अगम्य नासका लाइन्स

वाळवंटाच्या ओसाड कॅनव्हासवर कोरलेल्या नाझका रेषा म्हणजे काळाच्या पडद्याआड दडलेलं एक अद्भुत कोडं. त्यांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी हे रहस्य आजही जगाला भुरळ घालत आहे.
अगम्य नासका लाइन्स
अगम्य नासका लाइन्स
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

वाळवंटाच्या ओसाड कॅनव्हासवर कोरलेल्या नाझका रेषा म्हणजे काळाच्या पडद्याआड दडलेलं एक अद्भुत कोडं. त्यांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी हे रहस्य आजही जगाला भुरळ घालत आहे.

राजधानी लिमापासून दक्षिणपूर्व दिशेला, साधारण दोनशे मैलांवर असलेल्या वाळवंटी प्रदेशात नाझका संस्कृती वसत असे. नाझका ही एक प्राचीन संस्कृती असली तरी आज ‘नाझका’ या संज्ञेला आपसूकच ‘रेषा’ हे शेपूट जोडलं जातं. काय आहेत या रेषा? वाळवंटात मैलोन् मैल पसरलेल्या, एकमेकांना छेदणाऱ्या या रेषा पार क्षितिजाला भिडतात. त्यातून तयार झालेले त्रिकोण, आयात, समभुज चौकोन या भौमितिक आकृत्या आणि सर्वात अचंबित करतात पक्षी, प्राणी आणि वनस्पती यांची जमिनीवर रेखाटलेली महाकाय चित्रं. या रेषा गेली

८०-८५ वर्षं पेरूमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि पुरातत्त्व तज्ज्ञांना सारखीच भूल पाडत आहेत. या रेषांभोवतीचं अनाकलनीयतेचं वलय मात्र अजूनही गडदच राहिलं आहे. कितीही समाधानकारक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरील प्रश्नचिन्हाचं सावट काही हटायला तयार नाही.

लिमाहून भल्या पहाटे म्हणजे चार वाजता निघालो. चार तासांचा प्रवास करून आम्हाला उन्हं चढायच्या आधी नाझकाला पोहोचायचं होतं. शक्य होईल तितक्या लवकरच्या विमानात जागा पकडली तर धक्के कमी बसणार होते आणि वातावरण स्वच्छ असल्यामुळे खालच्या आकृत्याही स्पष्ट दिसणार होत्या. नाझकाला घेऊन जाणारा आमचा गाईड ॲलेक्स तिथल्या मातीतलाच. त्यामुळे त्या संस्कृतीशी त्याची नाळ जोडलेली होती. आमच्या ज्ञानाची पाटी कोरीच होती. त्यानं मग वळणदार अक्षरात नाझका रेषांचा इतिहास त्यावर लिहायला सुरुवात केली. (मिनिंग बिटवीन द नाझका लाइन्स?) आठशे रेषा, काही तीस मैलांपर्यंत पसरलेल्या, भूमितीतल्या तीनशे आकृत्या, प्राणी-पक्षी आणि वनस्पतींच्या सत्तर महाकाय आकृत्या. त्यातील काहींची जमिनीवरील लांबी बाराशे फूट. त्यामुळे अनावधानाने त्याच्या शेजारी उभं राहिलं तर असं काही भन्नाट आपल्यासमोर आहे याची सुतराम कल्पना येणार नाही.

विमानांचा शोध लागला आणि जेव्हा प्रवासी विमानसेवा सुरू झाली तेव्हा एका वैमानिकाला वाळवंटाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं हे भूमिचित्र दिसलं. ते साल होतं १९३०. ‘­­कोणी आखल्या या रेषा? प्रयोजन काय त्याचं? या इतक्या महाकाय आकृत्या आकाशातून कशा दिसतील याचा अचूक अंदाज कसा आला असेल त्यांना? आणि इतक्या लांबलचक रेषा खोदल्या म्हणजे नक्की काय केलं? कुदळ-फावडी वापरली? बरं इतकी वर्षं शाबूत कशा राहिल्या त्या?’ माझी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ॲलेक्सने हसत आमच्यासमोर रेषांचे नकाशे आणि विमानातून काढलेल्या प्राण्यांच्या आकृत्यांचे फोटो ठेवले. त्या विस्तृत आकृत्यांमध्ये होता ५९० फूट लांबीचा सरडा, माकड आणि त्याची गोल गोल गुंडाळलेली शेपटी ही आकृती होती १८० फूट, त्यांचा पवित्र कोंडोर पक्षी ४४६ फुटांचा; तर कोळी होता दीडशे फुटांचा, १६४ फुटांचा हमिंग बर्ड, तेवढ्याच आकाराचा कुत्रा आणि एका टेकडीच्या उतारावर कोरलेला, १०५ फूट उंचीचा, वाटोळ्या डोळ्यांचा आणि गोल डोक्याचा अंतराळवीर. माणसाचे हात किंवा पक्ष्यांचे पाय दिसावेत अशी एक आकृती होती. ते फोटो आवरत ॲलेक्स म्हणाला, “या जैविक आकृत्यांइतक्याच महत्त्वाच्या आहेत या रेषा, त्यांनी तयार झालेले त्रिकोण, आयात, समभुज चौकोन. तेही निरखून पाहा. विमानप्रवास आटोपला की मी तुम्हाला एका मचाणावर घेऊन जाईन. या रेषा कशा खोदल्या याचं उत्तर तुम्हाला तिथे गेल्यावर मिळेल.”

ॲलेक्सने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे आम्हाला साडेनऊच्या दरम्यानचं विमान तिकीट मिळालं. आठ जण बसू शकतील असं ते सेसना विमान. प्रत्येकाला खिडकीची जागा. आमचा तीस मिनिटांचा विमानप्रवास सुरू झाला. खाली रेताड रंगाचं वाळवंट दिसत होतं. वैमानिकाचं समालोचन सुरू झालं. त्यानं सांगितल्याप्रमाणे साधारण दहा मिनिटांत आकृत्या असलेल्या पृष्ठभागाच्या वरून आमचं विमान उडू लागलं. वाळवंटाने आपलं रूप पालटायला सुरुवात केली. किरमिजी रंगाच्या त्या दगडगोट्यांमधून पांढऱ्या लांबलचक रेषा स्पष्ट दिसू लागल्या. लांबच लांब, नजरेच्या टप्प्यापलीकडे जाणाऱ्या … वैमानिकाने दाखवल्यावर त्रिकोण, आयात, समभुज चॉकोन ओळखता येऊ लागले. विमानाने एक गिरकी घेऊन दिशा बदलली आणि वैमानिक म्हणाला, “आता मी प्रमुख बारा जैविक आकृत्यांच्या वरून विमान नेणार आहे. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे फिरवून आकृत्या विमानाच्या पंख्याखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाला आकृत्या पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.” आम्ही सरसावून बसलो. पहिली आकृती दिसली. अगदी स्पष्ट दिसली. आ वासलेला देवमासा. विमान पुढे सरकलं. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि धुकंविरहित हवा असल्यामुळे प्रत्येक आकृती डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. हमिंग बर्डची लांब चोच, माकडाची गुंडाळलेली शेपटी, कोंडोरचा प्रचंड पंखविस्तार, मुंगीसारख्या दिसणाऱ्या कोळ्याचे आठ पाय, झाड, एका हाताला चार आणि दुसऱ्या हाताला असलेली पाच बोटं आणि पुसट असूनही स्पष्ट दिसलेला घुबडाच्या डोळ्यांचा अंतराळवीर. हे सगळं आम्ही डोळे भरून पाहिलं. बरोब्बर तिसाव्या मिनिटाला आम्ही जमिनीवर उतरलो.

आमचे आनंदित चेहरे पाहून ॲलेक्सही खुश झाला. लगबगीने गाडीत बसलो. गाडी पॅन अमेरिका या हमरस्त्यावरून पळायला लागली. सरड्याच्या लांब शेपटीला दुभंगून गेलेला हा रस्ता आम्हाला वैमानिकाने दाखवला होता. सरकारने बांधलेल्या मचाणावर चढून तीन आकृत्या पाहिल्या आणि ॲलेक्सच्या आग्रहाखातर एक नैसर्गिक टेकडी चढून गेलो. रेषा अगदी डोळ्यांसमोर होत्या. हजारो वर्षांपूर्वीच्या असल्या तरी काल आखल्या असाव्यात इतक्या ताज्या दिसत होत्या. रेषांच्या जवळपास जाण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. इथून त्या खूपच जवळ दिसत होत्या. लहानपणी चौपाटीवरच्या वाळूत हातानं किंवा प्लास्टिकच्या फावड्यानं किल्ल्याच्या वाटा खोदायचो तशा या रेषा.

ॲलेक्स रेषांच्या ‘खोलात’ जाऊन त्याची माहिती सांगू लागला. ‘वाळवंटातील पिंगट रेताड गोट्यांचा रंग प्राणवायूशी संयोग होऊन आणि उन्हात रापून लालसर होतो. पृष्ठभागावरील त्या गोट्यांना बाजूस सारून मातीच्या खापरानं वीसेक सेंटीमीटर खोदलं जातं. क्षितिजाला टेकणाऱ्या त्या रेषांची रुंदी सरासरी १३५ फूट असते. रेषांच्या दोन्ही बाजूस, खोदलेल्या मातीचा ढिगारा लावून ठेवतात. आतली फिक्कट रंगाची कर्पूरशिलाजीत (जिप्सम) धातूची मात्रा असलेली वाळू अनाच्छादित झाल्यामुळे उघडी पडते. परस्परविरोधी रंगांमुळे ती छान उठून दिसते. इथला अत्यल्प पाऊस आणि अत्यंत मंद आणि जमिनीला स्पर्श न करता वाहणारा वारा यामुळे नगण्य अशी झीज होऊन दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेल्या या रेषा पुसून न जाता अबाधित राहिल्या.’

तरीही हा सगळा खटाटोप कशासाठी? हा प्रश्न उरतोच. या अगम्य रेषांमागचं रहस्य जाणून घेण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. कोसोक नावाचा शास्त्रज्ञ हिवाळी संक्रांत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका रेषेसमोर उभा राहिला असता त्याला रेषेच्या शेवटी सूर्य मावळताना दिसला. त्याच्या मते हे जमिनीवर उघडून ठेवलेलं एक मोठं खगोलशास्त्रीय पुस्तक आहे. त्यानंतर याच निष्कर्षाचं समर्थन करत जर्मन स्त्री शास्त्रज्ञ मारिया रिशी हिने तब्बल चाळीस वर्षं या रेषांचा अभ्यास केला. इ.स. ६०० पर्यंत इथे वसत असलेल्या नाझका संस्कृतीतल्या लोकांनी, प्रगत गणिती प्रमेय आणि लांब दोरीच्या सहाय्याने या रेषांची निर्मिती केली होती. मारिया सूर्य, तारे आणि रेषा यांची घालत असलेली सांगड काही शास्त्रज्ञांच्या पचनी पडेना. यापेक्षा वेगळा गर्भितार्थ या रेषांमध्ये दडला असावा असं कित्येकांचं म्हणणं पडलं. ती पोटतिडिकीनं रेषांचं खगोलशास्त्रीय महत्त्व पटवून देत राहिली. कधी नांगरणी करायची, कधी पेरणी आणि कधी कापणी हे सांगणारं एक शेतीविषयक वेळापत्रक आहे हे ती समजावून सांगत असे. या प्राचीन रेषांचं नुकसान होऊ नये म्हणून ती तिथेच एक खोपटं बांधून राहिली. ‘लेडी ऑफ लाइन्स’ नावानं तिला ओळखत असत.

१९७० नंतर मात्र या निष्कर्षांना आव्हान देणारी अमेरिकन शास्त्रज्ञांची एक तुकडी आली. रेषांचं खगोलशास्त्रीय महत्त्व न पटणारे हे शास्त्रज्ञ म्हणू लागले की पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या वाळवंटात (वर्षाला फक्त एक इंच पाऊस? म्हणजे फक्त वीस मिनिटं? आम्ही मुंबईकर चाट!) जीवनावश्यक पाणी सर्वात महत्त्वाचं असल्यामुळे या रेषा, देवाची करुणा भाकण्यासाठी निश्चित जागेकडे निर्देश करणाऱ्या असाव्यात. त्या जैविक आकृत्यांचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, पुरातन संस्कृतीत कोळी हे पावसाचं चिन्ह समजलं जाई, हमिंग बर्ड म्हणजे सुपीकता, माकडं असतात मुबलक प्राणी असलेल्या ॲमेझॉन जंगलात. त्यामुळे ही तिन्ही त्यांची दैवतच असावीत. तरीही आकाशातूनच दृष्टीस पडणाऱ्या या भल्यामोठ्या आकृत्या कोणी का काढेल हा प्रश्न उरतोच. त्यासाठी त्यांचा युक्तिवाद असा होता की हा संकेत जमिनीवर राहणाऱ्या मानवांकरता नव्हताच मुळी! तो होता स्वर्गस्थ देवतांसाठी. भूकंपाचे हादरे, लाव्हाचा उद्रेक, वडवानलाचं तांडव आणि अवर्षणामुळे वर्षानुवर्षं पडणारा भीषण दुष्काळ यापासून रक्षणासाठी देवाची करुणा भावणारे भाविक नाझकावासी पर्वताचीही पूजा करत असत. त्यांचा इंद्रदेव पाऊस पाडत नसेल, तर या गिरिराजाच्या कृपेने त्याच्या पोटातल्या पाण्याने आपली तहान भागावी म्हणून ही आराधना!

ॲलेक्सच्या तोंडून इतके सारे सिद्धांत ऐकल्यावर मी माझं ऐकीव ज्ञान पाजळायची घोडचूक केली. त्याला म्हटलं, “या सगळ्या रेषा परग्रहवासीयांच्या यानाच्या चाकोऱ्या आहेत, आकृत्या या परतीचं ठिकाण निश्चित करण्यासाठी केलेल्या खुणा आहेत आणि वेटोळ्या डोळ्यांच्या तो अंतराळवीर आपलीच प्रतिमा कोरून गेलाय असं लोक म्हणतात.” ॲलेक्सचं अस्सल नाझका रक्त उसळलं. म्हणाला, “थोतांड आहे हे सारं! खगोलशास्त्रात प्रवीण असलेल्या आमच्या पूर्वजांची कमाल आहे ही. प्रचंड अभ्यास आणि मेहनत आहे त्यामागे.” आपल्या पूर्वजांचं रक्त अभिमानानं मिरवणारा हा पूर्वजन्मीचा खगोलशास्त्रज्ञच असावा.

दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची ही संस्कृती काळाच्या ओघात कधीच नाहीशी झाली असती. परंतु रेषांचं हे कोडं आजही आपला गूढार्थ लपवून वैज्ञानिकांना, पुरातत्त्ववेत्त्यांना नवनवीन अटकळी बांधण्यास आणि वेगवेगळे अनुमान काढण्यास प्रवृत्त करतंय.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in