मसाई माराची जंगल सफारी

पिंजऱ्यातल्या प्राण्यांपेक्षा त्यांच्या खऱ्या घरात-मोकळ्या रानात-भेटणाऱ्या वन्यजीवनाचा थरार अनुभवायला मिळणारी, मसाई माराच्या जंगल सफारीची ही रोमहर्षक कहाणी आहे.
मसाई माराची जंगल सफारी
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

पिंजऱ्यातल्या प्राण्यांपेक्षा त्यांच्या खऱ्या घरात-मोकळ्या रानात-भेटणाऱ्या वन्यजीवनाचा थरार अनुभवायला मिळणारी, मसाई माराच्या जंगल सफारीची ही रोमहर्षक कहाणी आहे.

लहानपणी हटकून राणीच्या बागेत घेऊन जाणारी शाळेची ट्रिप मला फारशी आवडत नसे. त्या प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांना रानात त्यांच्या घरी नेऊन का नाही सोडत?’ असा प्रश्न माझ्या बालमनाला पडत असे. म्हणूनच त्यांच्या ‘घरी’, त्यांच्या नैसर्गिक निवासात केलेली मसाई माराची तीन दिवसांची ट्रिप मला खूप आवडली होती.

केनिया देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात मसाई मारा हे जंगल वसलंय. त्याचा विस्तार देशाची सीमा पार करून, टांझानियातील सेरेंगेटी नॅशनल पार्कमध्ये विलीन होतो. जुलै ते ऑक्टोबर या कडक उन्हाळ्याच्या चातुर्मासात ताज्या चाऱ्याच्या शोधार्थ असंख्य जनावरं सेरेंगेटीच्या जंगलातून ‘खुर’क्रमण करत, हिरवी कुरणं असलेल्या मसाई मारात पोहोचतात. चातुर्मासाच्या या कठीण व्रताची सांगता झाली की, आल्या पावली परत फिरतात. वर्षानुवर्षं त्यांचं हे तात्पुरतं स्थलांतर चालू असतं. अक्षरशः लाखोंच्या संख्येत हरणं, झेब्रा आणि वन्यगवे (विल्डेबिस्ट) ही वाट चालतात. त्याचा पसारा इतका अफाट आहे की, त्याला ‘द ग्रेट मायग्रेशन’ असं म्हटलं जातं. अशा या मुबलक ‘आहारा’वर तुटून पडणाऱ्या वनकेसरीच्या कुटुंबाला, झडप घालून शिकार करणाऱ्या बिबट्याला, हत्तींच्या कळपाला, गेंडा आणि रानरेडे अशा या ‘बिग फाइव्ह’ म्हणवल्या जाणाऱ्या प्राण्यांना भेटण्यासाठी आम्ही या जंगल सफारीचा कार्यक्रम आखला होता.

केनियाची राजधानी नैरोबीहून मसाई मारा हा १६८ किमीचा चारचाकीचा प्रवास अत्यंत खडतर, हाडं खिळखिळी करणारा. त्यापेक्षा ४५ मिनिटांत थेट कॅम्पवर पोहोचवणारा छोटेखानी विमानाचा पर्याय आम्ही निवडला. ‘गव्हर्नर्स कॅम्प’ असं साहेबी नाव असलेल्या तंबूंच्या कॅम्पमध्ये आमचं बुकिंग होतं. धावपट्टीवर उतरताच त्यांच्या रेंजरने आमचा ताबा घेतला आणि आमच्या तैनातीत असलेल्या जीपमधून लगेचच आमची सफारी सुरू झाली. उघड्या जीपमधून अंगावर येणारं वारं आणि जंगली श्वापदांच्या ‘घरी’ आल्याची जाणीव मनात हुरहूर निर्माण करत होती. जरा कुठे सळसळ झाली की वाटे, सिंह समोर येऊन उभा ठाकतोय की काय? सिंह नाही; पण इंपाला नावाच्या भल्यामोठ्या काळवीटाने आमचं स्वागत केलं. भेदरलेल्या नजरेनं टुकूटुकू पाहणारं आणि अत्यंत वेगाने धावणारं इंपाला, दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत पाहायला मिळतं. मला राजेंद्रनाथमुळे प्रसिद्ध झालेलं इंपाला हे गाडीचं नावच माहीत होतं. नामकरणात वेग हा घटक समान असावा बहुदा. जीपमध्ये असलेल्या वॉकीटॉकीवरून हळू आवाजात चालकांचं एकमेकांशी बोलणं सुरू होतं. एक सिंहीण आपल्या चार छाव्यांसह ‘स्पॉट’ झाली होती. या जीपचालकांचं दिशादर्शन कसं होत असावं बरं? कुठल्या खाणाखुणा सांगत असावेत ते? कारण सगळीकडे गुडघाभर वाढलेलं पिवळं गवतच काय ते दिसत होतं. एक एकलकोंडं बाभळीचं झाड हा बहुदा त्यांचा दीपस्तंभ असावा. डावी-उजवीकडे वळत आमची जीप नेमक्या जागेवर पोहोचली. लांबूनच आम्हाला जीपचा तांडा आणि त्यावर आरूढ, लांब नळकांड्यांचे कॅमेरे सरसावून सज्ज असलेले पर्यटक दिसले. सिंहीण आणि तिचे छावे करवंदाच्या जाळीसारख्या काटक्यांच्या झुडपात विसावले होते. जंगल सफारीतील ही सलामीची भेट खूपच सुंदर होती. नैसर्गिक निवासात शांत पहुडलेली ही ओली बाळंतीण आणि निर्धास्तपणे तिच्या अंगावर लवंडलेले तिचे पिटुकले छावे! तिचा पुढचा तपकिरी रंगाचा मांसल पाय (हात?) तिनं हळुवारपणे एका छाव्याच्या अंगावर टाकला होता. तिची अणकुचीदार नखं तिनं आत ओढून घेतली असावीत. त्यामुळे पंजाचा गुबगुबीतपणा स्पष्टपणे जाणवत होता. मातृत्वाचा सुरेख आविष्कार! अंगावर रोमांच उभे राहिले. त्या नीरव शांततेचा भंग करण्याची कुणाचीच इच्छा नव्हती.

कॅम्पवर परतत असताना जंगलाची विविध रूपं न्याहाळता आली. निर्भयपणे बागडणाऱ्या, काजळी डोळ्यांच्या, पिंगट उदी अंगावर सुंदर चट्टे असलेल्या हरणांचे कळप पाहिले. शहरात रस्ता ओलांडताना भेटणारी झेब्रा लाइन जणू आडव्याची उभी होऊन आमच्यासमोर उभी ठाकली. लहान तट्टूसारखं शरीर आणि चेहऱ्यावर गाढवाचा बावळटपणा या संयोगात हा झेब्रा फक्त या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांमुळेच आकर्षक दिसतो. शेजारी उभ्या असलेल्या मित्राला, मागचे दोन्ही पाय एकत्र उचलून सणसणीत लाथ मारत, झेब्रिणीच्या मागे धावणारा एक तरणाबांड झेब्रा पाहिला. आता ती मादी आहे आणि हे दोघे मित्र एकमेकांवर कुरघोडी करत तिच्यामागे धावताहेत वगैरे मौलिक माहिती आमच्या ड्रायव्हरने, पीटरने आम्हाला दिली होती.

कॅम्पजवळ आलो तशी हिरवाई दिसू लागली. फाटकातून आत शिरताच हरित साम्राज्यात आल्यासारखं वाटलं. खळाळणारी मारा नदी, झुळझुळणारं सायंवारं आणि चिवचिवणारे विविध रंगीबेरंगी पक्षी पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. तपकिरी रंगाचे, शार्पनरने काढलेले पेन्सिलीचे वर्तुळाकार डिझाईन दिसावेत तशा पाकळ्या असलेली पिवळी फुलं आणि गुंजराव करत मधुपानात मग्न भुंगा; मातीत आपलं निमुळतं तोंड खुपसून किड्यांवर ताव मारणारा मुंगूस आणि कढी ओरपल्यासारखा फुरफुर आवाज करत आपल्या इवल्याशा कानांसह नाकपुड्या पाण्याबाहेर काढून श्वास घेणारे, मारा नदीत डुंबणारे पाणघोडे असं वैविध्यपूर्ण निसर्गचित्र पाहायला मिळालं.

गव्हर्नर्स कॅम्प जंगल रिसर्वच्या आतच वसलेला होता. मात्र तेथील अद्ययावत तंबू सगळ्या सुखसोयींनी परिपूर्ण होते. बाथरूम, गिझर, पलंग, गाद्या, उश्या, टेबल-खुर्ची… काय म्हणाल ते! जाड कॅनव्हासचे हे तंबू तितक्याच मजबूत झिपने बंद होतात. करकचून आवळत खुंटीला बांधलेला हा तंबू दिसायचाही सुडौल. आतलं फर्निचर शिकारी बाण्याला साजेसं. हस्तिदंती रंग असलेले तंबू आणि त्यातील पिंगट रंगाचं फर्निचर ही रंगसंगती खूप सुंदर दिसते. प्रत्येकी दोन तंबूंसाठी एक बंदूकधारी गार्ड आणि तुमच्या खाण्यापिण्याची- आवडीनिवडीची वास्तपुस्त करणारा एक राखीव बेअरा. कॅम्पच्या मध्यभागी असलेल्या एका उघड्या लाकडी तंबूत बार वगैरेची सोय होती; परंतु तिथेच एक लायब्ररीही होती. त्यात वन्यजीवनाची माहिती असलेली, स्थलांतराचे अत्यंत सुंदर फोटो असलेली गुळगुळीत कागदांची खूप सारी पुस्तकं होती. ग्रेट मायग्रेशनच्या काही डीव्हीडीसुद्धा होत्या.

सूचनेनुसार साडेआठच्या सुमारास जेवणाच्या तयारीने आम्ही आमच्या ३६ नंबरच्या तंबूची झिप उघडून बाहेर आलो; तर आमच्या गार्डने आम्हाला तिथेच थांबायचा इशारा केला. आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो म्हणाला, “चौतीस नंबरच्या टेंटजवळ तीन-चार पाणघोडे उभे आहेत. जातील दहा-पंधरा मिनिटांत. नंतर आपण जाऊ जेवणघरात.” आमच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेणाऱ्या आमच्या कॅम्पला कुंपण नसल्यामुळे (खास जंगलातील निवास) नदीतून निघून जंगलात जाण्यापूर्वी ते पाणघोडे आमच्या तंबूजवळ अंग वाळवत असावेत. बरोबर पंधरा मिनिटांनी त्यांनी आम्हाला वाट मोकळी करून दिली.

रात्रीच्या भोजनाबरोबर मसाई आदिवासींच्या नृत्याचा कार्यक्रम होता. उंच पायांचा, पीळदार स्नायूंचा बेदरकार वृत्तीचा हा मसाई जमातीचा माणूस लढाऊ बाण्याचा! काळ्या शिसवी रंगाच्या कांतीवर त्यांनी परिधान केलेला लालसर भगवा झगा खूपच उठून दिसत होता. लुंगीसारखं एक लाल वस्त्र कंबरेभोवती गुंडाळलं होतं. गळा, दंड, मनगटं मात्र चित्रविचित्र माळांनी भरलेली. उजव्या हाती होता तीक्ष्ण भाला. बायकांच्या हातात भरपूर बांगड्या व गळ्यात छोट्या छोट्या रंगीबेरंगी मण्यांच्या असंख्य माळा. गंमत म्हणजे कानात मोठ्ठाले डूल घालणे ही फक्त बायकांची मक्तेदारी नाही. मसाई पुरुषसुद्धा तऱ्हेतऱ्हेचे डूल घालून मिरवतात. त्यांच्या कानाच्या पाळीची छिद्रं त्यामुळे मोठी होऊन लोंबकळलेली असतात. समारंभाच्या दिवशी पुरुष गरुड किंवा शहामृगाच्या पिसांची मोठी टोपी परिधान करतात किंवा केसांच्या वेण्या घालून त्याला भगव्या रंगाची पेस्ट चोपडतात. पायातून उंच असलेले हे मसाई लोक खूप उंच उड्या मारू शकतात. अशा उड्यांनी परिपूर्ण असं एक मसाई लोकनृत्य सादर करून त्यांनी आमचं खूप मनोरंजन केलं.

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्हाला गेम ड्राइव्हवर निघायचं होतं. शिकारीच्या या जनावरांना ‘गेम’ म्हणतात ही अस्मादिकांच्या आंग्लभाषेच्या ज्ञानात भर होती. पहाटेच्या त्या सफारीत भेटलेल्या वन्यजीवांची रोचक कहाणी पुढल्या लेखात!

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in