हिवाळ्यातले पाहुणे

हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो पक्षी दूरदेशातून भारतात दाखल होतात. कोणी अन्नाच्या शोधात, तर कोणी प्रजननासाठी अनुकूल वातावरणाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. पक्ष्यांच्या या स्थलांतराची कहाणी जितकी रंजक, तितकीच थक्क करणारी आहे.
हिवाळ्यातले पाहुणे
हिवाळ्यातले पाहुणे
Published on: 

अजब निसर्ग

मकरंद जोशी

हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो पक्षी दूरदेशातून भारतात दाखल होतात. कोणी अन्नाच्या शोधात, तर कोणी प्रजननासाठी अनुकूल वातावरणाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. पक्ष्यांच्या या स्थलांतराची कहाणी जितकी रंजक, तितकीच थक्क करणारी आहे.

निसर्गाच्या अजब दुनियेत वर्षानुवर्षे सातत्याने आणि नियमितपणे घडणारे काही चमत्कार आहेत. त्यातला एक म्हणजे ‘पक्ष्यांचे स्थलांतर’. दरवर्षी हिवाळ्यात भारतातील अनेक तलाव, जलाशय आणि नद्यांच्या काठावर न चुकता परदेशी पाहुणे पाहायला मिळतात. सायबेरिया, युरोप, चीन अशा दूरदेशांतून येणारे हे पाहुणे भारताच्या नैसर्गिक विविधतेत मोठी भर घालतात.

हिवाळ्यात हमखास होणारे हे पाहुण्या पक्ष्यांचे आगमन म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर. हे स्थलांतर मुख्यतः दोन कारणांसाठी होते. एक म्हणजे, हिवाळ्यात शीत कटिबंधात अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे अन्नाच्या शोधात पक्षी आपला मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात येतात. दुसरे कारण म्हणजे, जिथे अन्नाचा तुटवडा आहे, अशा ठिकाणी प्रजनन होऊ शकत नाही. त्यामुळे मुबलक अन्न असलेल्या प्रदेशात येऊन आपले वंशसातत्य राखणे हा देखील स्थलांतरामागचा उद्देश असतो. निसर्गातील ऋतुचक्राने कूस बदलली आणि हिवाळ्याची चाहूल लागली की शीत कटिबंधातील पक्ष्यांना स्थलांतराची नैसर्गिक उर्मी जाणवू लागते.

दरवर्षी न चुकता, ठरावीक काळात अर्थात हिवाळ्यात भारताच्या विविध भागांत येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळणारी विविधता थक्क करणारी आहे. या पक्ष्यांमध्ये उथळ पाण्यात राहून चिखलात अन्न शोधणारे पक्षी आहेत, त्याचप्रमाणे नदी किंवा खाडीच्या मुख्य प्रवाहात पोहणारे आणि मासे पकडणारे पक्षीही आहेत. यामध्ये अगदी चिमणीच्या आकाराच्या पक्ष्यांपासून ते साडेचार-पाच फूट उंचीच्या पक्ष्यांपर्यंत विविध आकाराचे पक्षी असतात. या पक्ष्यांच्या खाण्यामध्येही वैविध्य असते आणि त्यांची घरटीही वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही पक्षी समूहाने वसाहत करून राहतात, तर काही स्वतंत्रपणे घरटी बनवतात. या सगळ्या विविध पक्ष्यांमध्ये असलेला समान दुवा म्हणजे हे सर्व स्थलांतरित असतात आणि काही काळाने पुन्हा आपल्या मूळ प्रदेशाकडे परत जातात.

भारतात हिवाळ्याचा काळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या दहा कुळांमधील शेकडो पक्षी येतात. त्यातील ॲनाटिडी कुळातील म्हणजे सर्वसाधारणपणे डक अर्थात बदक प्रकारातील स्थलांतरित पक्ष्यांची नावे आहेत थापट्या (नॉर्दर्न शॉव्हेलर), हळदी-कुंकू बदक (स्पॉट-बिल्ड डक), भुवई (गार्गनी), तलवार बदक (नॉर्दर्न पिनटेल), चक्रांग (कॉमन टील), शाही चक्रवाक (कॉमन शेलडक), नकटा बदक (कॉम्ब डक). या सगळ्या हिवाळी पाहुण्यांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतात ते ग्रुईडी कुळातील क्रेन्स अर्थात क्रौंच पक्षी. या कुळातील डेमॉइझल क्रेन अर्थात कांड्या करकोचा आणि कॉमन किंवा युरेशियन क्रेन हे आजही भारतातील ठरावीक प्रदेशांत हिवाळ्यात पाहायला मिळतात. मात्र, सायबेरियातून येणारे स्नो क्रेन म्हणजेच सायबेरियन क्रेन आता भारतात येत नाहीत. २००२ नंतर भारतात सायबेरियन क्रेन्स आलेले पाहायला मिळाले नाहीत. यातील डेमॉइझल क्रेन हे पक्षी शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरतात, कारण हे क्रेन शेतात पेरलेले धान्यही उकरून खातात आणि तेही दिवसाला प्रत्येकी किलोभर धान्य. त्यामुळे शेतकऱ्यांना हे पक्षी शेतात यायला नकोच असतात.

दूरदेशांतून येणाऱ्या या हिवाळी पाहुण्यांमध्ये युरेशियन कर्ल्यू (युरेशियन कोरल), ब्लॅक-टेल्ड गॉडविट (काळ्या शेपटीचा पाणटिळवा), ब्राऊन-हेडेड गल (तपकिरी डोक्याचा कुरव), कॅस्पियन टर्न (थोरली कुररी), पलाश गल (पलाशचा कुरव), कॉमन सँडपायपर (तुतारी), कर्ल्यू सँडपायपर (बांकचोच तुतारी), कॉमन स्नाइप (पाणलावा), लिटल स्टिंट (लहान टिळवा), व्हाइट वॅगटेल (पांढरा धोबी), यलो वॅगटेल (पिवळा धोबी) असे अनेक लहान-मोठे पक्षी आहेत. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे छायाचित्रण करण्यासाठी पक्षीमित्र वेगवेगळ्या जलाशयांवर गर्दी करतात.

हे सगळे स्थलांतरित पक्षी परदेशातून येतात, त्याचप्रमाणे देशांतर्गत स्थलांतर करणारे पक्षीही आहेत. अशा स्थानिक स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वात देखणा आणि म्हणूनच सगळ्यांना पाहायचाच असतो असा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख किंवा रोहित पक्षी. यांचे दोन प्रकार आहेत. ग्रेटर म्हणजे थोरले रोहित आणि लेसर म्हणजे धाकले रोहित. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जलाशयांवर दोन्ही प्रकारचे रोहित पाहायला मिळतात. भारतातील फ्लेमिंगो हे गुजरातमधील कच्छच्या रणाचे म्हणजे वाळवंटाचे मूळ निवासी आहेत. उडताना काय किंवा जलाशयात उभे असलेले काय, फ्लेमिंगो त्यांच्या नेत्रसुखद रंगसंगतीमुळे कायम आकर्षकच दिसतात.

निसर्गातील पक्षी स्थलांतर म्हटल्यावर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा युरोप किंवा सायबेरियातून येणारे हिवाळी पाहुणे पक्षीच आठवतात. पण या दीर्घ पल्ल्याच्या स्थलांतराप्रमाणेच देशातल्या देशात होणारे स्थलांतरही भारतात अनुभवायला मिळते. भारताच्या उत्तरेतील हिमालय पर्वताच्या रांगेच्या पायथ्याशी इंडियन रोलर बर्ड अर्थात भारतीय नीलपंख याचे वास्तव्य असते. हिवाळ्यात हा नीलपंख दक्षिणेकडे सरकतो. महाराष्ट्रात साधारणतः ऑक्टोबरपासून नीलपंख दिसायला सुरुवात होते. मात्र, मध्य प्रदेशासारख्या काही राज्यांमध्ये हा निवासी म्हणजे नेहमी आढळतो. श्राइक अर्थात खाटिक पक्ष्यांमधील ब्राऊन श्राइक, लॉन्ग-टेल्ड श्राइक, रुफस-टेल्ड श्राइक असे काही प्रकार हिवाळ्यात देशांतर्गत स्थलांतर करतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमधील जमिनीवर आणि झाडांवर वावरणाऱ्या पक्ष्यांमधले एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्टर्लिंग अर्थात भोरड्या. रोझी स्टर्लिंग, कॉमन स्टर्लिंग, चेस्टनट-टेल्ड स्टर्लिंग अशा काही प्रकारच्या भोरड्या फार मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. यातील काही भोरड्या या पॅसेज मायग्रंट्स म्हणजे स्थलांतर करताना फक्त काही काळच वाटेत थांबणाऱ्या असतात.

देशांतर्गत केलेले स्थानिक स्थलांतर असो किंवा युरोप, तिबेटमधून केलेले आंतरराष्ट्रीय स्थलांतर असो, या प्रवासात वेगवेगळे विक्रम पक्ष्यांकडून रचले जातात. मध्य आशियातून भारतात येणारे बार-हेडेड गीज म्हणजे पट्ट कदंब हे डक्सच्या वर्गातले पक्षी जगातील सर्वात उंचावरून उडणारे पक्षी मानले जातात, कारण ते चक्क जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या माथ्यावरून उडत येतात. स्थलांतरातील सर्वाधिक अंतर कापण्याचा विक्रम आर्क्टिक टर्न या लहानशा पक्ष्याच्या नावावर आहे. दरवर्षी हा पक्षी आर्क्टिक म्हणजे पृथ्वीच्या उत्तर टोकावरून दक्षिण टोकावरील अंटार्क्टिकाच्या बर्फाळ किनाऱ्यापर्यंत प्रवास करतो. या प्रवासामध्ये आर्क्टिक टर्न सुमारे नव्वद हजार किलोमीटरचे अंतर एका वर्षात पार करतो. या पक्ष्याला सुमारे तीस वर्षांचे आयुष्य लाभलेले आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्यात मिळून हा पक्षी पृथ्वी ते चंद्र इतके अंतर तीन वेळा पार करतो. पॅसेज मायग्रेशनमध्ये भारतात एक थांबा घेणारे आमूर फाल्कन भारतातून आफ्रिकेकडे जाताना सलग पाच दिवस उडत असतात.

तर पक्षी स्थलांतराचे चक्र सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील भिगवण, नांदूर मध्यमेश्वर, हिप्परगा तलाव, कवडी पाट, हतनूरचा जलाशय आणि कोकणची किनारपट्टी येथे हिवाळी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. मग त्यांचे स्वागत अवश्य करा आणि त्यांचे हिवाळ्यातील निवासस्थान जपण्याचा प्रयत्नही अवश्य करा.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com