चंद्राची 'कला' कारी!

मालकीणबाई रात्री झोपायला गेल्यावर मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, दोघेही हळूच एका अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून बाहेर पडून गच्चीवर जात. दोघांनाही आकाश बघायला फार आवडायचं.
चंद्राची 'कला' कारी!
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाई रात्री झोपायला गेल्यावर मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, दोघेही हळूच एका अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून बाहेर पडून गच्चीवर जात. दोघांनाही आकाश बघायला फार आवडायचं. आकाशातल्या चमचमत्या ताऱ्यांपेक्षा दोघांनाही चांदोबा फार आवडायचा. चांदोबाकडे टक लावून बघितलं की रॉबिन्सनला त्याच्यावर एक हरीण दिसायचं. या हरणासारखंच आपल्याला चांदोबाकडे जाता आलं तर काय मज्जा येईल ना, असं रॉबिन्सन, मार्गारेट मावशीला म्हणालासुद्धा. यावर मावशी हसली नि तिने मामाची मिशी हलकेच ओढली.

“चुकलं का मावशे माझं?”

“नाही रे, मी हसले यासाठी हा चांदोबाफिंदोबा मला जरा बिलंदर आणि इब्लिस वाटतो.”

“आपल्यापेक्षासुद्धा अधिक?” मामा चांदोबाकडे डोळे फाडून बघत म्हणाला. तो चांदोबाला निरखून बघू लागला. स्वत:भोवती गिरकी घेत त्याने चारही बाजूंनी चांदोबाला न्याहाळलं, पण कोणत्याच कोनातून तो काही बिलंदर नि इब्लिस वाटला नाही त्याला. मार्गी आपल्याला उल्लू बनवतेय हे त्याच्या लक्षात आलं.

“मावशे, मला तर हा चांदोबाफांदोबा जराही इब्लिस वाटला नाही. माझ्या डोळ्यांची नजर कमी झाली की काय?”

“राब्या, तुला आज ते कळायचं नाही. पण पुढच्या आठ दिवसांत तुला कळेल सारं.” मावशी म्हणाली. थोडा वेळ पुन्हा चंद्रतारे बघून दोघेही घरी परतले. पुढचे आठ दिवस ठरलेल्या वेळी मार्गारेट मावशी रॉबिन्सनला गच्चीवर घेऊन जायची. चंद्राचं बारकाईनं निरीक्षण करायला सांगायची. तेव्हा रॉबिन्सनच्या लक्षात आलं की, हळूहळू चंद्राचा आकार कमी होत चाललाय. आठव्या दिवशी तो अर्धाच दिसू लागला आणि पंधराव्या दिवशी तो दिसलाच नाही.

“आँ, हा कसला चमत्कार मावशे. की यालाच तू याचा इब्लिसपणा म्हणालीस?” मामाने विचारलं.

“हा या चांदोबाफांदोबाचा इब्लिसपणा असला तरी मनुष्यप्राण्याने याला ‘चांदोबाच्या कला’ असं लाडाचं नाव दिलंय.”

“म्हणजे मनुष्यप्राण्याला यात शास्त्राचं गणित की गणितातलं शास्त्र दिसलं? बापरे बाप! उडतोय माझा थरकाप!”

“अरे थरकाप्या! चांदोबाची इब्लिसगिरी म्हण, कलाकारी म्हण, ती समजून घेतलीस तर तुझ्या ज्ञानात भर पडेल. सुपर इंटेलिजंट मावशीचा भाचा ‘ढ’ राहून चालेल का तुला?”

“असं कसं चालेल?”

“मग सांगू का?”

“सांग की”, मामा आळस देत म्हणाला.

“राब्या, हा चांदोबा आणि आपल्या पृथ्वीची एक गंमत आहे.”

“एवढा त्यांच्याकडे वेळ असतो?”

“गमतीसाठी वेळ काढतात रे ते बरोबर.”

“अच्छा, कोणती बरं ही गम्म‍ाडी गंमत, जम्माडी जंमत!”

“हे दोघेही सूर्याभोवती फिरत असताना स्वत:भोवतीही गिरकी घेतात. हा चांदोबा तर स्वत:भोवती फिरतोच, पण पृथ्वी आणि सूर्याभोवतीही फिरतो.”

“फिर फिर फिरण्याचा फार अनुभव दिसतो गड्याला.”

“त्यातूनच तर त्याच्या ‘कला’ घडू लागतात.”

“ते कसं?”

“अरे, या दोघांच्या प्रदक्षिणांमुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या परस्परांमधील स्थानांमध्ये कायम फरक पडत राहतो.”

“अच्छा.”

“पृथ्वीच्या स्वत:भोवती आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामध्ये म्हणजे फिरण्यामध्ये बराच फरक आहे.”

“तो कसा?”

“पृथ्वीला स्वत:भोवती फिरायला २४ तास लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष लागतं.”

“पण याचा आणि चंद्राच्या कलाकारीचा काय सबंध?”

“चंद्राला पृथ्वीभोवती आणि स्वतःभोवती फिरायला सुमारे २७.३ दिवस लागतात. यास ‘सिडेरिअल कालावधी’ म्हणतात. मात्र आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या कलांचा पूर्ण फेरफटका सुमारे २९.५ दिवसांनी होतो. याला ‘सिनॉडिक कालावधी’ म्हणतात.”

“त्यामुळे काय होतं?”

“त्यामुळे चांदोबाची एकच बाजू आपल्याला दिसते. त्याच्या पृष्ठभागाचा अर्धा हिस्सा कोणत्याही क्षणी सूर्याच्या दिशेने असतो. त्यामुळे तो प्रकाशलेला असतो.”

“पण यात त्याच्या कलेचा काय संबंध?”

“चांदोबाचा स्वत:भोवती व पृथ्वीभोवती फिरण्याच्‍या जवळपास समान कालावधीमुळे सूर्यकिरणांनी उजळलेला त्याचा संपूर्ण भाग पृथ्वीवरून दिसत नाही.” “मग, पंधरा दिवसांपूर्वी कसा काय तो पूर्ण उजळलेला दिसला?”

“त्या दिवशी पौर्णिमा होती.”

“त्याचं काही वेगळं गणित आहे का?”

“पाैर्णिमेच्या दिवशी पृथ्वीकडे असणारा चांदोबाचा पूर्ण प्रकाशमान भाग आपणास दिसतो. त्यानंतर तो प्रत्येक दिवशी जागा बदलून पृथ्वीभोवती फिरू लागतो, तेव्हा पृथ्वीच्या दिशेने असणाऱ्या त्याच्या भागापैकी काही भाग सूर्यकिरणांनी उजळतो. पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असलेला त्याचा उर्वरित उजळलेला भाग दिसत नाही. त्या भागाचा काही अंशच आपण बघू शकतो. हा भाग पूर्ण वर्तुळातून कमी कमी होत जातो. अमावस्येला चांदोबाचा प्रकाशमान भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने असल्याने तो आपल्याला दिसत नाही.”

“चांगलीच कलाकारी दाखवतो म्हणायचा हा चांदोबा.”

“हो ना, पौर्णिमेच्या पूर्ण प्रकाशित चंद्रापासून ते अमावस्येच्या अंधारलेल्या चंद्रापर्यंतच्या काळात आपणास चांदोबा वेगवेगळ्या स्थितीत दिसतो. त्यालाच या ‘कला’ म्हणतात. अष्टमीला तो बरोबर अर्धा दिसतो. नंतर प्रत्येक दिवशी त्याचा आकार लहान लहान होतो, त्याला ‘कोर’ म्हणतात.”

“वाव, इब्लिस चांदोबाच्या कोरी, दिसतात लय भारी, म्हणून तर हरणाने केली नसेलना त्याच्यावर स्वारी.” मामाने चांदोबाकडे बघत कविताच केली. मावशी खुदकन हसली. तेवढ्या वेळात चांदोबाने ढगांसोबत लपाछपीचा खेळ सुरु केला होता. दोघांनीही चांदोबाला या खेळासाठी ‘बेस्ट लक’ म्हणून शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in