

कथा
हार्दिका
भीतीवर मैत्रीने मिळवलेल्या विजयाची भावूक गोष्ट.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ‘शेंदरी’ नावाचं एक छोटंसं गाव. याच गावात १० वर्षांचा नक्ष आपल्या आई-बाबांसोबत राहायचा. नक्ष दिसायला इतर मुलांसारखाच गोंडस होता, पण त्याचं जग मात्र इतरांपेक्षा थोडं वेगळं होतं. स्वभाव शांत, थोडासा लाजरा आणि स्वतःच्या जगात रमणारा. इतर मुलांसारखा तो गोंगाट करायचा नाही, खेळांमध्ये फारसा सहभागी व्हायचा नाही. त्याला आवाज, गर्दी आणि विशेषतः अंगाला काही चिकटलेलं अजिबात आवडत नसे. रंग, पाणी, चिखल हे सगळं त्याच्यासाठी आनंद नव्हे, तर त्रास होतं.
नक्षला गोंगाट आवडत नसल्यामुळे शाळेच्या मधल्या सुट्टीत जेव्हा मुलं आरडाओरडा करत पळायची, तेव्हा नक्ष वर्गाच्या एका कोपऱ्यात बसून आपले कान घट्ट दाबून धरायचा. त्याला स्पर्श झालेलाही फारसा आवडत नसे. आईने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला तर ठीक, पण कुणी अनोळखी व्यक्ती जवळ आली की तो दचकायचा. मानसशास्त्रीय भाषेत याला ‘सेन्सरी इश्यू’ म्हणतात, पण गावात या गोष्टी माहीत नसल्याने लोकांना वाटायचं की, नक्ष खूप हट्टी आणि लाजाळू आहे.
नक्षला सर्वात जास्त भीती वाटायची ती म्हणजे ‘चिकट’ गोष्टींची. हाताला माती किंवा जेवताना भाजी, आमटी यांचा स्पर्श किंवा पावसाळ्यात चिखल उडाला की नक्षला अस्वस्थ व्हायचं. त्यामुळे तो नेहमी स्वतःला या गोष्टींपासून लांब ठेवायचा. चमच्याने जेवायचा. नक्षच्या या शांत जगात एक दिवस वादळ आलं, पण ते प्रेमाचं वादळ होतं! बाबांनी नक्षसाठी एक छोटासा, पांढराशुभ्र, मऊ केसांचा कुत्र्याचा पिल्लू आणला. नक्षने त्याचं नाव ठेवलं ‘जुडो’.
सुरुवातीला नक्ष जुडोला लांबूनच बघायचा. पण जुडो इतका निरागस होता की तो शेपटी हलवत नक्षच्या पायापाशी येऊन शांतपणे बसायचा. जुडोला समजलं होतं की, नक्षला गोंधळ आवडत नाही. त्यामुळे जुडो कधीच नक्षवर जोरजोरात भुंकायचा नाही. नक्ष जेव्हा उदास असायचा, तेव्हा जुडो त्याचे ओले नाक नक्षच्या हाताला लावायचा. हळूहळू नक्षला जुडोच्या मऊ केसांचा स्पर्श आवडू लागला. नक्ष तासनतास जुडोशी गप्पा मारायचा. जुडोही मान तिरकी करून त्याचं सगळं ऐकून घ्यायचा. जणू काही जुडो हा नक्षच्या भावनांचा आरसाच होता.
दिवस सरत गेले आणि गावात ‘होळी’ आणि ‘रंगपंचमी’ची तयारी सुरू झाली. गावात सण म्हणजे उत्साह, मस्ती आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करणं. गावातल्या चौकात लाकडं जमू लागली. मुलं पिचकाऱ्या विकत घेऊ लागली. पण जशी जशी होळी जवळ येत होती, तसा तसा नक्षचा चेहरा पडू लागला. नक्षसाठी रंगपंचमी हा आनंदाचा सण नव्हता, तर ते एक संकट होतं. अंगाला तो ओला, चिकट रंग लागणं, अनोळखी लोकांनी चेहऱ्याला गुलाल फासणं आणि पाण्याचे फुगे अंगावर फुटणं... या विचारानेच नक्षला दरदरून घाम फुटायचा. दरवर्षी तो या दिवशी घराच्या मागच्या खोलीत, खिडक्या लावून स्वतःला कोंडून घ्यायचा.
होळीचा दिवस उजाडला. गावात सगळीकडे ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’चा आवाज घुमत होता. ढोल-ताशांच्या आवाजात मुलं नाचत होती. रंगांचे ढग हवेत उडत होते. नक्ष मात्र आपल्या खोलीत लपून बसला होता. बाहेरून त्याच्या मित्रांचे आवाज येत होते, “नक्ष... बाहेर ये! बघ किती छान रंग आहेत!” पण नक्षने कानावर हात ठेवले होते. जुडोसाठी ही पहिलीच होळी होती. त्याला बाहेरचा उत्साह खुणावत होता. जुडो उत्साहाने बाहेर पळाला. बाहेर जाताच मुलांनी “जुडो... जुडो...” करत त्याच्यावर रंगांची उधळण केली. कुणीतरी त्याच्या पाठीवर गुलाबी गुलाल टाकला, तर कुणी निळं पाणी. जुडोला ते खूप आवडलं! तो रंगात न्हाऊन निघाला होता. तो आनंदाने इकडे-तिकडे उड्या मारत होता.
काही वेळाने जुडोला आपल्या मित्राची म्हणजे नक्षची आठवण आली. जुडो धावत धावत घरात गेला. तो पूर्णपणे ओला होता, त्याच्या अंगावर ओले रंग होते. जुडो जोरात भुंकू लागल्यामुळे नक्ष घाबरला. त्याला वाटलं, की जुडोलाही या सगळ्याचा त्रास होतोय म्हणून त्याने दार उघडलं तोच जुडो थेट नक्षच्या खोलीत घुसला. जुडो नक्षच्या जवळ गेला आणि त्याने नेहमीप्रमाणे नक्षच्या पायाला आपलं शरीर घासलं. जुडोचा अवतार पाहून नक्ष घाबरला. “नको... नको जुडो! लांब हो!” नक्ष ओरडला.
पण जुडो उत्साहात होता. त्याने आपलं अंग झटकलं आणि नक्षच्या शर्टवर निळ्या आणि गुलाबी रंगाचे थेंब उडाले. नक्षच्या हाताला जुडोचा ओला आणि रंगीत स्पर्श झाला. क्षणात नक्षचा थरकाप उडाला. त्याला राग अनावर झाला. त्याला वाटलं जुडो मुद्दाम करतोय. रागाच्या भरात त्याने जुडोला हलकासा फटका मारला आणि जोरात ओरडला, “बाहेर जा इथून! मला तू आवडत नाहीस!” जुडो क्षणभर थबकला. त्याच्या डोळ्यांतली चमक गेली. तो घाबरला आणि कान खाली घालून शेपटी पायात घालून घराबाहेर पळून गेला.
खोलीत आता शांतता होती, पण नक्षच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याने आपल्या हाताकडे पाहिलं, जिथे निळा रंग लागला होता. त्याने तो पुसायचा प्रयत्न केला, पण तो निघत नव्हता. नक्षला रडू कोसळलं. पण अचानक त्याला आठवलं की त्याने जुडोला मारलंय. जुडो तर फक्त प्रेमाने त्याच्याकडे आला होता.
“मी हे काय केलं? जुडो तर माझा मित्र आहे,” नक्ष पुटपुटला.
त्याला आता रंगाची भीती वाटेनाशी झाली. त्याला भीती वाटली ती जुडोला गमावण्याची. तो तसाच धावत घराबाहेर पडला. बाहेर पाऊल टाकताच एक पाण्याचा फुगा त्याच्या पायापाशी फुटला. कुणीतरी धावत येऊन त्याच्या गालाला गुलाल लावला. नक्ष क्षणभर थांबला. त्याचे डोळे घट्ट मिटले गेले. त्याला वाटलं आता आपल्याला खूप त्रास होईल. पण... तसं काहीच झालं नाही. गुलाल मऊ होता, अगदी जुडोच्या केसांसारखा. पाणी थंड होतं, जसं उन्हाळ्यात आई माठातलं पाणी प्यायला देते तसं. त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिलं. समोर जुडो एका कोपऱ्यात बसून नक्षकडे पाहत होता. नक्षने त्याला हाक मारली, “जुडो... इकडे ये रे!”
जुडो हळूच उठला आणि नक्षजवळ आला. नक्षने खाली वाकून जुडोला घट्ट मिठी मारली. आता जुडोच्या अंगावरचा सगळा रंग नक्षच्या अंगाला लागला होता. पण नक्षला आता त्याची घृणा वाटत नव्हती. उलट, त्या रंगात त्याला मैत्रीचा ओलावा जाणवत होता. गावातले लोक आणि मुलं हे बघून थक्क झाले. जो नक्ष रंगापासून पळायचा, तो आज रंगात माखलेल्या कुत्र्याला मिठी मारून बसला होता!
त्या दिवशी नक्षने पहिल्यांदाच पिचकारी हातात घेतली. त्याने जुडोवर पाणी उडवलं आणि जुडोही त्याच्याभोवती फेऱ्या मारू लागला. नक्ष खूप वेळ खेळला नाही, कारण त्याला अजूनही गर्दीचा थोडा त्रास होत होता. पण त्याने एक पाऊल पुढे टाकलं होतं. त्या रात्री नक्ष जेव्हा झोपायला गेला, तेव्हा त्याचे हात अजूनही थोडे रंगीत होते. त्याने आईला विचारलं, “आई, रंग वाईट नसतात ना?”
आई हसून म्हणाली, “नक्ष, रंग फक्त बाहेरून लागतात, पण मन मात्र जुडोसारखं स्वच्छ हवं. तू आज तुझ्या भीतीवर मात केली आहेस.” नक्षने जुडोकडे पाहिलं, जो शांतपणे त्याच्या बेडच्या खाली झोपला होता. नक्षला समजलं की, कधी कधी आपल्याला जे शब्द समजावून सांगू शकत नाहीत, ते मुके प्राणी एका स्पर्शाने शिकवून जातात.
krantip183@gmail.com