मर्डर इन लायब्ररी!

मालकीणबाईंच्या जाचाला कंटाळलेल्या मार्गारेट मांजरमावशीने तिला चांगलाच धडा शिकवायचा असा निर्धार केला. यावर विचार करण्यासाठी मालकीणबाईंचा डोळा चुकवून एके दिवशी रॉबिन्सन उंदीरमामाला सोबत घेऊन ती घराबाहेर पडली. रस्त्यावरील गोंगाटामुळे मार्गारेटला नीट बोलता येईना नि रॉबिन्सनला नीट ऐकू येईना.
मर्डर इन लायब्ररी!
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाईंच्या जाचाला कंटाळलेल्या मार्गारेट मांजरमावशीने तिला चांगलाच धडा शिकवायचा असा निर्धार केला. यावर विचार करण्यासाठी मालकीणबाईंचा डोळा चुकवून एके दिवशी रॉबिन्सन उंदीरमामाला सोबत घेऊन ती घराबाहेर पडली. रस्त्यावरील गोंगाटामुळे मार्गारेटला नीट बोलता येईना नि रॉबिन्सनला नीट ऐकू येईना. असं चालता चालता, आपला प्लॅन मामाला सांगता येणार नाही, कुठेतरी निवांत जागी बसायला हवं, हे मावशीच्या लक्षात आलं. अशी एखादी जागा दिसते का, यासाठी ती इकडेतिकडे बघू लागली. समोरच तिला एक भव्य इमारत दिसली. मावशीने मामाला इशारा केला. दोघेही कुणाचं लक्ष आपल्यावर पडणार नाही, याची काळजी घेत इमारतीच्या आत शिरले. आतलं दृश्य बघून त्यांना गरगरायलाच लागलं. कारण आतमध्ये जिकडे तिकडे पुस्तकंच पुस्तकं होती. छोटी! मोठी! जाडजूड! या पुस्तकांना बघून मामाची छाती दडपली. एखादं जाडजूड पुस्तक आपल्या अंगावर पडल्यास आपण भुईसपाट होऊ, या कल्पनेने त्याला भीती वाटली. तो थरथर कापू लागला. पण मावशीने त्याला धीर दिला. तिथे खूप माणसं आली होती. कुणी कपाटातून पुस्तक काढत होते. कुणी उभ्यानेच वाचत होते. कुणी केवळ पानंच चाळत होते. कुणी खुर्चीवर बसून वाचत होते. पुस्तक वाचता वाचता कुणी डुलक्या घेत होते.

मालकीणबाईंसारखी एक महिला तिथे पुस्तक वाचत असल्याचं रॉबिन्सनने बघितलं. ही बाई काय वाचतेय, हे मामाने तुरूतुरू जाऊन, हळूच बघितलं. त्या पुस्तकाचं नाव होतं, मर्डर इन लायब्ररी - ग्रंथालयात खून!

दरम्यान, त्या बाईंचं रॉबिन्सनकडे लक्ष गेलं. ती जोरात ओरडली. या ओरडण्यानं रॉबिन्सन घाबरला. त्याने टुणकन एका कपाटावर उडी मारली. त्याचा धक्का लागून एक पुस्तक बाईंच्या डोक्यावर पडलं. ती आणखी जोराने ओरडू लागली. एका कपाटाच्या आडून बघणाऱ्या मार्गारेटला काहीच सुचेना. तिने मामाला इशारा केला. दोघेही वाट मिळेल तिकडे पळत सुटले. कसेबसे इमारतीच्या बाहेर पडले. दोघांनाही चांगलीच धाप लागली. त्यांना आता पळणं शक्य नव्हतं. त्याही स्थितीत मावशीला इमारतीच्या बाजूला असलेलं झाड दिसलं. त्या झाडाच्या सावलीत गेल्यावर दोघांनाही बरं वाटलं.

“मावशे, आपण या डेंजर जागेत आलो तरी कशाला?”

“डेंजर मालकीणबाईंचा आपल्याला काटा काढायचाय. त्याचा प्लॅन करायचा होता. रस्त्यातील गोंगाटामुळे काहीच सांगता येत नव्हतं. म्हणून इथे शिरलो तर आपलेच प्राण कंठाशी आले.”

“पण, झालं ते बरंच झालं म्हणायचं.”

“काय बरं झालं? दोघांनाही पकडून झोडपलं असतं आतल्या माणसांनी.”

“मावशे, तसं तर काही झालं नाही ना.”

“मग चांगलं काय झालं?”

“मर्डर इन लायब्ररी, ग्रंथालयात खून!”

“कोड्यात बोलू नकोस. स्पष्ट सांग.”

“मावशे, ती आतमधली बाई, या नावाचं पुस्तक वाचत होती. तिच्या डोक्यावर माझ्या पळापळीमुळे पुस्तक पडलं. तिला चांगलंच टेंगूळ आल्याचं मला दिसलं.”

“यातून तुला काय कल्पना सुचली?”

“मावशे, आपण मालकीणबाईंवर हाच प्रयोग करू. त्यांना इथे आणू नि कपाटावर असलेली पुस्तकं त्यांच्या डोक्यावर पडतील असं बघू. ‘मर्डर इन लायब्ररीचा’ प्रयोग खरा करून दाखवू.” मामा डोळे मिचकावत म्हणाला. आपल्यासोबत राहून रॉब्या चांगलाच इंटेलिजंट झाल्याचं मावशीच्या लक्षात येऊन तिला रॉबिन्सनचं फार कौतुक वाटलं. लाडाने तिने हलकेच त्याची मिशी ओढली.

दरम्यान, मामाच्या डोक्यात सगळा प्लॅन तयार झाला होता. मालकीणबाईंना या ग्रंथालयात येण्यास तो स्वत: बाध्य करेल, हे त्याने मार्गा मावशीला सांगितलं.

“रॉब्या, हे म्हणजे सिंहाच्या जबड्यात स्वत:हून जाण्यासारखं आहे.”

“तुझ्यासाठी मी माझ्या प्राणाची बाजी लावायला तयार आहे ग. तुला मालकीणबाई सारखी हिडिसफिडीस करते, ते मला बघवत नाही आता. समजा माझा बळी गेलाच तर, मांजरीसाठी शहीद जाणारा मी पहिला उंदीर ठरून समस्त उंदीर जमातीला माझा अभिमान वाटेल. पृथ्वीच्या अंतापर्यंत ते माझं नाव गौरवानं घेत राहतील.” मामा छाती फुगवून म्हणाला.

याच विचारात दोघेही घरी आले. टीव्ही बघता बघता मालकीणबाई सोफ्यावरच कलंडून घोरत असल्याचं त्या दोघांना दिसलं. मामाने, मार्गारेटच्या कानात काहीतरी सांगितलं. मावशी आल्या पावली पुन्हा ग्रंथालयाकडे पळाली.

ती जाताच मामाने मालकीणबाईंच्या अंगावर उडी घेतली. त्यामुळे त्या खडबडून नि दचकून जाग्या झाल्या. मामाने खाली उडी मारली. तो मालकीणबाईंना दात दाखवून वेडावू लागला. त्या घाबरलेल्या अवस्थेतही मालकीणबाईंना त्याचा प्रचंड राग आला. त्यांनी जोराने मार्गारेटला हाक मारली. पण ती तर कधीचीच ग्रंथालयात पोहचली होती. चारपाच हाकेनंतरही मार्गारेट येत नाही, हे बघून मालकीणबाईंनी तिला ठेवणीतल्या शिव्या हासडल्या.

या उंदराचा आज खातमाच करायचा, हे ठरवून त्यांनी रॉबिन्सनच्या दिशेने टीव्हीचा रिमोट फेकला. मामाने तो नेम बरोबर चुकवला. मालकीणबाई आणखी वैतागल्या. हातात मिळेल ती वस्तू रॉबिन्सनवर फेकू लागल्या. रॉबिन्सनने हुशारीने त्यांना घराबाहेर काढले. तो ग्रंथालयाच्या दिशेने पळू लागला. मालकीणबाईही त्याच्या पाठीमागे पळू लागल्या. ग्रंथालय येताच मामा झरदिशी आत पळाला. मालकीणबाईही आत शिरू लागल्या.

रॉबिन्सनच्या पाठीमागे धावता धावता त्यांना चांगलीच धाप लागली होती. त्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण पडला. त्यांना श्वास घेणं अवघड जात होतं. पण रॉबिन्सनला काहीही करून मारायचंच, हाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत असल्यानं त्यांनी स्वत:ला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ग्रंथालयाच्या दारातच त्या कोसळल्या.

रॉबिन्सन आणि आधीपासूनच ग्रंथालयात आलेली मार्गारेट, पुस्तकांच्या कपाटाच्या आडून हे सगळं बघत होते. दोघांनाही धक्काच बसला. मालकीणबाईंच्या डोक्यावर एकही पुस्तक न पडता, त्या कशा काय बाराच्या भावात गेल्या बॉ? दोघांच्याही मनात एकाच वेळी हा प्रश्न येऊन त्यांनी एकमेकांकडे बघितलं.

इकडे ग्रंथालयात धावाधाव सुरू झाली. कुणीतरी टॅक्सी बोलावली. मालकीणबाईंना त्यातून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रॉबिन्सन आणि मार्गारेट सगळ्यांची नजर चुकवून टॅक्सीच्या टपावर जाऊ बसले. टॅक्सी हॉस्पिटलमध्ये आली. मालकीणबाईंना डॉक्टरांकडे नेण्यात आलं. टॅक्सीच्या टपावरून उतरून मार्गारेट आणि रॉबिन्सन दबकत डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहचले. डॉक्टरांनी मालकीणबाईंना तपासलं. त्यांचा श्वास सुरू असल्याने डॉक्टरांना हायसं वाटलं. त्यांनी किरकोळ उपचार केले. काही वेळाने मालकीणबाई शुद्धीवर आल्या.

शुद्धीवर येताच त्यांनी डॉक्टरांना विचारलं, “मी इथे कशी? काय झालं मला?” तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आतापर्यंत काय काय घडलं ते सांगितलं.

“अहो, काकू तुम्ही अशा वेड्यासाख्या धावत का सुटला होता? कुणाचा पाठलाग करत होता? तुमच्या जीवावरच बेतलं असतं.” डॉक्टर म्हणाले. मालकीणबाईंनी त्यांना सगळं काही सांगून टाकलं.

“काकू, एका क्षुल्लक उंदराला मारण्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घातला होता. लक्षात येतंयना. पुन्हा असं काही करू नका.” डॉक्टरांनी समजावलं. काही गोळ्या, औषधं देऊन मालकीणबाईंना घरी जाण्याची परवानगी दिली.

०००

डॉक्टरांच्या केबिनमध्ये असणाऱ्या रॉबिन्सन आणि मार्गारेटच्या कानावर डॉक्टरांचं सगळं बोलणं पडलं होतं. एका क्षुल्लक उंदराला मारण्यासाठी नव्हे, तर क्षुल्लक उंदराकडून, ‘मर्डर इन ग्रंथालयाचा’ प्रयोग सिद्ध करण्याच्या ट्रॅपमध्ये मालकीणबाई सापडल्या होत्या. पण तो अयशस्वी झाला. हे कुठं डॉक्टरांना ठाऊकाय? अशा भावना मामाच्या मनात आल्या. मावशीने ते बरोबर ओळखलं.

“रॉब्या, तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस, आपण इटुकले-पिटुकले असलो तरी काहीही करू शकतो हे लक्षात आलं ना तुझ्या.” मावशीने त्याचं कौतुक केलं. मामाने छाती फुगवून मावशीला टाळी देण्यासाठी उजवा पाय समोर केला.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in