‘झेब्रा क्रॉसिंग’ चा थरार

मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये प्रवेश करताच ‘द ग्रेट मायग्रेशन’च्या थरारक जगात पाऊल टाकल्यासारखं वाटतं. लाखो वन्यगवे आणि झेब्र्यांच्या स्थलांतरातून उलगडणारी जगण्याची लढाई इथे निसर्गाच्या रंगमंचावर थेट अनुभवायला मिळते.
‘झेब्रा क्रॉसिंग’ चा थरार
(Photo-Wikimedia)
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

मसाई मारा नॅशनल रिजर्व्हच्या तालेक गेटमधून जीप आत गेली. इथे आम्हाला सेरेंगेटीहून लाखोंच्या संख्येत आलेले वन्यगवे (विल्डेबीस्ट) पाहायला मिळणार होते. १९६१ साली हे नॅशनल रिझर्व्ह सुरू करण्यात आलं, ते शिकाऱ्यांपासून जंगली श्वापदांचं रक्षण करण्यासाठी. आज मात्र ते वन्यप्राणीप्रेमींचं आवडतं पर्यटन स्थळ बनलंय. इथलं सौंदर्य आणि विपुल प्राणिसंपदा पर्यटकांना मोहित करते. बीबीसीच्या ‘बिग कॅट डायरी’ या डॉक्युमेंटरीचं चित्रण इथलंच. रिजर्व्हच्या आत गेलो आणि आम्ही वन्यगव्यांच्या झुंडीच्या झुंडी पाहिल्या. तांबडं फुटायच्या सुमारास कँपमधून निघालो होतो; तेव्हा काही अंतर पार केल्यावर आमच्या चालकाने आम्हाला दूरवर हे झुंड दाखवले होते. आम्हाला फक्त क्षितिजाजवळ काळ्या ठिपक्यांची एक धूसर रांग दिसली होती. आता मात्र त्यांना जवळून पाहत होतो. बैलासारखा चेहरा, बोकडासारखी दाढी आणि काळपट तपकिरी रंग असा हा बेढब, बेडौल, कुरूप प्राणी! प्राण्यांमधील सर्वात ‘ढ’ म्हणावे असे हे नमुने. टांझानियातील सेरेंगेटी ते केनियातील मसाई मारा या स्थलांतरात बिचारे पदोपदी मृत्यूशी सामना करत असतात. जमिनीवर चरत असताना सिंह, चित्ता, बिबट्या इत्यादी हिंस्त्र पशूंची शिकार बनतात; तर मारा नदी पार करताना मगरीच्या तोंडचा घास बनतात. अशा तऱ्हेनं बळी पडलेल्यांची संख्या थोडी तिडकी नव्हे; तर हजारोंच्या घरात मोडते.

स्थलांतर करणाऱ्या वन्यगव्यांची संख्या असते अंदाजे तेरा लाख, झेब्रे दोन लाख आणि हरणं तीन लाखांच्या आसपास. या वन्यगव्यांपैकी एकाने नदीत उडी घेतली की, मागचा पुढचा विचार न करता, जराही सावधानता न बाळगता, आणि आजूबाजूस न बघता सगळे वन्यगवे एकामागोमाग एक धडाधड नदीत उड्या टाकतात. किनाऱ्यावर निपचित पडून असलेल्या मगरी मग सुळकन पाण्यात शिरतात आणि त्यातील एकदोघांचा फन्ना उडवतात. मगरींचा वेग जमिनीपेक्षा पाण्यात अधिक. अर्थातच तिथे त्यांची सत्ता अमर्याद! या रिव्हर क्रॉसिंगची एक फिल्म आम्ही आदल्या रात्री कँपवर पाहिली होती. श्वास रोखून ती ‘Survival of the Fittest’ची भयानक लीला आम्ही पडद्यावर अनुभवली होती. आज त्या बिचाऱ्या निरपराध प्राण्यांकडे पाहून मन अगदी द्रवून गेलं. त्यांना नदीपाशी पोहोचायला अजून पंधरा-वीस दिवस लागतील असा पीटरचा अंदाज होता. चुकून माकून एखादा झेब्र्यांचा कळप पोहोचला असण्याची शक्यता त्याने बोलून दाखवली. नदीच्या अलीकडील गवत चरण्यात वन्यगवे मश्गुल होते. यातील कुणाच्या कुंडलीत मृत्ययोग आहे कोण जाणे?

संध्याकाळी सूर्य पश्चिमेकडे कलल्यावर आम्ही पुन्हा सफारीला निघालो. पीटरने आम्हाला मारा नदीच्या मोठ्या पात्रापाशी नेलं. मारा रिझर्व्ह पार्कला दक्षिणोत्तर धावणारी ही मारा नदी. तिच्या काठावरील मऊ लुसलुशीत आणि मुबलक गवतावर ताव मारण्यासाठीच तर पार टांझानियाहून हे प्राणी ‘जान हथेली पर’ घेऊन इथे येतात. वर्षानुवर्षं चाललेल्या या त्यांच्या वार्षिक स्थलांतराला ‘ द ग्रेट मायग्रेशन’ असं म्हटलं जातं.

मारा नदीच्या काठी बरीच वृक्षवल्ली आहे. आणि म्हणूनच निरनिराळ्या जातीचे तब्बल ४५३ पक्षी इथे निवास करतात. त्यांचा चिवचिवाट ऐकत, मनोहारी रूप न्याहाळत नदीकाठी बसलो असताना अचानक आम्हाला रिव्हर क्रॉसिंगचा नाट्यमय थरार अनुभवायला मिळणार अशी चिन्ह दिसू लागली. झेब्र्यांची एक रांग हळूहळू नदीकडे अग्रेसर होत होती. किनाऱ्यावर कावेबाज मगरी निपचित पडून होत्या. काठावरील मातीच्या रंगात त्यांचा रंग बेमालूमपणे मिसळून गेला होता.

झेब्र्यांच्या झुंडीतील एक, बहुदा अनुभवी वयस्क, पाहणी करण्यासाठी नदीकाठचा उतार उतरू लागला. इतक्यात, “ काका, थांबा. मीही येतो सोबतीला” असं म्हणत एक मध्यमवयीन झेब्रा त्याच्या सोबतीनं चालू लागला. त्यांच्यामधील संवाद माझ्या मनात उमटू लागले. किनाऱ्यावरील मातकट रंगाची मगर काही त्यांच्या दृष्टीस पडली नाही. नदीत न उतरता तिथेच थांबून त्या दोघांचा विचारविनिमय सुरू झाला. उंचवट्यावर वाट बघत उभ्या असलेल्या तरुण झेब्र्यांचा धीर सुटत चाललेला दिसला. अस्वस्थ होऊन त्यांचं लाथा मारणं चालू झालं. “अरे, निघून जाऊया ना पटकन, हे बुढोऊ कसली बोडख्याची पाहणी करताहेत. पैलतीरावर काय मस्त गवत डोलतंय. ते पाहून माझी तर भूक खवळली आहे यार !” एक छोटं पिल्लू आईला ढुश्या देत होतं. “आई गं, कधी जायचं पैलतीरावर? माझे पाय दुखले इथं उभं राहून. तू सारखी उद्या उद्याच म्हणत राहतेस.” बिचारी आई! लहानगं पिल्लू, उतावळा तरुण मुलगा, आणि विचारी नवरा यांच्या कैचीत सापडली होती. तिच्यातली गृहिणी नवऱ्याला आवाज देत म्हणाली, “अहो, काय तो निर्णय घ्या ना लवकर, नसेल जायचं तर इथेच काहीतरी सोय करू.” नाटक रंगत चाललं होतं. वयस्क झेब्र्याच्या नजरेस मगर पडली नसली तरी त्याच्या अनुभवी मनात संभाव्य धोक्याची घंटा वाजत असावी. हे सगळं नाटक अगदी स्लो मोशनमध्ये चालू होतं. प्रेक्षक असूनही मी नाटकाचा भागच झाले होते. आता मनातली स्वगतं प्रकटपणे बाहेर पडू लागली. “अरे गधड्या (झेब्राड्या), डोळे नाही का दिले देवाने तुला? एवढी मोठी मगर दिसत नाहीये का तुला? चल फिर मागे!” तो अजून विचाराधीन! “हे प्रभो! याला सुबुद्धी दे. या धृतराष्ट्राला संजयची दिव्यदृष्टी दे!” देवाजवळ अशी करुणाही भाकली मी. अचानक एक स्वार्थी, दुष्ट विचार मनात तरळून गेला. या झुंडीनं नदी पार करायचं ठरवलं, तर काल सिनेमात पाहिलेलं दृश्य आपल्याला साक्षात पाहायला मिळेल. लगेच देवाजवळच्या प्रार्थनेत शब्दांचा फेरबदल केला. “जर यातील कुणा एकाच्या आयुष्याची दोरी तू आखूड बनवलीच असशील, तर त्याला आत्ता आमच्या डोळ्यांदेखत नदीत उडी मारायची बुद्धी दे.” छे छे! भाविक मनानं चलाख मनाला दटावलं. त्यानंतर आम्ही साक्षीभावाने फक्त वाट पाहत राहिलो. संथ वाहणारी मारामाई जन्ममृत्यूचा हा संथ खेळ निष्पक्षपणे पाहत होती. मगरीचा धीर सुटत चालला असावा. त्याची शेपटी किंचित हललेली आमच्या नजरेस पडली. “आज पण बॅडलक! चविष्ट काळीज न घेताच घरी जावं लागणार.” मी सहज वर आकाशात पाहिलं. गिधाडं घिरट्या घालू लागली होती. मृत्यूची आगाऊ सूचना? झेब्रा पुढे सरकला. मी श्वास रोखून धरला. नदीच्या पात्राजवळ तोंड नेलं त्यानं आणि पुढे पाऊल टाकणार इतक्यात त्याला काय वाटलं कोण जाणे? निर्णय बदलून त्याने ते पाऊल मागे घेतलं. त्याला आकाशातील गिधाडांचं प्रतिबिंब पाण्यात दिसलं असावं का? त्याच्या मागे येत असलेली त्याच्या कुटुंबीयांची रांग ‘अबाउट टर्न’ करत मागे फिरली. एखाद्या अल्लड नवयौवनेच्या गोंडा लावलेल्या केसांच्या शेपटासारख्या त्यांच्या शेपट्या इकडून तिकडे फिरत होत्या. ही व्यक्त होणारी नाराजी होती की मरणाच्या दारातून परत फिरल्याचा आनंद? माझ्यातील भाविक मनाने आकाशातील बाप्पाचे आभार मानले. जीपचं इंजिन सुरू झालं. मगररुपी खलनायकाकडे एक विजयी कटाक्ष टाकत आम्ही परतीचा रस्ता पकडला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा ‘झेब्रा क्रॉसिंग’ची सुप्त इच्छा मनात धरून आम्ही मारा नदीचा वेगळाच किनारा पाहण्यासाठी गेलो. काळ्या ढगांचा गडदपणा वाढू लागला होता. दूरचा वळसा घेऊन आम्ही नदीकाठी येऊन पोहोचलो. पाहतो तर काय? तिथे आज नाटकाचा भलताच प्रवेश सुरु होता. झेब्रा, हरणं यांचा पत्ताच नव्हता. वीस-पंचवीस हिप्पोंचा समूह (हिप्पींचा नव्हे!) फुरफुर आवाज करत जलक्रीडा करत होता. पाण्याच्या पृष्ठभागावर फक्त त्यांचे इवले इवले कानच दिसत होते. वरून राखाडी आणि आतून मांसल गुलाबी! शरीराच्या मानानं खूपच लहान! गरुड पक्ष्यांनी वेगवेगळ्या भराऱ्या मारून आमचं मनोरंजन केलं. अंबरात बगळ्यांची माळफुले दिसत होती. काल या नदीवर मृत्यूचं सावट होतं, गिधाडांच्या घिरट्या होत्या. आज तिथे नवजीवनाचं, आनंदाचं संगीत गुंजत होतं.

खूप रोमहर्षित होऊन आम्ही कँपवर परतलो. पुढच्या लेखात आपण भेटणार आहोत सिंहाच्या कळपाला आणि जाणार आहोत मसाई लोकांच्या वस्तीत, त्यांची संस्कृती जाणून घ्यायला.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in