चावदिसातील नरकासुरवध

दिवाळी म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणी बोलीभाषेत चावदिस. या चावदिसात गोव्यात आणि सिंधुदुर्गात नरकासुरवधाची अनोखी परंपरा आजही जिवंत आहे. पहाटेच्या थंडीत ‘गोविंदा गोपाळा’च्या गजरात अभ्यंगस्नान करून कारेटं फोडणे, नरकासुराचा पुतळा जाळणे हे सर्व अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे.
चावदिसातील नरकासुरवध
Published on

पाऊलखुणा

दिवाळी म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणी बोलीभाषेत चावदिस. या चावदिसात गोव्यात आणि सिंधुदुर्गात नरकासुरवधाची अनोखी परंपरा आजही जिवंत आहे. पहाटेच्या थंडीत ‘गोविंदा गोपाळा’च्या गजरात अभ्यंगस्नान करून कारेटं फोडणे, नरकासुराचा पुतळा जाळणे हे सर्व अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. या सणात लोककथा, श्रद्धा आणि एकतेचा उत्सव एकत्र गुंफला आहे; म्हणूनच गोव्याची ही दिवाळी केवळ सण नाही, तर संस्कृतीचा उत्सव आहे.

दिवाळीत, चावदिसात पहाटे उठून अभ्यंगस्नान करून, थंडीत कुडकुडत पायाखाली कारेटं धरून अंगठ्याने फोडताना, ‘गोविंदा रे गोपाळा’ ओरडताना, नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करताना आपण हे का करतोय? हा प्रश्न लहानपणी अनेकदा पडायचा. मग फराळ म्हणान ‘फॉव’ म्हणजेच पोहे खाताना आजीला, आईला दरवर्षी तोच प्रश्न विचारला जायचा. “कारेटा अंगठ्यानच कशाक फोडूक व्हया? एवढ्या सक्काळी सक्काळी नरकासुराक कशाक जाळतंत? ह्या सगळा कधीपासून सुरू झाल्ला?” या प्रश्नांची उत्तरं मला त्या त्या वेळी मिळाली. पण डोक्यात कधीच शिरली नाहीत; मात्र आता माझ्याजवळ ती आहेत. ती या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.

हिंदू पुराणानुसार, नरकासुर हा अत्यंत बलाढ्य व क्रूर असुर राजा होता. त्याने स्वर्ग व पृथ्वीवर अत्याचार मांडले होते आणि अनेक स्त्रियांना कैद केले होते. देवतांनी श्रीकृष्णाची मदत मागितल्यावर, श्रीकृष्ण व त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराचा वध करून त्या कैद्यांची मुक्तता केली व जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात. नरकचतुर्दशी म्हणजे मालवणी, कोंकणी भाषेत चावदिस. या दिवशी पहिली अंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान करून, कारेटं नावाचे कडू फळ पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. ते फोडताना ‘गोविंदा’ ‘गोविंदा’ असा गजर केला जातो. भल्या पहाटे नरकासुर दहन करण्याची परंपरा ‌रुजलेली आहे. येथे अधर्मावर धर्माच्या जयाचा प्रतीक म्हणून अत्यंत उत्साहाने नरकचतुर्दशी साजरी केली जाते.

भारतभर नरकचतुर्दशी साजरी केली जाते; मात्र पहाटेच्या वेळी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची परंपरा ही केवळ गोवा आणि गोव्याची सांस्कृतिक सीमा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागापुरतीच मर्यादित आहे. इथल्या लोकांसाठी दिवाळी म्हणजे नरकासुरवधच. तरुण मंडळी मिळून गवत, कागद, लाकूड आणि फटाके वापरून नरकासुराचे विशाल पुतळे तयार करतात. “नरकासुरा रे नरकासुरा, नवीन नवीन कपड्यांनी भोकं भरा!” असं खट्याळपणे म्हणत हे पुतळे रंगीबेरंगी व आकर्षक सजवलेले जातात. नरकासुराचा पुतळा उभारण्याच्या स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते. ते पुतळे गावागावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवले जातात आणि नंतर एका भव्य उत्सवात त्यांना आग लावून दहन केले जाते. या दहनातून अधर्माचा नाश आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक साकारले जाते.

गोव्यात, सिंधुदुर्गात ‘नरकचतुर्दशी’ हा फक्त घरापुरता, कुटुंबापुरता मर्यादित सण नसून सामाजिक एकतेचा उत्सव असतो. गावोगावी नरकासुराच्या पुतळ्यांचे दहन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात. संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा अधिक रंगतदार बनतो. या लोकउत्सवामुळे समाजातील बंधुत्व वाढते आणि लोक एकत्र येऊन आपली परंपरा, प्रथा जपतात. या ‘नरकचतुर्दशी’ सणाचे खरे सौंदर्य म्हणजे एकत्रित आनंदाचा अनुभव. भारतात इतरत्र अशी परंपरा आहे का, हे निश्चित सांगता येत नाही; पण इथल्यासारखा उत्साह आणि उत्सवाचं भव्य रूप हे इतरत्र कुठे दिसत नाही, एवढं मात्र खरे.

गोव्यातील या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे ती भगवान श्रीकृष्ण आणि त्याची पत्नी सत्यभामेची नरकासुरावर मिळवलेल्या विजयाची लोककथा. छोट्या दिवाळीला म्हणजेच नरकचतुर्दशीला कृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध करून जगाला भीतीतून मुक्त केले, अशी कथा गोव्यात प्रसिद्ध आहे. गोव्याच्या लोककथेनुसार, प्राचीन काळी नरकासुर नावाचा राक्षस गोमंतक प्रदेशाचा राजा होता. त्याच्या अत्याचारांनी सारा प्रदेश भयभीत झाला होता. या दुष्ट राजाने सोळा हजार गोमंतकीय स्त्रियांना कैद करून ठेवले होते. त्याच्या अन्यायाविरुद्ध लोकांनी देवांकडे मदत मागितली. अखेर अश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री भगवान श्रीकृष्ण आपल्या सैन्यासह गोव्यात आले आणि नरकासुराविरुद्ध युद्ध छेडले. या लढाईत कृष्णाने आपले सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र वापरून नरकासुराचे शिर छाटले आणि त्याची जीभ फाडली. पहाटेच्या वेळी या दैत्याचा अंत झाला. विजयाचे प्रतीक म्हणून श्रीकृष्णाने त्या राक्षसाच्या रक्ताचे थेंब कपाळावर लावले. त्यानंतर त्यांना तेलाने स्नान घातले गेले आणि याच घटनेतून अभ्यंगस्नानाची प्रथा सुरू झाली, असे मानले जाते. नरकासुराच्या कैदेत असलेल्या सोळा हजार स्त्रिया मुक्त झाल्या. त्यांनी आपल्या घरात मातीचे दिवे लावून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला आणि अशा रीतीने दिवाळी साजरी करण्याची परंपरा जन्माला आली.

याच लोककथेवर आधारित अभ्यंग स्नान करून ‘कारेट’ नावाचे कडू फळ पायाच्या अंगठ्याने फोडले जाण्याच्या प्रथेमागे देखील एक छोटासा संदेश लपलाय. हे कडू फळ ‘कारीट’, ‘कारटे’ किंवा ‘चिराटे’ या नावाने ओळखले जाते. हे एक काकडीसारखे लहान, कडू आणि वन्य फळ, जे दिवाळीच्या सुमारास गोवा व महाराष्ट्रात सहज आढळते. या कारटे फळाचे चिरडणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक मानले जाते. नरकासुराच्या वधाच्या स्मृतीत, हे फळ पायाखाली चिरडणे म्हणजे वाईट शक्तींचा नाश आणि अज्ञानाचा अंत असा अर्थ घेतला जातो. हे लहान हिरवे फळ नरकासुराच्या डोक्याचे प्रतीक मानले जाते. या प्रथेतील एक वेगळा संदेशही आहे; प्रथम कारट्याची कडू चव चाखली जाते आणि त्यानंतर गूळ किंवा साखर खाल्ली जाते. या विरोधाभासातून जीवनातल्या संतुलनाचा अर्थ समजतो. दिवाळीच्या गोड, आनंददायी वातावरणातही कडूपणाची ही छोटीशी आठवण संयम आणि समतोल राखण्याची शिकवण देते. असे म्हटले जाते की, जसे जीवनात काही कटू अनुभव आल्याशिवाय गोड क्षणांचे महत्त्व कळत नाही, तसेच या छोट्याशा गोष्टीतून कडूपणानंतर गोडवा अनुभवण्याचे प्रतीक साकारले जाते.

सत्यभामाने केला नरकासुराचा वध

हम्पी येथील बाळकृष्ण मंदिरातील (इ.स. १६वे शतक) शिल्पामध्ये धनुष्यबाण हातात घेतलेली एक स्त्री आणि तिच्या पायातील काटा काढणारी दासी दाखवलेली आहे. ही प्रतिमा सत्यभामेच्या शौर्याचे प्रतीक मानली जाते. ‘आंध्र महाभागवत’ या १५व्या शतकातील बाम्मेर पोथन यांनी रचलेल्या ग्रंथात सत्यभामेचे केवळ पात्र नसून, निर्णायक असे तिचे रूप दाखवले आहे. युद्धादरम्यान श्रीकृष्ण थकव्याने क्षणभर बेशुद्ध पडतात. त्या वेळी सत्यभामा स्वतः नरकासुर या राक्षसाशी युद्ध करते. आपल्या धनुष्यबाणाने नरकासुरावर आक्रमण करून अखेरीस त्याचा वध करते. दक्षिण भारतातील अन्य ग्रंथांमध्येही या प्रसंगाचे वर्णन येते आणि सत्यभामा ही भूमीदेवीचा अवतार असल्याचे गौरवपूर्वक नमूद केले आहे. पौराणिक कथेनुसार नरकासुराला एक वर मिळाला होता की, त्याचा वध फक्त त्याच्या स्वतःच्या मातेकडूनच होऊ शकतो. त्याला वाटले की, आई आपल्या पुत्राचा वध करणार नाही, त्यामुळे तो अमर झाला असे समजून बसला. पण सत्यभामा स्वतः भूमीदेवीचा अवतार असल्याने, त्या मातास्वरूपाने त्याचा वध करू शकल्या. हे स्त्रीशौर्याचे दैवी प्रतीक मानले जाते. नरकासुराची ही कथा आसामच्या इतिहासातही महत्त्वाची आहे, कारण नरकासुर हा तेथील कामरूप राज्यावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांचा प्रणेता मानला जातो.

प्रतीकात्मक नरकासुर

गोव्यातील पुरातत्त्व आणि संस्कृती यांचे अभ्यासक अमेय किंजवडेकर सांगतात, “एकेकाळी गोव्यात कारीटाला नरकासुर मानत तुळशीसमोर प्रतीकात्मक नरकासुर डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडून दिवाळी साजरी केली जात असे‌. दिवाळीसाठी उटणे देखील टायकिळ्याच्या सुकवलेल्या बिया वाटून तयार करीत असत. आजकाल कागद, गवत आदी गोष्टी वापरून नरकासुराची प्रतिमा केली जाते. एका लहान मुलाला श्रीकृष्णाचा वेश परिधान केला जातो. रात्रभर नरकासुराला नाचवत पहाटे त्याचे दहन करतात. या दीपावलीच्या पर्वात धेंडलो, धिल्लो आदी परंपरा देखील उत्साहात साजऱ्या होतात. दिवाळीत पाडव्याला स्थानिक आदिवासी पारंपरिक लोकगीतं गात हा धिल्लो उत्सव साजरा करतात. निसर्ग आणि माणूस यांना जोडणाऱ्या या दिवाळी उत्सवाचे स्वरूप कायम ठेवणे आवश्यक आहे.”

logo
marathi.freepressjournal.in