आलो सिंहाच्या घरी

मसाई माराच्या सोनसळी गवताळ विस्तीर्ण प्रदेशात, सिंहांच्या घरट्यात जाऊन त्यांच्या आयुष्याची एक झलक पाहण्याचा अनुभव लाभला. जंगल सफारीचा तो शेवटचा दिवस केवळ वन्यजीवदर्शनापुरता मर्यादित न राहता, निसर्ग आणि मसाई संस्कृतीच्या सहवासाने मन समृद्ध करून गेला.
आलो सिंहाच्या घरी
आलो सिंहाच्या घरी
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

मसाई माराच्या सोनसळी गवताळ विस्तीर्ण प्रदेशात, सिंहांच्या घरट्यात जाऊन त्यांच्या आयुष्याची एक झलक पाहण्याचा अनुभव लाभला. जंगल सफारीचा तो शेवटचा दिवस केवळ वन्यजीवदर्शनापुरता मर्यादित न राहता, निसर्ग आणि मसाई संस्कृतीच्या सहवासाने मन समृद्ध करून गेला.

मसाई मारा येथील तीन दिवसांच्या जंगल सफारीचा आज शेवटचा दिवस होता. गेम ड्राइव्हसाठी राखीव असलेला जवळ जवळ सगळा प्रदेश आणि भरपूर पशु-पक्षी बघून झाले होते. प्रत्येकवेळी अशी दृश्य पाहायला मिळतातच असं नाही. शेवटी आपण प्राणिसंग्रहालयात नाही, तर या वन्य पशूंच्या घरी आलेलो असतो. त्यांची इच्छा असेल तरच ते दार उघडून आपल्याला दर्शन देणार.

मारा नदीवरील पाणघोड्यांच्या जलक्रीडा बघून परतत असताना वाटेवरील चाकोऱ्यांवर सिंहाचे तीन तरुण छावे बसलेले दिसले. आकाश अजूनही ढगाळलेलंच होतं. सूर्य नेहमीसारखा वर येऊन तळपत नव्हता. आळसावलेली सकाळ होती ती. थंडीमुळे की काय कुणास ठाऊक; पण हे राजकुमार चक्क डुलक्या घेत होते. मागचे पाय दुमडलेले आणि पुढचे पसरलेले, त्यावर डोकं ठेवून मिटल्या डोळ्यांनी हे पहाटेच्या स्वप्नात गुंग दिसत होते. जीपच्या इंजिनाचा आवाज ऐकूनही त्यांची निद्रा भंग पावेना. ढिम्म बसून होते. अजिबात हलायला तयार नव्हते. पाच एक मिनिटं वाट पाहून त्यांच्या ‘वाटेला’ न जाता पीटरने दुसरी वाट पकडण्यासाठी जीप वळवली. आमचं घुमजाव झालं तसं त्यातल्या एकानं डोळा किलकिला करून आमच्याकडे पाहिलं.

डांबरट कुठला !

रस्ता बदलल्यामुळे आम्ही एका नवीनच जागी पोहोचलो. बघतो तर काय ? तिथे सिंहांची कॉलनीच होती. तरुण-तुर्क, साळकाया- माळकाया, बच्चे बछडे.. कॉलनीला आत्ताशी कुठे जाग येत होती. नुकतंच ‘आयाळडं’ फुटलेल्या तरण्याबांड सिंहाच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरु होत्या. फॅशनेबल कल्ले असावेत तशी त्याची ती कोवळी आयाळ दिसत होती.

आम्ही स्तब्धपणे आणि नवलाईनं त्यांच्या हालचालींकडे पाहत होतो. ते सिंह मात्र आमच्याकडे अशा नजरेने बघत होते की जणू म्हणताहेत, “ छान पावसाळी सकाळी आम्ही स्वतःच्याच घरी लोळतोय. काही प्रॉब्लेम?”

“ अरे प्रोब्लेम म्हणजे, लेकोहो, अगदीच शेळपट दिसताय रे तुम्ही.” मी मनात म्हटलं. या कॉलनीतच आम्ही एका किशोरवयीन छाव्याला चक्क गवत खाताना पाहिलं. चुकून शेळ्यांच्या कळपात तर वाढला नव्हता हा? कुणा एका चुलत्यानं विहिरीत आपलं प्रतिबिंब दाखवून त्याला नुकताच परत तर नव्हता आणला? पोटदुखीचा त्रास असेल का याला? हे औषधी गवत खाऊन त्याचा पोटशूळ कमी होत असावा.

वेगळ्या कोनातून फोटो घेता यावेत म्हणून पीटरने जीप वळवून पलीकडे एका उंचवट्यावर नेली. शेजारील उंचवट्यावर असलेल्या खड्ड्यात आम्हाला शहामृगाची अंडी दिसली. चांगली डझनभर असावीत. गवत खाणाऱ्या सिंहोजीरावांना पत्ताच नाही की काय या मेजवानीचा? पीटरने आम्हाला दूर निश्चल उभी असलेली शहामृगाची मादी दाखवली. आधीच उंच असलेली मान उंचावून ती या दिशेने पाहत होती. त्या आईचा सगळा जीव आपल्या या अजन्मा बाळांपाशी. त्यांच्या सुरक्षिततेकरता देवाचा धावा करत असावी ती. येथील आदिवासींसाठी शहामृगाची अंडी म्हणजे मिष्टान्नयोग!

“अगं माते, एकवेळ सिंह सोडून देतील आपल्या मुखीचा घास; पण या मनुष्यरूपी काळाला कसं रोखशील गं बाई?”

जंगलातील प्राण्यांच्या भेटीगाठी आवरत्या घेऊन, मसाई संस्कृती अनुभवण्यासाठी आम्ही त्यांच्या एका वस्तीला भेट दिली. हे मसाई आदिवासी वसाहतप्रिय! त्यांच्या वसाहतीचं ‘एनकांग’ असं नाव आहे. आतील रहिवाशांच्या आणि पशुधनाच्या रक्षणार्थ काटेरी कुंपणाचा कोट असलेली ही त्यांची एकोप्याने राहण्याची जागा. रात्रीच्या वेळी हल्ला करणाऱ्या लुटारू टोळ्या आणि हिंस्त्र पशु यांपासून संरक्षण असावं म्हणून ही संगतीनं राहण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

बांबूच्या कामट्यांना शेण लिंपून, फांद्या शाकारून आणि शेणाने सारवून बनवलेल्या अगदी छोट्या अशा दहा बारा झोपड्याच या वसाहतीत असतात. त्यांना ना उंची ना रुंदी. इतक्या उंच अंगकाठीच्या मसाई जमातीला त्यात धड उभं राहता येत नाही की, पाय पसरून झोपता येत नाही. त्या अंधाऱ्या झोपड्यांना एकच अरुंद दरवाजा असतो. मसाई ही गुराखी लोकांची भटकी जमात. गुरांना ताजा चारा मिळेल तिथे तात्पुरती वस्ती करायची असल्यामुळे ते बिऱ्हाडाचा मोठा पसारा मांडत नाहीत. लहान मुलं अंगण ओटीवर बागडत असतात. किशोरवयीन झाली की ती गुरं चरायला घेऊन माळरानावर जातात. गाईंची संख्या हे त्यांच्या श्रीमंतीचं द्योतक. पशुधन श्रेष्ठ मानणाऱ्या मसाईंच्या लग्नकार्यात हुंडा म्हणून गाईंची देवाणघेवाण होते.

आताशा बदलत्या काळानुसार त्यांनी ही भटकंती सोडून पोटापुरती शेतीभाती करायला सुरुवात केली आहे. त्यांचं उपजीविकेचं नवीन साधन म्हणजे पर्यटकांसाठी रंगीत मण्यांचे नेकलेस, लाकडी प्राणी आणि शोभेच्या वस्तू बनवणं. त्यांचे स्वतःचे नेकलेस तर कधी कधी गुडघ्यापर्यंत लांब असतात. त्यांच्या या एनकांगला भेट दिल्यानंतर आम्हाला एक मजेदार प्रथा कळली. त्यांचा वरुणदेव ‘एनकाई’ यानं या प्रांतातील गाईगुरांची जबाबदारी फक्त मसाई आदिवासींना दिली आहे, अशी त्यांची श्रद्धा! ‘धरणी दुभंगेल, आकाश फाटेल तेव्हा या गुरांना सांभाळायची जबाबदारी तुमची.’ या दैवी आदेशामुळे मसाई लोक इतर जमातीची गुरंढोरं लुटणं हा त्यांचा नैतिक अधिकार मानतात.

दूध देणाऱ्या गोमातेला आपण श्रद्धेने पूजतो. गोमांस निषिद्ध मानतो. आपल्यासाठी गोमूत्र, गोमय हे सर्व पवित्र, पूजनीय. अशा गोमातेचं रक्त प्राशन करणं हा विचार आपण स्वप्नातही करू शकणार नाही. मसाई लोक मात्र खास समारंभाच्या दिवशी गाईचं मांस खातात आणि तिचं रक्त दुधात मिसळून तर अगदी सर्रास पितात. एका अणकुचीदार बाणानं गाईच्या कंठातील मोठ्या नीलेला छेद करून, त्यातून उसळी मारून वाहणारं रक्त एका भोपळ्याच्या कमंडलूत गोळा करतात. जखम उथळ असते. औषधी झाडापाला लावून ती बंद केली गेली की, लगेच भरूनही येते. हे गाईचं रक्तदान म्हणावं का? गाय हा एक बहुउपयोगी प्राणी आहे अशी त्यांची भावना. तिला देवत्व बहाल नाही केलेलं त्यांनी. तिच्या चामड्याचे जोडे, गाद्या, उशा सगळं वापरात आणलं जातं. तिच्या शिंगांपासून वाद्य तयार केली जातात. झोपडीच्या भिंती सारवण्यासाठी शेण आणि औषधासाठी गोमूत्र. सगळ्या गोष्टींचा सुयोग्य उपयोग. अशा कामधेनूचं रक्त प्राशन करण्याची प्रथा कुठून आली असेल कुणास ठाऊक? मसाई जमात ही स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याची, लढाऊ वृत्तीची जमात आहे. त्यांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि गायीचं रक्त यामुळे प्रथिनांची आणि कॅल्शियमची विपुलता असते. त्यामुळे त्यांची हाडं खूप मजबूत राहतात. मसाई जमातीचे लोक त्यांच्या उंच, सडपातळ बांध्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुरुषांची सरासरी उंची सहा फूट आणि बायकांची पावणे सहा फूट असते. आदुमु या त्यांच्या नृत्यपद्धतीत पुरुष उंच उड्या मारतात. हे त्यांच्या मर्दानगीचं लक्षण मानलं जातं. स्त्रिया गाणी म्हणून त्यांना साथ देत असतात.

मसाई आदिवासींमध्ये त्यांची प्रिय संस्कृती टिकवायची धडपड दिसून येते. या भटक्या जमातींना आधुनिक काळात त्यांचं वेगळेपण टिकवण्यासाठी किती कष्ट पडत असतील याची जाणीव फक्त दोन चार दिवसांकरता येणाऱ्या आपल्यासारख्या पर्यटकांना होत असेल का? त्यांना निदान शुद्ध पाणी आणि प्राथमिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणं ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता असायला हवी.

परतीच्या वाटेवर या उलटसुलट विचारांच्या गर्दीनं विषण्ण झालेलं मन, सोनसळी वनात शिरल्यावर पुन्हा ताजंतवानं झालं. वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या पिवळ्या गवताच्या जंगलातून सिमेंटच्या कोंदट जंगलात जायला ते काही राजी होईना. ताजेपणाचा शिडकावा करणारा आणि वन्यजीवांचं वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारा मसाई मारा जंगलाचा हा अनुभव सिमेंटच्या जंगलात राहूनही माझ्या मनात नेहमीच ताजा राहिला.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in