

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
गरीब-श्रीमंत आणि जात-पात बाजूला सारून सर्वांना एकाच कट्ट्यावर आणणारे मुंबईचे स्ट्रीट फूड, हे केवळ खिशाला परवडणारे अन्न नसून या धावत्या शहराची खरी जीवनवाहिनी आणि खाद्यसंस्कृतीचा श्वास आहे.
मुंबईत फिरती दुकाने चालवून फेरीवाले आहार विक्री करतात तोच हा मुंबईतील रस्त्यावरील आहार आहे. या शहरातील हे एक विशेष असं नमुनेदार प्रकरण आहे. रस्त्यावरील आहार अर्थात स्ट्रीट फूड हे या शहराचं एक वेगळेपण आहे. सामान्यतः सर्व भारतभर रस्त्यावर आहार मिळतोच पण मुंबईत सर्व प्रकारची जनता, त्यात गरीब, श्रीमंत, जातिभेद, या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण सकाळी, संध्याकाळी रस्त्यावरील आहाराचा आस्वाद घेत असतात.
मुंबईचं स्ट्रीट फूड म्हणजे मुंबईतील फिरत्या बाजार स्टॉल्सवरून फेरीवाल्यांनी विकलेले खाद्यपदार्थ. संपूर्ण भारतात स्ट्रीट फूड सर्वमान्य असलं तरी, मुंबई तिच्या स्ट्रीट फूडसाठी ओळखली जाते आणि हे शहराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. सर्व आर्थिक स्तरांतील लोक जवळपास चोवीस तास रस्त्याच्या कडेला खातात आणि कधीकधी तर असं वाटतं की शहरातील रेस्टॉरंट्सपेक्षा स्ट्रीट फूडची चव चांगली असते की काय? शहराची खाद्यसंस्कृती विकसित करण्याचं श्रेय स्ट्रीट फूड विक्रेत्यांना दिलं पाहिजे.
महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड हे चटपटीत, मसालेदार आणि खिशाला परवडणारं असतं, ज्यामध्ये वडा पाव, मिसळ पाव, पावभाजी, शेवपुरी आणि झुणका भाकर यांसारखे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलसह सर्व हॉटेलमधील किचनमध्ये आता हे रस्त्यावरील विविध आहार प्रकार बनवले जातात. जगातील सर्व हॉटेलमध्ये मुंबईच्या रस्त्यावर बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची त्यांच्या मेनू कार्डावर वर्णी लागलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतील स्ट्रीट फूडचा जन्म हा विशिष्ट काळात झालेला नसून, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, म्हणजे १९६०-७० च्या दशतकात कामगार, प्रवासी, तसंच एकट्या राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वस्त आणि पोटभरीच्या जेवणाखाण्याची गरज म्हणून वडापाव, पावभाजी, चायनीज फूडसारख्या पदार्थांनी जोर धरला.
मुंबईत, गाडी स्टॉल टपरी यावर मिळणारे अन्नपदार्थ, ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो. अगदी आजच्या भाषेत सांगायचं, तर जे जनरेशन X पासून अगदी जनरेशन अल्फा पर्यंत सगळ्या वयोगटातील, नियमित हॉटेलचं खाणं न परवडणाऱ्या, तळागाळातल्या, सर्वसामान्य वर्गातल्या जनांची भूक शांत करत असतंच, पण अगदी सगळ्या वयोगटातील मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय ते उच्चवर्णीय स्तरातील जनांनाही जिव्हानंद देत असतं.
गेल्या अनेक वर्षांपासून यात वडापाव या चिरतरुण, All time favourite पदार्थाचा नंबर अगदी वरचा आहे. पंचवीस तीस रुपयात हॉटेलमधला चहासुद्धा मिळत नाही, तेवढ्या पैशात दोन वडापाव भुकेल्या माणसाची भूक शांत करतात. मुद्दा काय? तर हा पदार्थ भूकही भागवतो आणि झणझणीत आनंदही देऊन जातो. एखादी सभा, मीटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम इथपासून अधूनमधून, “चहा टाक कडक, मी नाक्यावरून वडापाव घेऊन येतो.” या शब्दांसह कुटुंबात आपली हजेरी लावून जातो. तरुणाईचा तर हा अत्यंत आवडता खाद्यपदार्थ आहे. आजकाल यामध्ये ब्रेड कटलेट (मूळ उच्चार कटलेट) भजीपाव, पंजाबी समोसा हेही जोडीला असतात, पण वडापावची लोकप्रियता अगाध आहे आणि पुढच्या अनेक वर्षांत ती कमी होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही.
स्ट्रीट फूड लोकप्रियतेत पुढचा नंबर लागतो तो पावभाजी या पदार्थाचा. अर्थात गेली काही वर्ष हा पदार्थ रेस्टॉरंट्सच्या पदार्थसारणीत अढळपदावर विराजमान झालेला आहे. हा पदार्थसुद्धा गाडी, स्टॉलवरूनच पुढे आला. सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात पावभाजीच्या गाड्या लागायच्या, आणि त्यांच्या आजूबाजूने खवैय्यांची गर्दी उसळायची. पूर्वी चहासाठी जी कपबशी दिली जायची तशा बशीत भाजी दिली जात असे, आणि सोबतच्या लहान ताटलीत मस्क्यात गरम केलेले दोन पाव आणि टोमॅटो कांद्याची चाट मसाला पेरून कचुंबर. तमाम तरुणाई सायंकाळी मित्रमंडळींसह पावभाजीचा आस्वाद घ्यायला जातीने हजर असायची. या खाण्याला विविध कारणं असायची, कुणाची पार्टी म्हणून, मित्राचा वाढदिवस म्हणून, वासाने भूक खवळली म्हणून किंवा आणखीन काही. पुढे या पदार्थाची लोकप्रियता ओळखून, हॉटेल व्यावसायिकांनी त्याला आपल्या मेन्यूमध्ये स्थान दिलं, आणि चीज पावभाजी, जैन पावभाजी अशा तरुणाईला आकर्षित करणाऱ्या नामकरणांनी हे कमी पैशात मिळणारं स्ट्रीट फूड अव्वाच्या सव्वा किमतीत खवैय्यांच्या जिभेचे चोचले पुरवू लागलं.
स्ट्रीट फूड या वर्गात पुढचा नंबर लागतो तो चायनीज या खाद्य व्यंजनांचा, त्यालाही आज साध्या लहान हॉटेलपासून मोठ्या रेस्टॉरंटनी आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. आता चायनीज खाद्य व्यंजन हे, टपरी स्टॉलकडून हॉटेलमध्ये गेलं की, हॉटेलमधून टपरीकडे आलं हे नाही सांगता येणार. फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, मंचुरियन, चिकन लॉलीपॉप, चायनीज सूप अशा नावांनी समोर येणारे हे सो कॉल्ड चायनीज पदार्थ खरंच मूळ चायनीज पाककृतीशी साधर्म्य राखणारे असतात का? किंवा चायनीज मंडळी खातात ते हेच पदार्थ का? हा खरोखर वादाचा आणि संशोधनाचा मुद्दा असल्याने खवय्ये मंडळी तिकडे दुर्लक्ष करून, चायनीज पदार्थांचा आस्वाद घेत असतात. हे पदार्थ मिळणाऱ्या गाड्या, स्टॉल साधारण दिवेलागणी झाली, की रस्त्याला लागतात त्या अगदी रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या असतात. High flame वर पेटणाऱ्या स्टोव्हवर ठेवलेल्या मोठाल्या लोखंडी कढया, त्यात तेलावर बनणारे चायनीज पदार्थ, पदार्थ ढवळणारा मोठ्ठा झारा आणि ते बनवणाऱ्या, मधून कढईतले पदार्थ टॉस करणाऱ्या माणसाच्या हातांची होणारी लयबद्ध हालचाल डोळे भरून पाहत असतानाच, पुढच्या काही मिनिटांत तयार झालेला गरमागरम राईस किंवा दुसरा एखादा पदार्थ काचेच्या, प्लास्टिक किंवा मेलामाइनच्या बाऊलमधून, दोन-तीन प्रकारच्या सॉससह समोर येतो आणि मग मात्र खवय्यांना वेळ दवडणं अशक्य होतं.
आता हे झाले स्ट्रीट फूड यात मोडणारे खाद्यपदार्थ. हे खाऊन झाल्यावर खवय्यांना लागणारी तहान, ज्यूस, फळांच्या तुकड्यांची प्लेट, फालुदा, कुल्फी यासारखे पेय पदार्थ भागवत असतात. जितकी वर्दळ खाद्यपदार्थांच्या गाडी स्टॉलवर असते, तितकीच गर्दी याही गाडीवर होत असते. परंतु विविध ज्यूसच्या भाऊगर्दीत एका पेयाने गेली कित्येक वर्ष आपलं अस्तित्व, नाव आणि चव सामान्य जनांच्या जिभेवर कायम राखलेलं आहे. ते पेय म्हणजे रसवंती गृहात मिळणारा उसाचा रस. सर्वसामान्यांना परवडणारा, तहान भागवणारा, हा उसाचा रस लिंबू आलं यासह समोर येतो. ग्लास मुखाला लावताच, त्या मधुर चवीने डोळे हलकेच मिटले जातात. पूर्वी काही पैशात मिळणारा हा रस आता काही रुपयांत मिळतो इतकाच फरक.
स्ट्रीट फूड यामध्ये खवय्यांना आवडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे सँडविच. स्टॉल किंवा गाडीवर मिळणारा हा पदार्थ, व्हेज सँडविच, टोस्ट सँडविच, चीज सँडविच, मसाला सँडविच ज्यामध्ये बटाट्याची भाजी घातलेली असते, ग्रिल्ड सँडविच अशा विविध प्रकारात उपलब्ध असतो. सँडविचवर बारीक शेव पसरूनही दिलं जातं.
मुंबईच्या फोर्ट भागातील विविध कार्यालयात काम करणारे कर्मचारी ते अगदी टाय लावणारी साहेब मंडळी, विक्रेते, फिरतीची नोकरी असलेले कंपनीचे प्रतिनिधी अशा समस्त तरुण वर्गापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या वयोगटातील मंडळींची, हे स्ट्रीट फूड वर्षानुवर्षे भूक-तहान भागवत आहे.
kprasad1959@gmail.com