धोका इथेच आहे...

वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढणारी महागाई, बेरोजगारी हे प्रश्न नित्याचे झाले आहेत. जातीय-धार्मिक वादामध्येही काही ‘राम’ उरलेला नाही. या पुढचे प्रश्न आहेत ते देशातील स्वायत्त संस्थांच्या अस्तित्वाचे, त्याचबरोबर महानगरांमधील पायाभूत सुविधांवरील वाढत्या ताणतणावाचे व हा ताण कमी करून सामान्य माणसाचे जगणे सुसह्य, सुलभ करण्याचे.
Photo - Pintrest
Photo - Pintrest
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढणारी महागाई, बेरोजगारी हे प्रश्न नित्याचे झाले आहेत. जातीय-धार्मिक वादामध्येही काही ‘राम’ उरलेला नाही. या पुढचे प्रश्न आहेत ते देशातील स्वायत्त संस्थांच्या अस्तित्वाचे, त्याचबरोबर महानगरांमधील पायाभूत सुविधांवरील वाढत्या ताणतणावाचे व हा ताण कमी करून सामान्य माणसाचे जगणे सुसह्य, सुलभ करण्याचे. तथापि हा देश, हे राज्य, हे शहर आपले आहे, ही आपलेपणाची भावनाच नष्ट झाली तर काय? धोका तर इथेच आहे.

मुंबई महानगराची जडणघडण करण्यात सर्वधर्मीयांचा आजवर मोलाचा हातभार लागलेला आहे. या महानगराच्या नियोजनात ब्रिटिशांचे योगदानही अनन्यसाधारण राहिलेले आहे. इटालियन गॉथिक शैलीचा नितांतसुंदर आविष्कार असलेली आणि युनेस्कोच्या यादीत विराजमान झालेली ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ इमारत, पश्चिम रेल्वे मुख्यालयाची देखणी इमारत असो, जीपीओ, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, क्रॉफर्ड मार्केट, गेटवे ऑफ इंडिया, डेव्हीड ससून लायब्ररी, तसेच, आर्ट डेको शैलीत आकारास आलेल्या मेट्रो, इरॅास, रीगल सिनेमा चित्रपटगृहांनी मुंबईच्या सौंदर्याला सुंदरतेचा साज चढविला आहे.

मुंबई म्हणजे केवळ मुंबादेवी, महालक्ष्मी, बाबुलनाथ, वाळकेश्वर, सिद्धिविनायक मंदिरेच नाही, तर अफगाण चर्च, पोर्तुगीज चर्च, माऊंट मेरी चर्च, हाजीअली, श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा, बानाजी लिमजी अग्यारी अशी सर्वधर्मीय भाविकांची महानगरी आहे. माहीमची शितलादेवी, माहीमचा चर्च, जसा आपल्याला प्यारा आहे, तसाच माहीमचा दर्गाही आम्हाला तितकाच पूजनीय आहे. माहीमच्या हलव्याची, इथल्या वडापावची तर चवच न्यारी. चटपटीत, लज्जतदार, खुसखुशीत खाद्यसंस्कृतीने भरलेल्या खाऊगल्ल्या तर मुंबईची शान आहे. ताजमहाल, ओबेरॉय, प्रेसिडेंट, दिल्ली दरबार, शालिमार, ऑलिंपिया, स्टेडियमच काय, इथल्या बेकऱ्या, इराणी हॉटेल म्हणजे स्वर्गसुखच जणू! मुंबईच्या या खाद्यसंस्कृतीला तर जगात तोड नाही. मुंबईने सर्वधर्मीय उत्सवांना आपलेसे केले आहे. म्हणूनच तर रमझानच्या पवित्र महिन्यात मोहम्मद अली रोडवर ज्याने खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

बहुढंगी, बहुरंगी, बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुगुणी मुंबईच्या शिक्षण क्षेत्राचा जगभर दबदबा आहे. हे महानगर साऱ्या देशवासीयांना आरोग्यसेवा पुरवून त्यांना नवजीवन देत आहे. वानखेडे, ब्रेबाॅर्न स्टेडियम, शिवाजी पार्कची खेळसंस्कृती जगभरात मान्यता पावली आहे. या महानगराने ‘बॉलीवूड’ चित्रपटांचा अफलातून नजराणा आलम दुनियेला पेश करून अनेक स्टार्स, सुपरस्टार्सना नावारूपाला आणण्याचे काम केले आहे. ख्यातकीर्त गायकांनाच नव्हे, तर ज्याला आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करायचे आहे त्या प्रत्येकाला या महानगराने आपले क्षितिज मोकळे करून दिले आहे. या मुंबईने केवळ सर्वधर्म समभावच जपलेला नाही, तर राष्ट्र, महा-राष्ट्र प्रेमही जागविले आहे. मुंबईचा संघ, मग तो कबड्डीचा असो, फुटबॉलचा असो की क्रिकेटचा.. तो समस्त मुंबईकरांना नेहमीच आपलासा वाटत आलेला आहे.

मुंबईचे कल्चर कॉस्मोपॉलिटन. इथली सर्वसमावेशक भाषाही कालपरत्वे बदलत आलीय. फारसी, बंगाली, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय अशा साऱ्या भाषाभगिनी परस्परांमध्ये अशा एकरूप झाल्यात जसे की दूध आणि साखर. त्यामुळेच ‘बम्बया’ ही नवीनच भाषा संस्कृती इथे उगम पावली आहे. मुंबई हा देशभरातील भाषा, प्रांत, पंथ यांच्या संस्कृतीचा अनोखा संगम आहे. इथल्या लोकल भाषेला त्या त्या भाषेची ढब, लहेजा, लय, ताल आहे. अशाप्रकारे या मायावी महानगरीने जगभरात आपल्या नावाचा डंका सतत वाजतगाजत ठेवला आहे. मुंबई कुणाची? तुमची-आमची सर्वांची. हाच एकमुखी नारा आजही दशदिशा गुंजत असला तरी मुंबई महाराष्ट्रीयनांची, मराठीजनांची आणि मराठीमनांची.

या मुंबईत एकेकाळी कापड गिरण्यांचे सुवर्णयोग होते व ते अस्ताला जाऊन आता उरल्या आहेत त्या केवळ आठवणी. ‘व्हिक्टोरिया’प्रमाणे मुंबईतील काळ्या- पिवळ्या टॅक्सीचा जमानाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. अलीकडच्या काळात झपाट्याने आडव्या मुंबईची उभी मुंबई होत आहे. अगदी अनिर्बंधपणे झोपड्या, चाळी, झोपडपट्ट्या जाऊन त्या जागी श्वास गुदमरणारी, वारा, उजेड नसलेली टॉवर संस्कृती आकारास येत आहे. तेथील गलिच्छपणा, बकालपणा नजरेत भरू लागला आहे. या टॉवर संस्कृतीसाठी पुरेशी मैदाने, उद्याने आहेत का? इथल्या मैदानाच्या जागा इमारतींच्या टेरेसवरील खेळांच्या जागा घेऊ शकतील का? जमिनीवरील आजी-आजोबा पार्कची जागा टेरेसमधील नाना-नानी पार्क घेऊ शकतील का? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच येतील यात काही शंकाच नाही.

मुंबईच्या रस्त्यांना मर्यादा असल्याने वाहतूककोंडीत नित्यनवी भर पडत आहे. प्रदूषणाची पातळी नवनवे उच्चांक गाठू लागल्याने मुंबईकरांची घुसमट अधिकच वाढत चालली आहे. शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, मलनि:सारण, जलनि:सारण, कचरा वाहतूक या साऱ्या व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. मुंबईची लोकसंख्या वाढत आहे, पण मुंबईकरांना अपुऱ्या पडत असलेल्या सेवासुविधांचे, त्याच्या दर्जाचे काय? हा प्रश्नच आहे.

ही मुंबई आपली आहे. हे महानगर आपणच घडवायचे आहे. तथापि, प्रत्यक्षात काय होतेय? काहींना या शहराविषयी आस्था-आपुलकीच वाटेनाशी झाली आहे की काय, असा प्रश्न उद्भवत आहे. रस्त्यावर, लोकलमध्ये, मेट्रोमध्ये कुठेही थुंका हाच काही पान, गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांचा अ-धर्म झालेला आहे. आपणच निर्माण केलेला कचरा कुठेही फेकण्याची कु-संस्कृती फैलावत चालली आहे. रस्त्याचे ठेकेदार रस्त्यांचा दर्जा राखत नसल्याने ठिकठिकाणी खड्डे संस्कृतीचा झपाट्याने उदय होत आहे. सरकारी खात्यात भ्रष्टाचार बोकाळल्याने शहरांमधील सेवासुविधांचा दर्जा खालावत चालला आहे. आरोग्य सेवेवरील वाढत्या ताणामुळे औषधोपचारांना विलंब होऊन तो अनेकांच्या जीवावरच उठला आहे. महागड्या शिक्षण खर्चाने गुणीजन विद्यार्थी बेदखल होत आहेत. लोकप्रतिनिधी कमिशनला सोकावल्याने भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली आहे. त्यामुळे हे शहर जपण्याची जबाबदारी न्यायालये, पालिकांसह सर्वसंबंधितांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

मुंबई शहरातील जलनि:सारण व मलनि:सारण वाहिन्या क्षमतेने कमी पडू लागल्याने आसपासचे रस्ते मैला, सांडपाण्याने तुंबून नागरिकांचे बेहाल होत आहेत. दूषित पाण्याने आरोग्याचे प्रश्न बिकट झाले आहेत. रस्त्यावर वाहनांची गर्दी, पदपथावर फेरीवाल्यांचे आक्रमण वाढल्याने सामान्य माणसाला पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. रोगराईला निमंत्रण देणारी डासांची पैदास वाढली आहे. कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मुंबईत पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलावर्गाचे, ज्येष्ठ नागरिकांची मोठीच कुचंबणा होत आहे. मुंबईकरांचा सर्वाधिक वेळ वाहतूक कोंडीत वाया जात आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात आदर्शवत ठरावी अशी मुंबईतील किफायतशीर, दर्जेदार आणि परवडणारी ‘बेस्ट बससेवा आज तोट्यात आहे. या उपक्रमाला प्रत्येक उद्योगपतीने आपल्या सीएसआर फंडातून एक बस जरी देणगीदाखल दिली, तरी बेस्टच्या ताफ्यात अधिकच्या बसेस‌्ची भर पडून प्रवास सुसह्य होऊ शकेल. चाकरमान्यांची जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबईच्या लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचे जीव हकनाक जात आहेत. गलिच्छ वस्त्यांमधील नागरिक कीडामुंग्यांचे जीवन जगत असून मरण स्वस्त झाले आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या यंत्रवत मुंबईकरांची जगण्याची धडपड सुरू आहे. तथापि, हे शहर आपले आहे हा आपलेपणाचा भावच हरपत चालला आहे, हा भावार्थ सर्वांना समजेल तो सुदिन.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in