सावटातील शांततेच्या शोधात

इतकी शस्त्रे असूनही माणसाला शांतता का सापडत नाही? रणांगण बदलत आहेत, युद्धाची साधने आधुनिक होत आहेत; मात्र प्रत्येक युद्धाच्या राखेतून उमटणारा आक्रोश एकच आहे- विजय कुणाचा, पण माणुसकीची किंमत किती? सोमवारच्या जागतिक शांतता दिनाच्यानिमित्ताने लेख.
सावटातील शांततेच्या शोधात
सावटातील शांततेच्या शोधात
Published on

विशेष

ॲड. प्रदीप म. पाटील

मानवाने अवकाश जिंकले, कृत्रिम बुद्धिमत्तेने ज्ञानाच्या सीमा विस्तारल्या; पण स्वतःच्या विनाशाची शस्त्रे निर्माण करण्यातही तो तितकाच पुढे गेला. जगाच्या क्षितिजावर युद्धाचे काळेकुट्ट ढग दाटत असताना एक प्रश्न अधिकाधिक अस्वस्थ करतो- इतकी शस्त्रे असूनही माणसाला शांतता का सापडत नाही? रणांगण बदलत आहेत, युद्धाची साधने आधुनिक होत आहेत; मात्र प्रत्येक युद्धाच्या राखेतून उमटणारा आक्रोश एकच आहे- विजय कुणाचा, पण माणुसकीची किंमत किती ? सोमवारच्या जागतिक शांतता दिनाच्यानिमित्ताने लेख.

"जर तुम्हाला शांतता हवी, तर युद्धास तयार रहा" अशा आशयाचं साधारणतः चौथ्या शतकातलं हे एका रोमन लेखकाचं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं विधान आहे. दुसरं महायुद्ध दिनांक २ सप्टेंबर, १९४५ रोजी संपुष्टात आलं खरं; मात्र त्या युद्धानं जगातल्या युद्धखोर देशांच्या लालसेला बऱ्याच वाटा तयार करून दिल्या आणि शांततेच्या प्रक्रियेला सावटात ढकलून देण्याचं पाप कर्म त्या दुसऱ्या महायुद्धानं केलं. फसलेल्या ‘लीग ऑफ नेशन्सच्या’ जागी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेच्या पुढाकाराने पश्चिमी युरोपीय देशांना सोबत घेऊन ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ (नाटो) १९४९ मध्ये स्थापण्यात आली; तर रशियाने पूर्व युरोपीय देशांचा गट घेऊन ‘वॉर्सा करार’ अंतर्गत एक स्वतंत्र गट १९५५ साली तयार केला. दुसऱ्या महायुद्धातून सारं जग होरपळून निघाल्या नंतरही युद्ध टाळण्याचे वा सामंजस्याची बोलणी करून मतभेद मिटवण्याचं शहाणपण मोठे, ताकदवान देश शिकलेच नाहीत. अमेरिका आणि तत्कालीन सोविएत रशिआ दरम्यान तब्बल १९४५ ते १९९१ इतक दीर्घ काळ शीतयुद्ध चालू होतं. सोव्हिएत रशिआचं विघटन पंधरा देशांमध्ये करण्यात विरोधकांना यश आलं; आणि ह्या शीतयुद्धाची अखेर झाली. या शीतयुद्धा बरोबरच जगाला भेडसावणारे आणखीन काही लष्करी संघर्ष चालूच होते आणि आहेत. यामध्ये अरब-इस्त्रायल संघर्ष, बाल्कन युद्ध, १९४७ ते १९९४ पर्यंतचा दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी संघर्ष हे सारेच संघर्ष अखख्या जगावर युद्धाचे सततचे सावट ठेवणारे म्हणून इतिहासात ओळखले जातात. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अखख्या जगात सध्या इतका युद्धानं, लष्करी संघर्षानं आणि अशांततेने ग्रासलेला सर्वाधिक कठीण काळ जगानं पाहिला नव्हता. जिनिव्हा अकॅडमी च्या ‘वॉर वॉच’ च्या सध्याच्या अहवालानुसार विद्यमान परिस्थितीत जगभरात ३४ आंतरराष्ट्रीय युद्धे चालू असून सक्रिय लष्करी संघर्षांची संख्या तर ११२ आहे.

विज्ञानाने मानवाला अवकाशात पोहोचविले, जागतिक व्यापाराने राष्ट्रांना परस्परावलंबी बनविले, कृत्रिम बुद्धिमत्तेने तर ज्ञानाच्या सीमा प्रचंड विस्तारल्या तरीही मानवाने मानवाचा विनाश करण्यासाठी कमालीची अचूक, वेगवान आणि विध्वंसक अशी शस्त्रे निर्माण केलीत, ज्यांची झलक सद्य स्थितीत ड्रोन्स आणि मिसाइल्स जगाला करून देत आहेत. ही अशी शस्त्रे ही फक्त तांत्रिक अशी युद्ध सामुग्रीची प्रगती नाही, तर मानवी विवेका समोरील गंभीर विरोधाभास आहे. जगभरात चालू असलेली युद्धे जरी भूगोलाच्या अंगाने, क्षमतेच्या दृष्टीने आणि संहाराच्या बाबतीत भिन्न असली तरीही त्यांच्यात काही समान सूत्रे आढळतात. विस्तार वाद, सत्ता स्पर्धा, संसाधनांची लालसा, धार्मिक व जातीय अस्मिता आणि बाह्य शक्तींचा हस्तक्षेप यामुळे अशा संघर्षांना आणि परिणामी हिंसेला दीर्घायुष्य मिळत जाते. आजची आधुनिक युद्धं ही केवळ रणांगणांवर लढली जात नाहीत. ती अर्थव्यवस्था, अन्नपुरवठा, ऊर्जा व्यवस्था, सायबर क्षेत्र आणि माहितीच्या माध्यमांतून लढली जातात. एका प्रदेशातील युद्धामुळे दुसऱ्या प्रदेशातील नागरिकांना अन्नपुरवठा, महागाई, इंधन टंचाई अशा गंभीर संकटांना सामोरे जावे लागते; शिवाय अख्ख्या जगभरात अखंड चालू असणारी व्यापार विषयक पुरवठा साखळीच खंडित होते. स्वाभाविकपणे, कोणतेही युद्ध हा आता केवळ दोन राष्ट्रांचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही.

कुठल्याही युद्धातील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे सामान्य नागरिकाचे होरपळणारे जीवन. घरं, शाळा, दवाखाने, ऊर्जा केंद्र, पायाभूत सुविधा हे सारंच उध्वस्त होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीच्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. या युद्धज्वरात जागतिक सुरक्षेची जणू काही मक्तेदारी असलेली अमेरिका सारख्या तथाकथीत महाशक्तीची स्थिती किती केविळवाणी झालीय याचा प्रत्यय अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धात रोजच येतोय. ज्या अमेरिकेने पश्चिम आशियातील देशात इतकी वर्षे फौजा आणि प्रचंड युद्ध सामुग्री तैनात करून संबंधित मित्र राष्ट्रांना सुरक्षेची हमी दिली, ती हमीच इराणने नेस्तनाबूत केलीय. इराणने पश्चिम आशियात ठाण मांडून बसलेले अमेरिकन सैनिक आणि त्यांची महाकाय म्हणून ओळखली जाणारी ताकद मातीत मिसळलीय हे जमिनीवरचं वास्तव आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर हे सारे उत्पात थांबतील तरी कधी, हा कुणाही विचारी माणसाच्या मनात येणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना काही गोष्टी प्रकर्षानं विचारात घेणं आवश्यक ठरतं. दि. २ सप्टेंबर, १९४५ रोजी संपलेल्या दुसऱ्या विश्व युद्धानंतर भले रडत खडत स्वतःचा आब सांभाळत का होईना संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय न्यायालय, युरोपीय महासंघ, नाटो, जी-७ हे सारे तग धरून आहेत. या संस्थांवर अधिराज्य गाजवणारे बरेच नेतेगण त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आलेत; आणि जगभर युवकांच्या चळवळी मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत; आणि हा युवा वर्ग बदलाची आणि शक्यतांची ताकद ओळखून आहे. जगाला आता थोडीफार जी काही अनुकूल बदलांची - मग तो हवामान बदल असो, भूराजकीय संघर्ष असो वा आर्थिक विषमता व अन्नपाण्याची समस्या असो, युवा पिढी अधिक सक्षमपणे आणि विचारपूर्वक या जागतिक समस्यांना सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करेल हा एक आशावाद जगभरात चर्चिला जातोय.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने ठराव क्र. २५३५ अन्वये दि. १४ जुलै, २०२० रोजी युवा पिढी, शांतता आणि सुरक्षेविषयी सर्वसंमतीने ठराव पारित करून जागतिक शांतता प्रक्रियेत आणि मानवतावादी कृत्यांमध्ये युवकांच्या सहभागावर भर दिलाय. शिवाय, सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये तरुण पिढीचा सहभाग अधिकाधिक व्हावा ह्या दृष्टीने ह्या ठरावाचे महत्व आहे. असे जरी ठराव जागतिक पातळीवरील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदे सारख्या सर्वोच्च संस्थेने पारित केले तरी राजकीय नेतृत्व, न्याय व्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि चिकित्सक आणि विवेकवादी नागरिक तरुण पिढीच्या सहभागाबाबत किती आग्रही भूमिका घेतात ह्यावर ह्या ठरावाचे यशापयश अवलंबून असेल.

कोणत्या देशाला शांततेचा शत्रू म्हणावे हा प्रश्न भावनिक घोषणेपेक्षा अधिक गंभीर आहे. कारण एखाद्या देशातील सर्वच नागरिकांना त्याच्या सरकारच्या धोरणांसाठी दोषी धरणे अन्यायकारक ठरेल. स्वाभाविकतः एखादा देश, त्याचे सत्ताधारी आणि त्या देशाची विशिष्ट धोरणे ह्या मध्ये फरक करणे आवश्यक ठरते. ह्या पार्श्वभूमीवर लष्करी हस्तक्षेपांना, शस्त्र पुरवठ्याला आणि दुसऱ्या राष्ट्रांबाबतच्या धोरणांना समान आंतरराष्ट्रीय निकष लागू व्हायला हवेत.

दि. २१ सप्टेंबरच्या जागतिक शांतता दिनानिमित्त एक महत्वाची बाब स्वीकारणे आवश्यक आहे ती म्हणजे कुठल्याही राष्ट्राचा विजय जर हजारो निरपराध नागरिकांच्या विनाशावर उभा असेल तर तो मानवतेचा विजय असू शकत नाही. युध्द जिंकणे आणि शांतता निर्माण करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. युद्धात शत्रूचा पराभव केला जातो; तर शांततेत शत्रुत्वाचे कारण दुर केले जाते. आज जगाला अधिक शस्त्रांपेक्षा अधिक विश्वासाची, अधिक धमक्यांपेक्षा अधिक संवादाची आणि अधिक सामर्थ्य प्रदर्शनापेक्षा अधिक न्याय्य आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची आवश्यकता आहे. शांततेचा मार्ग बराच खडतर असतो; कारण त्यासाठी केवळ शत्रूशी नव्हे तर स्वतःच्या पूर्वग्रहांशीही संघर्ष करावा लागतो. परंतु मानव जातीसमोर दुसरा टिकाऊ पर्याय नाही. शांतता हे युद्धानंतर मिळणारे बक्षिस नाही; तर ती प्रत्येक मनुष्य प्राण्याची आणि प्रत्येक राष्ट्राची सामुहिक जबाबदारी आहे.

शांतता म्हणजे केवळ रणांगणावर बंदुका थांबणे नव्हे. शांतता म्हणजे माणसाच्या मनातील भीतीचा अंत आणि भविष्याबद्दलच्या आशेचा जन्म. युद्धं सीमा बदलू शकतात, सत्तांची समीकरणे उलटवू शकतात; पण उद्ध्वस्त झालेली घरे, हरवलेली माणसं आणि बालपण गमावलेली पिढी पुन्हा उभी करण्यासाठी विजयाची नव्हे, तर विवेकाची गरज असते. म्हणूनच आज मानवजातीसमोरचा खरा प्रश्न कोण जिंकलं हा नसून, आपण किती माणुसकी वाचवली हा आहे. जगाच्या क्षितिजावर युद्धाचे काळेकुट्ट ढग दाटले असले, तरी संवाद, सहअस्तित्व आणि न्याय यांच्या मशाली विझू देता कामा नये. कारण युद्धाच्या राखेतून उगवणारी प्रत्येक नवी पिढी आपल्याला एकच प्रश्न विचारत राहील—इतकी शस्त्रे निर्माण करूनही आपण शांतता निर्माण करण्यात अपयशी का ठरलो? या प्रश्नाचे उत्तर इतिहासाला नव्हे, तर वर्तमानाला द्यावे लागणार आहे.

लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकील असून जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in