

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
एकेकाळचे शहराचे अध्यक्ष आता महापौर झालेत. तत्कालीन नगरपिता आता नगरसेवक म्हणून ओळखले जाताहेत. काळ बदललाय, तसा सेवाभावही संपलाय. आता उरलीय ती स्वार्थी, दिखाऊ व भ्रष्ट व्यवस्था. त्यात विकत घेणारे आहेत म्हणून विकत जाणारेही आहेत. हेच मुंबई महानगराच्या आजारांचे मूळ आहे. जल, जमीन, जंगलांचा, पर्यावरणाचा ऱ्हास करणारी, जल, ध्वनी, वायू प्रदूषणाने घुसमट वाढवून रोगराईला आवतण देणारी, भ्रष्टाचाराने पोखरलेली व सामान्यांचे जगणे असह्य करणारी ही महानगरे मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजत आहेत.
सध्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत लोकशाहीचे भवितव्य ठरविणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उभ्या आयुष्यात कधी ऐकले नव्हते, पाहिले नव्हते ते आता आपल्या डोळ्यासमोरच घडते आहे. मुंबई-महाराष्ट्र आपला आहे, हा विचारच मागे पडला आहे. या बहुभाषिक शहरात मुंबईच्या महापौरपदाचा उल्लेख जात, धर्म, प्रांताच्या नावाने केला जात आहे.
एकेकाळची कर्तृत्ववान मंडळींची घराणी सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेत होती, आताची राजघराणी केवळ सत्तेत राहण्याचीच केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे आपली आई असल्याची जनभावनाच लोप पावत चालली आहे. ‘जो आला तो रमला’ ही उक्ती सार्थ ठरवणाऱ्या मुंबईच्या मोकळ्या सरकारी जमिनींचे, उद्यानांचे, मैदानांचे, डोंगरांचे, तलावांचे, विहिरींचे, समुद्राचे लचके तोडून मुंबईची जमील तशी लूट केली जात आहे. ज्यांनी मुंबईची जडणघडण केली ते मुंबईच्या चाळ नावाच्या वस्तीत वर्षानुवर्ष राहिले ते चाळींबरोबरच परागंदा झाले अन् ज्या उपऱ्यांनी येथे अनधिकृत झोपड्या वसवल्या ते आज ‘एसएआरए’ इमारतींमधील घरांचे मालक बनले आहेत. मूळ मुंबईकरांची शोकांतिका ती हीच.
तत्कालीन ब्रिटिश राजवटीने दीडशे किलोमीटर अंतरावर धरणे बांधून आपल्या दूरदृष्टीचा आदर्श निर्माण केला. आंतरराष्ट्रीय कीर्तीची मिशनरी शाळा, कॉलेजेस उभारली. रस्ते बांधले. रुग्णालय उभारली. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईचे नियोजन पार कोलमडले. या शहरावर आधी भूमाफियांनी, ड्रगमाफियांनी, गुंडांनी व नंतर पुढाऱ्यांनी दहशत माजवली व त्यात हे शहर अधिकाधिक विद्रुप होत गेले ते कायमचेच.
एका चाळीतल्या ४० घरांची जेव्हा अलीकडच्या टॉवर संस्कृतीत ४०० घरे झाली असली तरी इथल्या मलनि:सारण वाहिन्या, जल:निसारण वाहिन्या अथवा जलवाहिन्या ‘जैसे थे’ राहिल्या. त्यांचे आकारमान वाढले नाही. रस्त्यांची रुंदीही वाढली नाही. या उलट दुचाकी, चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या. या वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागात सार्वजनिक पार्किंग टॉवर उभे राहिला हवे होते तेही झाले नाहीत. बिल्डर नुसते पैशांची झाडे उगवत राहिले. त्यातून अनधिकृत पार्किंगचा भस्मासूर मातला. काही इमारतींमध्ये पार्किंग अपुरे अरुंद असल्याने गाड्या हात बाहेर काढणेही अग्निदिव्य ठरले आहे. परिणामी गाड्या इमारतींच्या कंपाउंडमधून थेट रस्त्यावर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर रस्तेही दुहेरी तिहेरी पार्किंगने आक्रमिले आहेत. या अनधिकृत पार्किंग समस्येमुळे वाहतूक कोंडीच्या डोकेदुखीने अक्षरश: कहर माजवला आहे. ‘कोणीही यावे टपली मारून जावे’ अशी या मुंबईची दुर्दशा झाली आहे.
अलीकडचे कुर्ला व भांडुप येथील बस अपघात काय सांगतात? इथल्या अनधिकृत फेरीवाल्यांनी, दुकानदारांनी पदपथही गिळंकृत केले आहेत. त्यात मुंबईकरांचा पदपथावरून चालण्याचा मूलभूत हक्कसुद्धा डावलला जात आहे. लोकांना पदपथावरून चालायला जागा नाही म्हणून नागरिक रस्त्यावरून चालू लागले आहेत. सेवा रस्तेही फेरीवाले, अनधिकृत पार्किंगने व्यापले आहेत. परिणामी ज्या रस्त्यावरून गाड्या धावायला हव्यात तिथून नागरिक चालू लागल्याने या शहराच्या वाहतूक समस्येचा अगदी बट्ट्याबोळ झाला आहे. तोच नवनव्या भीषण अपघातांना जन्म देत आहे.
मुंबईत वाहतूक प्रदूषण आहे. औद्योगिक, कचऱ्याचे प्रदूषण आहे. आता इमारतीच्या बांधकामाचे प्रदूषणही वाढले आहे. ज्या मैदानांनी, उद्यानांनी मोकळा श्वास घेण्यास मदत करायची तीच अतिक्रमित झाली आहेत. मुंबईच्या विकासाच्या नावाखाली रातोरत जंगले नष्ट करून मुंबईकरांचा प्राणवायू हिसकावून घेतला जात आहे. दूषित पाणी, धुरकट, प्रदूषित, रोगट हवा हेच मुंबईकरांचे प्राक्तन बनले आहे.
मुंबईकरांचे श्वसनाचे विकार वाढले आहेत. त्वचा विकारांनी उचल खाल्ली आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पालिका रुग्णालयांमध्ये परप्रांतीय रुग्णांची भाऊगर्दी झाली आहे. प्रत्यक्षात परवडणाऱ्या दरात औषधोपचार करणाऱ्या या रुग्णालयांमधील आरोग्य सेवेचा विस्तार होत नाही, दर्जा उंचावत नाही की त्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रूपांतरही होत नाही. परिणामी, मुंबईकरांचे आरोग्य बिघडून त्यांचे जगणे अधिक खडतर होत चालले आहे.
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी महापालिकेच्या निवडणुका वेळेवर न घेता त्या वर्षानुवर्षे लांबविण्याचा घाट घातला गेला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका तब्बल आठ वर्षांच्या अंतराने होत आहेत. या मुंबईवर आपली सत्ता यावी यासाठी राजकीय साठमारी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांना रातोरात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी कोणताही थर गाठला जात आहे. त्यात निष्ठांचा कचरा झाला आहे. कुठे रडारड सुरू आहे. कुठे हाणामारी होत आहे. कुठे तोडफोड केली जात आहे. कुठे उमेदवारी नाकारली जात आहे, तर कुठे आयाराम गयारामांचा अहोरात्र संचार सुरू आहे. बिनविरोध उमेदवारांचे विष लोकशाहीच्या शरीरात भिनत चालले आहे. या सत्ता-पैशांच्या हव्यासात राजकारणाचे पार मातेरे झाले आहे.
आडवी मुंबई उभी होत आहे. १९ हजाराहून अधिक इमारती जुन्या होऊन मोडकळीस आलेल्या आहेत. सर्वत्र एकात्मिक विकासाची चक्रे फिरु लागली आहेत. या पार्श्वभूमीवर या शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास व्हायला हवा आणि त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता आपण भांडुप या उपनगरातील एका भागाचे उदाहरण घेऊ. आधीच श्रमिकांच्या झोपडपट्ट्यांनी व्यापलेल्या या भागात प्राथमिक सेवासुविधांचीच वानवा होती व आजही त्या परिस्थितीत काही बदल होताना दिसत नाही. इथे रुंद रस्ते नाहीत. खेळाची मैदानी नाहीत. इथल्या चाळींच्या जागी आता ३०-४० मजल्यांचे टॉवर दाटीवाटीने उभे राहत असले तरी रस्ते अरुंदच आहेत. पायाभूत सेवासुविधांचे जाळेसुद्धा अपुरे आहे. इथल्या विहिरी बुजल्या आहेत. तलाव आक्रसले आहेत. विरंगुळ्यासाठी मैदाने नाहीत की करमणुकीसाठी नाट्यगृहेसुद्धा नाहीत. मग इथल्या मुलांनी खेळायचे कुठे? रस्त्यांवर रिक्षांचीच अलोट गर्दी होत असेल, पदपथ फेरीवाल्यांनी ताब्यात घेतले असतील, तर सामान्य नागरिकांनी चालायचे कसे व कुठे? या भागात साध्या भाजीमंडयाच नसल्याने रस्त्यावरच मंडई बाजार भरले आहेत. त्यातून वाट काढत बेस्ट बस चालकांनी वाहने दामटायची तरी कशी: हा बस चालक जरा जरी चुकला, तरी त्यात रस्त्यावर बसच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या किंवा रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप नागरिकांचा बळी ठरलेलाच आहे.
मुंबई अपघातांचे शहर आहे. या शहराच्या कानाकोपऱ्यात मृत्यू दबा धरून बसलेला आहे. तो लक्षात घेता, घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचे जीवन आधीच यंत्रवत व रुक्ष झाले आहे. त्यांची वीतभर पोटासाठी जीवघेणी धावपळ करणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावयाचे असतील, तर रुग्णशय्येवर अखेरच्या घटका मोजणाऱ्या या शहराला नवसंजीवनी द्यावीच लागेल.
prakashrsawant@gmail.com