

स्टाईल वाईल
शब्दांकन : पूजा सामंत
आपल्या स्वातंत्र्यलढयाचं प्रतीक असलेली लोकल खादी आता ग्लोबली ओळखली जात आहे. तिच्यात नवे नवे फॅशन ट्रेंड येत आहेत. खादीचे महत्त्व आता फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीपुरतं उरलेले नाही. खादीचे पोशाख वर्षभर उत्साहाने वापरले जात आहेत. भारतीय हातमाग आणि खादीमधील विशेषज्ञ असलेल्या फॅशन डिझायनर करिश्मा सहानी खादीचे वेगवेगळे पैलू इथे उलगडून दाखवत आहेत.
मी इंडियन टेक्स्टाईलवर काम करते. त्यात खादीची भूमिका महत्त्वाची आहे. खादी म्हणजे एक फॅब्रिक एवढाच त्याचा अर्थ नाही. आपल्या देशाची ओळख म्हणजे खादी. आपलं अस्तित्व म्हणजे खादी. खादी म्हणजे केवळ एक हातमाग नाही. खादी हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक आहे.
ब्रिथेबल फॅब्रिक
खादी म्हणजे हातमागाच्या विविध प्रकारांपैकी एक अनोखा प्रकार आहे. कापडाची ती एक वेगळी शैली आहे. खादी या प्रकाराच्याही असंख्य उपजाती आहेत. पण खादी, हातमाग आणि 'इंडियन टेक्स्टाईल'वर सातत्याने प्रयोग करणारी, त्याचे नावीन्यपूर्ण कलेक्शन सादर करणारी एक प्रयोगशील फॅशन डिझायनर म्हणून मी आवर्जून सांगन की, इंडियन टेक्स्टाईलमधील खादीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं हे फॅब्रिक 'ब्रिथेबल' आहे! म्हणजेच हे फॅब्रिक श्वास घेतं. या फॅब्रिकचे कपडे शरीरावर घातले की, त्यातून हवेचं उत्सर्जन होत राहतं. खादीमधून हवेचं निसर्गतः उत्सर्जन होत राहिल्याने घामाघूम होणं हा जो अनुभव आपल्याला कायम येतो, तसा अनुभव खादी घातल्यावर येत नाही. आपला देश उष्ण कटिबंधीय भूभागात येत असल्याने वर्षाच जवळजवळ दहा महिने आपण घामाघूम होत असतो. भारतीय हातमागामध्ये विशेष गुणधर्म असलेली खादी, त्यातील हातमागाच्या नैसर्गिक धाग्यामुळे उष्णता जाणवू देत नाही. म्हणूनच हे फॅब्रिक 'ब्रिथेबल' आहे. त्यामुळे कम्फर्टेबिलिटी हे खादीचं खास वैशिष्ट्य आहे.
चाकोरीबद्ध धारणा बदलण्याची गरज
सर्वसामान्यतः खादीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन टिपिकल असतो. उदा. खादीचे कपडे जाडे-भरडे असतात. नेतेमंडळींनी असे खादीचे कपडे वापरावेत इत्यादी. खादीकडे पाहण्याची लोकांची हीच चाकोरीबद्ध धारणा बदलली पाहिजे. त्यासाठी मी माझ्या प्रयोगांमधून प्रयत्न करत आहे. खादीमध्ये पारंपरिक पोशाख बनतात, पण खादौत तितकीच विविधताही सादर करता येते. अगदी 'जनरेशन अल्फा' किंवा 'जेनरेशन झेड', अर्थात टिनएजर, न्यूली बॉर्न ते सर्व वयोगटांना आवर्जुन वापरता येईल, असे हे फॅब्रिक आहे. त्यामध्ये विविध फॅशन साकारण्यासाठी खूप वाव आहे, खादीचे कपडे अनेकदा 'ब्लॅक अॅन्ड वाईट मध्येच नजरेस पडतात. पण त्यात विभिन्न रंगांचा योग्य वापर केल्यास हेच पोशाख 'डिझायनर होतात, अधिक पॉन्सी ठरू शकतात. खादीच्या फॅब्रिकवर गोल्ड एम्ब्रॉयडरी हा लेटेस्ट ट्रेंड आहे. नव्या जनरेशनला तो आवडतो आहे.
फ्लेक्सिबल फॅब्रिक
काही ठरावीक कार्यक्रमांमध्ये ड्रेस कोडचं भान ठेवणं आवश्यक मानलं जातं. पण खादी हे फॅब्रिक अतिशय फ्लेक्सिबल आहे. कारण ते आपण कुठेही वापरू शकतो. हे एकच फॅब्रिक असं आहे ज्यात ड्रेस कोडचं भान बाळगलं नाहीं तरी चालतं.
मटेरियलविषयीची जागरूकता
खादीमधल्या वेगवेगळ्या ट्रेंड्सचा विचार करताना मला जाणवतं की, हल्लीचा ग्राहकवर्ग अतिशय चिकित्सक, चोखंदळ झाला आहे. कुठे कसले ड्रेस वापरले गेले पाहिजेत, याची त्यांना जाणीव आहे. स्वतःचे लग्न, मित्र-मैत्रिणींचे लग्न, नातेवाईकांचे लग्न, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचे लग्न किंवा मेहंदी... यानुसार कपडे निवडले जातात. अगदी रंगसंगती कुठली असावी, याची देखील पक्की जाणीव आताच्या नव्या पिढीला आहे. जेव्हा ड्रेस विकत घेतला जातो तेव्हा लोक पहिल्यांदा 'ए मटेरियल कौनसा है?' असा प्रश्न विचारतात. 'सिंथेटिक नको, कॉटन पाहिजे' ही आताची कॉमन मागणी आहे. लोकांच्या दृष्टिकोनात झालेल्या या बदलामुळे एकूणच भारतीय हातमागाला, कॉटनला तसेच खादीला असलेली मागणी खूप वाढली आहे.
कॉर्पोरेट लूक
खादीमध्ये स्टाईल्स-सिल्व्हेट्सचा खूप कलात्मक वापर केलेला आढळून येत आहे. कुर्ता, साडी, शाल... म्हणजे खादी, हे पूर्वीचं स्टिरियोटाइप समीकरण आता बदललं आहे. अगदी कॉर्पोरेट ड्रेस, श्री पीस सूट यामध्ये देखील कॉटन, खादी यांचा वापर करून डिझाईन केलं जात आहे. फॉर्मल्समध्ये डिझाईन करताना 'सटल' रंगसंगती ठेवली जाते.
ग्लोबल मागणी
बोडक्यात, खादी हा अलीकडचा 'कंटेम्पररी क्लोथिंग ब्रेड' बनला असून हे प्रमाण वाढतं रहावं, यासाठी मी कटिबद्ध आहे. वजनाला हलकी असणारी, वजनाला जाड असणारी खादी किंवा मध्यम स्वरूपाची खादी वापरणं हे देखील सध्या ट्रेंडिंग आहे. खादी सस्टेनेबल आहे, त्यात खूप मोठी कम्फर्ट लेव्हल आहे. त्यामुळेच सध्या त्याला ग्लोबल मागणी आहे. खादीचा ड्रेस पुरुष किंवा स्त्री, कोणालाही, कुठेही वापरता येतो. त्याचं एक वेगळे इम्प्रेशन पडतं.
ग्लोबल मागणी वाढल्याने खादीचं उत्पादनही वाढत आहे. यात खूप इनोव्हेशन आहे. खादीमधले विविध कट्स आणि स्टाईल्स लोकप्रिय होत आहेत. पूर्वी यात फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. पण आता खादीमध्ये अनेक रंगसंगतीचे ड्रेस, सिल्व्हेट्स सहज उपलब्ध होत आहेत. अगदी अलीकडेपर्यंत फक्त गंभीर प्रवृत्तीच्या व्यक्ती, प्रोफेसर, पत्रकार ही मंडळीच खादी वापरतात, अशी एक धारणा होती. खादीबद्दलचे हे स्टिरियोटाइप चित्र आता बदलत आहे. त्यामुळेच मोठ्या फॅब्रिक मॅन्युफॅक्चर कंपन्याही खादी उत्पादनात उतरत आहेत. विणकर, मध्यस्थ, डिझायनर असे सगळे सक्रियतेने खादीसाठी अधिकाधिक काम करत आहेत. रिसायकल होणं हाच यूएसपी
'जो मिला उसे पहना' ही वृत्ती आता राहिलेली ही. सोशल मीडियामुळे ड्रेसिंगबाबतचा अवेअरनेस खूप वाढला आहे. देशाच्या एका कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला देखील कुठे कुठले कपडे वापरावेत याची जाणीव झाली आहे. यू कान्ट मेक क्लेम विदाऊट प्रूफ. म्हणूनच तर भारतीय कोल्हापुरी चप्पल आपण बनवली हा प्राडाचा बनाव खोटा ठरला! आमच्या देशाची निर्मिती, त्याचं श्रेय आम्हाला न देता ते घेणारे आता एक्स्पोज होणार हे नक्की! आयुर्वेद, योगा याप्रमाणेच हातमाग-खादी ही आपली ओरिजिनल निर्मिती आहे. ही विशुद्ध भारतीय उत्पादनं रिसायकल, रि यूज होतात. हाच त्यांचा यूएसपी आहे आणि सध्याचा ग्लोबल फॅशन ट्रेंड हाच आहे- रिसायकल, रि यूज करणं, भारतीय खादी पुन्हा पुन्हा वापरावी अशीच आहे, आपल्या आज्या-पणज्यांनी घरातील कपडे जुने झाल्यावर त्यांचा किती उपयोग केलाय -गोधड्या करा, पडदे शिवा, अगदी शेवटी तर जमीन पुसण्यासाठीची फडकी करा ! एकही चिंधी फुकट जाऊ देत नसे आपली मागची पिढी ! पर्यावरणास अनुकूल असलेली फॅशन आज जगभरचा गौरवबिंदू बनली आहे आणि आपली भारतीय खादी हा असाच एक मानबिंदू आहे.
इट्स अन्यू इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन!
फॅशन डिझायनर करिश्मा सहानी या खादी आणि इंडियन टेक्सटाईलमधल्या तज्ज्ञ मानल्या जातात.