

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
कुणी आमदार, खासदार, मंत्री व सनदी अधिकारी नसतानाही केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रांची परिषद गाजवणारे एकमेव भारतीय अन् ज्यांचा ग्राहक चळवळ हाच श्वास आणि ध्यास आहे, ते तुमच्या-आमच्या 'मुंबई ग्राहक पंचायती'चे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे. तसेच, ज्यांनी ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेचा यशोमार्ग दाखविला, त्या 'मुंबई ग्राहक पंचायती'च्या कार्योपाध्यक्ष अनुराधा देशपांडे. या दाम्पत्याने दैनिक 'नवशक्ति'च्या कार्यालयाला भेट देऊन 'जागतिक ग्राहक दिना' निमित्त मुक्तसंवाद साधला. तो मनस्वी आनंद देणारा ठरला.
'मुंबई ग्राहक पंचायती'ची स्थापना कशी झाली ? याविषयी शिरीष देशपांडे सांगत होते, समस्त भारतीयांची सत्वपरीक्षा घेणारा तो काळ होता १९७४-७५ सालचा. महागाईच्या ज्वाळा सर्वत्र भडकल्या होत्या. बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. काळाबाजार, साठेबाजी, भेसळीला ऊत आला होता. व्यापाऱ्यांची नफेखोरी वाढली होती. त्यात सामान्य माणूस भरडून निघाला होता. या अंधारयुगात आंदोलनाचा अथवा विध्वंसक मार्ग न अनुसरता ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू दर्जेदार व रास्त दरात कशा मिळतील हा विधायक व सकारात्मक विचार काही सहृदयींच्या मनात आला. मग त्यांनी वस्तूंच्या पुरवठा साखळीतून नफेखोर व्यापाऱ्यांना वगळून थेट उत्पादकांकडून घाऊक वस्तू घेऊन त्या आपल्या सदस्यांना वितरीत करण्याची संकल्पना मांडली. एकत्रित खरेदी व सांघिक वितरण प्रणालीची क्रांतिकारक संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बिंदू माधव जोशी, ख्यातनाम गायक सुधीर फडके, मधुकरराव मंत्री अशी मातब्बर मंडळी १९७५च्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दादर येथील एका चिंचोळ्या जागेत जमली. प्रारंभी २५ कुटुंबांचा एक असे ३० ग्राहक संघ स्थापून 'मुंबई ग्राहक पंचायती'चे एक इवलेसे रोप लावले. आता बघता बघता त्या रोपट्याचे डेरेदार महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे. उद्याच्या गुढीपाडव्याला ५१ वर्षे पूर्ण करणारी ही संस्था आता २९-३० हजार कुटुंबांच्या विश्वासाची 'मर्मबंधातली ठेव' झाली आहे. ग्राहकांनी ग्राहकांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेचा आजवरचा प्रदीर्घ प्रवास कार्यकर्त्यांसाठी जणू 'आनंदयात्रा' ठरला आहे. या संस्थेची मुंबई, ठाणे, वसई, पालघर, रायगड आणि पुणे अशी सहा वितरण केंद्र आहेत. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ लोकवर्गणी व निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या बळावर ही संस्था आत्मनिर्भरतीची दमदार वाटचाल करीत असून ती आशिया खंडातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था ग्राहक संस्था म्हणून पुढे आली आहे. हा गौरव आहे मराठी माणसांचा, मराठी संस्कृतीचा आणि आपुलकीच्या नात्याचा.
१५ ते २० टक्के बचत
मुंबई ग्राहक पंचायतीच्या वस्तू खरेदी समितीच्या प्रमुख अनुराधा देशपांडे यांनी आपले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या की, सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची मागणी नोंदवितो व मगच घाऊक बाजारपेठेतून अथवा थेट उत्पादकाकडून वाणसामान खरेदी करतो. या वाटप प्रणालीत प्रत्येक ग्राहकांची १५ ते २० टक्के पैशांची बचत होते. 'ना नफा ना तोटा' या ग्राहकस्नेही तत्त्वाच्या आधारे त्याचे वितरण प्रत्येक ग्राहकांना केले जाते. या साध्या वाटणाऱ्या सूत्राने अवघ्या अवघड बाजारपेठीय समीकरणच बदलून टाकले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरण व्यवस्थेतून जे वाणसामान ग्राहकांच्या घरोघरी पोहोचवले जाते ते केवळ धान्य नसते, तर ती असते शुद्धतेची, विश्वासाची, दर्जेदार वस्तूंची हमी. ग्राहक पंचायतीची रत्नपारखी खरेदी समिती प्रत्येक वस्तूची काटेकोर तपासणी करून मगच खरेदी करते. हाच परीक्षणाचा, समीक्षणाचा चोखंदळ प्रवास केवळ ग्राहकांच्या पैशाचीच बचत करत नाही, तर त्यांना वाजवीदरात दर्जेदार व भेसळमुक्त वाणसामान देते आणि तेही स्वदेशी. हेच मुंबई ग्राहक पंचायतीचे गुणवैशिष्ट्य आणि तिच्या विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे.
पर्यावरणस्नेही व्यवस्था
निसर्गाशी नाते सांगणारी शाश्वत जीवनशैली रुजवणे हे देखील मुंबई ग्राहक पंचायतीचे आगळे वैशिष्टच राहिले आहे. याविषयी शिरीष देशपांडे म्हणाले की, सध्याच्या जागतिक हवामान बदलाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकराजाला निसर्गराजाची ओळख पटवून देण्याचा मुंबई ग्राहक पंचायतीच्या कामगिरीचा आदर्श 'युनो' सारख्या जागतिक व्यासपीठांनीही घेतला आहे. ही कहाणी रंजक तितकीच स्फूर्तिदायी आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने प्लास्टिक पिशव्यांना नकार देऊन पर्यावरणस्नेही कापडी पिशव्यांचा सातत्याने पुरस्कार केला आहे. एका कापडी पिशवीचा पुनर्वापर तब्बल १८ ते २० वेळा करण्याचा प्रयोगही पंचायतीने यशस्वी करून दाखवला आहे. त्याने पर्यावरण संरक्षणात मोलाची भर पडली आहे. एकाच वेळी मोठ्या वाहनांमधून वाणसामान ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविणारी ही संकल्पना प्रदूषणाची तीव्रता कमी करणारी, वेळेची, पैशाची आणि इंधनाची बचत करणारी आहे. म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायतीच्या या 'मिशन पॉसिबल' वितरण प्रणालीचा डंका संयुक्त राष्ट्रांच्या सभेत वाजतोय आणि गाजतोय. हे केवळ पंचायतीचे यश नाही, तर तिच्या संकल्पनेचे जागतिक मानांकन आहे.
मानवतेचा सेतू
मुंबई ग्राहक पंचायतीचा 'सेतू बांधा रे' हा प्रकल्प म्हणजे 'आहे रे वर्गाकडून' 'नाही रे वर्गाकडे' जाणारा माणुसकीचा धर्म आहे. हा धर्म उचित व्यापाराचा, स्वदेशी नाऱ्याचाच नाही, तर अंध, अपंग, दिव्यांग यांना अर्थार्जनाचा स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखविणारा व आपुलकीचे नाते वृद्धिंगत करणारा आहे. याविषयी अनुराधाताई म्हणाल्या की, समाजातील वंचित घटकांनी बनवलेल्या वस्तूंना मानाचे स्थान देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे हे मानवतावादी कार्य ईश्वरी कार्यापेक्षा खचितच कमी नाही. जळगावच्या 'गाथा' किंवा नाशिकच्या 'घरकुल' यासारख्या संस्थांनी बनवलेले पदार्थ जेव्हा ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतात, तेव्हा तो केवळ व्यवहार राहत नाही, तर ते 'या हृदयीचे त्या हृदयी' जोडणारे मानवतेचे सेतू होतात.
संघटित ताकद
मुंबई ग्राहक पंचायतीचा लढा घाऊक बाजारपेठेतील अनिष्ट मानसिकतेच्या, अनैतिक जाहिरातबाजीच्या विरोधात होता व आहे. 'टफ शुज' ची अजगर पांघरलेली विवत्र जोडप्याची जाहिरात असो, वा मद्यविक्रीची जाहिरात असो की छुप्या सरोगसीची जाहिरात असो, याविरुद्ध ग्राहक पंचायतीने रणशिंग फुंकले होते. या लढ्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते. त्यामुळे ग्राहकांच्या मनशक्तीपुढे हुकूमशाही धनशक्ती झुकली आहे. महाबलाढ्य शक्तींना ग्राहकांची संघटित ताकद झुकवू शकते, हाच या संघर्षाचा अर्थ आहे.
फसगत झालेल्यांना दिलासा
मुंबई ग्राहक पंचायतीने आर्थिक फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे. असे सांगून शिरीष देशपांडे पुढे म्हणाले की, रेरा कायद्यात सुचवलेल्या २० पैकी १८ दुरुस्त्या स्वीकारल्या गेल्या. एवढेच काय, तर 'सलोखा मंच' स्थापून शेकडो प्रकरणांचे सामंजस्याने निराकरण केले आहे. त्यामुळे पंचायतीची ही कामगिरीसुद्धा जागतिक स्तरावर नावाजली गेली आहे. एकेकाळी एका स्कूटर कंपनीने ५०० रुपये अनामत रक्कम घेऊन नंतर ती रक्कम परत करण्यास टाळाटाळ चालवली होती. त्याविरुद्ध आवाज उठवून आपण ४ लाख ग्राहकांना ४० कोटी रुपये सव्याज परत मिळवून दिले. हा सनदशीर मार्गाने दिलेला लढा अनेकांच्या आजही स्मरणात आहे. विरारच्या एका बिल्डरने ८०० कुटुंबांच्या मेहनतीचे २४ कोटी रुपये गिळंकृत केले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी २४ वर्षे लढा देऊन न्याय मिळवून देण्याचे कार्य पंचायतीने केले आहे. या चळवळीने निराश, उदास ग्राहकांच्या मनात नवी उमेद जागवून त्यांना लढण्याचा विश्वास दिला आहे. मानसिक व आर्थिक आधार दिला आहे, त्याचे मोल अनमोल आहे.
बँक ठेवीसाठी लढा
सध्या बँकेतील ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. त्यापुढील रकमेच्या ठेवी सुरक्षित नाहीत. बँक बुडाली की फक्त ५ लाखांपर्यंतचीच रक्कम ठेवीदारांना मिळते. तथापि, आपले पैसे जेव्हा बँकेत ठेवले जातात, त्यावर आपल्याला व्याजाखेरीज काहीच मिळत नाही. उलट आपण ठेवलेले पैसे इतरांना कर्जाऊ दिले जातात व त्यासाठी हमीही घेतली जाते. मुळात हे पैसे आपलेच असतात. पण आपल्या सर्व ठेवींची हमी बँका देत नाही. त्यामुळे पाच लाखांपुढच्या ठेवीदारांनाही त्यांच्या हक्काच्या, कष्टाच्या सर्व पैशांची हमी मिळायला हवी, यासाठीचा लढा आम्ही हाती घेतला आहे.
मेडिक्लेमबाबत धोरणात्मक बदल हवा
प्रारंभी मेडिक्लेमचा हप्ता कमी व नंतर उतार वयात तो वाढत जातो. ६० वर्षांनंतर व्याधी सुरू होतात. नेमके त्याचवेळी उत्पन्न थांबलेले असते. बहुतेक निवृत्त झालेले असतात. तेव्हा प्रीमियम वाढतो. अशा वेळी आजवरच्या हप्त्याच्या रकमेची सरासरी काढून ज्येष्ठ नागरिकांना अधिक भार सहन करावा लागू नये यासाठी मेडिक्लेमसंदर्भात धोरणात बदल करणे आवश्यक आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याचा विचार आम्ही करीत आहोत.
ग्राहकांचे मूलभूत कर्तव्य
आजकालच्या डिजिटल युगात डॉक्टर, उद्योजक, सेवानिवृत्त अधिकारीच नव्हे, तर साक्षात न्यायाधीशांचीही 'डिजिटल' फसवणूक होत आहे. ही फसगत टाळण्यासाठी प्रत्येकानेच आता अधिक सजग, दक्ष राहायला हवे. वस्तूची माहिती, निवड, सुरक्षितता या मूलभूत हक्कांच्या बळावरच ग्राहक सुरक्षा उभी आहे. गिऱ्हाईक होणे सोपे असले तरी सुजाण नागरिक होणे हीच काळाची गरज आहे. त्यासाठी लोकशिक्षण व लोकप्रबोधन होणे आवश्यक आहे. बिस्किटाचा पुडा असो की शाम्पूची बाटली असो त्यावर काय लिहिले आहे? का लिहिले? कसे लिहिले ? याविषयीचे 'लेबर रिडिंग' प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. आजकालच्या जाहिरात विश्वाच्या झगमगटाला न भुलता वस्तूंचा दर्जा व सुरक्षितता तपासणी करणे हे सुजाण ग्राहकांचे मूलभूत कर्तव्य आहे.
ग्राहकांना काय सल्ला द्याल ?
ग्राहकांनी सजग राहणे, सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. असे सांगून देशपांडे दाम्पत्य म्हणाले की, प्रत्येक ग्राहकाला सुरक्षेचा व माहितीचा हक्क, तसेच, वस्तू निवडीचा, तक्रार निवारणाचा व ग्राहक शिक्षणाचा अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. त्याविषयी जागरूकपणे खरेदी करणे गरजेचे आहे. आपण गृहित धरले जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. याआधी कोणत्याही वस्तूची खरेदी पारखून, निरखून घेता येत होती. सध्या ऑनलाइनचा, फास्टफुड खरेदीचा जमाना आहे. त्यात धोके अधिक आहेत. त्यामुळे कुठलेही व्यवहार करताना ते नीटपणे करणे, त्याची खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुळात, बालवयातच मुलांवर ग्राहकहिताचे संस्कार होणे गरजेचे आहे. आपण काय खायला पाहिजे, कोणते खाद्यपदार्थ आरोग्याला हानिकारक नाहीत याबाबत सजग असणे आवश्यक आहे. ही सजगता अंगी भिनेल, तेव्हाच ग्राहकांचे हक्क व अधिकार अबाधित राहतील.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या लोकचळवळीचा इतिहास विश्वासार्हतेच्या पायावर उभा आहे. राजकीय शक्ती नव्हे, तर लोकशक्तीच्या बळावर तिची दमदार वाटचाल सुरू आहे. ही चळवळ ५१ वर्षांची झाली असली तरी तिचा उत्साह नवतरुण, नवचैतन्यांनी सळसळणारा आहे. दिव्यांग, गतिमंदांच्या हाताला काम देणे वा जागतिक स्तरावर ग्राहकांच्या न्यायहक्कासाठी लढा उभारणे असो हे सत्कर्म म्हणजे मानवी भावभावनांचे, जनसंवेदनांचे मूर्तिमंत प्रतीक आहे. ही सचोटी, जिद्दीची अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची व विश्वासार्हतेची, माणुसकीला समृद्धीने जोडणारी लोकचळवळ आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचा गुढीपाडव्याला वर्धापन दिन आहे. 'जागतिक ग्राहक दिना' च्या पार्श्वभूमीवर या लोकचळवळीचा लामण दिवा असाच अखंडपणे तेवत राहो व त्याच्या उजेडात वंचितांच्या, उपेक्षितांच्या अंधारवाटा उजळून निघोत, हीच सदिच्छा..।
prakashrsawant@gmail.com