आनंद तर्रीच्या ठसक्यातला

मिसळ म्हणजे केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर झणझणीत चवीतून उलगडणारा एक पूर्ण अनुभव आहे. कळकट टपरीपासून गबदुल बेकरी पावापर्यंत आणि तर्रीच्या ठसक्यापासून कडक चहापर्यंत- मिसळ खाणं म्हणजे पोटासोबत मन तृप्त करणारा उत्सवच.
आनंद तर्रीच्या ठसक्यातला
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

मिसळ म्हणजे केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर झणझणीत चवीतून उलगडणारा एक पूर्ण अनुभव आहे. कळकट टपरीपासून गबदुल बेकरी पावापर्यंत आणि तर्रीच्या ठसक्यापासून कडक चहापर्यंत—मिसळ खाणं म्हणजे पोटासोबत मन तृप्त करणारा उत्सवच.

तिखट झणझणीत मिसळी संगती-

हवा बेकरी पाव,

गोडुस स्लाइस ब्रेड-बिडला-

जराही इथे न वाव.

मिसळ- कांदा, लिंबू आहा !

नाकातून, पाणी वहातं नुसतं.

जेवणा खाण्याचं म्हटलं तर

एक कॉम्बिनेशन असतं,

खरं म्हणजे मिसळ हा नावाप्रमाणे अनेक खाद्य घटकांची मिसळण करून बनवलेला चटकदार पदार्थ. फरसाण, चिवडा, शेव, कांदा, लिंबू आणि या सगळ्यावर उतरणारा झणझणीत मटकी, चणे किंवा पांढऱ्या वाटण्याचा रस्सा, तेलाच्या तवंगासह. आणि या सगळ्या मिश्रणासहित जेव्हा ती समोर अवतरते, त्यानंतर मात्र एक मिनिटंही दवडणं अशक्य होतं. कधी एकदा तिच्या बाजूचा मऊशार गबदुल बेकरी पावाचा घास रश्शात डुबवून मुखात घालतो असं होऊन जातं अगदी. काही ठिकाणी मिसळीबरोबर स्लाइस ब्रेड देतात. पण गबदुल बेकरी पावाची मज्जा स्लाइस ब्रेडला जराही येत नाही.

एक प्लेट मिसळ आणि दोन किंवा तीन गबदुल बेकरी पावाचा स्वाहा केल्यावर पोट भरून जातं. काही अस्सल खवय्ये एकाचवेळी दोन प्लेट मिसळसुद्धा हाणतात.

आता घरीही एखाद दिवशी मिसळीचा बेत होतो, ती चवदारही होते, पण ठराविक ठिकाणच्या फर्मास मिसळीची चव घरच्या मिसळीला नाही येत. भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी घरीही बनते पण चाट ठेल्यावरच्या या चटकदार पदार्थांना जी चव असते ती का कोण जाणे पण घरी नाही येत.

त्यातून मिसळ ही रेस्टॉरंट्समध्ये खाऊच नये या मताचा मी आहे. उडप्याच्या हॉटेलमध्येही मिसळ मिळते पण तिचा आपल्याला हव्या असलेल्या चविशी काहीही संबंध नसतो.

मिसळीचं नेमकं ठिकाण म्हणजे टपरी किंवा बसायला चार अगदी साधी बाकडी आणि रंग उडालेली थोडीशी डुगडुगणारी टेबलं असलेलं लहानसं उपहारगृह. जिथे मिसळ, बटाटा वडा, कांदा भजी आणि कडक चहा एव्हढेच पदार्थ उपलब्ध असतात. कॉफीबिफी मागितली तर विचित्र नजरेने आपल्याकडे पाहिलं जातं. आत शिरायला चिंचोळा लाकडी दरवाजा आणि या टपरी उपहारगृहाच्या जवळ येताच जीभ नाक आणि पोट भुकेने खवळून उठणारे एकत्रित वास ही मिसळीच्या टपरीची जिवंत खूण.

टपरी जितकी कळकट्ट, तितकी तिथल्या मिसळीची चव उत्तम, चटकदार आणि झणझणीत असं काहीसं समीकरण आहे. या टपरी उपाहारगृहाच्या लहानशा किचनमधून काळ्याभोर कढईमध्ये तळतळाट होत असलेल्या कांदाभज्यांचा, भल्या थोरल्या टोपात उकळत असलेल्या मिसळ रश्शाचा आणि दुसऱ्या स्टोव्हवर उकळत असलेल्या चहाचा स्वाद एकत्रित होऊन बाहेरून जाणाऱ्या खवय्यांना ओढून घेत असतो.

इथे मेन्यू कार्ड, बिसलेरी की नॉर्मल वॉटर असे काहीही फालतू प्रश्न विचारले जात नाहीत, तर बोटं बुचकळून आणलेली चार पाण्याची ग्लासं, धाडकन टेबलावर आदळली जातात. बोला काय खाणार असं विचारलं जातं. या प्रश्नाचं उत्तर द्यायला पदार्थ सारिणीमधले चाळीस पन्नास पदार्थ शोधायचे कष्ट इथे नसतात, कारण मुळात हाटेलात लावलेल्या बोर्डावर मोजून पाच पदार्थ लिहिलेले असतात, आणि आपली ऑर्डर तर ठरलेली असते.

शर्टाची दोन बटणं उघडी टाकलेला, बऱ्याच दिवसात धुतली नसावी अशी शंका येणारी हाफ पँट ल्यालेला आणि खांद्यावर, मूळ रंग कुठला होता हे गुलदस्त्यात ठेवणारा नॅपकिन घेतलेला तो मुलगा, आपली ऑर्डर घेता घेता, बाजूच्या टेबलावरच्या गिऱ्हाईकाने खाल्लेल्या पदर्थांचं बिल, खणखणीत आवाजात काउंटर पर्यंत पोहोचवत असतो.

आपण ऑर्डर द्यायची, 'मिसळ भरपूर तर्री मारून, दोन पाव, आणि कांदा....' तो मुलगा आपली ऑर्डर घेऊन आतल्या भागात नाहीसा होतो, आणि पुढच्या अगदी तीन चार मिनिटांत ट्रे वगैरे फालतू छानछौकीला सपशेल फाटा मारून, दोन हातात मिसळीच्या किंचित खोलगट स्टीलच्या बशा आणि पाव ठेवण्यासाठी पावाच्या आकारापेक्षाही लहान, साधारण वाटीपेक्षा किंचित मोठ्या असलेल्या स्टीलच्या बशा घेऊन अवतरतो आणि सराईतपणे टेबलावर मांडतो. मिसळीच्या ताटलीत पूर्ण बुडून, धरण्याच्या जागेपर्यंत मिसळमय झालेले हडकुळे चमचे विसावलेले असतात. रश्शाचा वास नाकात शिरून अस्वस्थ करत असतो, आता थांबणं अशक्य असतं. मिसळीची डिश जवळ ओढायची, वर कांदा पेरायचा, लिंबू डिशभर पिळायचं, पांढऱ्या शुभ्र गबदुल बेकरी पावाचा तुकडा मोडून रश्शात बुडवून त्याला लाल करायचं आणि तोंडात सोडून द्यायचं. लहानसा ठसका लागतो, पण तिकडे दुर्लक्ष करून चमच्याने मिसळीचा पहिला घास घ्यायचा. डोळे आपोआप बंद होतात, अष्ट्सात्विक भाव जागे होतात आणि मुखावर आनंदाचे डोही आनंद तरंग असे भाव उमटतात. त्यानंतर फार वेळ न घालवता मिसळ पावाचे घास, नाकाच्या शेंड्यावर जमणारा घाम, नाकातून वाहणारं पाणी आणि प्रत्येक घासाला तोंडातून स्स्ऽऽऽऽ स्स्ऽऽऽऽ येणारा आवाज यासह मिसळ पाव खाणं सुरू ठेवायचं.

मिसळ खाताना सोबत कुणीतरी असलेच पाहिजे. एकटं जाऊन मिसळ खाण्यात काय मजा आहे. दोन तीन चार आपापल्या तब्येतीनुसार पाव हाणायचे. मिसळीचा शेवटचा घास पावासोबत अगदी निगुतीने निपटून तोंडात टाकायचा आणि जराही विचार न करता समोरच्या ग्लासमधलं पाणी गटागटा संपवायचं. एव्हाना मुलगा पुन्हा समोर येऊन उभा राहिलेला असतो. त्याने 'बोला..' म्हणताच, किती जण आहेत त्यानुसार, कडक कटिंग चहाची ऑर्डर द्यायची, आणि समोर येताच तिखट मिसळवर पुन्हा एकदा स्स्ऽऽऽऽ आवाज करत चहा ढोसायचा. अहो, पोटभर आनंद, तृप्तता आणि समाधान आणखी कशाला म्हणायचं सांगा ना ?

दोन बाय दोन इंचाच्या कागदावर आलेलं बिल, नानकटाई, लांबडे टोस्ट ठेवलेल्या जाडजूड चौकोनी बरण्या असलेल्या काउंटरवर द्यायचं आणि रुमालाने घाम, नाक पुसत तृप्त होऊन बाहेर पडायचं. आयुष्यात अशी मिसळ कायमच सगळा क्षीण घालवून टाकते हे नक्की.

लेखक, निवेदक, कवी

logo
marathi.freepressjournal.in