
बुककट्टा
प्रभाकर नानावटी
सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तीचं स्मरण तिने मागे ठेवलेल्या शब्दांमधून करणं, शब्दांच्या माध्यमातूनच तिला अभिवादन करणं हेच अधिक उचित असतं. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती २० ऑगस्ट या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमाले’तील पाच ग्रंथांचे प्रकाशन करत आहे.
शहीद डॉ. दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठीचे योगदान खूपच मोठे आहे. कृतिशील धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सेतून मानवता, आध्यात्मिक आकलन, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ मानवतावाद, लोकशाही प्रबोधन, रचनात्मक संघर्ष, संघटना बांधणी, जातपंचायतीला मूठमाती असे अनेक लेख लिहित अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मांडणी त्यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची निकड, समज, त्यावरील आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती अशा सर्वांगाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दलचे त्यांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर २०१३ ते २०२४ पर्यंतच्या अकरा वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने दरवर्षी शहीद डॉ. दाभोलकर स्मृतिविशेषांक प्रसिद्ध केले. त्यात व इतर वेळीही अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वार्तापत्रात डॉ. दाभोलकरांवर लिहिलेले लेख तसेच अनेक मान्यवर विचारवंत, हितचिंतक, कलाकार, शास्त्रज्ञ यांनी डॉक्टरांवरील प्रेम व्यक्त करणारे, त्यांच्या कार्याबद्दल लिहिलेले लेख, अंनिसच्या समविचारी संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देणारे लेख, डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी केलेल्या भाषणांचे शब्दबद्ध केलेले लेख, दीर्घकाळ चाललेल्या डॉक्टरांच्या खुनाच्या खटल्याचा प्रवास व त्याचा निकाल लागल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे लेखही या दहा वर्षांच्या वार्तापत्रात वाचावयास मिळतील. गेल्या दहा वर्षांतील वार्तापत्रातील डॉ. दाभोलकरांच्या संबंधित लेखांचे संकलन ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमाले’तील या पाच पुस्तकांमध्ये केले आहे.
अपराजित योद्धा
या पुस्तकामध्ये पानोपानी डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक मान्यवरांचे लेख आणि प्रतिक्रिया आहेत. ही मान्यवरांची यादी भरपूर मोठी आहे. कॉ. गोविंद पानसरे, बाबा आढाव, भाई वैद्य, पुष्पा भावे, विद्या बाळ, विलास वाघ, सा. रे. पाटील, सुनील देशमुख, प्रकाश आमटे, तारा भवाळकर, सुभाष थोरात, मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर इत्यादी विचारवंतांचे लेख या पुस्तकात आहेत.
कलाक्षेत्रातील डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, संजय पवार यांचे लेखही आहेत. या सर्वांच्या हृद्य आठवणी वाचत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर हे खरोखरच एक अपराजित योद्धा होते, याचा प्रत्यय येतो.
निर्मळ व निर्भिड
पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे डॉ. दाभोलकरांचा साधेपणा आणि सच्चेपणा त्यांना एवढा भावला की, त्या एका भेटीत ते त्यांचे चाहते झाले. त्यांच्या मते दाभोलकरांसारखं होण्यासाठी आतून खूप निर्मळ आणि निर्भीड असायला लागतं आणि असं असण्याचा बाजारात कुठला कोर्स नाही. तसं जगायलाच लागतं.
निर्मळ व निर्भीड या पुस्तकात किरण माने, गिरीश कुलकर्णी, डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर, जावेद अख्तर, सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी या कलाकारांचे डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. नरेश दधीच, डॉ. हेमू अधिकारी, अरविंद गुप्ता, अच्युत गोडबोले, विवेक मॉन्टेरो इत्यादी वैज्ञानिक क्षेत्रातील दिग्गजांचे व कुमार केतकर, निखिल वागळे, ज्ञानेश महाराव, संजय आवटे, उत्तम कांबळे, प्रतिमा जोशी, संध्या नरे-पवार, राजा कांदळकर, आशिष खेतान, रवीश कुमार इत्यादी पत्रकारांचे लेख आहेत.
जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी डॉक्टर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. त्यापैकी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सीताराम येच्युरी यांनीसुद्धा प्रतिक्रिया देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अन्वर राजन, राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे, साधनेचे विनोद शिरसाठ, आंध्र प्रदेशातील अथेइस्ट सेंटरचे विजयम गोरा, ओदिशा रॅशनॅलिस्ट सोसायटीचे देवेंद्रू सुतार, पंजाबच्या तर्कशील सोसायटीचे रामस्वर्ण लक्खेवाली इत्यादींचे आदरांजलीपर लेख या पुस्तकात वाचावयास मिळतील.
नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्याने व कार्यक्रम
या पुस्तकात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या २० ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त दैनिक हिंदूचे संपादक एन. राम यांचे ‘वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने’, योगेंद्र यादव यांचे ‘कोरोना के बाद स्वराज का अर्थ’, पी. साईनाथ यांचे ‘भारतीय लोकशाही आणि विवेकवादी शक्तींसमोरील आव्हाने’, डॉ. सदानंद मोरे यांचे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर हे खरे धर्ममित्र’ व वरुण ग्रोवर यांचे ‘नरेंद्र म्हणून आलात तर दाभोलकर बना’ ही दीर्घ भाषणं शब्दबद्ध करून ती लेख स्वरूपात देण्यात आली आहेत.
समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे प्रतीक सिन्हा, आशिष दीक्षित, अलका धुपकर व प्रसन्न जोशी या नव्या दमाच्या पत्रकारांच्या परिसंवादाचे चित्रण या पुस्तकात आहे. अतुल पेठे यांचा रिंगण नाट्याविषयीचा, तर नागराज मंजुळे यांचा अंधश्रद्धेवरील लघुचित्रपट स्पर्धेविषयीचा लेख या पुस्तकात आहेत.
आम्ही सारे दाभोलकर
डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण हत्येनंतर अंनिसचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशा घोषणा देत माणसाला मारता येते, विचारांना नाही, याची आठवण करून देत होते. याच शीर्षकाच्या या पुस्तकात डॉक्टर हयात असताना त्यांच्याबरोबर काम केलेल्या व डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जोडले गेलेले तरुण वयातील कार्यकर्त्यांची प्रांजळ मनोगतं आहेत. डॉक्टरांचे विचार वाचून वा कुटुंबातील कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेत ते अंनिसशी जोडले गेले. त्यांची मनोगतं वाचत असताना डॉक्टरांसारखी व्यक्ती इतक्या सर्व लहान-मोठ्यांना कशी काय प्रेरणा देऊ शकते, त्यांच्याकडून अपेक्षित काम कसे काय करून घेऊ शकते, याचे आश्चर्य वाटू लागते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्षपद सोडताना डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते, “मी समितीचा कार्याध्यक्ष असलो काय किंवा नसलो काय, माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात मी आहेच. कार्यकर्ता म्हणून मी अंनिसच्या प्रवाहात आहेच व पुढेही कायमचा राहीनच.”
आज डॉ. दाभोलकर या जगात नाहीत, पण डॉक्टरांचे हे वाक्य किती तंतोतंत सत्य आहे याची प्रचिती सर्वच अंनिसचे कार्यकर्ते घेत आहेत. गेल्या १२ वर्षांतील एकही दिवस असा गेलेला नाही की, कार्यकर्त्यांना डॉक्टरांची आठवण झालेली नाही. डॉक्टर कार्यकर्त्यांच्या ‘मनात’ आहेतच. कार्यकर्त्यांच्या या आठवणींमधूनच डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सामोरे येत आहेत. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने आणि चिकाटीने पुढे चालू ठेवले आहे. डॉ. दाभोलकरांच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की मदत करेल.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून खटला आणि निकाल
हे पुस्तक डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाच्या अकरा वर्षांचा मागोवा आणि सीबीआय न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ यावर बेतलेले आहे. या विषयावर दाभोलकर कुटुंबीय, खटला लढविणारे ॲड. अभय नेवगी वकील, प्रा. रावसाहेब कसबे, डॉ. एन. डी. पाटील, निखिल वागळे, किरण मोघे इत्यादींचे लेख या पुस्तकात आहेत. खरे पाहता पाचपैकी दोन आरोपींना शिक्षा दिलेला निकालच आश्चर्यचकित वाटणारा आहे. पोलीस तपासातील ढिलाई वा राजकीय दबावामुळे अलीकडील काही न्यायालयीन निकालांचा मागोवा घेतल्यास बहुतेक निकालात हिंदी चित्रपटातील डायलॉगप्रमाणे सर्वच्या सर्व आरोपी ‘बाइज्जत बरी’ झालेले असतात. तरी डॉक्टरांच्या या खटल्यात निदान दोघांना तरी शिक्षा झाली, हेही नसे थोडके!
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे २० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी ७.१५ च्या सुमारास, मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचा खून झाला. त्यांच्या खुनाला जवळपास ११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खुनाच्या खटल्याचा न्यायालयीन निकाल १० मे २०२४ रोजी लागला. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी म्हणून न्यायालयाने दोषी ठरवले. मात्र या व्यापक कटामागील सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा ‘विचाराला विचाराने उत्तर न देता, आम्ही माणूस मारून विचार संपवू, तेव्हा खबरदार!’ असे सांगण्याचा प्रयत्न होता.
प्रत्येक पुरोगामी वाचकांच्या संग्रही असायलाच हवीत, अशी ही पाच पुस्तकं आहेत.
अंनिसचे कार्यकर्ते व लेखक
प्रकाशक - अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र
एकूण किंमत रु. १०००/-
सवलतीच्या दरात रु. ५००