निसर्गातील नकलाकार

निसर्ग केवळ सौंदर्यानेच नाही, तर अफाट बुद्धिमत्तेनेही परिपूर्ण आहे. आवाज, रंग आणि वर्तनाची हुबेहूब नक्कल करून जगणारे निसर्गातील नकलाकार हेच त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
निसर्गातील नकलाकार
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

निसर्ग केवळ सौंदर्यानेच नाही, तर अफाट बुद्धिमत्तेनेही परिपूर्ण आहे. आवाज, रंग आणि वर्तनाची हुबेहूब नक्कल करून जगणारे निसर्गातील नकलाकार हेच त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.

निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात अनेक मजेदार, रंजक गोष्टी बघायला मिळतात. माणूस याच निसर्गामधून घडलेला आहे. त्यामुळे निसर्गातील या गमतीशीर गोष्टींचे अनुकरण करताना तो पाहायला मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणसांमधील नकलाकार अर्थात मिमिक्री आर्टिस्ट. प्रसिद्ध अभिनेत्यांच्या किंवा गायकांच्या आवाजाची, बोलण्याची हुबेहुब नक्कल करणारे अनेक कलाकार आहेत. त्याचप्रमाणे वेशभूषेच्या मदतीने एखाद्याच्या रूपाची तंतोतंत नक्कल करणारे नकलाकारही आपण पाहतो. ही नक्कल करण्याची युक्ती माणसाला निसर्गानेच तर शिकवलेली आहे. निसर्गात कधी आवाजाची तर कधी रंगरूपाची नक्कल करणारे अनेक कलाकार पाहायला मिळतात. निसर्गातले नकलाकार म्हटल्यावर सर्वांत आधी आठवतात ते माणसाने पिंजऱ्यात पाळलेले पोपट किंवा राघू. रोझ रिंग पॅरॅकिट म्हणजेच गळ्याभोवती लाल रंगाचा पट्टा मिरवणारा कंठवाला पोपट तर अनेकांच्या घरात असतो. हे राघू अवतीभवतीची माणसं जे बोलत असतात ते काळजीपूर्वक ऐकतात आणि मग आपल्या कंठातून ते शब्द जसेच्या तसे उच्चारतात. लोककथांमध्ये बोलणाऱ्या राघू-मैनेच्या गोष्टी आहेत. हे राघू-मैना एकमेकांशी अगदी माणसांसारखे बोलताना फक्त कथेतच नाही दिसत तर प्रत्यक्षातही असतात. कंठवाल्या राघूप्रमाणेच हिल मैना अर्थात सारिका ही मैनेची एक जात सुद्धा माणसांच्या बोलण्याची हुबेहुब नक्कल करते. या हिल मैनेच्या शास्त्रीय नावात ‘रिलिजोसा’ असा शब्द वापरला आहे. धार्मिक स्तोत्रांचे पठण करणारे विद्यार्थी जसे ऐकून ऐकून स्तोत्र म्हणतात, तशीच ही मैनाही माणसांचं बोलणं ऐकून ऐकून त्याची नक्कल करायला शिकते, म्हणून हा शब्द वापरला आहे.

माणसाने पाळलेल्या पक्ष्यांनी माणसाच्या बोलण्याची नक्कल करायला शिकावं हे स्वाभाविकच आहे. पण रानात-अरण्यात राहणाऱ्या पक्ष्यांमधले काही भिडू सुद्धा त्यांच्या या मिमिक्रीच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यातला एक म्हणजे ब्लॅक ड्रोंगो अर्थात कोतवाल. काळ्या कुळकुळीत रंगाचा, दुभंगलेल्या शेपटीचा कोतवाल जसा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्यासाठीही ओळखला जातो. त्यातही कोतवाल प्रसिद्ध आहे तो ‘शिक्रा’ या शिकारी पक्ष्याच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी. हा आवाज तो कशासाठी काढतो? तर आयतं भक्ष्य मिळवण्यासाठी. पानांआड लपून कोतवालने शिक्राचा आवाज काढला की मैनेसारखे लहान आकाराचे पक्षी घाबरतात आणि त्यांच्या तोंडातलं भक्ष्य सोडून पळ काढतात, मग कोतवाल त्यावर आरामात ताव मारतो. कोतवालाचा मोठा भाऊ म्हणता येईल असा रॅकेट टेल्ड ड्रोंगो (भृंगराज) सुद्धा उत्तम नकलाकार म्हणून ओळखला जातो. हा पक्षी त्याच्या या मिमिक्रीने अनेकदा पक्षी निरीक्षकांनाही फसवण्यात यशस्वी होतो. एखाद्या स्टार परफॉर्मरसारखा या रॅकेट टेल्ड ड्रोंगोचा अवतार असतो. डोक्यावरचा लफ्फेबाज तुरा आणि जादूगाराच्या पायघोळ अंगरख्याची आठवण करून देणारी दुभागलेल्या शेपटीतून आलेली दोन लांबलचक रुबाबदार पिसे या पक्ष्याचा डौल वाढवतात.

पक्ष्यांच्या जगातला अव्वल दर्जाचा नकलाकार असलेल्या रॅकेट टेल्ड ड्रोंगो अर्थात भृंगराज या पक्ष्याला तसं रंगरूप नसतं. त्याउलट पक्षी राज्यात एक नकलाकार असा आहे ज्याला अतिशय आकर्षक रंगरूप लाभलेलं आहे आणि तो म्हणजे नारिंगी डोक्याचा कस्तूर. यालाच इंग्रजीत ऑरेंज हेडेड थ्रश म्हणतात. हा कधीही थव्याने आढळणार नाही, एकटाच किंवा फारतर मादीबरोबर जोडीने फिरताना दिसतो. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी कस्तुर प्रसिद्ध आहे. बुलबुल, सातभाई, वटवट्या, शिंपी पक्षी यांच्या आवाजाची नक्कल हा करतो.

पक्ष्यांमध्ये आवाजाची मिमिक्री करणारे नकलाकार आहेत तसेच निसर्गात काही रंगरूपाची मिमिक्री करणारे कलाकारही पाहायला मिळतात. सरीसृप अर्थात रेप्टाइल गटामधील माणसांच्या जवळ असणारे आणि अगदी धोकादायक मानले गेलेले प्राणी म्हणजे साप. खरतर एकूण सापांच्या जातींपैकी अगदीच कमी जाती विषारी सापांच्या आहेत. भारतात आढळणाऱ्या सापांमधील नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस हे चार प्रमुख विषारी साप आहेत. त्यातील निशाचर असलेली मण्यार (कॉमन क्रेट) नागापेक्षाही जास्त विषारी मानली जाते. निळसर झाक असलेल्या काळ्या कुळकुळीत अंगावरचे पांढऱ्या रंगाचे पट्टे ही मण्यार ओळखण्याची सोपी खूण. मण्यारच्या या रंगरूपाची नक्कल करणारा साप म्हणजे कवड्या साप (वूल्फ स्नेक). मात्र कवड्याने केलेली मण्यारची नक्कल बारकाईने पाहिली तर कळू शकते. एकतर पूर्ण वाढलेला कवड्या साप जास्तीत जास्त अडीच फुटांपर्यंत वाढतो, तर मण्यार पाच ते सहा फूट लांब असते. त्याचप्रमाणे मण्यारीच्या अंगावर जे पांढरे पट्टे असतात ते जोडी जोडीने असतात. कवड्याच्या अंगावर तसे नसतात. सगळ्यात मोठा फरक म्हणजे मण्यारीच्या मानेवर एकही पट्टा नसतो, पण कवड्याच्या मानेवर ठसठशीत पट्टा असतो.

बिनविषारी कवड्या सापाने मण्यारीच्या रंगाची नक्कल केल्यामुळे जो गोंधळ उडू शकतो त्यात चुकून मण्यारीला कवड्या समजलं तर जीवावर बेतण्याचा धोका असतो. पण निसर्गात अशी म्हणजे विषारी प्राण्याची नक्कल बिनविषारी प्राण्याने केलेली आणखी एका गटात पाहायला मिळते. हा गट आहे फुलपाखरांचा. आता फुलपाखरांमध्ये ‘विषारी’? असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. पण माणसांसाठी नाही तरी फुलपाखरांच्या भक्षकांसाठी- शिकाऱ्यांसाठी विषारी असलेली काही फुलपाखरे आहेत. टायगर जातीची फुलपाखरे या प्रकारची असतात. प्रत्येक फुलपाखराचं एक ‘अन्न झाड ’असतं, ज्यावर त्याच्या अळ्या वाढतात. टायगर वर्गातल्या फुलपाखरांच्या अळ्या या रुईच्या झाडाची पाने खाऊन वाढतात. अळी असताना त्यांनी खाल्लेल्या रुईच्या पानांमधील विषारी घटक (टॉक्सिन्स) त्यांच्या शरीरात जमा होतात. पुढे पंख फुटून फुलपाखरू म्हणून उडताना ही घातक द्रव्ये त्यांच्या शरीरात कायम असतात. जर त्यांच्या शिकाऱ्यांनी म्हणजे सरडा, लहान पक्षी यांनी अशी ‘विषारी’ फुलपाखरे खाल्ली तर त्यांना उलट्या होतात, चक्कर येते. साहजिकच टायगर फुलपाखराचे जे रंग असतात (पिवळा, केशरी, काळा) त्या रंगाचे फुलपाखरू खायचे नाही हा संदेश भक्षकांच्या मेंदूवर नोंदवलेला असतो. त्याचाच फायदा डॅनिड एग फ्लाय जातीच्या फुलपाखराची मादी घेते. या मादीच्या पंखांचे बाहेरचे रंग हुबेहूब प्लेन टायगर फुलपाखरासारखे असतात. त्यामुळे भक्षक तिला घातक समजून टाळतात. आता मादीच ही नक्कल का करते, तर तिच्यावर प्रजोत्पादनाची जबाबदारी असते. त्यामुळे मादी वाचली तर नवी फुलपाखरे जन्माला येतील आणि नक्कल फक्त बाहेरूनच का तर डॅनिड एग फ्लायच्या नराला आपल्या मादीची ओळख पटली पाहिजे म्हणून आतमधून रंग जातीशी इमान राखणारे.

तर निसर्गातील नकलाकार हे असे मानवी नकलाकारांपेक्षा जराही कमी नसतात. मात्र त्यांची नक्कल ही केवळ मनोरंजनासाठी नसते तर स्वतःचा बचाव करायला किंवा अन्न मिळवायला मदत व्हावी म्हणून असते.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in