निसर्गातले स्वच्छता रक्षक

जंगलात सफाई कर्मचारी नसतात, तरी ते नेहमी स्वच्छ आणि निरोगी कसं राहतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे निसर्गातील काही अद्भुत स्वच्छता रक्षकांमध्ये.
निसर्गातले स्वच्छता रक्षक
निसर्गातले स्वच्छता रक्षक
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

जंगलात सफाई कर्मचारी नसतात, तरी ते नेहमी स्वच्छ आणि निरोगी कसं राहतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे निसर्गातील काही अद्भुत स्वच्छता रक्षकांमध्ये.

आजच्या काळातल्या अत्याधुनिक सुख सुविधांनी युक्त असलेल्या मोठ मोठ्या ‘स्मार्ट ’ शहरांपुढचा सगळ्यात मोठा आणि बिकट प्रश्न हाच आहे की शहरात रोज जमा होणाऱ्या लाखो टन कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट कशी लावायची ? कारण यातला सुमारे नव्वद टक्के कचरा हा अजैविक म्हणजे कृत्रिम पदार्थांचा असतो. माणसाने आपलं जीवन सुखदायी आणि सोप करताना निसर्गाचा हात सोडल्यामुळे ही समस्या उभी राहिली आहे.कचऱ्याचं करायचं काय ? किंवा कचऱ्याची विल्हेवाट कोण लावणार हे प्रश्न निसर्गाला कधी पडत नाहीत,कारण निसर्गाची रचनाच अशी आहे की खराब झालेल्या,मरण पावलेल्या,सडलेल्या जीवांची मग त्या वनस्पती असोत की प्राणी विल्हेवाट लावणारी यंत्रणा इथे तयारच असते.निसर्गातली सफाई कामगारांची टीम,जे स्वच्छता रक्षक आहेत,अतिशय कार्यतत्पर आहे आणि त्यांनी आपापल्या कामांची वाटणी ही करुन घेतलेली आहे.त्यामुळे निसर्गात एखादं झाड पडतं किंवा एखादा प्राणी मरण पावतो तेव्हा या टीमकडून न चुकता त्याची विल्हेवाट लावली जाते आणि परिसराच्या आरोग्याचं रक्षण केलं जातं.

निसर्गातील सर्वात मोठा सफाई कामगार किंवा स्वच्छता रक्षक म्हणजे ज्याच्या विषयी अनेक गैरसमज,अंधश्रध्दा आणि चुकीच्या समजूती आहेत असा पक्षी अर्थात गिधाड.शिकारी पक्ष्यांच्या गटात येणारं गिधाड स्वतः कधीच शिकार करत नाही.मृतमांसभक्षी म्हणजे मेलेल्या प्राण्यांना खाणारा पक्षी हीच त्याची ओळख आहे.जगात युरोप,आफ्रिका आणि आशिया खंडात गिधाडांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात.आपल्या भारतात नऊ प्रकारची गिधाडे पाहायला मिळतात.राजस्थानच्या वाळवंटी भागापासून ते हिमालयाच्या थंड वातावरणापर्यंत विविध प्रदेशांमध्ये गिधाडे आढळतात.आकाराने घारीपेक्षाही मोठ्या असलेल्या गिधाडाकडे पाहताक्षणी नजरेत भरते ते त्याचं तुळतुळीत टकलासारखं डोकं.सगळ्याच गिधाडांच्या मानेपासून ते डोक्यापर्यंत अजिबात पिसं नसतात.त्यामुळे गिधाड एकाचवेळी विनोदी आणि भयंकर दिसतं.अशा ‘टकलू’ अवताराचा फायदा गिधाडाला मेलेल्या जनावरांचे मास खाताना होतो,ते मृतप्राण्याच्या शरीरात अगदी आतपर्यंत मान खुपसून मांसाचे लचके तोडू शकते,कारण मानेवर-डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाचं मांस तिथे चिकटत नाही. तसंच या पिसे विरहीत डोक्यामुळे गिधाड थर्मोरेग्युलेशन अर्थात स्वतःच्या शरीराचे तपमान नियंत्रित करू शकते.त्यामुळेच वाळवंटातील उच्च तापमान आणि हिमालयातील बर्फाला गिधाड तोंड देऊ शकतं. एखाद्या माळरानावर किंवा झाडाच्या फांद्यावर विसावलेला गिधाडांचा समूह अनेकदा पाहायला मिळतो,अशा समूहाला इंग्रजीमध्ये ‘कमिटी’ म्हणतात.या सहस्रकाच्या आरंभी म्हणजे सुमारे २५-२६ वर्षांपूर्वी भारतातील गिधाडांची संख्या धक्कादायक रित्या घटत असल्याचं लक्षात आलं.त्याचं कारण मोठं विचित्र होतं.शेतकरी,गुरे पाळणारे लोक त्यांच्या गुरांना डायक्लोफेनॅक हे वेदनाशामक औषध द्यायचे.या औषधाचा अंश या जनावरांच्या शरीरात शिल्लक राहायचा,अशा जनावरांचे मांस खाल्ल्यामुळे गिधाडांच्या मूत्रपिंडात बिघाड व्हायचा आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यू व्हायचा.त्यामुळे सृष्टीतील एका आवश्यक जीवाची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागली.त्याचा परिणाम म्हणून निसर्गातील प्राण्यांचे मृतदेह तसेच पडून सडू लागले आणि त्यातून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला.अखेर त्या औषधावर भारत,नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली.त्याच प्रमाणे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची प्रजनन केंद्रे उभारण्यात आली.पिंजोर मधील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रापासून ते महाराष्ट्रातील चिरगाव मधील स्थानिकांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या कामापर्यंत देशभरात गिधाडे वाचवण्याची मोहिमच सुरू झाली.वेळीच सुरू झालेल्या या मोहिमेमुळे गिधाडे नामशेष होण्यापासून वाचली आणि मानवांवरचं रोगराइचं संकटही सौम्य झालं.

जंगलात असाही एक प्राणी आहे जो सहसा इतर प्राण्यांची शिकार करत नाही,मात्र त्याचं रंगरुप आणि त्याची जीवनशैली यामुळे तो फार भितीदायक मानला जातो.तो प्राणी म्हणजे तरस ! सगळ्या जगात आफ्रिका,आशिया या दोनच खंडात तरसाच्या वेगवेगळ्या चार जाती पाहायला मिळतात.त्यातील स्ट्राइप्ड हायना म्हणजे पट्टेवाला हायना ही जात भारतात आढळते.जंगल आणि मनुष्यवस्तीच्या सिमेवर आढळणारा हा प्राणी आता विविध कारणांमुळे धोक्यात आलेला आहे.जगभरात आढळणाऱ्या तरसांमध्ये भारतातील तरस हा आकाराने सर्वात लहान असतो.तरसाचे मागचे पाय आखूड आणि पुढचे पाय लांब असतात,त्यामुळे त्याची आकृती जरा विचित्र दिसते.तरस हे निशाचर आहे.भल्या पहाटे दिवस उजाडायच्या आधी किंवा संध्याकाळी काळोख पडू लागला की मग तरसाचा वावर सुरू होतो.मृतमांसभक्षक असल्याने मानवी स्मशानांच्या किंवा कबरस्तानांच्या जवळही अनेकदा तरस पाहायला मिळतात,त्यामुळेच त्याला अशुभ,भितिदायक मानलं गेलं आहे.तरसाची घ्राणेंद्रिय अतिशय तिक्ष्ण असतात,त्याला दूरवरूनच सगळे वास घेता येतात,मात्र त्याची नजर आणि ऐकण्याची शक्ती कमकुवत असते.भारतातल्या तरसाची कवटी इतर तरसांपेक्षा आकाराने लहान असली तरी त्याचे जबडे अतिशय ताकदवान असतात,अगदी उंटाच्या मांडीची हाडे ही सहज फोडण्याची त्याची क्षमता असते.तरस समुहाने राहात नाहीत,एकटे किंव जोडीने राहातात.जंगलात,गावाच्या वेशीवर मरुन पडलेल्या कोणत्याही प्राण्याचा मृतदेह तरस खाऊन टाकतात.अगदी त्या प्राण्याची हाडेही ते सोडत नाहीत.मात्र मृत गिधाडांना ते तोंडही लावत नाहीत.तरस जरी मृत मांसभक्षी असलं तरी काही वेळा ससे,घोरपड,बकऱ्या,कुत्रे अशा छोट्या प्राण्यांची शिकार ते करतात.जखमी प्राणी आढळला तर त्याला घेरून त्याच्या जखमेचे लचके तोडण्यासाठीही तरस प्रसिध्द आहे.काही वेळा तरस लांडग्यांच्या कळपाबरोबर फिरताना आढळता,लांडग्यांनी केलेल्या शिकारीची साफसफाई ते करतात.बिबट्या,वाघ,चित्ता अशा मोठ्या शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला वाट पळवण्याचं धाडस ही तरस करतात.

निसर्गात रोगराई पसरू नये,परिसर स्वच्छ राहावा म्हणून गिधाड आणि तरसासारखे मोठे स्वच्छता रक्षक जसे पाहायला मिळतात,त्याच प्रमाणे लहानशा मुंग्यांपासून ते समुद्रातल्या खेकड्यांपर्यंत अनेक इनव्हर्टिब्रेट्स प्राण्यांनाही ही जबाबदारी सोपवलेली आहे.फक्त प्राण्यांचेच मृतदेह नाही तर मेलेल्या वनस्पतींची विल्हेवाट लावायची यंत्रणाही निसर्गाकडे आहे.निसर्गाच्या या अजब रचनेकडून माणसाने प्रेरणा घेऊन स्वतःच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायला शिकणं गरजेचं आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in