निसर्गाची सुपरपॉवर टीम

निसर्गात टिकून राहण्यासाठी बदल अपरिहार्य असतो. वनस्पती आणि प्राणी आपल्या अधिवासाशी जुळवून घेतात, म्हणूनच लाखो वर्षांच्या प्रवासात ते आजही अस्तित्वात आहेत.
निसर्गाची सुपरपॉवर टीम
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

निसर्गात टिकून राहण्यासाठी बदल अपरिहार्य असतो. वनस्पती आणि प्राणी आपल्या अधिवासाशी जुळवून घेतात, म्हणूनच लाखो वर्षांच्या प्रवासात ते आजही अस्तित्वात आहेत.

आपण नेहमी म्हणतो की ‘बदल’ हा जगण्याचा भाग आहे. बदल घडणं किंवा घडवून आणणं जसं मानवी व्यवहारात, समाजात पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे निसर्गाच्या दरबारातही ते घडत असतात. मात्र निसर्गातले बदल हे अनेकदा ‘टिकाऊ’ असतात. या बदलांच्या मदतीनेच निसर्गातील विविध घटक हजारो-लाखो वर्षे टिकलेले पाहायला मिळतात. पशु-पक्षी,किटक-जलचर, वनस्पती-सूक्ष्मजीव अशा साऱ्यांनीच भोवतालच्या बदलत्या वातावरणाशी, हवामानाशी आणि अधिवासाशी जुळवून घ्यायला आपल्यात काही ना काही बदल करुन स्वतःला भोवतालच्या वातावरणाशी अनुकुल करुन घेतलं. निसर्गामध्ये हे अनुकुलन म्हणजेच ॲडाप्टेशन वेगवेगळ्या प्रकाराने घडल्याचं पाहायला मिळतं. वाळवंटातल्या वनस्पतींना सर्वसाधारणपणे काटे असतात, इतर वनस्पतींसारखी पाने नसतात असं का? तर पानांमुळे वन्स्पतींनी शोषलेल्या पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होतं. असं पाणी वाया घालवणं वाळवंटासारख्या कोरड्या-जिथे पाण्याची आधीच कमतरता आहे अशा प्रदेशात परवडणारं नाही, त्यामुळेच वाळवंटातल्या वनस्पतींनी आपल्या पानांचं रुपांतर काट्यांमध्ये केलं आणि स्वतःचा जीव वाचवला. वाळवंटातल्या काही वनस्पतींनी तर स्वतःच्या खोडात पाणी साठवण्याची क्षमता मिळवली. अमेरिकेतील-मेक्सिकोतील वाळवंटातला ‘सवारो’ हा कॅक्टस आपल्या अंतर्भागात भरपूर पाणी साठवतो आणि त्याच्या मदतीने सुमारे दोनशे वर्षे जगतो. वाळवंटातील वनस्पतींनी पानांऐवजी काटे धारण केले तरी इतर वनस्पतींप्रमाणे फुलं येण्याची क्षमता मात्र गमावली नाही. भारतातल्या फड्या निवडुंगापासून ते अमेरिकेतल्य बॅरल कॅक्टसपर्यंत अनेक प्रकारच्या निवडुंगांना सुंदर सुंदर फुलं येतात.

वाळवंटासारख्या अगदी टोकाचं आणि तिव्र हवामान असलेल्या अधिवासात सहज राहाणारा, वावरणारा प्राणी म्हणजे उंट. आजच्या उंटांचे पूर्वज हे ४० ते ५० दशलक्ष वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत आढळत होते. सुरवातीला त्यांचा आकार सशाइतका होता, नंतर तो बकरीइतका मोठा झाला. त्यानंतर त्यांच्यात आणखी बदल होत गेले आणि आपण आज पाहातो ते उंट साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी आशिया खंडात आले. आपल्या भारतात उंट हे पाळीव प्राणी म्हणूनच आले. वाळवंटात सहज जगू शकणाऱ्या उंटांनी आपल्या शरीरात असे बदल करुन घेतले आहेत आहेत की, इतर प्राण्यांपेक्षा उंटांचा निर्जलीकरणाचा (डि हायड्रेशन)वेग अत्यंत कमी असतो. तपमान ४९ अंश सेल्सिअस पर्यंत चढलं तरी उंटांना घाम येत नाही. उंट जेव्हा उच्छवास सोडतात तेंव्हा त्यातली पाण्याची वाफ त्यांच्या नाकपुड्यांमध्येच अडकते आणि परत शरीरात शोषून घेतली जाते, यामुळे त्यांची पाण्याची गरज भासते. वाळवंटातील वाळूच्या वादळांपासून बचाव करता यावा म्हणून उंटाच्या पापण्या लांब असतात, कानावर संरक्षक केस असतात आणि त्यांना आपल्या नाकपुड्या बंद करता येतात. या सगळ्यामुळे उंट हे अनुकुलनाचे आदर्श उदाहरण म्हणता येईल.

रेल्वे स्टेशनवरच्या किंवा बाजारातल्या गर्दीत हजारो माणसांमध्ये जी व्यक्ती भरपूर उंच असते, ती कुठूनही दिसत राहाते. त्याचप्रमाणे निसर्गातील प्राण्यांमध्ये आपल्या उंचच उंच मानेमुळे कुठूनही उठून दिसणारा प्राणी म्हणजे ‘जिराफ’. फक्त आफ्रिका खंडातच आढळणारा जिराफ पृथ्वीवरील जमिनीवरील अस्तित्वात असलेल्या प्राण्यांमधील सर्वात उंच प्राणी आहे. जिराफ त्याच्या जिराफिडे कुळातला एकमेव प्राणी आहे. मुळात हा असा म्हणजे उंटासारखा फेंगाडी चाल असलेला, सशासारखा पळणारा म्हणजे पळताना आधी मागचे पाय पुढे करणारा, डोक्यावर छोटी छोटी शिंगे असलेला आणि सुमारे सात ते नऊ फूट लांब मान असलेला प्राणी निसर्गात जन्मालाच कसा आला हे कोडेच आहे. त्यात याच्या अंगावरील डिझाइन जे काहीसे बिबट्याच्या ठिपक्यांची आठवण करुन देते आणि उंटासारखा आकार यामुळे तर सुरवातील युरोपियन लोकांनी तर याला ‘कॅमलेपर्ड’ असेच नाव दिले होते जे आजही या प्राण्याच्या शास्त्रिय नावात शिल्लक आहे. जिराफाची मान इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा लांब असली तरी या मानेमध्ये मणके ( सर्व्हिकल व्हर्टिब्रे) मात्र इतर सस्तन प्राण्यांइतकेच म्हणजे फक्त सातच असतात. फक्त हा एक मणका साधारण्तः ११ इंच लांब असतो. या तुलनेत माणसाच्या पाठीच्या संपूर्ण कण्याची लांबी फक्त दोन फूट असते ( म्हणजे जिराफाच्या जिभे इतकी!). साहजिकच जिराफाला ही लांब मान कशासाठी किंवा कशामुळे मिळाली असावी?

जिराफाच्या लांबलचक मानेबाबतचा पहिला अंदाज (जो अनेक शतके सर्वमान्य होता)हा होता की आफ्रिकेतल्या अन्य वनस्पतीभक्षक प्राण्यांची स्पर्धा टाळण्यासाठी जिराफाची मान उंचावत गेली, जिच्या मदतीने तो उंच झाडांच्या शेंड्यावरची कोवळी पाने खाऊ शकतो. वरकरणी हा तर्क बरोबर वाटतो पण नंतर लक्षात आलं की जिराफ फक्त झाडाच्या शेंड्यावरचीच पाने खात नाही, किंबहुना आधी ते आपली उंच मान वळवून खालच्या फांद्यांवरची पाने खाणेच पसंत करतात. दुसरा मुद्दा असा की फक्त जिराफानेच स्पर्धा टाळण्यासाठी मान उंचावण्याचा मार्ग कसा निवडला, अन्य कोणत्याही तृणभक्षी प्राण्याने का नाही आपली मान उंचावली? मग दुसरा अंदाज पुढे आला की, माद्यांना आकर्षित करायला ही लांब मान उपयोगी पडत असावी. पण इथेही एक गफलत होती म्हणजे जसा मोराला पिसारा असतो पण लांडोरीला नसतो किंवा सिंहांमध्ये फक्त नरालाच आयाळ असते, माद्यांना नसते तसं या जिराफात नसतं. माद्यांची मान ही नरांसारखीच लांब असल्याने नराच्या सौंदर्य, सामर्थ्यचे प्रतिक म्हणून मान लांब हा सिध्दांतही मागे पडला. शेवटी जिराफाच्या लांब मानेचे रहस्य उलगडण्यासाठी डार्विनचे विधानच उपयोगी पडते, त्याने म्हटले होते की, ‘एखादी जात (प्राणी) कालौघात टिकून राहाण्यासाठी केवळ एकच वैशिष्ठ्य कारणीभूत नसते तर त्या प्राण्याच्या ठायी असलेल्या लहान मोठ्या अनेक वैशिष्ठ्यांमुळे तो प्राणी टिकलेला असतो.’ म्हणून तर सुमारे ऐंशी लाख वर्षांपूर्वी युरोपच्या भुमीवर अवतरलेल्या आणि सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी आजच्या अवतारात आफ्रिकेच्या भूमीवर स्थिरावलेला जिराफ आजही टिकून आहे.

निसर्गाकडून शिकण्यासारख्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातली ‘अनुकुलन’ अर्थात अडाप्टेशन ही एक महत्वाची गोष्ट आहे. निवडुंग, उंट, जिराफ सारखी अनेक घटक या अजब निसर्गात पाहायला मिळतात जे फक्त याच वैशिष्ट्यामुळे टिकाऊ ठरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in