मृग लपतो छपतो...

श्रावण आला की आभाळाच्या कुशीत ढगांची गर्दी होते, मातीच्या अंगणात हिरवाईचा उत्सव रंगतो आणि सरींच्या तालावर निसर्गाची कविता खुलते. ऊन-पावसाच्या या लपंडावात कधी इंद्रधनुष्य उमटतं, तर कधी एखादी जुनी आठवण मनाच्या वळचणीला येऊन अलगद ओलावून जाते.
मृग लपतो छपतो...
मृग लपतो छपतो...
Published on

विशेष

गीतेश गजानन शिंदे

श्रावण आला की आभाळाच्या कुशीत ढगांची गर्दी होते, मातीच्या अंगणात हिरवाईचा उत्सव रंगतो आणि सरींच्या तालावर निसर्गाची कविता खुलते. ऊन-पावसाच्या या लपंडावात कधी इंद्रधनुष्य उमटतं, तर कधी एखादी जुनी आठवण मनाच्या वळचणीला येऊन अलगद ओलावून जाते.

पारची उन्हं कलंडू लागली आणि संध्याकाळ हळूहळू जवळ येऊ लागली. ऊन अगदी मलूल होऊन आजारी माणसाप्रमाणे आभाळाच्या एका कोपऱ्यात निपचित पडून होतं. आभाळाचा एक लहानसा तुकडाच त्या उन्हानं व्यापलेला होता आणि उरलेलं आभाळ मात्र ढगांनी गच्च दाटून आलेलं. पाऊस येईल असं वाटत असतानाच सर आली देखील... पाऊस थोडासाच भुरभुरला आणि ढगांमध्ये पुन्हा लुप्त झाला, अगदी सरस्वती नदीसारखाच. पण त्या अमृतधारांनी उन्हाला ढगांच्या पॅलेटमध्ये रंग कालवून आभाळाच्या कॅनव्हासवर चित्रं काढायला प्रेरित केलं. ते चित्रं होतं इंद्रधनुचं! आणि नकळत ओळी स्फुरल्या,

मृग लपतो छपतो

तसे श्रावणाचे ऊन

आभाळाचे मन गेले

सात रंगांनी भरून...

हे श्रावणातलं ऊन मला हरणासारखं चपळ वाटतं. म्हणजे ‘आज काय पाऊस येणार नाही’, असं वाटून छत्री न घेताच आपण घराबाहेर पडतो; तोच हे ऊन ढगांमध्ये गुडूप होऊन जातं. पावसाची एखादी सर येते आणि दुसऱ्याच क्षणी लगेचच ते प्रगटतं. बहुधा धुतलेल्या रस्त्यांना, इमारतींना सुकवण्याकरता... झाडांना उन्हाची हळद लावण्याकरता. साधारणतः या ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात; सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आभाळाचं मन इंद्रधनुष्यानं व्यापलं जातं आणि ते पाहताना नकळत आपण आपलं वय विसरतो. त्यामुळेच कदाचित हा श्रावण महिना सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

काय नाही या महिन्यात? आषाढात तरुणाईच्या जोषात धुवांधार बरसणारा पाऊस श्रावणात मात्र पोक्त पुरुषासारखा जबाबदारीनं वागतो. (अर्थात हे ऋतुचक्र गेल्या काही वर्षांत बिघडलंय आणि त्यास सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत!) याच काळात बळीराजानं पेरलेलं बीज मातीतून तरारून वर येतं. हे कोंब जणू ढगांचं ऋण फेडून उगवून येतात आणि अख्खं शिवार हिरवंजर्द होतं. ही हिरवाई पाहून जणू पक्षी आपले पंख विसरतात आणि झाडांशी अधिकाधिक सलगीनं वागतात. त्यांच्या फांद्यांवर आपल्या चोची घासून जणू आपली नावंच त्यावर कोरत बसतात. हे पाहून नकळत मनाच्या रेडिओवर मंगेश पाडगांवकराचं गीत वाजू लागतं,

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी

निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी

गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा

याच श्रावणात अवचितपणे झाडातून हिरवा मोरपिसारा फुलतो. मातीच्या अत्तरानं गगनाचा गाभारा भरून जातो. पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा उमलून येतात नि आपल्याला पुन्हा एकदा अंतर्यामी सूर गवसतो. थोडक्यात काय, या चराचर सृष्टीसोबत आपणही नव्यानं उगवून येतो.

आषाढाचा धुवांधार, धुंद प्रवाह थोडा शांत होतो आणि आकाशाच्या आख्यानावर एका हळुवार कवितेची नांदी सुरू होते... तोच हा श्रावण! श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या वहीत उमटलेला एक लयबद्ध छंद आहे. तो फक्त आकाशातून कोसळणारा पाऊस नसून, मातीच्या कानाकोपऱ्यातून फुटणारा एक काव्यात्मक अंकुर आहे. ​श्रावणातल्या पावसाचा अंदाजच निराळा. तो येतो नटखट प्रेयसीसारखा- पावलांचा आवाज न करता, अचानक मागे उभं राहून डोळे झाकावेत तसा. एका क्षणी सोनचाफ्यासारखं कोवळं ऊन अंगावर सांडतं अन् दुसऱ्याच क्षणी थेंबांचे पैंजण वाजवत एक रेशमी सर कोसळते. या ऊन-पावसाच्या मंद खेळातून जेव्हा आकाशाच्या पटलावर इंद्रधनुष्याची कमान उमटते, तेव्हा वाटतं- देवानेच जणू अंतराळात रंगांची एक ताजी कविता लिहून ठेवली आहे.

श्रावणात सृष्टीची भाषा बदलून जाते. डोंगर-दऱ्यांवर हिरव्यागार मखमलीच्या सुरेख ओळी कोरल्या जातात. झाडांच्या पानांवर अडून राहिलेले पाण्याचे थेंब सकाळी पडणाऱ्या उन्हात मोत्यांसारखे लखलखतात, जणू गवताच्या पातीवर कुणीतरी लयीत शब्द सांडले आहेत असं वाटतं. ढगांमध्ये दडलेल्या उन्हाचं काय होत असेल? या प्रश्नाचं उत्तर मला अवतीभवतीच सापडतं आणि वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत ओल्या मातीचा सुगंध दरवळतो, तेव्हा मन आपोआप एखाद्या अनामिक लयीत गुणगुणू लागतं की,

फुलांमध्ये ऊन कोवळं

केशर होऊन उमलतं,

पाखरांचं काळीज तेव्हा

फुलांभोवती भिरभिरतं...

अशा काळीजओल्या वेळी पाऊस पडत असताना खिडकीत उभं राहून बाहेर नुसतं पाहत राहणं हा देखील स्वतःमध्येच एक आनंदसोहळा असतो. काचेवर थेंबांची नक्षी उमटत असते. काही थेंब एकमेकांना भेटतात, एक होतात आणि मग अलगद खाली घसरत जातात. त्या थेंबांच्या प्रवासातही एक तत्त्वज्ञान दडलेलं असतं. स्वतंत्र असलेले थेंब एकत्र आले की त्यांचा प्रवाह होतो. माणसांचंही तसंच आहे ना? एकट्याच्या अस्तित्वाला मर्यादा असतात; पण माणसं एकत्र आली की जीवनाला अर्थ मिळतो. म्हणूनच मला श्रावणाच्या सौंदर्यात एकत्र आणणारी एक प्रगल्भ जाणीव गवसते. पावसाच्या या सरी मनाला आनंद देतात, पण त्याच वेळी कुणाची तरी आठवणही करून देतात. दूर गेलेली माणसं, जुन्या घराचं अंगण, गावची ओसरी, आजीच्या हातच्या चहाची चव, शाळेतल्या मित्र-मैत्रिणी, बालपणीची पावसाळी दुपार- या सगळ्या आठवणी श्रावणाच्या सरींसोबत मनात वळचणीला येतात.

श्रावण नेमकं काय करतो? तर तो आषाढातला झाकोळ आपल्या अंत:ज्योतीने दूर करतो. आता हेच पाहा ना, दीप अमावस्येच्या दुसऱ्याच दिवसापासून श्रावणातील व्रत-वैकल्यांचा प्रारंभ होतो. आदल्या दिवशी घरोघरी दिवे घासून लख्ख केले जातात, त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर विविध सणांना प्रारंभ होतो. (मात्र काही वर्षांपासून सामिष भोजन आणि दारू पार्टी करून गटारीच्या नावानं हा दिवस बदनाम केला गेलाय.) आपले हे सण देखील निसर्गाची पूजा, जपणूक करायला शिकवणारे. त्यांची सुरुवात होते ती नागपंचमीपासून. मग रक्षाबंधन आणि त्यालाच जोडून येणारी नारळी पौर्णिमा. त्यानंतर श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी चौकाचौकात थरांचे उच्चांक गाठणारा दहीहंडीचा थरारक उत्सव. श्रावणातील या उत्सवी वातावरणाचा शेवट पिठोरी अमावस्येच्या दिवशी होतो. आपल्याकडे हा दिवस कितीतरी आधीपासून (म्हणजे ‘मदर्स डे’चं कमर्शियल वारं शिरण्याआधी बरं का!) मातृदिन म्हणून साजरा केला जातो. कदाचित यामुळेच माहेरवाशिणी श्रावणाची आतुरतेनं वाट पाहत असतात. रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या हातावर चमचमणारा रेशीम दोर नव्हे तर आपलं काळीजच बहीण बांधत असते, तर काही भगिनी दूरदेशी असलेल्या भावाला पोस्टाच्या पाकिटातून मायेचा स्पर्श पाठवत असतात. मला तर खात्रीये की त्या पाकिटाला गोंदाऐवजी या मातीचाच सुगंध येत असणार. कारण कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात तसे, ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना...’ या कवितेत श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा महिना अशी सुंदर कल्पना बोरकरांनी केली आहे. खरं तर मराठी महिन्यांचा विचार करता श्रावण हा पाचवा महिना आणि गरोदरपणातही पाचवा महिनाच गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच महिन्यात निसर्ग आपल्या डोळ्यांत हिरवं अंजन घालत असतो आणि आपली नाळ या मातीशी घट्ट होते.

तुम्ही जर या काळात ट्रेकिंगला गेलात तर अनेक धबधबे, झरे वाहताना दिसतील. दुरून पाहिलंत तर हे झरे म्हणजे जणू डोंगराच्या पाठीवर जानवे घातल्यासारखे अन् पानापानांतून टपटपणाऱ्या पागोळ्या म्हणजे या झाडांना फुटलेले आनंदाश्रूच वाटतात. रानावनात तर इतक्या रंगांची फुलं फुललेली दिसतात की ते पाहून मन हरकून जातं. त्यांच्या अवतीभोवती टाळ्या वाजवत बागडणाऱ्या फुलपाखरांच्या पंखावर किती अलगदपणे या फुलांचे रंग जाऊन बिलगतात. कधी कधी वाटतं की ही फुलंच फुलपाखरांच्या रूपानं इकडेतिकडे, चोहीकडे फिरून येतात आणि दमलीभागली की पुन्हा देठांवर येऊन विसावतात. रंग तर इतके की कुठेही कोरड्या रंगाला किंचितशीही जागा उरत नाही. या रंगांमध्ये जेव्हा इंद्रधनुष्याचे रंग मिसळतात तेव्हा नभोमंडपी कुणीतरी तोरण बांधल्याचा भास होतो. हा भास मग बालकवींच्या शब्दांत ‘श्रावणमासी, हर्षमानसी’ म्हणत इंद्रधनुचा गोफ होत गातो की,

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे

मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे

तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

आपल्या मनाच्या पाठ्यपुस्तकातील श्रावणाची सुरुवात आजही या कवितेशिवाय होत नाही हे विशेष. मग महिना कोणताही का असो, बालकवींची ही कविता वाचताना आपण नकळतपणे निसर्गाच्या कुशीत जाऊन बसतो आणि आपल्या पायांखाली हिरव्यागार गवतांचे गालीचे कुणीतरी अंथरल्यासारखे मनोमन वाटत राहते. हे पिवळं ऊन जसं बालकवींच्या कवितेत आलं, तसंच पाडगांवकरांच्या कवितेत ‘पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले...’ म्हणत आपल्याला नखशिखांत माखवून गेलं, तर कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेत हेच ऊन केशर झालं आणि हा श्रावण हसरा नाचरा, जरासा लाजरा होत सुंदर साजिरा झाला तो पुढील ओळींतून,

तांबुस कोमल पाऊल टाकीत

भिजल्या मातीत श्रावण आला

लपत, छपत, हिरव्या रानात

केशर शिंपीत श्रावण आला...

या उन्हाचं लपणं इतकं निरागस वाटतं की, जेव्हा ते सापडतं आणि त्यावर राज्य येतं तेव्हा तेही पावसात ओलचिंब भिजलेलं असतं. म्हणूनच त्याचा स्पर्श दाहक न वाटता उबदार वाटतो. त्यामुळेच कदाचित बायका मंगळागौर म्हणजेच स्त्रीमनाचा उत्सव या महिन्यात साजरा करतात. अंगणात जमलेल्या स्त्रिया, हातातल्या हिरव्या बांगड्या, केसांतील फुलं, पारंपरिक गाणी, झिम्मा-फुगड्यांचा ताल आणि हास्याचे कारंजे यामुळे सगळं वातावरण जिवंत होतं. काही काळासाठी संसाराच्या जबाबदाऱ्या मागे पडतात आणि स्त्रिया आपल्या आनंदाच्या मोकळ्या आकाशात विहार करतात. परंपरा ही केवळ जपायची गोष्ट नसते; तिच्यातून पिढ्यांना जोडणारा एक अदृश्य धागा तयार होत असतो. श्रावण तो धागा अधिक घट्ट करतो. मग अशावेळी वाऱ्यालाही पानांसोबत झिम्मा-फुगडी खेळत फेर धरावासा वाटतो आणि कविता म्हणावीशी वाटते,

ऊन शोषले ढगांनी

झाली पावसाची वेळ,

वारा खेळतो पानांशी

झिम्मा-फुगड्यांचा खेळ...

geeteshshinde@gmail.com

लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in