आई निरोगी तर घर आनंदी

मदर्स डे निमित्त आईच्या प्रेमासोबत तिच्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज आहे. कारण आई निरोगी असेल, तरच घर आनंदाने आणि उत्साहाने फुलत राहते.
आई निरोगी तर घर आनंदी
आई निरोगी तर घर आनंदी
Published on

विशेष

डॉ. रूपाली भिंगारे

मदर्स डे निमित्त आईच्या प्रेमासोबत तिच्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज आहे. कारण आई निरोगी असेल, तरच घर आनंदाने आणि उत्साहाने फुलत राहते.

मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि जबाबदारीचा टप्पा आहे. एका बाळाच्या जन्मासोबतच एक आई जन्माला येते— जी स्वतःच्या गरजांपेक्षा मुलं आणि कुटुंबाला नेहमी प्राधान्य देते. गर्भधारणेदरम्यान अनेक आवश्यक तपासण्या केल्या जातात, पण प्रसूतीनंतर अनेकदा स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येक आईने वर्षातून किमान एकदा फुल बॉडी चेकअप करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नव्याने झालेली आई आपल्या बाळाच्या एका हसण्यावर स्वतःचे सर्वस्व ओवाळून टाकते. पण या प्रवासात, स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देण्याचे ती पूर्णपणे विसरून जाते.

एका मध्यमवर्गीय घरातील अनघा नावाची एक स्त्री, जिने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या आगमनानंतर मध्यमवर्गीय घरातील अनघाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. बाळाची निगा, अपुरी झोप, स्तनपानामुळे येणारा थकवा आणि घरकामाचा वाढलेला व्याप यामुळे तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. शरीरातील ऊर्जेची कमतरता आणि कंबरदुखी यांसारख्या शारीरिक त्रासांकडे ती 'बाळंतपणानंतर हे होणारच' असे समजून दुर्लक्ष करते. अनघाची ही ओढाताण केवळ तिची वैयक्तिक समस्या नसून, ही आपल्या समाजातील ९०% मातांची वास्तव स्थिती आहे. प्रसूतीपूर्व काळात आपण जशी आईची डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतो, तशीच किंबहुना त्याहून अधिक काळजी प्रसूतीनंतर घेणे गरजेचे असते. प्रसूतीनंतर शरीरात निर्माण झालेली पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य तपासण्या आणि योग्य आहार ही काळाची गरज आहे.

आईच्या शरीरातील बदलांचा विचार केला, तर सर्वात आधी येते ते म्हणजे तिचे रक्त. गरोदरपण आणि प्रसूती या प्रक्रियेत शरीरातील रक्ताचे प्रमाण अनेकदा कमी होते. म्हणूनच प्रत्येक आईने ‘कम्प्लीट ब्लड काउंट’ (CBC) ही चाचणी वर्षातून एकदा तरी केलीच पाहिजे. आपल्या घरातील आई जर लवकर थकत असेल, तिला धाप लागत असेल किंवा तिचे डोळे पांढरट दिसत असतील, तर समजून जावे की तिचे हिमोग्लोबिन कमी झाले आहे. लोहाची ही कमतरता तिला भविष्यात मोठ्या आजारांकडे नेऊ शकते. त्याचप्रमाणे थायरॉईडचा समतोल बिघडल्याने अनेक महिलांना नैराश्य किंवा अचानक वजन वाढण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या तांत्रिक गोष्टी वाटत असल्या तरी त्या आईच्या हसण्याशी निगडित आहेत. त्याचप्रमाणे Liver Function Test (LFT) म्हणजे यकृताचे आरोग्य तपासणे तसेच Kidney Function Test (KFT) : मूत्रपिंडांची कार्यक्षमता तपासून घेणे हे आईवर्गासाठी महत्वाचे आहे.

जसजसे वय वाढते, तसे आईची जबाबदारी ही मुलांच्या अभ्यासाकडून त्यांच्या करिअरकडे वळते. पण या काळात आईच्या शरीरात निसर्गाचा एक मोठा बदल घडत असतो, तो म्हणजे ‘मेनोपॉज’ किंवा रजोनिवृत्तीची चाहूल. वयाच्या चाळीशीनंतर स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. याचे एक उदाहरण म्हणजे, अनेकदा आपण पाहतो की आपली आई अचानक चिडचिड करायला लागते, तिला विनाकारण गरम व्हायला लागते (Hot Flashes) किंवा तिची हाडे दुखू लागतात. अशा वेळी तिला गरज असते ती मानसिक आधाराची आणि कॅल्शियमच्या सप्लीमेंट्सची. ३० वर्षांनंतर मॅमोग्राफी आणि ४० वर्षांनंतर ‘पॅप स्मीअर’ यांसारख्या तपासण्या कर्करोगासारख्या राक्षसाला घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. अंतर्गत अवयवांच्या सुदृढतेसाठी पोटाची सोनोग्राफी आणि स्तनांच्या कर्करोगाचे वेळेत निदान करण्यासाठी ३० वर्षांनंतर मॅमोग्राफी करणे, हे आईच्या दीर्घायुष्यासाठी आवश्यक सुरक्षा कवच आहे. आपण नवीन फोन घेताना त्याचे फिचर्स तपासतो, पण आईच्या शरीरातील हाडांची घनता (Bone Mineral Density) किती कमी झाली आहे, हे तपासायचे मात्र विसरतो. त्यामुळे Bone Mineral Density जरूर तपासून घ्या.

आहाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आई ही घरातील अशी व्यक्ती असते जी सगळ्यांना गरम जेऊ घालते, पण स्वतः मात्र उरलेले आणि थंड अन्न खाते. न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, आईने सकस आणि पौष्टिक नाश्ता करणे हे तिच्या आरोग्यासाठी संजीवनी आहे. समजा, एखाद्या आईचे वय ४५ वर्षे आहे, तर तिने आपल्या आहारात प्रथिने, व्हिटॅमिन बी १२ आणि डी यांचा समावेश आवर्जून केला पाहिजे. सकाळी उठल्यावर कामाच्या घाईत नाश्ता टाळणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडवण्यास कारणीभूत ठरते. घराची धुरा सांभाळणाऱ्या या ‘मॅनेजर’ने जर वेळेवर इंधन घेतले नाही, तर घराचे यंत्र कोलमडणारच. पालेभाज्या, फळे, दूध आणि दही यांचा आहारात समावेश असणे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर भविष्यातील आजारांविरुद्ध सुरक्षा कवच तयार करणे होय.

आता थोडा विचार करूया आपल्या आजीचा किंवा घरात असणाऱ्या ज्येष्ठ मातांचा. त्या वयाने थकलेल्या असतात, पण मनातून अजूनही कुटुंबाची काळजी करत असतात. वयाची साठी ओलांडलेल्या आईला औषधांपेक्षा तुमच्या सोबतीची जास्त गरज असते. ज्येष्ठ लोक खूप हळवे आणि भावनिक असतात. जेव्हा आपण त्यांच्या जवळ बसून फक्त “आई, तू कशी आहेस? तब्येत व्यवस्थित ना.. काही असले तर सांग हा!” एवढे विचारले, तरी तिचे अर्धे आजार त्या मायेच्या ओलाव्यानेच बरे होतात.

आईच्या आरोग्याचा विचार करताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घर, मुले, पाहुणे आणि नोकरी या सगळ्या चक्रात आई स्वतःला हरवून बसते. तिला स्वतःचे असे काही छंद असतात, जे लग्नानंतर किंवा मुलांच्या जन्मानंतर कुठेतरी कोपऱ्यात धूळ खात पडलेले असतात. तिला पुन्हा एकदा त्या छंदांची आठवण करून देणे, तिला तिची ‘खाजगी स्पेस’ देणे हे मुलांचे आणि पतीचे काम आहे.

बदलत्या काळानुसार आता आरोग्याच्या सोयी उपलब्ध आहेत. ‘थायरोकेअर’ किंवा ‘मेट्रोपॉलिस’ सारख्या लॅब्स आता घरी येऊन रक्त नमुने घेतात. आपल्याला फक्त आईचा हात धरून तिला सांगायचे आहे की, “आई, आज तुझी तपासणी आहे.” कदाचित सुरुवातीला ती नाही म्हणेल, पण अशा वेळी तिला प्रेमाने समजावून सांगावे की, “तू स्वस्थ आहेस म्हणूनच हे घर हसतेय-खेळतेय.”

या ‘मदर्स डे’ तिला साडी, दागिने किंवा एखादे गॅजेट देण्यापेक्षा ‘आरोग्याचे वचन’ द्या. तिला चांगल्या डॉक्टरांकडे न्या, तिची पूर्ण तपासणी करून घ्या. आई ही घरातील देवाऱ्यातल्या दिव्यासारखी असते, जो स्वतः जळतो पण घराला प्रकाश देतो. पण त्या दिव्याला तेलाची (पोषणाची आणि काळजीची) जोड दिली, तर तो अधिक प्रखरतेने आणि दीर्घकाळ तेवत राहील. आई म्हणजे केवळ त्याग नव्हे, तर घराचा मुख्य आधार असणारी एक शक्ती आहे. ही शक्ती कायम राखण्यासाठी तिला सकस आहार, व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासण्यांची गरज असते. कारण जेव्हा आई निरोगी आणि हसती खेळती असते, तेव्हाच संपूर्ण घर आनंदी राहते. तिला सांगा, “आई, तू स्वतःची काळजी घे, कारण तू आहेस तरच आम्ही आहोत!”

कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट

संस्थापक- त्वचा योग क्लिनिक

logo
marathi.freepressjournal.in