

परीक्षण
चित्रा राजेंद्र जोशी
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ठाणे वितरण केंद्रांतर्गत आमचा ग्राहक संघ गेली तेवीस वर्षं सुरू आहे. आमचं गृहसंकुल तेव्हा नवीन असल्याने निरनिराळ्या भागातून आलेले आम्ही रहिवासी. संघ स्थापनेसाठी इतरांच्या घरी जायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याप्रमाणेच काही रहिवासी त्यांच्या आधीच्या सोसायटीत संघ सभासद असल्याचं लक्षात आलं. या सामानाची इतकी सवय होती की दुसरीकडून सामान आणणे त्यांनाही माझ्यासारखेच न पटणारे होते. काहीजण तोवर आपल्या आधीच्या संघातून सामान आणत होते. म्हणजे अगदी ठाणे ते बोरिवली दरमहा जा-ये होत असली तरीही ते न थकता, न कंटाळता करत असत. इथे संघ सुरू होतोय याचा आनंद होऊन ते लगेच सभासद झाले. ते सगळेच आजही टिकून आहेत आणि त्यांच्यामुळे नवीन सभासददेखील येत आहेत.
ही कथा आमच्याप्रमाणेच इतरही अनेक संघांची असणार याची मला पक्की खात्री आहे. काय बरं असेल याचं इंगित? आपल्या रोजच्या जेवणातले सर्व अन्नघटक निवडून पारखून घेतलेले, दर्जेदार आणि वजनात जराही तूट नसलेले असतात. गेली पन्नासहून अधिक वर्षं दरमहा नियमित वेळापत्रकानुसार हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. हे कसं शक्य झालं असेल?
ज्या संस्थेचे आपल्या रोजच्या जगण्यात इतके महत्त्वपूर्ण स्थान आहे, तिचा इतिहास थक्क करणारा आहे. १९८१ मध्ये ‘मुंबई ग्राहक पंचायत’ या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. दरमहा वितरण आणि दरवर्षी ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणारी ग्राहक पंचायत पेठ यातून ‘पीठ ते पांघरूण’ अशा घरातील जवळपास सर्व गरजांना सामावून घेणारी ही संस्था ठरली आहे.
मात्र याची मुहूर्तमेढ त्याआधी, २२ फेब्रुवारी १९७५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ या संस्थेच्या स्थापनेने रोवली गेली. याला पार्श्वभूमी आहे ती १९७४ च्या दिवाळीत ‘ऑपरेशन लक्ष्मी रोड’ या पुण्याच्या काही युवकांनी छेडलेल्या आंदोलनाची. सुधीर फडके उर्फ बाबूजी, बिंदूमाधव जोशी, सूर्यकांत पाठक, शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोलकर, अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर, पत्रकार दि. वि. गोखले, ग. वा. बेहरे अशी अनेक मंडळी रास्त दरात कापड-विक्री आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली होती. त्याची परिणती एका घाऊक व्यापाऱ्याच्या पुढाकाराने साड्या, शर्टिंग, ब्लँकेट्स यांची भरपूर खरेदी झाली.
त्यानंतर महागाई आणि टंचाई या दोहोंनी हैराण झालेल्या ग्राहकांसाठी शेतकरी-ग्राहक थेट व्यवहार घडवणारी ‘तांदूळ पेठ’ भरवली गेली. असा प्रयोग दर महिन्याला व्हावा अशी अपेक्षा लाभार्थी ग्राहकांनी व्यक्त केली. त्यातूनच उत्पादक-ग्राहक यांचा थेट मेळ घालण्याची संकल्पना पुढे आली. गेली बावन्न वर्षं तीच अव्याहतपणे सुरू आहे.
पुण्याला सुरुवात झाल्यानंतर यथावकाश हे काम मुंबईतदेखील सुरू झाले. सुधीर फडके, लेखक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, मुंबईचे माजी महापौर हेमचंद्र गुप्ते, पत्रकार व लेखक विद्याधर गोखले अशा अनेक मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले.
मुंबई ग्राहक पंचायतीचे कामकाज दरमहा गरजेच्या वस्तूंचे वितरण हे जसे आहे, त्याचप्रमाणे ग्राहकहिताच्या इतरही गोष्टी या माध्यमातून केल्या जातात. ग्राहकांचे प्रश्न हाताळणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या हक्कांचे भान देणे, ग्राहक विषयांचा प्रचार-प्रसार करणे, सभासदांना संघटित ठेवणे, कार्यकर्ते आणि संघप्रमुखांचे सक्षमीकरण अशी कामे संस्थेमार्फत केली जातात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत तक्रारी निर्माण होणे अपरिहार्य असते. या तक्रारी स्वतःच कशा सोडवायच्या याचे प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून ग्राहकांना विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
त्रस्त टेलिफोन, गॅस ग्राहक, समस्याग्रस्त बँक ग्राहक, गृहप्रकल्पांत फसवले गेलेले गुंतवणूकदार अशा निरनिराळ्या समस्यांत अडकलेल्या ग्राहकांना संस्थेतर्फे आपसात चर्चा करून, सल्लामसलत करून यशस्वीरीत्या मदत करण्यात आली. सततच्या प्रयत्नांनी वैद्यकीय सेवा ग्राहक कायद्यात समाविष्ट झाली. प्रत्येक वेळी निर्णायक यश मिळालं असं जरी घडलं नाही, तरी सार्वत्रिक ग्राहक प्रश्नांचा वेळोवेळी पाठपुरावा करत राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना व्यवहार करतानाच जागरूक राहण्याचे भान आले.
भेसळविरहित अन्नधान्याच्या नियमित वितरणाच्या जोडीने पर्यावरण संरक्षणाचे कामही उभे राहिले. कचरा वर्गीकरण करून घरातल्या ओल्या कचऱ्याचे खत आपणच करायचे, पर्यावरणस्नेही पद्धतीने गणपती, दिवाळी असे सण साजरे करायचे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमीत कमी ठेवायचा, त्या पुनर्चक्रीकरण संस्थांना देण्याची व्यवस्था करायची, अशा अनेक पूरक गोष्टी संस्थेने हाती घेतल्या आहेत. मासिक वितरणातील गहू, तांदूळ, साखर अशा वस्तू पाच किलोच्या कापडी पिशव्यांतून दिल्या जातात. सभासद ती पिशवी स्वच्छ धुवून परत करतात. यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर काहीसा निर्बंध येतो. डिजिटल युगात सामानाचे मागणीपत्रक भरणे आणि बिलांची रक्कम जमा करणे ऑनलाइन माध्यमातून केले जाते.
ग्राहक चळवळीचे काम भारतापुरते मर्यादित राहिले नाही. मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरीष देशपांडे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या UNCTAD संस्थेच्या लक्षात ग्राहक संरक्षणविषयक सुधारणा आणून दिल्या. त्यानंतर भारत सरकारने टास्क फोर्स निर्माण करून जगासमोर उदाहरण ठेवले. ऑक्टोबर २०१६ मध्ये UNCTADच्या जिनिव्हा परिषदेत भारताचा गौरव करण्यात आला. पुणे-मुंबई शहरांत यशस्वी ठरलेली ही चळवळ थेट जगासमोर गेली.
या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळाच्या प्रवासाचे दस्तावेजीकरण आवश्यक ठरते. ग्राहक चळवळीतील प्रत्येक टप्प्यावर कोणी सक्रिय सहभाग दिला, पाठिंबा दिला, हा प्रवास कसा घडला, याचा विस्ताराने आढावा लेखिका शुभदा चौकर यांनी घेतला आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या मदतीने अनुक्रमणिकेच्या स्वरूपात आराखडा तयार करून त्यांनी एकेका विषयावर लेखन केले. संस्थेच्या स्थापनेपासून पुढाकार घेतलेल्या सुधीर फडके यांच्या गीतातील ओळींवर आधारित ‘सेतू बांधा रे’, ‘कष्टाविण फळ ना मिळते’ अशी अनोखी शीर्षकेही पुस्तकाला लाभली आहेत.
पुस्तकाचे हिरवागार रंग आणि सूर्यकिरणांनी प्रकाशमान झालेली कापडी पिशवी यांचे समर्पक मुखपृष्ठ राजू देशपांडे यांनी साकारले आहे. नुकतेच लेखिका शुभदा चौकर यांना पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कै. ना. के. बेहरे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शीर्षकाला साजेसं ‘गोष्ट ग्राहकशक्तीची - यशोगाथा मुंबई ग्राहक पंचायतीची’ हे पुस्तक प्रत्येक ग्राहकाने जरूर वाचावं आणि या चळवळीशी जोडून घ्यावं, यासाठी इच्छाशक्ती जागी करणारं ठरावं.
(लेखिका : शुभदा चौकर - रोहन प्रकाशन - पहिली आवृत्ती: १२ एप्रिल २०२६ - मूल्य : ₹४४०/- पृष्ठसंख्या : २४८.)