
बालमैफल
सुरेश वांदिले
मालकीणबाईंना कधी काय करावं वाटेल, याचा काही नेम नव्हता. परवा असंच झालं. त्यांनी कुणाला तरी बोलावलं. आल्या आल्या ती व्यक्ती मालकीणबाईंच्या हातावर कशाने तरी काहीतरी काढू लागली. तासाभरात मालकीणबाईंचा हात रंगला आणि मग त्या व्यक्तीने मालकीणबाईंच्या डोक्यालाही तेच काहीतरी लावलं. काहीवेळाने ती व्यक्ती निघून गेली.
बिळातून रॉबिन्सन मामा टक लावून मालकीणबाईंच्या हाताचं रंगवणं बघत होता. मार्गारेट मावशी मालकीणबाईंच्या बाजूलाच पहुडलेली होती. तीही टक लावून मालकीणबाईंच्या रंगलेल्या हाताकडे बघू लागली.
“मग, मार्गे रंगली ना छान माझी मेहंदी,” अचानक मालकीणबाई मार्गारेटचा कान हलकेच ओढत म्हणाली.
“वा वा वा! छान छान छान… तुम्ही गोऱ्या गोऱ्या पान, हातावर उमटलंय वेलीफुलांचं टामटूम विमान!” असं काहीसं मार्गारेटला म्हणावंसं वाटलं. पण तिने ते मनातच ठेवलं. फक्त तोंड फाकून मावशीला, ‘हो...हो...हो...’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. मालकीणबाईंनी खूश होऊन तिचा गालगुच्चा घेतला. त्यात तिच्या मिशीचा एक केस उपटला गेल्याने तिला वेदना झाल्या. मालकीणबाईला कचदिशी चावून याचा बदला घेतला पाहिजे, असं तिला वाटून गेलं. पण तिने दीर्घ श्वास घेऊन स्वत:ला सावरलं. मालकीणबाई थोड्या वेळाने त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्यांनी धाडकन दरवाजा लावून घेतला. आता त्यांची दुपारची वामकुक्षी सुरू होणार नि मग त्या पुढचे चार-पाच तास बाहेर पडणार नाहीत, हे दररोजच्या अनुभवावरून रॉबिन्सनला ठाऊक होतं. दरवाजाचा धाडकन आवाज म्हणजे रॉबिन्सनसाठी बिळातून बाहेर पडण्याचा सिग्नलच होता. हा सिग्नल कानी पडताच मामा बिळातून बाहेर आला. सोफ्यावरच झोपी गेलेल्या मार्गारेटच्या कानाला चावा घेऊन त्याने मावशीला जागवलं.
मावशी ताडदिशी उठली. मिशीचा केस उपटल्याच्या आधीच्या वेदनेत आता रॉबिन्सनच्या चाव्याची भर पडली.
ती मामावर धावून गेली, “रॉबेटल्या, हा उपद्व्याप करायला सांगितलं कुणी तुला?”
तिची उडी चुकवत मामाने तिला सॉरी म्हटलं, “मावशे, मला मघापासून एक प्रश्न पडलाय.”
“तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही.” मावशी म्हणाली. कानाला पंज्याने कुरवाळत तिने दुसरीकडे तोंड वळवलं. मामा चटदिशी किचनमध्ये पळाला नि त्याने मावशीसाठी चिज आणलं. ते बघून मावशी विरघळली. चिजवर ताव मारत म्हणाली, “काय तुझ्या डोक्यात, येऊ दे तुझ्या मुखात!”
“मावशे मावशे, मालकीणबाईंचा हात आणि डोकं…”
“कुणी छाटलं नाही ना?” मावशी छद्मीपणे हसत म्हणाली.
“मावशे, पुरे तुझा दुष्ट विचार. त्यांचा हात रंगला कसा? त्यावर चित्र उमटलं कसं? आणि डोक्यावर त्यांनी चोपडलं काय? हे समजून सांग माझे बाय.”
“बस्स.. इतकंच…”
“म्हणजे तुला ठाऊकाय ते?”
“मामू, मावशीला माहीत नाही अशी कोणती तरी गोष्ट आहे काय या जगात?” मावशी नाक फेंदारून नि मिशी उडवत म्हणाली.
“मग, मालकीणबाईंच्या हातावरच्या रंगांचं रहस्य उघड कर की.”
“माम्या, त्यात रहस्य नाही, तर विज्ञान आहे.”
“म्हणजे पुन्हा भानगड... बापरे!”
“मामेटल्या, माझ्या मते विज्ञान नि तुझ्या मते भानगड असलेल्या, हातावरच्या रंगांचं रहस्य, लॉसोनिया इनर्मिस झुडपाच्या पानात दडलंय.”
“लॉसोनिया इनर्मिस? हे कसलं झुडूप?”
“या झुडुपाला आपल्याकडे ‘मेहंदी’ म्हणतात, तर बऱ्याच देशांमध्ये ‘हिना’ म्हणतात.”
“अच्छा, या मेहंदीमध्ये रंग कुठनं बरं येतो?”
“अरे, या झुडुपांची पान हिरवी असतात नि त्यांच्यात ‘लॉसोन’ नावाचं लाल-शेंदरी रंगांचं द्रव्य असतं. या रसायनाचा रेणू, अमिनो आम्लापेक्षा मोठा आणि ग्लुकोजसारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडा लहान असतो. मेहंदीच्या झुडुपांच्या वेगवेगळ्या जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असतो. त्यामुळे रंगांच्या छटांमध्येही फरक आढळतो.”
“त्याने काय होतं?”
“अरे, मेहंदीचा रंग लाल-नारंगी असला तरी दालचिनीसारखा तपकिरी-काळसर, चॉकलेटी आणि चेरीसारखा लाल गडद असाही असतो.”
“अरे वा!”
“मनुष्यप्राण्याच्या कातडीच्या वरच्या थरातील पेशींच्या बाहेरच्या भागात असलेल्या ‘फॉस्फोलिपिड’ रसायनाच्या किंवा त्या पेशीतल्या प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. ते त्यांच्यात सहज मिसळतात. प्रथिनांच्या रेणूंना घट्ट मिठी मारून बसतात.”
“वंडरफूल!”
“हे झालं हाताचं, डोक्यावर काय घडतं?”
“केसांमधील ‘केरॅटिन’ या प्रथिनाशी त्यांची प्रकिया होते.”
“त्याने काय होतं?”
“जर केसांमध्ये केरॅटिनचं प्रमाण जास्त असेल तर लॉसोनियाही जास्त प्रमाणात तिथे घट्ट बसतो. त्यामुळे केसांचा रंग पालटतो. अठ्ठेचाळीस तासांनंतर तो काळसर होऊ लागतो.”
“वाव!”
“मेहंदीचा रंग कातडीमध्ये किंवा केसांना मिळावा म्हणून ही पानं वाटताना त्यात लिंबाचा रस मिसळतात. तळहातावरील किंवा तळपायावरील कातडीत शिरलेल्या लॉसोनियाला वाफेचा स्पर्श झाल्यास त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.”
“म्हणजे मावशे, मालकीणबाईंच्या हातावर इतक्या सगळ्या भानगडी, या मेहंदीने घडवून आणल्या नि पुढच्या अठ्ठेचाळीस तासांतच आपली ही पांढऱ्या केसांची भूतीन मालकीणबाई, काळ्या केसांची चेटकीण होणार, असंच ना.”
“मग तुला काय व्हायचंय, चेटकिणीचा घुबड? की राक्षशिणीचा कावळा? चल, तुलासुद्धा रंगवते या मेहंदीत. मालकीणबाई येईपर्यंत तू होशील लालढुस्स! लाल रंगाचा उंदीर बघून मालकीणबाईच होईल फुस्स!!” मावशी डोळे मिचकावत नि टेबलवरील मेहंदीच्या भांड्याकडे बघत म्हणाली. मावशीचा दुष्ट विचार लक्षात येताच, मामाने बिळाकडे धूम ठोकली.
ज्येष्ठ बाल साहित्यिक.