
स्मरण
भरत यादव
१९३२ ते २०२५..९३ वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य एका ध्यासाने जगणं यालाच व्रत म्हणतात. मारुती चित्तमपल्ली हे असे व्रती होते. हा वनाधिकारी निसर्गाच्या प्रेमात पडला आणि संशोधक बनला. वनाधिकारी म्हणून ३५ वर्षं नोकरी आणि त्यानंतरचा काळ संशोधन, असा एकूण ६५ वर्षांचा काळ त्यांनी अरण्याच्या सोबत काढला आणि अरण्याचे विविध रंग त्यांनी शब्दांमध्ये बंदिस्त केले. निळावंती, पक्षी जाय दिगंतरा, रानवाटा, चैत्रपालवी, रातवा अशी एकूण १४ पुस्तकं त्यांनी लिहिली. प्राणीकोश, पक्षीकोश लिहिण्याचं काम केलं.
आयुष्यभराची भटकंती त्यांनी सहा वर्षांपूर्वी थांबवली. अरण्याची वाट घरापर्यंत आली आणि आता सोलापुरातच स्थायिक व्हायचा निर्णय अरण्ययात्री मारुती चित्तमपल्ली यांनी घेतला. जंगलाच्या सोबतीनेच वनखात्यातील अधिकारी ते वन्यजीव संशोधक, निसर्गलेखक, लोकप्रिय साहित्यिक आणि मुख्य म्हणजे अरण्यऋषी ही आपली ओळख त्यांनी मिळवली होती. ही सोबत नाकारत शहरवासी होताना त्यांच्या मनात खळबळ माजली असेलच. पण ऋषीच होते ते. आपल्या आयुष्याची अखेर त्यांनी ओळखली आणि ते आपल्या गणगोतात परतले.
मारुती चित्तमपल्ली सोलापूरात परतल्यानंतर दोन वर्षांपूर्वी सोलापुरात त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही कायम आहे. सोबत नांदेडचे ज्येष्ठ लेखक भगवंत क्षीरसागर होते. सोलापूर शहरातला पूर्व भाग हा तेलुगू भाषिकबहुल. श्रमसंस्कृतीचं निष्ठेने पालन करणारा. तेलंगणातून दोन-तीन शतकांपूर्वी सोलापुरात स्थलांतरित झालेला तेलुगू समाज आज इथल्या मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीत मिसळून गेला आहे, सर्वदूर पसरला आहे. अशाच एका तेलुगू भाषिक कुटुंबात मारुती चित्तमपल्लींचा जन्म झाला आणि मराठी भाषेला वन्य जग शब्दात बांधणारा साहित्यिक लाभला. संस्कृती मिलाफाचं हे एक सुंदर उदाहरण होय. पण चित्तमपल्ली यांचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि तेलगू या दोन भाषांपुरतं त्यांनी आपलं भाषिक जग मर्यादित ठेवलं नाही. वेगवेगळ्या राज्यातल्या जंगलाशी परिचय करून घेताना आपल्या अरण्य संशोधन प्रेमापायी ते चक्क दहा भाषा शिकले. असं असलं तरी मायमराठीवर त्यांनी मनापासून प्रेम केलं. सगळं लेखन आवर्जून मराठीतूनच केलं.
आपल्या वनसंशोधनाच्या कार्यात ते प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना आपले गुरू मानत असत. वनविभागातून प्रदीर्घ सेवेनंतर १९९० साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी प्राणीकोश बनवण्याचं काम सुरू केलं. पत्नी सरस्वती आणि नंतर कन्या छाया यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला होता. म्हणूनच नंतर २०२० साली ते आपल्या जन्मगावी सोलापुरात परतले. मात्र नव्वदीनंतरही चित्तमपल्ली यांची स्मरणशक्ती तल्लख होती. दाढीचे केस चंदेरी होते, पण डोईवरचे केस काळे कुळकुळीत होते, चष्मा न वापरता ते सहज वाचू शकत होते! याचं श्रेय ते आदिवासी समूहाशी प्रस्थापित झालेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना द्यायचे. जंगलात आदिवासींच्या सहवासात आयुष्याची अनेक वर्षं व्यतीत केल्याने आरोग्यासंबंधीची काही रहस्यं ज्ञात झाल्याचं ते हसत हसत सांगत. निसर्गाने मानवजातीला भरभरून देऊनही मानव मात्र निसर्गाशी कृतघ्नपणे वागत असल्याची खंत ते वेळोवेळी व्यक्त करत. प्रदूषणाचं वाढत चाललेलं प्रमाण आणि वनांचा ऱ्हास पृथ्वीला विनाशाकडे नेत असल्याचंही त्यांनी नोंदवलं होतं.
तरुणपिढीला उद्देशून ते म्हणत, “तरुणांनी जंगलातली असीम शांतता मनसोक्तपणे अनुभवली पाहिजे. शहरातल्या कोलाहलापासून दूर दाट अरण्यात काही दिवस घालवले पाहिजेत. आपलं मन आणि जगणं टीव्ही, मोबाइल अशा आधुनिक उपकरणांचं गुलाम झालं असल्याने आपण वनविहाराचे सुख हरवून बसलो आहोत.” मोबाइलसारख्या यंत्रातून होणाऱ्या रेडिएशनचा दुष्परिणाम माणसांसाठी आणि निसर्गासाठी घातक बनत चालल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
आदिवासी जनतेवर, त्यांच्या जगण्यावर सुरू असलेल्या अतिक्रमणाची, अन्यायाची चित्तमपल्ली सरांना मनस्वी चीड होती. त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला असता ते उसळून म्हणाले, “विचारा की प्रश्न सरकारला, लेखणीतून. मग बघा काय होतं ते!” एकूणच सध्या आपण सगळेच आदिवासी प्रश्नांबाबत हतबल असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं होतं.
विदर्भातील जंगलवाटा तुडवताना अनेक लोक त्यांचे घनिष्ठ मित्र झाले. जंगलवासी आदिवासींनी आपल्यावर खूप प्रेम केलं, असं सांगताना चित्तमपल्ली सरांचा कंठ दाटून आला होता. गोंड, भिल्ल आणि इतर आदिवासी समुदायांशी त्यांचा उत्तम संपर्क राहिल्याने मराठी भाषेत प्रचलित नसलेल्या लाखभर शब्दांची भर त्यांच्या लेखनातून मराठी भाषेत पडली, हे ते अभिमानाने सांगायचे. त्यांच्या या कामगिरीबद्दल समस्त मराठी भाषिक जनता त्यांची सदैव ऋणीच राहील. साहित्य संशोधनासाठी त्यांनी संस्कृत भाषाही आत्मसात केली.
पाच नोव्हेंबर हा चित्तमपल्ली सरांचा वाढदिवस. नोव्हेंबर २०२४ ला त्यांचा ९३ वा वाढदिवस घरीच स्नेही, चाहते यांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. तेव्हा त्यांची प्रकृती ठणठणीत होती. राहत्या सोसायटीत एका प्रशस्त जागी त्यांच्या सूचनेनुसार एका भव्य ग्रंथालयाच्या उभारणीचं काम प्रगतिपथावर होतं. लवकरच त्याचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्याचं नियोजन होतं. तिथे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध करून द्यावेत, अशी चित्तमपल्ली यांची इच्छा होती. पण तत्पूर्वीच ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले!
अरण्यऋषी चित्तमपल्ली सरांचा दिनक्रम नव्या पिढीसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय होता. पहाटे चार वाजता उठणं, हलकासा व्यायाम आणि ध्यान करणं; यानंतर सकाळी नऊ वाजता न्याहारी; मग वर्तमानपत्रांचं आणि इतर वाचन; दुपारी १ ते २ या कालावधीत जेवण; त्यानंतर थोडी विश्रांती; मग लोकांच्या गाठीभेटी-गप्पा-संवाद. रात्री दहा वाजता जेवण. मग झोप येईपर्यंत वाचन.
त्यांच्या राहत्या घरी सुमारे दहा हजार ग्रंथांचा संग्रह आहे. आता तो ग्रंथालयात हलवला जाईल. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. अलीकडेच त्यांनी प्राणीकोशाचं काम संपवलं आणि ग्रंथ हातावेगळा केला होता. आवश्यक छायाचित्रंदेखील प्रकाशकांना पाठवली होती. प्राणीकोशाची छपाई आता सुरू झाली आहे. मत्स्यकोशाचं लेखनही त्यांनी याच काळात पूर्णत्वास नेलं होतं आणि यानंतर ते वृक्षकोशलेखनाची तयारी करीत होते. या कोशात महाराष्ट्रासह संपूर्ण भारत तसेच नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी शेजारी देशातील शेकडो वृक्षांची माहिती, छायाचित्रं संकलित केली जाणार होती. पण ते कार्य आता अधुरंच राहून गेलं!
यावर्षी ३० एप्रिलला त्यांनी दिल्लीत जाऊन पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. ती दगदग त्यांच्या प्रकृतीला झेपली नसावी. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्नग्रहण थांबवलं होतं. दिवसातून तीनवेळा ते दूध घेत असत. निधनादिवशी ते सायंकाळी अर्धा ग्लास पाणी प्यायले. १८ जूनला संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही त्यांनी आपली ज्ञानसाधना अखंड आणि अविरतपणे सुरू ठेवली होती. पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्यासारखे शब्दव्रती आजच्या काळात दुर्मिळच.
मुक्त पत्रकार.
yadavbh515@gmail.com