'रि'फिल

पेन संपलं की रिफिल बदलायची, पण आयुष्याच्या वहीत काही आठवणी अशा असतात की, त्या कधीच आटत नाहीत. त्या आठवणींच्याच शाईनं मनाची रिफिल भरत जाते शेवटच्या श्वासापर्यंत.
'रि'फिल
(Photo-Yandex)
Published on

विशेष

गीतेश गजानन शिंदे

पेन संपलं की रिफिल बदलायची, पण आयुष्याच्या वहीत काही आठवणी अशा असतात की, त्या कधीच आटत नाहीत. त्या आठवणींच्याच शाईनं मनाची रिफिल भरत जाते शेवटच्या श्वासापर्यंत.

समजला ना तुला ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन?’

‘येस सर!’

‘ठीक आहे. आता आपण असंच जॉमेट्रीचा वापर करून दोन व्हेक्टर्स कसे ॲड करायचे ते आणखी एका प्रकारे पाहू या. सो नेक्स्ट लॉ इज पॅरेलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन... अरे! पेन चालत नाहीये...’

मी शिकवताना पुढल्या नियमाविषयी म्हणून गेलो खरं, पण पेनाला पाझरच फुटत नव्हता. मी लागलीच वहीचं मागलं पान उलटवून तिथे पुन्हा पेन चालवून पाहिलं. पण काहीच उमटलं नाही. दोन-तीन वेळा पेनाला झटकाही दिला. पण तरीही पेन शुष्कच. अगदी हातपंपाचा हापसा मारूनही त्याच्या तोंडातून पाणी येऊ नये तसं. मग समजलं हापस्यात नव्हे; तर झर्‍यातच खोट आहे. झराच आटला तर पाणी वर येईल तरी कसं? याचा अर्थ पेनातली रिफिलच संपली होती. मी लागलीच ईशाला म्हणालो, ‘अगं रिफिल संपलीये. नवी आहे का? देतेस?’

‘रिफिल? ते काय असतं?’

ईशाच्या चेहर्‍यावर मला भलंमोठं प्रश्नचिन्ह दिसलं. मलाही तो प्रश्न दारावर आलेल्या एखाद्या आगंतुकासारखाच वाटला. मीही त्या अनपेक्षित प्रश्नानं थोडा गोंधळलो. मग सावरतच म्हंटलं, ‘ईशा, पेन चालत नाहीये ना, म्हणजे त्यातली शाई संपलीये. तर ती पुन्हा भरायला नको? नवी रिफिल टाकावी लागेल.’

तरी तिच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काही हललं नव्हतं. मग मी ते जेल पेन मागनं उघडलं आणि आतली रिफिल ट्युबलाईटवर धरली. बाहेरनं दुधिया रंगाच्या त्या रिफिलच्या आत शुष्कावत गेलेल्या शाईचे निळसर ठसे दिसले. ते ईशाला दाखवत म्हणालो, ‘ही बघ रिफिल.. आणि यातली शाई बघ कशी संपलीये ते. शाई पूर्ण भरलेली असती तर त्यात दिसली असती ना!’

एव्हाना ईशाच्या चेहर्‍यावरच्या प्रश्नचिन्हाची जागा कुतुहलानं घेतली होती. ती लागलीच म्हणाली, ‘ओह आय सी! अशी असते का रिफिल... मी तर पहिल्यांदाच पाहतेय. पण माझ्याकडे नाहीये रिफिल. मी माझ्या रूममधनं नवं पेन घेऊन येते सर.. आलेच!’

आता आश्चर्यचकित होण्याची माझी वेळ होती. मी मनात म्हंटलं, ‘आईंग! अकरावीतल्या मुलीला रिफिल नाही माहीत...’

मग मला तिची पार्श्वभूमी आठवली. तिचे वडील मंत्रालयात मोठ्ठ्या हुद्द्यावर होते. फोर बीएचके फ्लॅटमध्ये पूर्ण वेळ घरकाम करणार्‍या मुलीलाही स्वतंत्र खोली इतकी सुबत्ता. घरातल्या प्रत्येक डेकोरेटिव्ह गोष्टींतून श्रीमंती झळकत होती. मलाही ईशाची प्रायव्हेट ट्युशन घेण्याकरता आणि तिला बारावी चांगल्या मार्कांनी पास करून देण्याच्या उद्देशानं चांगलीच फी तिच्या वडिलांनी मोजली होती. इतक्यात ईशा आतून डझनभर जेल पेन असलेलं पाऊचच घेऊन आली. पेनाची रिफिल संपली की पेन थेट कचऱ्याच्या पेटीत टाकायचं आणि नवं पेन घ्यायचं. कारण तिला रिफिल हा प्रकार ठाऊकच नव्हता.

मी त्या पाऊचमधून एक पेन काढलं आणि तिला म्हंटलं, ‘ईशा हे एक पेन चाळीस रुपयांचं आहे, पण याची रिफिल तुला स्टेशनरीच्या दुकानात दहा रुपयात मिळेल. म्हणजे तू कमी पैशात हे पेन पुन्हा पुन्हा वापरू शकतेस. अगं, गाडीतलं पेट्रोल संपल्यावर आपण नवी गाडी घेत नाही ना, तर त्यात पुन्हा पेट्रोल भरतो. हो की नाही..?’

ती लागलीच उद्गारली, ‘बिग डिल सर, काय फरक पडतो..!’

तिच्या या ‘युज अँड थ्रो’ मानसिकतेच्या उत्तरावर मी मान खाली घातली आणि वहीत फिजिक्सचा नवा नियम शिकवायला घेतला. पण नकळतपणे माझं मन शाळेतल्या दिवसांमध्ये गेलं...

मी डॉ. बेडेकर विद्यामंदिरचा विद्यार्थी. म्हणजे चौथीत असताना आम्ही कळव्यातून ठाण्यात राहायला आलो तेव्हा पहिल्यांदा बेडेकर शाळेत माझा प्रवेश झाला. मराठी माध्यमाची मध्यमवर्गीय मानसिकता असलेली आमची शाळा. त्यामुळे उधळपट्टीचा घोडा उधळू नये इतका घट्ट लगाम परिस्थितीनं हाती धरलेला.

मला आठवतंय मी सहावीत असेल; लिहिता लिहिता माझं पेन अचानक तुटलं. दुसरं पेन कंपासपेटीतून काढलं तर त्यानंही थोडावेळानं मान टाकली. त्याची रिफिल संपली. कशीबशी पेन्सिलनं वेळ मारून नेली. नंतर मधली सुट्टी होणार होती. त्यानंतर भूगोलाचा तास होता. भूगोलामुळे डोळ्यांसमोर दिवसाच काजवे चमकायला लागले. कारण भारताचा नकाशा आणायला मी विसरलो होतो आणि भूगोलाचे बागुल सर म्हणजे जमदाग्नीचा अवतार. त्यांच्या तासाला पट्टी आणि हात एक व्हायचा नि काहींच्या गालावरच नकाशा उमटायचा. मी खिसे तपासले तर खिशात फक्त दोन रुपये सापडले. आता या दोन रुपयात काय काय घ्यावं याचं मनाशी पुन्हा पुन्हा गणित जुळवलं; तरीही पैसे कमीच भरत होते.

मनाचा हिय्या करून मधल्या सुट्टीत अर्धाच डबा खाऊन मी लपतछपतच शाळेच्या गेटबाहेर आलो. समोरच स्टेशनरीचं दुकान होतं. मी दोन नकाशे, एक पेन आणि एका पेनात रिफील या सगळ्या गोष्टी दोन रुपयात येणं शक्य नव्हत्या. मी दुकानदारला माझ्याकडे दोनच रुपये असल्याचं सांगितलं. 'जा पळ इथून' असा माझ्यावर खेकसला. मीही मग पळतच पुढल्या दुकानाकडे माझा मोेर्चा वळवला. मी धापा टाकत त्या दुकानापाशी पोहोचलो आणि म्हणालो, ‘दोन नकाशे आणि या पेनाची रिफिल द्या काका.’

मी विचारलं, ‘किती पैसे झाले काका?’

ते लगेचच म्हणाले, ‘अडिच रुपये.’

मी खिशातून दोन रुपयाचं नाणं काढलं. ‘काका माझ्याकडे दोनच रुपये आहेत. मी उरलेले पैसे उद्या देऊ का प्लीज...’

‘ठीक आहे. पण आठाणे उद्या नक्की आणून दे.’

मी धावतपळतच शाळेत पोहोचलो तेव्हा मधमाशांच्या पोळ्याजवळ घोंगावणाऱ्या मधमाशा संध्याकाळी गुपचूप आत जाऊन बसाव्यात तशी मधल्या सुट्टीत गोंगाट करणारी सर्व मुलं वर्गात शांत बसली होती. मी माझ्या वर्गावर आलो. बागुल सर नकाशा न आणणाऱ्या मुलांच्या हातावर पट्टीनं नकाशा रेखाटत होते. भीतीनं माझीही गाळण उडाली. मनात म्हंटलं, ‘मेलोऽ’

दरवाजातून घाबरतच विचारलं, ‘सर आत येऊ का?’

खूर्चीतूनच माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून सरांनी विचारलं, ‘काय रे, तुझी मधली सुट्टी आत्ता संपली का? घंटा ऐकू आली नाही का? कुठे गेला होतास हुंदडायला?’

‘काय रे, ऐकू येतंय की कानात बोळे घातलेत. काय विचारतोय मी.. कुठे होतास एवढा वेळ?’

कसा तरी धीर गोळा करून मी सर्व हकिगत सरांना सांगितली. ते सर्व ऐकून सरांनी मला जवळ बोलावलं. मी भीतभीतच जवळ गेलो. आत्ता हातावर पट्टी पडणारंच या विचारानं हातही पुढे केला. तर आश्चर्य म्हणजे सरांनी त्यांच्या खिशात असलेल्या खडीसाखरेचे चार दाणे माझ्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ‘जा पटकन जागेवर बस... मुलांनो पुस्तक काढा रे!’

मी बाकावर जाऊन बसलो. भूगोलाचं पुस्तक बाहेर काढलं. मुठीत असलेले खडीसाखरेचे दाणे पाहिले. ट्युबलाईटच्या प्रकाशात मला ते शिपल्यातल्या मोत्यासारखे वाटले. ते जिभेवर ठेवण्याआधीच त्यांचा गोडवा माझ्या मनात उतरला होता. दोन दाणे तोंडात टाकत मी उरलेले दोन दाणे शेजारी बसलेल्या मित्राला दिले. त्या दाण्यांनी रिफिल झाल्यासारखं वाटलं. त्यादिवशी सरही मायाळू वाटले. तेही कदाचित त्यांच्या शाळेतल्या अशाच एखाद्या आठवणीनं रिफिल झाले असावेत...

मी दुसऱ्याच दिवशी त्या स्टेशनरी दुकानात जाऊन त्या काकांचे उरलेले आठाणे दिले. काका म्हणाले, ‘अरे वा! आलास तू... शाब्बास! मला वाटलंच होतं तू नक्की येशील.’

माझ्या खरेपणाविषयी त्यांना खात्री पटली असावी. तेव्हापासून मला त्या आठाण्याची आणि रिफिलचीही किंमत समजली होती. पुढे काही दिवस मी मुद्दाम त्यांच्या दुकानातून मला शाळेला लागणार्‍या वस्तू खरेदी करायचो. पण काही काळानं अचानक ते दुकान बंद झालं. ते काका कुठे गेले याबद्दल काहीच कळलं नाही. पण त्यांचं नाव माहीत नसल्याची रुखरुख मात्र मनात लागून राहिली. कारण आमच्यासाठी त्यांचं दुकान म्हणजे फक्त होतं ‘विद्यार्थी बुक डेपो’.

ईशाच्या त्या रिफिल पुराणामुळे मी काळाच्या कितीतरी मागे जाऊन आलो. ट्युशन संपवून मी इमारती खाली आलो. गाडीला किक मारली आणि पुन्हा मनाला आठवणींची किक बसली. वार्‍याच्या झोताबरोबर आठवलं की, एकदा गणिताच्या तासाला माझं पेन तुटलं होतं. तेव्हा नुसत्या रिफिलिनं लिहून मी वेळ मारून नेली होती. अर्थात त्या पेनातली रिफिल नेहमीसारखी प्लास्टिकची, बारिकशी नव्हती; तर ती स्टिलची असल्यानं त्याला पकडायला थोडी ग्रीप मिळत होती. रेनॉल्डसचं प्लास्टिक पेन असेल तर रिफिलिनं लिहिणं जमायचं नाही. जॉटर कंपनीचं पेन असेल तर मात्र तसा जुगाड सहज जमून जायचा. ज्याच्याकडे हे पेन तो खरा श्रीमंत अशी त्यावेळी वर्गातल्या सर्वांची श्रीमंतीची समज होती. आत स्प्रिंग असलेल्या त्या पेनाचा चालू-बंद करतानाचा टुक टुक, टुक टुक असा आवाज करण्यात मस्त टाईमपासही व्हायचा. आमच्या भट बाई त्या आवाजानं वैतागायच्या. तसली पेनं त्या जप्त करायच्या म्हणून ती त्यांच्या नजरेपासून वाचवावी लागायची.

अशीच फाऊंटन पेनची एक अजब कहाणी असायची. त्यात शाई भरणं मला नेहमी किचकट काम वाटायचं. बोटं हमखास काळी-निळी पडायची आणि शर्टाचा खिसाही फाऊंटन पेन सोबत असल्याचा न मागताच पुरावा द्यायचा. त्यापेक्षा पायलेट पेन मला जवळचं वाटायचं. पण ते खूप महाग मिळायचं. पेनही आणि रिफिल करणंही महागडच. खाऊचे पैसे साठवून साठवून एकदाच मी पायलेट पेन विकत घेतलं होतं. मला वर्गाचा पायलट असल्यासारखच तेव्हा वाटलं होतं. पण तिसर्‍याच दिवशी कोणीतरी माझ्या कंपासपेटितून ते पेन लंपास करून मला जमिनीवर आणलं. वर्गात एकमेकांच्या कॉलरी पकडून ते पेन मी आणि माझ्या मित्रानं खूप शोधलं; पण सापडलंच नाही. काहीतरी मौल्यवान गमावल्याची भावना त्यावेळी मनात दाटून आली होती. खूप वाईट वाटलं होतं...

पेनांच्या बाबतीतली आणखी एक गंमत म्हणजे मधल्या सुट्टीत रंगणारी आमची पेन-फाईट. प्रत्येकाच्या दप्तरातून मेटलची जड जड पेनं बाहेर यायची. ती मेटलची पेनं आणखी जड व्हावीत म्हणून आतली रिफिल आणि स्प्रिंग काढून त्यात आम्ही मुलं बॉल बेरिंग्स भरायचो. सायकल दुरुस्ती करणार्‍या दुकानाबाहेर अशी बॉल बेरिंग्स हमखास मिळायची. चार-पाच बाकांवर दोन-दोनच्या टीमने पेन फाईट सुरू व्हायची. त्या बाकांजवळ गुळाभोवती घोंगावणाऱ्या माशांप्रमाणे इतर मुलांचा घोळका जमायचा. प्रत्येकाच्या सूचना, चिडवाचिडवी सुरू असायची. ज्याचं पेन शेवटपर्यंत टिकून राहायचं तो ‘हेवी-वेट चॅम्पियन’ ठरायचा.

एकदा मधल्या सुट्टीत पेन फाईट खेळताना गलका इतका वाढला की, आमचे वर्गशिक्षक गावित सर अचानक वर्गात घुसले. मग काय सर्वांच्या हातांवर पट्ट्यांचे वळ उठले आणि पेनं जप्त केली गेली. मागे उरल्या त्या फक्त पेनातल्या रिफिली...

आज त्याच आठवणींच्या रिफिलींवर मन शाळेतल्या दिवसांची भ्रमंती करून आलं. त्या वेळी खिशात पैसे नसायचे; पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निखळ आनंद मिळायचा. म्हणूनच कदाचित मनाची रिफिल इतक्या सुंदर आठवणींच्या शाईनं ओतप्रोत भरलेली राहिली. शेवटी आपण सर्व काय करत असतो? शेवटच्या श्वासापर्यंत आठवणींचं रिफिलच ना!

geeteshshinde@gmail.com

लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत

logo
marathi.freepressjournal.in