
भटकंती
उमेश झिरपे
पाऊस सुरु झाला की पावसाळी भटकंतीच्या योजना तयार होऊ लागतात. पावसाच्या मोसमात एक तरी पावसाळी पिकनिक करावी, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण या इच्छेला अति उत्साहाची जोड मिळाली की नको ते साहस केले जाते आणि अपघाताला निमंत्रण मिळते. म्हणूनच पावसाळी भटकंती करताना कोणती काळजी घ्यावी, हे एका अनुभवी गिर्यारोहकाकडून समजून घेणं आवश्यक आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने तीन ऋतू दिसून येतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. एप्रिल, मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसल्यानंतर सर्वानाच ओढ लागते ती वर्षा ऋतूची. जून महिन्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे वारे वाहू लागतात आणि भारतीय भूभागाच्या वर आभाळात पावसाचे काळे ढग दाटून येतात. या ढगांना पोषक वातावरण मिळताच पाऊस पडण्यास सुरुवात होते. पहिल्या काही दिवसांतच सर्व डोंगररांगा, माळराने आणि जंगलं हिरवाईने नटू लागतात. ओढे, नाले, धबधबे, नद्या ओसंडून वाहू लागतात आणि यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री डोंगररांगेत पावसाळ्यादरम्यान अत्यंत आल्हाददायक वातावरण असते. हिरवाईने नटलेले डोंगर, त्यामध्ये दाटून येणारे ढग, फेसाळणारे धबधबे, थंड वातावरण हे अनुभवण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे गर्दीने तुडुंब भरलेली असतात. याच पावसाळी भटकंतीचा एक भाग म्हणून अनेक लोक साहसी पर्यटनाकडेही वळतात. आपल्या जवळपासच्या डोंगरांवर, गड-कोटांवर ट्रेकिंग, हायकिंगसाठी नेहमीच्या गिर्यारोहकांसोबतच हौशेनवशेही गर्दी करु लागतात.
पावसाळी भटकंती करताना समोर दिसणारं निसर्गाचं मनमोहक रूप अक्षरश: वेड लावणारं असतं, यातून उत्साह अधिक वाढतो आणि काही अवघड वाटा लोकांना खुणावू लागतात. काही माहिती नसताना एखाद्या आडवाटेवर मंडळी जातात आणि कधी तिथे अडकतात, कधी एखाद्या अवघड वळणावर अडकतात. म्हणूनच पावसाळ्यात भटकंती करताना ती अत्यंत काळजीपूर्वक करणं तितकंच आवश्यक आहे.
पावसामुळे माती वाहून जाते आणि चिखल साचून वाटा निसरड्या होतात. खडकांवर शेवाळ साचल्याने दगडांच्या वाटाही अंदाज चुकवतात. अनेकदा डोंगरमाथ्यावर दाट धुके असतं, गवत वाढलेलं असतं. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे ओढे-नाले-धबधबे भरभरुन वाहत असतात. पाण्याची पातळी कधी वाढेल, हे सांगता येत नाही. अनेकदा पाण्याबाबतचा अंदाज चुकल्यानेही अपघात होतात. पाण्याबाबत जसे काही सांगता येत नाही, त्याचप्रमाणे गडकोटांवरील मोठमोठे दगड, तटबंदीचे दगड निसटून दरड कधी कोसळेल, हेही सांगता येत नाही. या अशा अनेक धोक्यांपासून सावध राहून भटकंती करणं गरजेचं आहे. स्थानिक प्रशासनही हे सर्व धोके लक्षात घेऊन यावर उपाययोजना करत असतंच. धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावलेले असतात. तरी स्वत: काळजी घेणं हे केव्हाही अधिक योग्य.
काही पावसाळी भटकंतीची स्थळं ही वन्य जीव अभयारण्याच्या अंतर्गत येतात, तर काही वन विभागाच्या अंतर्गत येतात. याठिकाणी प्रशासन योग्य ती काळजी घेतच असतं. परंतु पर्यटकांनीही सांगितलेल्या सूचनांचं पालन करण आवश्यक असतं. मुळात वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी प्रवेश करताना या सगळ्या सूचना वाचणं आवश्यक असतं. सूचना नीट वाचल्या तर पुढील धोके आधीच लक्षात येतात. आणि काय करु नये, हे लक्षात येते.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकताना साहस नक्की करावं, पण ते सगळे धोके लक्षात घेऊन. मुख्य म्हणजे पावसाळा किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये कधीही आडवाटांवर एकट्याने भटकंती करू नये. गिर्यारोहकांचे अनेक संघ आजवर सह्याद्रीमध्ये निस्वार्थपणे मदतकार्य करत आहेत. हे मदतकार्य करताना अतिसाहसामुळे जखमी झालेल्या किंवा मृत पावलेल्या व्यक्तिंना बाहेर काढताना अत्यंत दुःख होते. महाराष्ट्रातल्या डोंगराळ व दुर्गम भागात कोणी अडकलं असेल तर तातडीने शोध घेण्यासाठी व बचाव मोहिमेसाठी गिर्यारोहकांकडून प्रयत्न केले जातात. या कामात समन्वय साधण्यासाठी ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग’ आणि ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ संचालित ‘महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर’ (एमएमआरसीसी) तर्फे २०१६ साली २४*७ ही हेल्पलाईन (संपर्क क्र. ७६२०-२३०-२३१) सुरू करण्यात आली. या हेल्पलाईन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो गिर्यारोहक एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे मदतकार्य करत असतात. हे मदतकार्य करत असताना कित्येकदा या स्वयंसेवकांना स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कार्य करावं लागतं. एमएमआरसीसी (MMRCC) स्थापण्यामागे एक सुव्यवस्थित संस्था तयार करणं, हा मुख्य हेतू होता. यामुळे आपत्तीचं ठिकाण तातडीने शोधणं, स्थानिक गिर्यारोहक, बचाव स्वयंसेवक, पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधणं, प्रथमोपचार देणं आणि पीडित व्यक्तीला जवळच्या वैद्यकीय मदतकेंद्रापर्यंत त्वरित नेणं या गोष्टी साध्य होतात.
पावसाळ्यात सह्याद्रीतील भटकंती जरूर करावी. हाच ऋतू असतो जेव्हा कारण सह्याद्री चारी अंगांनी बहरलेला असतो. पण ही बहार अनुभवताना, पावसाळी भटकंती करताना ती काळजीपूर्वक करणंही तितकंच गरजेचं आहे. केवळ मानवी चुकीमुळे अनेकजण हकनाक आपला जीव गमावत असतात. यावर्षीची पावसाळी भटकंती करताना काय आणि कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सूचनावली ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ने जारी केली आहे. ती पुढीलप्रमाणे -
ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे.
ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी.
ग्रुपकडे प्रथमोपचाराचे साहित्य असावे.
ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ग्रुप कोण आहे, याची माहिती घरी, जवळच्या व्यक्तीस द्यावी.
ट्रेकमध्ये ‘फर्स्ट मॅन’ व ‘लास्ट मॅन’ यांच्या मध्येच चालावे.
ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी.
आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.
पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.
किल्ल्यांवरील तट-दरवाजे-इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.
चालताना मजबूत काठी सोबत ठेवावी, त्यामुळे चढणे-उतरणे व चालणे सोपे होते.
शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.
आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा. त्याची बॅटरी संपणार नाही, याची काळजी घ्यावी.
अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
निसर्गात वावरताना शहरी गोंगाट करू नये.
किल्ल्यांवर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नये. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवायला हवा.
पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास लगेच काही कळत नाही. पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.
धबधब्याच्या प्रपातासोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
एखाद्या पर्यटनस्थळी अती गर्दी होत असेल तर अशी गर्दीची ठिकाणे टाळावी.
आयत्यावेळी ट्रेकमध्ये, मार्गामध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवावे.
ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहचले आहेत याची खात्री करावी.
सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावेत. आपत्कालीन स्थितीत त्याचा उपयोग होतो.
सोबत असणारे सर्व साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅकमध्ये टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.
दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा.
थोडक्यात काळजी घ्यावी आणि मजा करावी. म्हणजे पश्चात्ताप करावा लागणार नाही.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष.