Mother's Day : आईसाठी जोडीदार शोधला - सिद्धार्थ सीमा चांदेकर
विशेष
शब्दांकन: पूजा सामंत
आज ११ मेला जागतिक मातृदिन आहे. आई आणि मुल हे नातं जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये प्राथमिक नातं आहे. हे नातं हा जगण्याचा पाया आहे. हे नातं जर समृद्ध असेल तर तुम्हाला जगण्यासाठी आयुष्यभराची पूंजी मिळते. म्हणूनच मातृदिन हा केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नसतो. तर तो आपलं जगणं समजून घेण्याचा दिवसही असतो. आपल्या जगण्यातला आईचा रोल समजला की, आपण नेमकं काय करायला हवं, हेही समजतं.
“आईबद्दल अगदी सगळेच भरभरून बोलतात. आणि ते स्वाभाविकही आहे. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्याला कारणही तसंच आहे. आपण सगळेच आपल्या आईशी बोलताना आपल्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या-मोठ्या घडामोडी सांगत असतो. आई त्यावेळी श्रोत्याच्या भूमिकेत असते. मोठया कौतुकाने आई आपली लेकरं काय सांगतात ते ऐकत असते. एखाद वेळी ती आपली प्रतिक्रिया नोंदवते. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे काही चुकत असल्यास ती सज्जड दम भरते. मी, माझी आई आणि माझी ताई आम्हा तिघांचं एक स्वतंत्र विश्व आहे. आई ही केवळ आमची आई नव्हती, तर तिने आमच्या वडिलांची भूमिकाही पार पाडली. मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आमच्या बाबांना आम्हा मुलांसोबत, आमच्या कुटुंबात कधी पाहिलं नाही. घराचा खर्च भागवणं, मुलांची देखभाल करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, मुलांना वेळ देणं...अशा सगळ्या आघाडया सांभाळताना फक्त आईलाच पाहिलं. हे असं का? माझं आणि माझ्या बहिणीचं आयुष्य इतर मुलांप्रमाणे नॉर्मल का नाही? बाबा हयात आहेत, पण मग ते आमच्यासोबत का नाहीत? असे प्रश्न पडत होते, पण त्यांची उत्तरं नव्हती! जर वडील अकाली इहलोकी गेले असते, तर आम्ही त्यांची अनुपस्थिती मान्य केली असती. पण घरोघरी दिसणारे वडील, कुटुंबात रमणारे वडील आमच्या घरात नव्हते. आई हेच आमचं विश्व होतं, आईच आमच्यासाठी बाबा होती, तीच मार्गदर्शक, तीच मैत्रीण, तीच सर्वस्व होती. मला आणि ताईला वाढवण्यासाठी तिने अथक मेहनत केली, खूप खस्ता खाल्ल्या. आईने अनेकांच्या टिकेला, कुत्सित नजरांना तोंड देत आपलं कर्त्यव्य पार पाडलं.
आई अभिनेत्री होती. महिन्याकाठी ती नाटकांचे ४०-५० प्रयोग करत असे. त्यामागे आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये, ही भावना होती. आई हा एक खांबी तंबू होता, तीच आमची मार्गदर्शक होती. आपल्याकडे आईचं नाव आपल्या नावामागे लावण्याचा प्रघात नाही. पण मी मोठा झालो तसा आईचं प्रेम, तिने आम्हा मुलांसाठी केलेले कष्ट, तिचं माझ्याशी-ताईशी असलेलं नातं या सगळ्याचा मी वेगळा विचार करु लागलो. मी माझं नाव ‘सिद्धार्थ सीमा चांदेकर’ असं रूढ केलं. माझ्या नावासोबत माझ्या आईचं नाव लावणं ही माझ्यासाठी खचितच अभिमानाची बाब होती.
मी स्वत: अभिनय करु लागलो, माझी ‘अग्निहोत्र’ ही पहिली मालिका प्रसारित होऊ लागली, तेव्हा मला जाणवलं की, माझ्यापेक्षा दुप्पट वय असलेली आई गेली अनेक वर्षं एकटी कमावतेय, ती किती दमत असेल! आता आपण कमवायला लागलो आहोत, तेव्हा आता आईने थोडी विश्रांती घेतली पाहिजे. घरातला मुलगा म्हणून मी आर्थिक जबाबदारी सांभाळावी, असं मला तीव्रतेनं वाटू लागलं.
याच काळात माझं आणि मिताली (मयेकर)चं लग्न झालं. आयुष्यात एका जोडीदाराची किती गरज असते, हे मला माझ्या लग्नानंतर जाणवलं. आपल्या मनातल्या भावना आपल्या जोडीदाराकडे शेअर करणं, एकत्र फिरायला जाणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे आनंद असतात, जे तुम्ही जोडीदाराशिवाय मिस करता. अर्थात आईला मी आयुष्यभर सांभाळणार आहेच, पण तरी मला मनापासून असं वाटू लागलं की, आईलाही तिच्या आयुष्यात एका जोडीदाराची गरज आहे. मुलं मोठी झाल्यावर ती नाही म्हटलं तरी त्यांच्या संसारात रमतात. मग आईची संवादाची गरज कोण भागवणार? पण आईला विचारायचं कसं? तरी शेवटी मनाचा हिय्या केला आणि तिला ‘तुझ्यासाठी जोडीदार शोधू का?’ असं विचारलं. तिने अर्थातच अपेक्षेप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली. मला वेड्यात काढलं. पण मी आणि ताईने हार न मानता हळहळू तिचं मन वळवलं. आईचा नव्याने संसार उभारायचा तर तिची मर्जी असणं गरजेचं होतं. तिचा होकार मिळवला आणि मग आईसाठी योग्य तो पार्टनर शोधायला सुरुवात केली. आईला समजून घेणारा पार्टनर आम्ही अखेर शोधला आणि आम्हाला मानसिक समाधान लाभलं.
आईच्या चेहऱ्यावर पूर्वी जी अनिश्चितता होती ती निघून गेली आहे. आई आता खूप कॉन्फिडन्ट वाटतेय. तिच्या चेहऱ्यावर जे सात्विक समाधान आहे, ते पाहणं हा माझ्यासाठी दुर्मिळ आनंद आहे. आईला सेटल्ड करून देणं हे माझं मुलगा म्हणून कर्तव्य होतं. त्यामुळेच त्याच्या पूर्ततेतला आनंद हा काही वेगळाच आहे.
आता लोकं काय म्हणतील, हा प्रश्न. तर लहानपणी आम्ही अनेक वर्षं वडिलांविना काढली आहेत. तेव्हा देखील लोकांचा सूर हा टिकेचाच असायचा. आता देखील टीका झाली असेलच. पण माझ्यासाठी टीका-टोमणे यांच्यापेक्षा आईचं उर्वरित आयुष्य सुखाचं जाणं, ती आनंदी असणं हे महत्त्वाचं आहे.”