

अजब निसर्ग
मकरंद जोशी
"पेर्ते व्हा... पेर्ते व्हा..." अशी शीळ घालणारा पक्षी, फक्त पावसाचं पाणी पितो अशी समजूत असलेला चातक आणि इंद्रधनुष्यासारख्या रंगांचा तिबोटी खंड्या... या तिघांमध्ये एक समान गोष्ट आहे. ती कोणती? चला, जाणून घेऊया पावसाच्या पाखरांची रंजक दुनिया!
उन्हाळ्याच्या गरमागरम वातावरणानंतर आकाशात काळे काळे मेघ जमायला जरी लागले तरी मनाला गारवा मिळतो. हा अनुभव फक्त माणसांचाच नाही तर अवघ्या सृष्टीचाच असतो. पावसाचं आगमन आपल्या ओरडण्यातून जाहीर करणारे बेडूक असोत किंवा पावसाच्या शिडकाव्यामुळे हलके हलके डोकं वर काढणाऱ्या मशरुम्स असोत यांचं जसं पावसाशी नातं आहे त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या जगातील अनेक भिडू आहेत ज्यांचं आणि पावसाचं काही वेगळंच नातं असतं. ते नातं इतकं घट्ट असतं की या पक्ष्यांना ‘पावसाची पाखरं’ म्हणूनच ओळखतात.
या पावसाच्या पाखरांमध्ये सगळ्यात आधी उल्लेख करावा लागतो तो ‘पावशा’ पक्ष्याचा. येऊ घातलेल्या पावसाची सूचना शेतकऱ्यांना देण्यासाठी पावशा प्रसिद्ध आहे. साधारणतः एप्रिलपासून पावशा ठिकठिकाणी ‘पेर्ते व्हा... पेर्ते व्हा... पेर्ते व्हा’ अशी शीळ घालत शेतकऱ्यांना, ‘चला पाऊस जवळ आलाय, आता पेरणीची तयारी करा’ म्हणून सूचना देताना पाहायला (खरंतर ‘ऐकायला’!) मिळतो आणि म्हणून महाराष्ट्रात याला ‘पावशा’ म्हणतात. इंग्रजांनी या देशात आल्यावर जेव्हा पावशाची शीळ ऐकली जी सुरुवातीला लहान असते आणि नंतर वाढत वाढत दीर्घ होत जाते. त्यामुळे सतत ऐकून ऐकून जणू डोकेदुखीच होते अशी भावना गोऱ्या साहेबांची झाली, शिवाय या शिळेतून त्यांना ‘ब्रेन फिवर... ब्रेन फिवर’ असे शब्द ऐकायला आले आणि त्यांनी या पक्ष्याचं नाव ठेवलं ‘ब्रेन फिवर बर्ड’. हिंदी भाषा जिथे बोलली जाते त्या उत्तर भारतात याच पक्ष्याची शीळ ‘पियां कहां?... पियां कहां?...’ अशी ऐकली जाते आणि त्यावरून या पक्ष्याला ‘पपिहा’ असे म्हणतात.
पावशा पक्ष्याचे इंग्रजी नाव आहे ‘कॉमन हॉक कक्कू’. आपल्या ओळखीच्या कोकिळा पक्ष्याच्या ‘कुकुलिडे’ फॅमिलीतच कॉमन हॉक कक्कूचा समावेश होतो. हा पक्षी दिसायला काहीसा ‘शिक्रा’ या शिकारी पक्ष्यासारखा असतो. त्यामुळेच ‘हॉक’ म्हणजे ससाण्यासारखा दिसणारा म्हणून ‘हॉक कक्कू’ असे नाव मिळाले आहे. पावशा भारतात राजस्थान, काश्मीर आणि इशान्य भारताचा काही भाग वगळता उर्वरित सगळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतो. विणीच्या हंगामात सतत ओरडणारा पावशा हिवाळ्यात मात्र कोकिळेप्रमाणेच गप्प असतो. कोकिळेच्या वर्गातला असल्याने कोकिळेसारखाच पावशादेखील ‘ब्रूड पॅरासाइट’ आहे. अर्थात हा पक्षी देखिल स्वतःचे घरटे न बनवता आपले अंडे दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालतो.मार्च ते जून हा पावशाचा विणीचा हंगाम असतो. हाच काळ ‘कॉमन बॅबलर ’ म्हणजे ‘रानभाई’ पक्ष्याचा ही विणीचा आहे,पावशा आपले अंडे कॉमन बॅबलरच्या घरट्यात शिताफीने घालतो आणि कॉमन बॅबलर (रानभाई) पावशाचे पिल्लू वाढवतो. तसेच काही वेळा कृष्ण थिरथिरा(ब्लॅक रेडस्टार्ट ) किंवा नर्तक (फ्लायकॅचर) या पक्ष्यांच्या घरट्यातही आपली अंडी घालतो.
पावशा पक्ष्याप्रमाणेच पावसाशी ज्याचं नाव जोडलेलं आहे असा पक्षी म्हणजे चातक.संस्कृत आणि मराठी साहित्यात हा पक्षी प्रसिध्द आहे तो ‘फक्त पावसाचं पाणी पिणारा पक्षी ’ म्हणून. प्रत्यक्षात असं काही नसतं. चातक हा सुध्दा पावशा प्रमाणेच कक्कू कुळातील पक्षी आहे. याच्या तीन उपजाती आहेत पायका,सिरेट्स आणि याकोबिनस. सिरेट्स ही जात आफ्रिकेतून उत्तर भारतात स्थलांतर करुन येते. याकोबिनस ही जात दक्षिण भारतात आढळते.जॅकोबिन कक्कू,पाइड कक्कू किंवा पाइड क्रेस्टेड कक्कू या इंग्रजी नावांनी तो ओळखला जातो. डोक्यावरचा काळा तुरा,पंखांवरचा पांढरा पट्टा आणि पांढऱ्या टोकाची लांब शेपटी यामुळे चातक नजरेत भरतो. विणीच्या हंगामात हे पक्षी एकमेकांचा पाठलाग करत, जोरदार गोंगाट करतात.कोकिळेच्या कुळातला असल्याने चातक सुध्दा आपली अंडी स्वतः उबवत नाही.तो सातभाईंच्या घरट्यात आपले अंडे घालतो आणि नंतर त्यातून बाहेर आलेले पिल्ली सातभाई वाढवतात.
पावसाळ्याशी नातं जुळलेला आणि पक्षि निरिक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला पक्षी म्हणजे ‘तिबोटी खंड्या ’.अलिकडे ‘ ओ डी के एफ ’ अर्थात ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर या नावाने हा पक्षी वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये विशेष प्रसिध्द झाला आहे. यालाच ‘थ्री टोड किंगफिशर’ आणि ‘ब्लॅक बॅक्ड किंगफिशर’ अशीही नावे आहेत. भारतात आढळणाऱ्या बारा प्रकारच्या खंड्यांमधील हा खंड्या आकाराने सर्वात लहान असतो मात्र याच्या अंगावर लाल,पिवळा, नारिंगी, निळा, किरमिजी, काळा, पांढरा अशी रंगपंचमीच पाहायला मिळते. इतर खंड्यांपेक्षा याचं सर्वात मोठं वेगळेपण म्हणजे हा वर्षातला काही काळ स्थानिक स्थलांतर करताना पाहायला मिळतो.
या खंड्याचे एक शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे याच्या पायाला तीनच बोटं असतात,दोन पुढे आणि एक मागे, म्हणून याला तिबोटी खंड्या किंवा थ्री टोड किंगफिशर म्हणतात. अल्सेडिनिडे कुळातील हा खंड्या प्रामुख्याने पाणथळींजवळ आणि दाट वनांच्या भागात पाहायला मिळतो. भारतामध्ये हा खंड्या पावसाळ्यात संपूर्ण कोकण किनाऱ्यावरच्या जंगलांमध्ये दिसून येतो. पावसाळा संपल्यानंतर मात्र हा दक्षिणेकडे स्थलांतर करतो. भारताबाहेर बांग्लादेश, भूतान, म्यानमार, चीन, कम्बोडिया, मलेशिया, श्रीलंका, व्हिएतनाम, फिलिपाइन्स या देशांमध्ये पाहायला मिळतो. नदी-ओढ्याकाठचे अरण्य,खारफुटी यात राहाणारा हा पक्षी रानातील वाहते झरे,ओढे,डबकी यांच्याजवळ आढळतो.
महाराष्ट्रात जुलै ते सप्टेंबर हा तिबोटी खंड्याचा विणीचा हंगाम असतो. इतर खंड्यांप्रमाणेच हा देखिल जमिनीत बीळ खोदून आपले घरटे थाटतो. एकाद्या ओढ्याजवळ किंवा नदीच्या काठावरच्या मातीच्या दरडीमध्ये सुमारे एक मीटर लांबीचे बीळ खोदून त्यात हा अंडी घालतो. हे बिळातले घरटे नर आणि मादी मिळून बनवतात. एकावेळी मादी तीन ते सहा अंडी घालते. नर आणि मादीमिळून आळीपाळीने अंडी उबवतात. साधारण सतरा-अठरा दिवसांमध्ये अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. पुढचे एकोणीस - वीस दिवस नर-मादी मिळून पिल्लांना भरवतात आणि वाढवतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर पिल्ले घरट्याबाहेर येऊन उडून जातात. पिल्लांचे संगोपन करत असताना नर आणि मादी घरट्याजवळच्या एखाद्या फांदीवर क्षणभर विसावतात, त्यामुळे या काळात त्यांचे छायाचित्रण करणे तुलनेनं सोपं जातं.
पावसाळ्यात किटकांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पक्ष्यांना खायला विपुल अन्न उपलब्ध असते,त्यामुळे खरतर सगळेच पक्षी पावसाच्या आगमानाने सुखावतात. मात्र चातक,पावशा अशा काही पक्ष्यांचं नाव पावसाशी असं जोडलेलं आहे की आओपापच त्यांना पावसाची पाखरं म्हणावसं वाटतं.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com