२०५१ : मुंबई खाली करा

चितळे समितीच्या आराखड्याने मुंबईच्या पाण्याचा प्रश्न दशकांपूर्वी ओळखून उपाय सुचविले होते. एमएमआरडीएचा २०५१ चा आराखडा आता संपूर्ण महानगर प्रदेशाचा विचार करतो; परंतु त्यातील आकडेही पाणीटंचाईची शक्यता संपलेली नसल्याचे दाखवतात. जुन्या योजनांच्या विलंबातून धडा घेऊन नव्या प्रकल्पांना निश्चित कालमर्यादा, आर्थिक तरतूद, जबाबदार यंत्रणा आणि पारदर्शक प्रगती अहवालाची जोड दिली पाहिजे.
२०५१ : मुंबई खाली करा
२०५१ : मुंबई खाली करा
Published on: 

विचारपान

संदीप प्रधान

चितळे समितीच्या आराखड्याने मुंबईच्या पाण्याचा प्रश्न दशकांपूर्वी ओळखून उपाय सुचविले होते. एमएमआरडीएचा २०५१ चा आराखडा आता संपूर्ण महानगर प्रदेशाचा विचार करतो; परंतु त्यातील आकडेही पाणीटंचाईची शक्यता संपलेली नसल्याचे दाखवतात. जुन्या योजनांच्या विलंबातून धडा घेऊन नव्या प्रकल्पांना निश्चित कालमर्यादा, आर्थिक तरतूद, जबाबदार यंत्रणा आणि पारदर्शक प्रगती अहवालाची जोड दिली पाहिजे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या पाण्याची चिंता कायम राहील.

विकसित भारताचे स्वप्न २०४७ साली जवळपास पूर्ण झाले आहे. रस्ते, पूल, महामार्ग, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड यांचे महाप्रचंड जाळे उभे राहिले आहे. बृहन्मुंबईच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचणे तुलनेने बरेच सोपे झाले आहे. मुंबईत २००० ते २०१० मध्ये उभ्या राहिलेल्या ६० मजली टॉवरच्या जागेवर आता पुन्हा पुनर्विकासानंतर १२० ते १५० मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. एका पुलावर वेगवेगळ्या भागांना जोडणारे आठ पूल, मेट्रोच्या अतिरिक्त मार्गिका, जलवाहतूक अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र शहर सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. ते म्हणजे पाणी! २०५१ पर्यंत पाण्याची परिस्थिती सुधारली नाही, तर मुंबई शहर रिकामे करावे लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु अधिकृतपणे पाच, तर अनधिकृतपणे साडेसात कोटी लोकसंख्येच्या या महामुंबईचे स्थलांतर कुठे करायचे, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. जर शहर रिकामे करायचे नसेल तर यापूर्वी वापरले गेलेले पाणी शुद्ध करून तयार झालेले व सध्या केवळ टॉयलेट व अन्य वापराकरिता असलेले पाणी पिण्याकरिता वापरण्याखेरीज पर्याय नाही. यावरून आंदोलने सुरू झाली आहेत. एका मोठ्या वर्गाचा पाण्याच्या पुनर्वापराला विरोध आहे. यावरच चर्चा, वितंडवाद, सोशल मीडिया पोस्ट यांचा पाऊस पडत आहे. २०५१ मध्ये पुरेशा पाण्याची गरज भागली नाही तर मुंबई खाली करावी लागेल ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. स्वप्नरंजन वाटावे असे जरी हे असले तरी तेच भविष्यात वाढून ठेवलेले वास्तव आहे.

मुंबईच्या पाण्याची चिंता आजची नाही. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारने जलतज्ज्ञ डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली. या समितीने १९९४ मध्ये सादर केलेल्या अहवालात मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या जलस्रोतांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याचा आराखडा मांडला. मात्र, तीन दशकांनंतरही त्या आराखड्यातील अनेक प्रकल्प कागदावरच राहिल्याने मुंबई महानगर प्रदेशाच्या जलसुरक्षेचे नियोजन किती दूरदृष्टीने आणि किती प्रभावीपणे झाले, हा प्रश्न उपस्थित होतो. आता एमएमआरडीएने २०५१ पर्यंतच्या पाण्याची गरज आणि उपलब्धतेचा आराखडा मांडला आहे. जुन्या नियोजनातील अपूर्णता आणि नव्या आराखड्यातील आकडे पाहता, मुंबईच्या पाण्याचा प्रश्न केवळ नवीन धरणे बांधून सुटणार नसल्याचे स्पष्ट होते.

चितळे समितीने मुंबईची २०२१ मधील पाण्याची गरज ५,४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात आजमितीस पाण्याची दैनंदिन गरज ४,५०० दशलक्ष लिटर आहे. त्या वेळी उपलब्ध स्रोत आणि प्रस्तावित भातसा प्रकल्पातील अतिरिक्त पाणी धरूनही २०२१ पर्यंत २,५०७ एमएलडी पाण्याची तूट भासेल, असे समितीने नमूद केले होते. ही तूट भरून काढण्यासाठी मध्य वैतरणा, काळू, गारगाई आणि शाई या मोठ्या धरणांचा कालबद्ध विकास करण्याची शिफारस करण्यात आली. पिंजाळ हा अतिरिक्त जलस्रोत म्हणून पुढील टप्प्यात विकसित करण्याचा विचार होता. या प्रकल्पांची उभारणी सुमारे दोन दशकांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. समितीच्या आराखड्यात भातसा तिसरा टप्पा २००३, मध्य वैतरणा २०११, गारगाई २०१७, काळू आणि पिंजाळ २०२५, तर शाई २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. म्हणजेच मुंबईच्या पाणीपुरवठ्याची समस्या आणि त्यावरील उपाय यांचे नियोजन जवळपास तीस वर्षांपूर्वीच झाले होते.

या नियोजनातील मध्य वैतरणा धरण अखेर २०१४ मध्ये कार्यान्वित झाले. त्यातून ४५५ एमएलडी पाणी उपलब्ध होते. मात्र, गारगाई आणि पिंजाळसारखे महत्त्वाचे स्रोत अद्याप पूर्ण क्षमतेने विकसित झालेले नाहीत. चितळे समितीच्या शिफारशींनुसार मुंबईला अतिरिक्त २,८९१ एमएलडी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पांचा विचार पुढे करण्यात आला. परंतु जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी, वनक्षेत्र, पुनर्वसन आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे या प्रकल्पांची गती मंदावली. तीन दशकांपूर्वी आखलेल्या योजनांपैकी अनेक योजना अद्याप पूर्ण न झाल्याने मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न आजही नव्या आराखड्यांवर अवलंबून आहे. डॉ. चितळे यांनी परिश्रमपूर्वक सादर केलेल्या अहवालाची ज्या गांभीर्यपूर्वक दखल घेऊन कालबद्ध वेळापत्रकानुसार प्रकल्प राबवायला हवे होते तसे झाले नाही. जमीन संपादन व वन विभागाची मंजुरी याच बाबी वेगवेगळी धरणे उभारण्यातील प्रमुख अडसर ठरल्या. महामुंबईचा हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतराजांच्या नजीक असल्याने दिल्ली किंवा चेन्नई यासारख्या शहरांच्या तुलनेत पाण्याच्या बाबतीत फारच नशीबवान आहे. या भागात साधारणपणे खूप चांगला पाऊस पडतो. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असतानाही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ८० टक्क्यांच्या आसपास जलसाठा उपलब्ध आहे. असे सुख देशातील अन्य मोठ्या शहरांना नाही.

एमएमआरडीएच्या २०५१ पर्यंतच्या जलव्यवस्थापन आराखड्याने या समस्येची व्याप्ती मुंबई शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या संदर्भात मांडली आहे. डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीतील आकडेवारीनुसार, एमएमआरमधील सुमारे २.७५ कोटी लोकसंख्येला दररोज १०,४५३ एमएलडी पाण्याची गरज आहे, तर प्रत्यक्ष उपलब्ध पुरवठा ९,२६२ एमएलडी आहे. म्हणजेच सध्याची तूट १,१९० एमएलडी आहे. २०४१ पर्यंत लोकसंख्या ३.२६ कोटी आणि पाण्याची मागणी १३,१८१ एमएलडी होण्याचा अंदाज आहे. त्या वेळी नियोजित पुरवठा १३,१६१ एमएलडी असल्याने तूट २० एमएलडीपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, २०५१ मध्ये लोकसंख्या ४.१५ कोटी होऊन मागणी १६,१३९ एमएलडीपर्यंत पोहोचणार आहे. प्रस्तावित स्रोत विकसित झाले तरी ५८० एमएलडीची तूट कायम राहण्याचा अंदाज या सादरीकरणात मांडण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण किंवा रायगड जिल्ह्यातील महामुंबईत समाविष्ट झालेल्या प्रदेशात भविष्यात उभी राहणारी डेटा सेंटर्स, विमानतळ परिसरातील हॉटेल्स व इतर सेवा केंद्रे यामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

या आकडेवारीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नव्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन असूनही २०५१ पर्यंत मागणी आणि पुरवठ्यातील तफावत पूर्णपणे मिटणार नाही. एमएमआरडीएच्या आराखड्यात काळू, देहरजी, बालगंगा, कोंढाणे, पोशिर, शिलार, खोलसापाडा-१ आणि २, दमणगंगा-पिंजाळ, हेटवणे विस्तार आणि न्हावा-शेवा तिसरा टप्पा अशा अकरा स्रोतांचा समावेश आहे. त्यातून एकूण ६,२९७ एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे. परंतु या प्रकल्पांची पूर्तता वन आणि पर्यावरणीय मंजुरी, जमीन संपादन, पुनर्वसन तसेच न्यायालयीन प्रकरणांवर अवलंबून आहे. काही प्रकल्पांची कामे सुरू असली, तरी अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी अद्याप नियोजन किंवा मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आराखड्यातील क्षमता आणि प्रत्यक्ष उपलब्ध होणारे पाणी यांमध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ हाच की, चितळे समिती असो की एमएमआरचा अहवाल त्यात सुचवल्यानुसार, नव्या धरणांची उभारणी ही या दाट लोकवस्तीच्या महामुंबईकरिता अशक्यप्राय गोष्ट आहे. भविष्यात ती अधिकाधिक अशक्यप्राय होत जाणार आहे.

याहून महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरवठ्यातील गळती आणि वितरण व्यवस्थेतील अपव्ययाकडे लक्ष देण्याची गरज. एमएमआरमधील विविध महापालिकांमध्ये पाणीगळतीचे प्रमाण २० ते ४० टक्क्यांपर्यंत असल्याचे सादरीकरणात नमूद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना केवळ नवीन धरणांवर अब्जावधी रुपये खर्च करण्याऐवजी गळती रोखणे, स्मार्ट मीटरिंग, पाणीवापराचे नियंत्रण आणि वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण यांना प्राधान्य दिले पाहिजे. पाणी उपलब्ध करून देणे आणि ते नागरिकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचवणे या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय जलसुरक्षा साध्य होणार नाही. त्याचबरोबर सांडपाण्याचा पुनर्वापर, ग्रे-वॉटर पुनर्चक्रण, पावसाचे पाणी साठवणे आणि कमी पाण्यात अधिक कार्यक्षम वापर ही भविष्यातील गरज आहे. एमएमआरडीएने २०५१ पर्यंत सुमारे ३० टक्के ग्रे-वॉटर पुनर्वापराचा विचार केल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते, असे नमूद केले आहे. औद्योगिक वापरासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होईल. मात्र, या उपायांची अंमलबजावणी कागदावर न राहता प्रत्येक महापालिकेच्या स्तरावर बंधनकारक आणि नियमितपणे तपासली जाणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची सक्षम यंत्रणा आहे. असे शुद्धीकरण केलेले पाणी रेल्वेने त्यांच्या गाड्या धुण्याकरिता वापरावे, असा आग्रह मुंबई महापालिकेने रेल्वेकडे धरला होता. मात्र रेल्वेने त्याला प्रतिसाद दिला नाही. शुद्ध केलेल्या सांडपाण्याबाबत आपल्याकडे प्रचंड साशंकता आहे. मुंबईला जलसुरक्षित बनवण्यासाठी धरणे बांधण्याइतकेच पाणी वाचवणे, गळती रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे न्याय्य व कार्यक्षम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

अखेर २०५१ उजाडले. एमएमआरडीएच्या आराखड्यातील बहुतांश धरणे कागदावर राहिली होती. पर्यावरणाच्या हानीचे मुद्दे, कोर्टकज्जे, जमीन संपादनाविरुद्धचे लढे यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. काही धरण प्रकल्प भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकली. भविष्यात धरणे उभी राहतील व धो धो पाणी वाहू लागेल या अपेक्षेने नवनवीन डेटा सेंटर्स, विमानतळे, हॉटेल, सेवा क्षेत्रातील कंपन्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन यांना परवानग्या सरकार देऊन बसले आहे. आता हे सर्व सोडून शहर खाली करून कुठे जाणार? पाण्याची टंचाई कशी संपवणार? अशा प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असताना अखेर सरकारने काही कठोर निर्णय घेतले. पाणीचोरी-गळती हा अत्यंत गंभीर गुन्हा जाहीर करून त्याकरिता कठोरात कठोर शिक्षेची तरतूद केली. सांडपाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य केले. सरकारने शुद्ध केलेले पाणी हे पिण्यायोग्य असून आता ते प्या किंवा मुंबई सोडून निघून जा, असा फतवाच सरकारने काढला आहे. काल्पनिक वाटले तरी २०५१ चे हेच वास्तव आहे.

pradhansandeep19@gmail.com