डिजिटल आई, हरवलेली माया

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आई आणि मुलांमधील जिवंत संवाद खुंटत चालला आहे का? यामुळे मुलांच्या मनावर भावनिक आघात होत आहेत का?
डिजिटल आई, हरवलेली माया
डिजिटल आई, हरवलेली माया 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

विशेष

प्राजक्ता गांगल

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आई आणि मुलांमधील जिवंत संवाद खुंटत चालला आहे का? यामुळे मुलांच्या मनावर भावनिक आघात होत आहेत का?

एखादं मूल आपल्या बोबड्या बोलांनी आईला काही सांगू पाहतं आणि आईचं लक्ष मात्र स्क्रीनवरच्या 'नोटिफिकेशन्स' मध्ये असतं, तेव्हा त्या चिमुकल्या मनावर एक अदृश्य घाव घातला जातो. यातूनच आई आणि मुलामध्ये एका अनाम भावनिक अंतराची निर्मिती होते. संवाद हा केवळ शब्दांचा नसतो, तर तो नजरेचा आणि स्पर्शाचा असतो. मात्र, मोबाईलच्या या आभासी जगामुळे हा जिवंत संवाद आता खुंटला आहे.

आता हेच बघा ना, पाच वर्षांच्या अर्णवने मेहनतीने बनवलेला ब्लॉक्सचा बंगला आईने मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे नीट पाहिला नाही. आईचं दुर्लक्ष झाल्याने अर्णवने हिरमुसून आपला बंगला स्वतःच तोडून टाकला. मुलाला वेळ देण्यापेक्षा आईसाठी मोबाईलचा विरंगुळा मोठा ठरला, ज्यामुळे अर्णव खिन्न झाला, तर दुसरीकडे "मम्मा, आटप ना लवकर ! तुझ्यामुळे सगळीकडे उशीर होतो आणि मला लाज वाटते," अशा शब्दांत मुलीने पार्टीला उशीर होत असल्यामुळे आईवर संताप व्यक्त केला. आईने रजोवृत्तीच्या (Menopause) त्रासाचं कारण दिलं; मात्र मुलीने ती मोबाईलवर 'ल्युडो' खेळत बसल्याचं स्पष्ट बोलून दाखवलं. आयुष्यभर शिस्त पाळणारी आणि वळण लावणारी ही आई गेल्या दोन वर्षांपासून एकटेपणामुळे रील्स आणि गेम्सच्या आहारी गेली आहे. रजोवृत्तीमुळे होणारे बदल खरे असले, तरी आई आता गोष्टी खूप कॅज्युअली घ्यायला लागली होती. मोबाईलच्या वाढत्या स्क्रीनटाइममुळे तिचं कशातच चित्त उरलेलं नव्हतं, हे स्वतः त्या माऊलीला सोडून बाकी सर्वांना प्रकर्षाने जाणवत होतं.

एका सुशिक्षित कुटुंबातील अभियांत्रिकीला असलेला अथर्व एकेकाळी चुकीच्या संगतीमुळे मोबाईलच्या व्यसनात आणि 'एन्झायटी'च्या विळख्यात अडकला होता, ज्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. त्याला यातून बाहेर काढण्यासाठ त्याच्या आईने स्वतःची नोकरी सोडून त्याला वेळ दिला आणि आईच्या प्रयत्नांमुळे अथर्व पुन्हा सावरला. मात्र, मुलगा अभ्यासात व्यग्र झाल्यावर आई एकटी पडली आणि पुस्तक वाचनाचा कंटाळा येतो म्हणून तिनेही मोबाईलचा आधार घेतला. परिणामी, एकेकाळी मुलाला व्यसनातून वाचवणारी आई आता स्वतःच मोबाईलमधील मालिकांमध्ये दं झाली. आता एकाच खोलीत अथर्व लॅपटॉपव अभ्यासात आणि आई मोबाईलमध्ये डोकं खुपसून सीरियल बघण्यात मग्न असते, असं चित्र कायमचं होऊन बसलं.

आणखीन एक असंच उदाहरण की, कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एका तरुण स्त्रीने बाळंतपणानंतर कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला. घराचे ईएमआय आणि वाढत्या खर्चामुळे तिला आर्थिक ओढ जाणवत होती, तरीही करिअर सेट करणं ही तिची पहिली प्राथमिकता होती. बाळ भूकेने रडत असतानाह घरातील इतरांच्या मदतीने ती मनावर दगड ठेवून लॅपटॉपवर काम उरकत होती. केवळ चूल आणि मूल यात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी तिला घरातील लोकांच्या विचित्र नजरा आणि बोलणीही सहन करावी लागत होती, पण करिअरमधील प्रगतीसाठी आणि स्वाभिमानासाठी ती सर्व आव्हानं पेलत जिद्दीने काम करत होती.

या सर्व परिस्थितीत कोणाचंही खरंच खूप काही चुकत होतं का ? त्यांचा आतला आवाज त्यांना काहीच सांगेनासा झाला होता का ? आणि कुठल्याही स्क्रीनपासून त्या एकट्या दूर राहिल्यामुळे घरातलं वातावरण दरवेळी संपूर्णपणे उत्तम राहणार होतं तरी का? इक्वलिटीच्या जमान्यामध्ये अजूनही सगळी जबाबदारी बाईच्या हाती आहे का? आणि तिनेच त्याग करत राहायचा का? हा प्रश्न या बायकांच्या मनात नक्कीच येत होता. आपल्या सगळ्यांच्या मनातदेखील येतोच. पण याचं खरं उत्तर आपल्या आसपासच दडलेलं आहे.

त्याग म्हणजे तरी कशाचा ? एंटरटेन्मेंटचा ? नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्षात न भेटता फोनवरून गुड मॉर्निंग आणि शुभ रात्रीचे मेसेजेस पाठवण्याचा त्याग ? की एखादी रोजची सीरियल आपण पाहिली नाही तर जणू काही आभाळ कोसळेल आणि मी टाइम किंवा स्त्री स्वातंत्र्य/स्पेस मिळवणे वगैरे या नावाखाली दैनिक जबाबदाऱ्या सोडून टीव्ही/मोबाईल/कॉम्प्युटर किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला खिळून राहणे हा अनेक जणांनी शोधलेला आणि आता जणू सर्वमान्य झालेला पर्याय आहे. मनोरंजन हवंच, व्यक्तिस्वातंत्र्यही हवं, सतत ठराविक काम करण्यापेक्षा दर्जेदार काहीतरी घरबसल्या पाहायला देखील हवंच. मुद्दा इथे प्रमाणाचा आहे ! थोडं थोडं काहीतरी पाहिल्यामुळे तात्पुरतं समाधान मिळणं, अल्गोरीदममुळे मनाला हव्याशा वाटणाऱ्या रंगीत गोष्टी विनासायास बघायला मिळणं आणि डोपेमाईन पाझरल्यामुळे बनावटी आनंद मिळणं या मायाजालात आपण एव्हाना पुरते अडकले आहोत.. आणि स्त्री ही अनंत काळाची माता वगैरे न राहता स्त्रीच्या हाती स्क्रीन एवढं एकच सत्य अगदी खेडोपाड्यातल्या सर्व वयोगटांमध्ये सर्रास दिसून येतंय !!

बदलत्या काळानुसार सगळ्यांच्या पद्धतीत बदल होणार, कामांचं स्वरूप बदलणार, हे मान्य आहेच. पण डिजिटल माध्यमांचा वापर अतिरेकी झाल्यामळे डोळ्यांवर, हृदयावर. शरीरातल्या सर्व अवयवांवर आणि सर्वात मुख्य म्हणजे बुद्धीवर, स्वभावावर आणि मनावर होणारे खोलवर परिणाम घातक आहेत हे आपल्याला ठाऊक आहे.

भ्रमणध्वनीचा खरा वापर किंवा खरा उद्देश हा एकमेकांशी दुरूनही संपर्क ठेवता यावा, यासाठी होता... आणि आता बाकी आपण इथे स्वतःशीच संपर्क हरवून बसलो आहोत. अनेकांच्या मेमरीवर, विचारसरणीवर, चित्तवृत्तीवर भयाण परिणाम होताना दिसत आहेत. स्वतःच्या जाळ्यात खेचून घेणारं आणि गुरफटून टाकणारं व्यसनच ते. तर बायका तरी यातून कुठे सुटल्या आहेत?.. डिजिटल फ्रॉड, इंटरनेटचा चुकीचा वापर यामुळे कित्येक घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि घरातली आणि बाहेरची कामं मोबाईलच्या एका बटनावर आता होऊ शकतात, हे म्हणता म्हणता या बटणांमध्ये मनःसौख्य हरवलेल्या आपण सावरणार तरी नक्की कशा?? असा यक्षप्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. यावर सोल्युशन एकच.. खरोखर स्वतःला नव्याने शिस्त लावायची.. दिवसातून गरजेशिवाय, खऱ्या गरजेशिवाय हं का... टीव्ही किंवा मोबाईलवर जास्त अडकायचं नाही. मग ते गप्पा मारण्यासाठी असेल किंवा बिनकामाचा नुसता ईटेक घेण्यासाठी असेल. नाहीतर मुलं प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंटच्या नावाखाली गेमिंगमध्ये जशी अडकतात तसंच सगळ्या आर्याचं हल्ली होतंय.. बँकेची कामं मोबाईलवर होतात, महत्त्वाचे फॉर्म, बिलं भरून होतात, अनेकोनेक अभ्यास, जगभरातले कोर्सेस आणि AI माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड उपयोग आपण यामुळे लीलया करू शकतो. पण त्यापलीकडे या मशीनवर आपण एवढं अवलंबून राहायला नको हे बाकी खरं..

मध्यंतरी एका वर्कशॉपमध्ये मी चॅलेंज दिलं, की "यापुढे अर्ध्या तासाच्या वर दिवसभरात मोबाईलला हात लावायचा नाही, कोण कोण तयार आहे ?" ३०० पैकी १२ हात फक्त वर आले होते.. खरंच खूप कठीण आहे मोबाईल वापराचं स्वातंत्र्य (की पारतंत्र्य?) झुगारून पुढे जाणं! या विचारासरशी अनेकांना डिप्रेशनची भीती वाटते !!

पण अभी नहीं तो कभी नहीं, अशी खरी स्थिती आपण ओळखली आणि आपल्या स्वतःपासून सुरुवात केली तर काही काळामध्ये मुलांना आपलं अनुकरण करून पुन्हा एकदा वाचन, शिवण, स्वयंपाकातले वेगवेगळे पदार्थ, गप्पा, बैठे आणि मैदानी खेळ, एकमेकांना भेटणं आणि आनंदाचं आदानप्रदान करणं, नाट्य शिबिरं, स्पोर्ट्सची शिबिरं, बाहेर फिरायला जाणं आणि नव्या गोष्टींचा आस्वाद घेणे याचं जरा काहीतरी महत्त्व वाटायला लागेल..

मोबाईल हे संवादाचं साधन म्हणून आपल्या आयुष्यात आलं होतं, पण आज ते संवादाचा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. पाच वर्षांच्या अर्णवपासून ते मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या आईपर्यंत आणि करिअरच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण स्त्रीपर्यंत, प्रत्येकजण एका 'निळ्या प्रकाशाच्या' सापळ्यात अडकला आहे. आपण 'डिजिटल क्रांती' तर केली, पण त्या नादात 'मानवी नात्यांची उत्क्रांती' कुठेतरी खुंटली आहे. आईने केलेला त्याग, तिचं स्वातंत्र्य आणि तिचं मनोरंजन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; पण हे सर्व करताना घराचा 'आधारवड' असलेल्या आईची नजर जर स्क्रीनवर खिळलेली असेल, तर संपूर्ण घराचं भावनिक घरपण धोक्यात येतं. मुलांच्या निरागस प्रश्नांना आणि आईच्या मायेच्या स्पर्शाला मोबाईलची काच कधीच रिप्लेस करू शकत नाही. मोबाईलच्या जंगलात हरवलेल्या आईला पुन्हा घराच्या अंगणात, गप्पांच्या ओट्यावर आणि मुलांच्या खेळात परत यावेच लागेल. कारण नाती ही 'ऑनलाइन' नसून 'लाइव्ह' जगण्याची गोष्ट आहे. हा विचार अंमलात आणायला तुम्ही आईवर्ग तयार आहात का? तरच हा हॅपी मदर्स डे खऱ्या अर्थाने साजरा होईल !!

समुपदेशिका

counsellor prajakta@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in