विशेष
शब्दांकन: पूजा सामंत
आज ११ मेला जागतिक मातृदिन आहे. आई आणि मुल हे नातं जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये प्राथमिक नातं आहे. हे नातं हा जगण्याचा पाया आहे. हे नातं जर समृद्ध असेल तर तुम्हाला जगण्यासाठी आयुष्यभराची पूंजी मिळते. म्हणूनच मातृदिन हा केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नसतो. तर तो आपलं जगणं समजून घेण्याचा दिवसही असतो. आपल्या जगण्यातला आईचा रोल समजला की, आपण नेमकं काय करायला हवं, हेही समजतं.
“माझी आई सोनी राझदान आणि माझं मेतकूट बहुधा माझ्या जन्मापासूनच आहे. आईचं आणि मुलीचं नातं नेमकं काय असतं हे मुलगी जेव्हा स्वतः आई बनते तेव्हाच अधिक कळतं. मी माझ्या मुलीची, राहाची आई झाले. आता राहादेखील अडीच वर्षांची झाली. तिच्या जन्मांनंतर मला माझ्या आईचं मोठेपण, तिची वैशिष्ट्य अधिक तीव्रतेनं जाणवली. अगदी माझ्या लग्नापर्यंत मी माझ्या आईला गृहीत धरत असे. आई होणं ही अतिशय अनोखी, सुखद भावना असली तरी ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. आज जगभर स्त्री-पुरुष समानतेची चर्चा होते, पण हे एक कटू सत्य आहे की, एका आईला कायम तिच्या लेकीच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. मुलगी लहान असते तेव्हाही ती लहान वाटते, ती टिनएजमध्ये असते तेव्हाही ती लहान वाटते आणि आपली मुलगी स्वतः आई झाली तरी एका आईला आपल्या लेकीची काळजी वाटतच असते. स्त्री-पुरुष दोनों को मैं भी एक समान मानती हूँ, लेकिन लड़के जिस तरह आझाद पंछी बनकर कहीं भी, कभी भी घूम सकते है, क्या लड़कियों को समाज में यह आजादी है? आजादी मिलती भी है तो भी उनकी सेफ्टी बहुत मायने रखती है. यह कैसे कोई नजर अंदाज करे? लड़कियों की सुरक्षा के लिए माता-पिता को ज्यादा सतर्क होना पड़ता है.. रणबीर पित्याच्या कर्तव्यात कुठेही कमी पडत नाही, पण मी घरी नसते तेव्हा राहाबद्दल अनेक चिंता माझ्या मनात घोंगावत असतात.
माझे वडील महेश भट्ट यांना चार अपत्यं. सगळ्यात मोठी पूजा, मग राहुल, मग मी आणि त्यानंतर शाहीन. मी आणि पूजा इंडस्ट्रीमध्ये आलो. आम्हा दोघींविषयी डॅडना अधिक चिंता वाटत असे. माझे आई-वडील (सोनी राझदान-महेश भट्ट ) हे स्वभावाने पार उत्तर आणि दक्षिण आहेत. पण सुदैवाने त्यांच्यात सामंजस्य होतं. त्यांचं परस्परांमधलं अंडरस्टॅण्डिंग पाहून मी हा धडा घेतला. माझ्या आणि रणबीरच्या स्वभावामध्ये जरी खूप फरक असला तरी एकमेकांवर दोषारोपांची राळ उठवण्यापेक्षा आपापसातल्या चांगल्या गुणांची दखल घेतली पाहिजे. कारण पती-पत्नीमधल्या विसंगतीचा परिणाम मुलांवर होत असतो. राहाला वाढवताना या सगळ्याच गोष्टींचा मी विचार करते. त्यामागे तिचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा हेतू आहे. राहा रणबीरच्या आई नीतू कपूर यांच्या देखरेखीखाली असते. त्यामुळे मी तशी निर्धास्त असते.
माझ्या लहानपणी माझी आई तिच्या किटी पार्टीजना जात असे. मला फिल्मी माहोलपासून दूर ठेवावं असं वडिलांना वाटत असे. मम्मी तिच्या पार्टीजना गेली, की मी घरात टीव्ही पाहत असे. छायागीत, चित्रहार पाहून मला सिनेमात काम करावं, असं वाटू लागलं. आपल्याला जर सिनेमात जायचं असेल तर डॅडच्या मागे लागावं लागेल. कारण मला सिनेमात घेणं हे फक्त त्यांच्याच हातात आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी तसंच केलं. डॅडच्या मागे लागले. डॅडनी मला ‘संघर्ष’ या चित्रपटात प्रीती झिंटाच्या बालपणीचा रोल दिला. आईला हे कळल्यावर ती खूप रागावली. अभिनयाच्या फंदात पडायचं नाही, असं तिने सांगितलं. मी ऐकत नाही, हे पाहिल्यावर माझ्याशी बोलणंही बंद केलं. पण मी पण बधले नाही. मी अभ्यास करावा, असं आईला वाटत होतं आणि मला अभ्यासाची अजिबातच आवड नव्हती. मला अभिनयाने पछाडलं होतं.
डॅडच्या ‘संघर्ष’ सिनेमात मी काम केलं. पुढे मी अभिनयात करियर करणार, हे माझ्यापुरतं निश्चित झालं होतं. याच काळात अनेक वर्षे मी वडिलांना निराशेने घेरलेलं पाहिलं आहे. सिनेमांच्या निर्मितीमध्ये त्यांना कर्ज झालं होतं. त्यांची काही अभिनेत्रींसोबत झालेली रिलेशनशिप तुटत गेली. दारू पिणं त्यांच्यासाठी अपरिहार्य झालं होतं. घरात अनेक आघाड्यांवर वादळं येत होती. आम्हा मुलांवर या वादळांचा परिणाम होणं स्वाभाविक होतं. या सगळ्या कौटुंबिक तुफानात एकच व्यक्ती होती, जी मनाने स्थितप्रज्ञ होती, जिने या तुफानात आम्हाला सुरक्षित ठेवलं, जी वरकरणी शांत होती, पण तिच्याही मनात काहूर माजलं असेलच...लेकिन हर हालातों में माँ न खुद टुटी, न उसने घर तुटने दिया! आम्हां मुलांवर कसलाही प्रतिकूल परिणाम होऊ नये याची तिने आटोकाट काळजी घेतली. आमचं जीवन अतिशय कॉम्प्लेक्स झालं होतं. आज त्या भयंकर दिवसांची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा येतो. आईकडे कमालीचा संयम आहे. वादविवाद, नकारात्मकता अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून तिने स्वतःला सावरलं, आम्हालाही वाचवलं. डॅडचं लाईफ नेहमीच वादविवादात राहिलं, पण त्याची कसलीच झळ आईने आम्हा मुलांना बसू दिली नाही.
माँ को लोग ईश्वर का दर्जा क्यों देते है, यह मेरी माँ को देखकर पता चलता है...
माझ्या आईचं माझ्या जीवनात जे काँट्रिब्युशन आहे ते शब्दातीत आहे. जिंदगी धूप तुम घना साया.. हेच म्हणेन मी!”