सागरातील अद्भूत दुनिया - भाग २

गेल्या आठवड्यात आपण सागरतळाशी राहणाऱ्या काही अनोख्या जीवांची ओळख करून घेतली होती. त्यापेक्षा वेगळे जलचर म्हणजे सागरी सस्तन प्राणी.
सागरातील अद्भूत दुनिया
सागरातील अद्भूत दुनिया (Photo-@unsplash)
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

गेल्या आठवड्यात आपण सागरतळाशी राहणाऱ्या काही अनोख्या जीवांची ओळख करून घेतली होती. त्यापेक्षा वेगळे जलचर म्हणजे सागरी सस्तन प्राणी. सागरी सस्तन प्राणी म्हणून जो मोठा गट तयार झालेला आहे त्यातही कायम पाण्यात राहणारे आणि अर्ध जलचर असे दोन उपविभाग आहेत. सुमारे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी सिटाशियन म्हणजे व्हेल, डॉल्फिनसारखे सस्तन प्राणी सागराचे रहिवासी बनले, तर सिल, सी लायन्ससारखे पिन्निपिडिया गटाचे सभासद असलेले सागरी सस्तन प्राणी अर्ध जलचर मानले जातात, कारण त्यांना विणीसाठी जमिनीवरच यावे लागते.

आपल्याला पाण्यातले सगळेच असे प्राणी मासे वाटतात आणि म्हणून तर मराठीमध्ये व्हेलसाठी ‘देवमासा’ हे नाव रूढ झालेले पाहायला मिळते. पण सागरातील महाकाय म्हणून ओळखला जाणारा व्हेल हा मासा नसून सस्तन प्राणी आहे. व्हेल्सचे वर्गीकरण- दात असलेले आणि दातांऐवजी ‘बलीन’ असलेले अशा दोन गटांमध्ये केले जाते. व्हेल्स हे जलचर असल्याने ते खोल समुद्रात राहतात, तिथेच आपले भक्ष्य मिळवतात, तिथेच त्यांची वीण होते आणि आपल्या पिल्लांना ते वाढवतात. समुद्रातल्या व्हेल्सचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये आकाराने सर्वात लहान असलेला म्हणजे ड्वार्फ स्पर्म व्हेल जो साधारण साडेआठ फूट लांब असतो, वजन १३५ किलो असतं, तर सर्वात मोठा व्हेल- जो पृथ्वीवरचा सर्वात मोठा जीव मानला जातो तो म्हणजे ब्लू व्हेल जो साधारण ९८ फूट लांब आणि २१० टन वजनाचा असतो त्यांचा समावेश होतो. व्हेल्स हे जमिनीवरच्या सस्तन प्राण्यांमधूनच उत्क्रांत झाले आहेत. त्यामुळे कायम पाण्यात राहात असले तरी त्यांना श्वसनासाठी वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतंच. मात्र काही जातींचे व्हेल जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात, जसे स्पर्म व्हेल्स पाण्याखाली ९० मिनिटे राहू शकतात. व्हेल्सना श्वासोच्छ्वास करण्यासाठी डोक्यावर नाकपुडीसारखी छिद्रे असतात. सागराच्या पृष्ठभागापर्यंत येऊन व्हेल्स या ब्लो होल्समधून हवा बाहेर टाकतात आणि आत घेतात, या प्रक्रियेत पाण्याचा उंच फवारा उडताना पाहायला मिळतो. व्हेल्स वेगवेगळे ध्वनी काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे आवाज ते याच ब्लो होल्सच्या मदतीने काढत असावेत. हम्पबॅक जातीचे व्हेल्स तर गाणारे जलचर म्हणून ओळखले जातात. नर हम्पबॅक व्हेल्स सुमारे वीस मिनिटे अशी गाणी म्हणतात आणि त्याच्या सुरावटी-त्यातील भाव वेगवेगळे असतात असे आढळून आले आहे.

व्हेल्सच्या एकूण आकाराच्या तुलनेने त्यांचे डोळे लहान आकाराचे असतात, मात्र ते डोक्याच्या दोन बाजूला असल्याने व्हेल्सना एकाचवेळी दोन्हीकडचे पाहाता येते. दात असलेल्या व्हेल्सना घ्राणेंद्रिय नसते. त्यामुळे वास कळत नाही, तर बोहेड व्हेल्ससारख्या काही जातींमध्ये टाळूच्या ठिकाणी असलेल्या ग्रंथींमुळे वासाचे ज्ञान असते. व्हेल्समध्ये स्थलांतराची प्रवृत्ती पाहायला मिळते. व्हेल्स प्रामुख्याने दोन कारणांसाठी स्थलांतर करतात, एकतर अन्नासाठी आणि दुसरं म्हणजे प्रजोत्पादनासाठी. हम्पबॅक व्हेल्स हे सर्वात दीर्घ पल्ल्याचे स्थलांतर करताना आढळून आले आहेत. ते अगदी ८००० किलोमीटरचा पल्लाही स्थलांतर करताना पार करतात.

बो हेड व्हेल, राइट व्हेल, ब्लू व्हेल, फीन व्हेल, ग्रे व्हेल, हम्पबॅक व्हेल, पिग्मी किलर व्हेल, ओर्का (किलर व्हेल), बेलुगा व्हेल इ. सुमारे वीस वेगवेगळ्या प्रकारचे व्हेल्स जगभरातल्या समुद्रात पाहायला मिळतात. व्हेल्स झोपतात का? तर प्राणिसंग्रहालयातील व्हेल्सच्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की व्हेल्स मेंदूचा काही भाग ठराविक काळासाठी बंद करून झोप (विश्रांती) घेतात. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणेच व्हेल आया आपल्या पिल्लांना दूध पाजून वाढवतात. पिल्लांची वाढ विशेषतः त्यांच्या त्वचेखालचा ‘ब्लबर’(चरबी)चा थर झपाट्याने वाढावा म्हणून व्हेल माद्यांच्या दुधात फॅट्स म्हणजे स्निग्धाशांचे प्रमाण इतके जास्त असते, की व्हेलचे दूध टुथपेस्टप्रमाणे दाट असते.

सागरी जीवसृष्टीतील काही कोटी वर्षांपूर्वी उत्पन्न झालेल्या काही कणाहीन म्हणजे इनव्हर्टिब्रेट गटातल्या भिडूंची रचनाच अशी आहे की ते प्राणी आहेत की वनस्पती? असा संभ्रम पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे स्पॉन्ज. वनस्पतींप्रमाणेच स्पॉन्ज एकाच जागी राहात असले आणि वनस्पतींप्रमाणेच त्यांना हात-पाय, नाक-तोंड नसले तरीही स्पॉन्ज हे काही वनस्पतींच्या गटातले नाहीत तर ते प्राणीच आहेत. कारण ते वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि अन्य प्राण्यांप्रमाणेच ते बहुपेशीय (मल्टिसेल्युलर) आहेत. त्यामुळे दिसायला एखाद्या नळकांड्यासारखे असणारे स्पॉन्ज हे कणाहीन म्हणजे इनव्हर्टीब्रेट्स गटातले प्राणीच आहेत.

स्पॉन्ज जगभरात सर्वत्र म्हणजे ध्रुवीय समुद्रांपासून ते उष्ण कटिबंधातील सागरांपर्यंत सगळीकडे पाहायला मिळतात. समशितोष्ण कटिबंधातील स्पॉन्ज काही वर्षेच जगतात, मात्र उष्ण कटिबंधातल्या खोल समुद्रातले काही स्पॉन्ज २०० वर्षे जगतात असे आढळून आले आहे. स्पॉन्ज सच्छिद्र असतात, याच छिद्रांच्या मदतीने स्पॉन्ज सतत समुद्राचे पाणी आत घेतात आणि बाहेर सोडतात. आपल्या तळाच्या भागातून ते पाणी आत घेतात आणि वरच्या भागातील ‘ऑस्कलम’ म्हणजे तोंडाच्या ऐवजी असलेल्या लहान भोकातून पाणी बाहेर टाकतात. जर पाण्यात गाळ, वाळू याचे प्रमाण जास्त झाले तर ते पाणी अजिबात आत घेत नाहीत. या पाण्यामधूनच ते ऑक्सिजन आणि आपले अन्न मिळवतात. समुद्रतळाच्या खडकांना चिकटून असलेले स्पॉन्ज प्रामुख्याने बॅक्टेरिया खाऊन जगतात आणि त्या जोडीला सागराच्या पाण्यातील मायक्रोस्कोपिक अन्न ग्रहण करतात. जगभरातील समुद्रांमध्ये मिळून स्पॉन्जचे सुमारे दहा हजार प्रकार आढळतात. स्पॉन्जचे शरीर आतून पोकळ असते. त्यांना जो आकार मिळालेला असतो तो मेसोहिल या जेलीसारख्या पदार्थामुळे आलेला असतो. सगळे स्पॉन्ज आपला आकार बदलू शकतात, कारण त्यांच्या शरीरातील पेशी आतल्या आत जागा बदलू शकतात, काही पेशी तर त्यांचे परिवर्तन एका प्रकारच्या पेशीतून दुसऱ्या प्रकारातही करू शकतात. स्पॉन्जचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या शरीराचा एखादा भाग तुटला तर तो नव्याने निर्माण करू शकतात. जेव्हा भोवतालचे वातावरण, परिस्थिती जगण्यासाठी अनुकूल नसते तेव्हा काही प्रकारच्या स्पॉन्जमध्ये ‘सर्व्हायवल पॉड्स’ म्हणजे भविष्यात पुन्हा जिवंत होतील अशा गाठी तयार केल्या जातात, वातावरण प्रतिकूल असेपर्यंत या पॉड्स निद्रिस्त असतात. मात्र वातावरण अनुकूल झाले की त्यातून नवीन स्पॉन्ज निर्माण होतात किंवा जुन्या स्पॉन्जच्या सांगाड्यातूनच ते आपला जीवनक्रम सुरू करतात.

सागराच्या तळाशी वास्तव्य करणारी जीवसृष्टी खरोखरच वैविध्यपूर्ण आणि अजब आहे. कोटी कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा आरंभ सागरातूनच झाला होता. त्यामुळे सागरी पर्यावरण प्रदूषणरहित, स्वच्छ आणि जलचरांसाठी जगण्यायोग्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in