्या दिवसरात्र बासरी वाजवत बसू दे, अशी तू कॅटूलेश्वरीस नि मी रॅटूलेश्वरास प्रार्थना करुया कां ग?”

“गधड्या, त्या जर अशा वाजवत बसल्या तर मग वेगवेगळे पदार्थ कोण करणार? त्यांच्या खादाडीवरच तर आपल्या पोटातील कावळोबा शांत शांत होतोना. नाही तर तो सारखा ‘भूकराग’ आवळणार आपल्या पोटात, त्याचं काय?” मामाची मिशी ओढत मावशी म्हणाली.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in