

विशेष
सुरेश भागवत
अभिनेते नाना पाटेकर यांचे आकस्मिक निधन झाले. नानाच्या बरोबर अनेक वर्षांपासून चांगली मैत्री होती. नाना फटकळ, उद्धट वाटला तरी तो विनयशीलही होता. त्याच्याशी कसे वागायचे हे आम्हा मित्रांना चांगले ठावूक होते. वक्तशीर व शिस्तबद्ध नानाने नाट्य व सिनेसृष्टीत जे यश मिळवले त्यामागे त्याची तपश्चर्या होती.
नाना पाटेकर आणि माझी दोस्ती किती जुनी आहे, याचा विचार मी त्याच्या निधनाची बातमी कानावर आल्यापासून करतोय. नाना दादरला रहात होता व आम्ही दोघेही नाट्यसृष्टीत पदार्पण केले नव्हते तेव्हापासून आमची मैत्री होती व ती अखेरपर्यंत राहिली. नानाच्या निधनाच्या आठ दिवस अगोदर आमचे बोलणे झाले होते. नाना पाटेकर हे अजब रसायन होते. नाना हा उद्धट होता तितकाच विनयशील सुद्धा होता. त्याची वागण्याची स्वतःची पद्धत होती. ती समजून घ्यायला लागायची. आम्ही मित्र ती बरोबर समजून घ्यायचो. पाहिजे जातीचे नाटकातून तो रंगभूमीवर आला. त्यावेळी छबिलदासची चळवळ जोर धरत होती. आम्ही तरुण मुले नाट्यक्षेत्रात पाय रोवण्याकरिता धडपडत होतो. नाना त्यापैकीच एक होता. नानाने त्या उमेदीच्या काळात अपार कष्ट, मेहनत घेतली. आपली भूमिका प्रभावीपणे साकारली जावी याकरिता तो जीवतोड मेहनत घ्यायचा. लोकांना ग्लँमर प्राप्त केलेला नाना दिसतो. पण त्यामागची त्याची मेहनत, तपश्चर्या ही माझ्यासारख्या त्याच्या जुन्या जवळच्या मित्रांनाच ठावूक आहे.
एकदा मी चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे गेलो. तर नाना त्याच्या शैलीत म्हणाला की, सुरेश, मी तुझा चित्रपट करीत पण माझ्या काही अटी असतील. त्या तू मान्य केल्या तरच मला तुझ्या चित्रपटात काम करता येईल. मग मी म्हटले कोणत्या अटी आहेत तुझ्या? त्यावर नाना म्हणाला की, मी तुझ्याकडून १०१ रुपये मानधन घेईन व ते मी सांगेन त्याच संस्थेला द्यायचे. माझ्या भूमिकेकरता लागणारे कपडे हे माझ्या टेलरकडून तुम्ही शिवून घ्यायचे व त्याचे पैसे द्यायचे. मला चित्रपटाच्या शुटींग येण्याकरिता गाडीघोडा नको. माझ्याकडे माझे पाय आहेत. मी चालत येईन. माझे जेवणखाणाचे वेगळे चोचले नाहीत. सर्व युनिटला जे जेवण द्याल तेच मी जेवेन. मला तुम्ही ठरवलेला मेकअपमन चालेल. (कारण त्यावेळी मोठ्या नटांचे स्वतःचे मेकअपमन असायचे.) मी बरोबर साडेनऊ वाजता शुटींगला येईन. पण तुम्ही जर ११ वाजता शुटींग सुरु केले तर मी तेथे थांबून राहणार नाही. नटांनी चित्रपटाच्या शुटींगला वेळेवर यावे हा जसा निर्मात्यांचा आग्रह असतो तसा नट म्हणून मी आल्यावर शुटींग वेळेत सुरु झाले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. वेळ आपण दोघांनी पाळली पाहिजे. नाना हा असा सरळ, स्पष्टवक्ता होता. मात्र काही निर्मात्यांना तो फटकळ वाटायचा. काहींच्या मनात त्याच्याबद्दल विनाकारण तेढ असायची. नाना पाटेकर याने त्याच्या अटी-शर्तींवर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले हे त्याचे मोठेपण आहे. जेथे काम मिळवण्याकरिता लोक तडजोडी करायला तयार होतात तेथे नाना त्याला हवे ते, हवे तसे व हवे तेव्हा करत होता. अर्थात हे नानालाच शोभून दिसायचे. कारण त्याच्यात कुवत होती. तो कसदार अभिनेता होता. त्याने स्वतःचा दर्शक तयार केला होता. त्यामुळेच त्याला त्याच्या अटी-शर्तींवर काम करणे शक्य झाले व शोभून दिसत होते. एखाद्या कलाकाराने बेताचे अभिनयगुण असताना जर नानासारखा उद्धटपणा केला तर तो कुणीही खपवून घेणार नाही. ते फक्त त्यालाच शोभून दिसत होते.
विजयाबाई मेहता यांनी नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर, मंगेश कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी अशा असंख्य कलाकारांवर नाट्यसंस्कार केले. विजयाबाई हे एक वेगळेच व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणाऱ्या कलाकारांना असा संवाद बोल, असा उभा रहा, अशी शब्दफेक कर वगैरे काही सांगितले नाही. आम्ही कलाकार आमच्या आमच्या कुवतीनुसार विजयाबाईंकडून शिकत गेलो. एका नाटकात विजयाबाईंसोबत मी आणि दिलीप कोल्हटकर यांनी दोन बोक्यांचे काम केले होते. त्यामध्ये पहाट झाल्यावर आम्ही बोके उठतो, असे दृश्य होते. मांजरे झोपेतून उठल्यावर आपली पाठ उंटासारखी उंचावतात. तशी ती मी उंच करायचो. तेथे प्रेक्षागृहातून हास्याची लकेर उठायची. सुरुवातीच्या काही प्रयोगानंतर विजयाबाईंनी मला विचारले की, सुरेश त्या दृश्याला प्रेक्षक का हसतात तेच मला कळत नाही. मला ते पाहायचे आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो की, ते तुम्ही प्रेक्षागृहात बसलात तरच तुम्हाला कळेल. त्यावर मी खऱ्याखुऱ्या मांजरासारखी पाठ उंच करत असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्या मंद हसल्या. सांगायचे तात्पर्य असे की, नाटकाचा, भूमिकेचा कलाकार म्हणून तुम्ही कसा, किती बारीक विचार करता, वास्तवाच्या जवळ जाणारे व्यक्तिमत्व कसे उभे करतात हेच विजयाबाईंच्या स्कूलने नाना पाटेकरसह आम्हा साऱ्यांना शिकवले.
एकदा नानाचा मला फोन आला. त्याला नामदेव ढसाळ यांचे एक पुस्तक हवे होते. मी नानाला म्हणालो की, तू चुकीच्या ठिकाणी फोन केलाय. पुस्तके बुक डेपोत मिळतात. मग मी त्याला अशोक कोठावळे यांचा नंबर दिला. तू नाना पाटेकर असल्याने कोठावळे तुला घरपोच पुस्तक पाठवतील, असेही म्हणालो. मात्र आलेल्या पुस्तकांचे बिल तूच दे, असा चिमटा काढला. त्यावर नाना त्याच्या शैलीत हसला. नंतर कोठावळे यांच्याकडून वेगवेगळी पुस्तके आपल्याला नियमित येत असल्याचे व त्याचे बिल आपण नियमित देत असल्याचे नानाने मला एकदा फोन करुन सांगितले. नानाच्या घरी वर्षानुवर्षे गणपती यायचा. तो स्वतः दादरच्या फूल बाजारात जाऊन फुले खरेदी करायचा व सजावट करायचा. मी काहीवेळा त्याच्यासोबत फुले खरेदी करायला गेलोय आणि सजावटही केलेय.
नानाला एकदा फोन केला आणि सांगितले की, तू आणि निलकांती दोघांनी मिळून संध्याछाया नाटक रंगभूमीवर घेऊन यावे. निलकांती ही चांगली अभिनेत्री आहे. नाना आणि निलकांती यांनी जर संध्याछाया केले असते तर ते नक्की गाजले असते. परंतु तो योग जमून आला नाही ही हुरहुर मला लागली आहे.
लेखक ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत.