
विशेष
शब्दांकन: पूजा सामंत
आज ११ मेला जागतिक मातृदिन आहे. आई आणि मुल हे नातं जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये प्राथमिक नातं आहे. हे नातं हा जगण्याचा पाया आहे. हे नातं जर समृद्ध असेल तर तुम्हाला जगण्यासाठी आयुष्यभराची पूंजी मिळते. म्हणूनच मातृदिन हा केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नसतो. तर तो आपलं जगणं समजून घेण्याचा दिवसही असतो. आपल्या जगण्यातला आईचा रोल समजला की, आपण नेमकं काय करायला हवं, हेही समजतं.
“माझी आई शांता गोखले! प्रसिद्ध लेखिका, पत्रकार, सदरलेखक आणि अनुवादक. पण आईची ओळख ही अशी चार शब्दांमध्ये मावणारी नाही. आई म्हणजे माझ्यासाठी मोठा वटवृक्ष. वटवृक्षाला कुठे ठाऊक असतं की, त्याच्याकडून किती पांथस्थांना सावली मिळतेय, किती जण त्याच्या गारेगार सावलीत सुखाची निद्रा घेतात ते. आईने आम्हा दोघा भावंडांना जे घडवलं, तिच्या संस्कारानी आम्ही जे घडलो, त्याचं मोल किती हे तिला नाहीच ठाऊक. पण तिने आम्हांला वाढवलं, घडवलं आणि म्हणून मी घडले. आईने तिच्या संस्कारांची मोठी विरासत निर्माण करून ठेवली आहे. तिच्या शिस्तीत देखील प्रेमाची झालर होती. तिच्या रागावण्यामध्ये देखील माया होती, कळवळ होती.
आईचं कार्यक्षेत्र म्हणजे लेखन. ती मान्यवर लेखिक, अनुवादक आहे. पण तिच्या कार्यक्षेत्राबद्दल मी आज बोलणार नाही. कारण लेखक-अनुवादक म्हणून असलेलं आईचं साहित्यातलं योगदान आज जगासमोर आहे. त्याविषयी मी वेगळं काय सांगणार? मला सांगायचं आहे ते माझ्या मैत्रिणीबद्दल. आईला मी ‘मैत्रीण’ म्हणतेय, कारण तिने ज्या पद्धतीने मला आणि भावाला (भाऊ गिरीश ) वाढवलं, ती तिची खेळीमेळीची सहज पद्धत पालकत्वाच्या पारंपरिक पठडीपेक्षा वेगळी होती. त्यामुळे आमच्यातलं नातं कायम पारदर्शी राहिलं. अर्थात असं असलं तरीही आईने संस्कार, शिस्त, मैत्री यांची अतिशय उत्तम सांगड घातली होती. आई म्हणून हे तिचं मोठेच कौश्यल्य होतं.
आईने तिचं प्रेम, माया, संस्कार जसे मला दिलेत, तसेच माझ्या लग्नानंतर माझ्या मुलांनाही दिलेत. राणाजी (पती -अभिनेता आशुतोष राणा) यांना देखील आईने लळा लावला आहे. त्यांचं नातं सासू-जावयाचं नसून आई-मुलासारखं आहे. हे जिव्हाळ्याचे भावबंध आईने निर्माण केले आहेत. आम्ही मोठे होत असताना आईने तिचं करिअर पूर्णतः बॅक सीटवर ठेवलं होतं. कारण मुलांना त्यांच्या वाढत्या वयात सर्वाधिक गरज असते ती त्यांच्या आईची. वाढत्या वयात मुलं सगळ्याच बाबतीत आईवरच अवलंबून असतात. मग ते पौष्टिक, घरगुती अन्न असो, कपडे असोत, त्यांचा होमवर्क घेणं असो किंवा मित्र-मैत्रिणींची साथसंगत असो, प्रत्येक बाबतीत आई जवळ असणं आवश्यक असतं. कोवळ्या वयातील चुकीची मैत्री आयुष्यावर परिणाम करु शकते. खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी नीट डेव्हलप होत नाहीत. आईलाच हे बघावं लागतं. मी सुद्धा माझी दोन्ही मुलं लहान असताना त्यांच्या वाढत्या वयात माझं लिखाणाचं, अभिनयाचं, दिग्दर्शनाचं काम बॅक सीटवर ठेवलं. मुलं कॉलेजमध्ये गेली आणि मी पुन्हा माझा मोहरा दिग्दर्शनाकडे, अभिनयाकडे वळवला. कारण आपल्या मुलांना आपली गरज केव्हा आहे हे ध्यानात घेऊनच माझ्या आईने तिची पावलं उचलली होती. तो प्रभाव माझ्यावरही पडला.
आई अतिशय उत्कृष्ट जेवण बनवते. ती महाराष्ट्रीयन फूड जितकं उत्कृष्ट करते तितकंच काँटिनेन्टल फूडही छान बनवते. आईने बनवलेले पदार्थ खाणं म्हणजे मोठी पर्वणीच असते. यंदा आईला नुकताच ‘मेटा पुरस्कार’ (महेंद्र एक्सलन्स इन थिएटर लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड) मिळाला आहे. आम्हा सगळ्यांनाच याचा खूप आनंद झाला आणि अर्थातच आईचा खूप अभिमानही वाटला. मी जे काही थोडं फार लिहिते, लिहू शकते ते आईकडून लेखनाची प्रतिभा मला लाभली असावी म्हणूनच. अर्थात ही तुलना नाही. होऊही शकत नाही.
माझं आणि माझा भाऊ गिरीश, आमचं बालपण खूप समृद्ध होतं. त्याचं श्रेय आईचंच आहे. तिने जे काम केलं, संसार केला, मुलांना वाढवलं, ते तिने अतिशय प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने केलं. अर्थातच त्यासाठी तिने अनेक त्यागही केले. आईच्या मते फक्त शालेय पुस्तकं वाचून मुलांचा विकास होत नाही. शालेय पुस्तकं वाचून एकेक इयत्ता पास होता येते, पण सुजाणपणा, सुसंस्कृतपणा येत नाही. व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर शालेय पुस्तकांखेरीज इतर पुस्तकं वाचली पाहिजेत. आईने आम्हाला अनेक नामवंत लेखकांची पुस्तकं आणून दिली. दर रविवारी आम्ही सगळे हिंदी चित्रपट, नाटक किंवा हॉलिवूड चित्रपट पाहण्यास जात असू. तो चित्रपट किंवा नाटक पाहिल्यावर त्या कलाकृतीबद्दल घरात चर्चा होत असे. कलाकृती आवडली तर ती का आवडली किंवा न आवडल्यास का नाही आवडली, यावर कारणमीमांसा देणं बंधनकारक होतं. कदाचित म्हणूनच लहानपणापासूनच माझा एक ‘क्रिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू’ तयार झाला. चांगलं काय-वाईट काय हे जाणवू लागलं. ‘नीरक्षीरविवेके’ असं जे म्हणतात याची जाण आईनेच अप्रत्यक्षरित्या करून दिली होती. ती अतिशय शिस्तीची असल्याने स्वयंपाक, टिफिन सगळं रुचकर आणि वैविध्यपूर्ण करत असे. पण त्याचवेळी स्वतःचा टिफिन स्वतः भरण्याची शिस्तही तिने आम्हा मुलांना लावली.
माझा आणि भावाचा युनिफॉर्म आई स्वतः शिवत असे. आईचं शिक्षण युकेला झालं होतं. तिचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. आमच्या वाढदिवशी आजूबाजूला राहणाऱ्या शालेय मुलांना ती घरी बोलावत असे. सगळ्या लहानग्यांची धमाल, मस्ती-खाणं अशी सगळी मज्जा असे. आमच्यासाठी आईने मैत्रीचं निस्वार्थी दालन उघडून दिलं होतं. गरिबी-श्रीमंती पाहून मैत्री करायची नसते, हे आईमुळेच समजलं. आजूबाजूची मुलं-मुली आमच्याकडे अभ्यासाला येत. एकदा आमच्या शाळेत शिक्षकांनी मुलांना कोंबडीचं चित्र काढून आणण्यास सांगितलं. आमच्या घरी अभ्यासाला येणाऱ्या मुलीने माझ्या आईला चित्र काढून द्यायला सांगितलं. आईनेही तिला प्रेमाने कोंबडीचं चित्र वहीत काढून दिलं. मला काही कोंबडी नीट रेखाटता आली नाही. मला त्या चित्रात शून्य मार्क मिळाले आणि त्या मुलीच्या चित्राचं कौतुक झालं. मला भारी राग आला. ‘तू मला का नाही चित्रं काढून दिलंस?’ असं मी आईला रागाने विचारलं. तेव्हा आईने मला खूप छान समजावलं. ती म्हणाली, “त्या मुलीने मदत मागितली, ती मी तिला दिली. पण तू मात्र आता स्वतः कोंबडी काढणं शिकशील.” आणि झालंही तसंच. आपल्या मुलांना तिने स्वावलंबी व्हायला शिकवलं. तेही न रागवता, न ओरडता. कधी गरज वाटल्यास तिने कानपिचक्या द्यायलाही कमी केलं नाही.
आईशी मी जगातल्या कुठल्याही गोष्टीवर बोलू शकते. मी क्लिनिकल सायकॉलॉजी घेऊन एम ए केलं. मला पुढे चाईल्ड सायकॉलॉजीमध्ये करियर करायचं होतं. कॉलेजमध्ये असताना मी हॉबी म्हणून एक्सपरिमेंटल थिएटरमध्ये - प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं. मला अभिनयात रस वाटत होता. नंतर मला ‘सर्कस’ ही मालिका मिळाली. मी थोडा ब्रेक घेतला, आईशी चर्चा केली. मला अभिनयात करियर करण्याची इच्छा आहे, हे तिला सांगितलं. एव्हाना मला ‘सुरभी’ हा शो मिळाला होता. आईने मला सावध केलं. “अभिनयाची दुनिया खूप वेगळी आहे, तू तिथे करियर करण्यापूर्वी पुरेसा विचार करावास असं वाटतं. कारण ज्या मूल्यांमध्ये तू वाढली आहेस, ती मूल्य तिथे असतीलच असं नाही”, असं तिने सांगितलं.
पण मी अभिनयातच करियर करायचं निश्चित केलं. पुढे मला अभिनयात स्थिरस्थावर होताना पाहून आईला समाधान वाटलं. आयुष्याच्या एका वळणावर मी पुन्हा तिच्याशी चर्चा केली. तिचं मार्गदर्शन माझ्यासाठी कायमच महत्त्वाचं असतं. तिच्याकडे अनेक गुण आहेत. त्यातले अर्धे देखील मी आत्मसात करू शकणार नाही. आज मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मला आईचं योगदान, तिचा त्याग, तिची अखंड काम करण्याची क्षमता, तिची ऊर्जा हे सगळं जाणवतंय, समजतंय. ओल्या मातीला घड्याचा आकार द्यावा तसं तिने आम्हांला वाढवलं. माझ्या मुलांना, आपल्या नातंवंडांना देखील तिने तिचे संस्कार, तिची मूल्यं दिली आहेत. आता लक्षात येतं, की आजच्या पिढीला आईची जितकी आवश्यकता आहे, तशीच अशा आजीचीही गरज आहे. समाजाच्या समृद्धीसाठी..नव्या पिढीच्या आदर्श जडणघडणीसाठी..आई आय लव्ह यू!”