

कथा
हार्दिका
आरशातली गंमत सांगणारी ही मजेशीर गोष्ट -
बनी म्हणजे शाळेतला एक वेगळाच नमुना. तो वर्गात पाऊल टाकतो न टाकतो, तोपर्यंत वर्गातलं वातावरण बदलायचं. कुणी हसत, कुणी डोळे वटारतं, तर कुणी मनातल्या मनात म्हणतं, “अरे देवा, बनी आला!” दुसरीच्या वर्गात असलेल्या बनीचं खरं नाव होतं अश्वमेघ. पण तो गुबगुबीत असल्यामुळे त्याला घरी आणि शाळेतही बनी म्हणायचे. बनी म्हणजे सतत बडबड, खोड्या, मस्ती आणि गोंधळ. वर्गात मॅडम फळ्यावर गणित शिकवत असताना बनी मागच्या बाकावर मित्रांबरोबर खोड्या करायचा, कुजबुजायचा. मॅडम वळून पाहायच्या आणि बनी लगेच पुस्तकात नाक खुपसायचा, जणू काही फारच लक्ष लावून वाचतोय असं नाटक करायचा.
मधल्या सुट्टीत तर बनीला कोण थांबवणार? कुणाच्या डब्यात चॉकलेट दिसताच तो न विचारता ती चॉकलेटस पळवायचा. तर कधी कुणाचं पेन अचानक दुसऱ्याच्याच खिशात सापडायचं. काही मुलांना त्याचा त्रास व्हायचा, पण सगळ्यांना बनी नसला तर खूपच शांत आणि कंटाळवाणं वाटायचं. एखाद्या दिवशी बनी गैरहजर असला, तर वर्गात कुजबुज सुरू व्हायची, “आज बडबड्या बनी नाही? मग मजाच नाही.”
घरीही बनी काही वेगळा नव्हता. शाळेतून आला की, आधी पिशवी फेकायची, मग थेट स्वयंपाकघरात. “आई, खायला काय आहे?” हा प्रश्न विचारायच्या आधीच तो डब्यांमध्ये डोकावायचा. चॉकलेट दिसलं की, त्याचे डोळे चमकायचे. एक नाही, दोन नाही तर चॉकलेट म्हणजे बनीचा जीव! पण या सगळ्याहून मोठी त्याची आवड होती ती म्हणजे मोबाइल. “मोबाइल जास्त बघू नकोस” असं आई-बाबांनी शंभर वेळा सांगितलं होतं, पण बनीसाठी ते शब्द हवेत विरून जायचे.
रात्री झोपायची वेळ झाली की, बनी अगदी गोड मुलासारखा वागायचा. “आई, गुड नाईट.” “बाबा, मी झोपतो.” पांघरूण अंगावर, डोळे मिटलेले. पण सगळे झोपले की, तो हळूच उठायचा. कधी उशीखालून, कधी कपाटातून, कधी बाबांच्या खिशातून मोबाइल शोधून काढायचाच! दिवे बंद, कानात ब्ल्यूटूथ लावून पांघरूणात डोकं लपवून मोबाइल पाहायचा. एक व्हिडिओ पाहता पाहता दुसरा, मग तिसरा… वेळ कसा जायचा ते त्यालाच कळायचं नाही. सकाळी उठल्यावर डोळे थोडेसे लाल, डोकं जड, आणि शाळेत लक्ष कुठेच नसायचं.
याच कारणामुळे शाळेतून बनीबद्दल तक्रारी यायला लागल्या. “बनी वर्गात बसत नाही.” “बनी अभ्यासाकडे लक्ष देत नाही.” “बनी इतर मुलांना चिडवतो.” आई-बाबा वैतागले, पण त्याचबरोबर काळजीतही पडले. त्यांनी समजावून सांगून पाहिलं, रागावून पाहिलं, कधी मोबाइल लपवूनही ठेवला. पण बनी काही ऐकत नव्हता.
आईने शेवटी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांना विचारलं, “डॉक्टर, हा असा का वागतो?”
डॉक्टर हसले आणि म्हणाले, “आजकालची मुलं मोबाइलमुळे जरा जास्तच हट्टी झालीत. मोबाइल कमी केला तर बरंच सुधारेल.” आईने मान डोलावली, पण तिला माहीत होतं- बनी आईचं ऐकेल तर तो बनी कसला?
एक दिवस आई घरी बसून थोडा वेळ रील्स बघत होती. ते पाहताना एक रील तिच्यासमोर आलं मुलांचा मोबाइल कसा सोडवायचा. ते पाहून तिच्या ओठांवर हसू आलं. तिने मनात ठरवलं की, आपणही हा सेम उपाय करूया फक्त थोडा आपल्या पद्धतीने करूया. पहाटेच्या वेळी बनी गाढ झोपलेला असताना आई हळूच त्याच्या जवळ गेली. बनीकडे पाहिलं. तो शांत झोपलेला, चेहऱ्यावर निरागस भाव. आईने क्षणभर विचार केला, पण मन घट्ट केलं आणि ती कामाला लागली. तिने बनीच्या डोळ्यांभोवती काळं-काळं काजळ, लाल लिपस्टिक लावत त्याचा हॉरर मेकअप केला. वरून डोळ्यांना थोडंसं तुपांजन लावलं, म्हणजे उठल्यावर डोळे स्वच्छ होतील आणि थोडे चुरचुरतील. सगळं करून ती हळूच बाहेर आली आणि मनातल्या मनात हसली.
थोड्याच वेळात रडत बनी उठला तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटलं. डोळे चुरचुरत होते. त्याने डोळे चोळले, पण जळजळ अजूनच वाढली. “आई?” तो कुजबुजला. आरशासमोर गेला आणि तिथेच थबकला. आरशात दिसणारा चेहरा पाहून त्याच्या तोंडातून किंकाळीच फुटली. डोळ्यांभोवती काळं-लाल काजळ, भयानक चेहरा, जणू काही राक्षस! “आई गंऽऽऽ!” तो रडायला लागला. त्यालाच स्वतःचा चेहरा पाहून भीती वाटली.
तो धावत आजीकडे गेला. “आजी, माझे डोळे जळत आहेत आणि बघ ना कसे झाले!” आजीने नीट पाहिलं आणि गंभीर चेहरा करून म्हणाली, “हे सगळं मोबाइलमुळे झालं असणार.” मग काका, बाबा, आत्या सगळेच तेच म्हणू लागले.
“आम्ही थोडाच वेळ मोबाइल पाहतो. आम्ही मोबाइल चोरून पाहत नाही. म्हणून आमचे डोळे चांगले आहेत.” बनी अजूनच घाबरला. आई दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिला हसू आवरत नव्हतं, पण ती गप्प होती. हे नाटक एका दिवसापुरतं थांबलं नाही. काजळ पुसताना ते अजूनच पसरायचं. डोळे थोडेथोडे चुरचुरायचे. बनी आरशाकडे पाहायला घाबरायचा. शाळेतही तो बदललेला दिसत होता. मित्र विचारायचे, “काय झालं रे?” तर तो हळू आवाजात म्हणायचा, “जास्त मोबाइल पाहिल्यामुळे.” आठवडाभर असंच चाललं. त्या काळात बनीने स्वतःहून मोबाइलपासून अंतर ठेवलं.
हळूहळू आईने मेकअप थांबवला. डोळे, चेहरा नॉर्मल वाटू लागला. एक दिवस बनी आईकडे आला आणि थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाला, “आई, मी मोबाइल पाहू का? पण थोडाच वेळ.” आई हसली. आता बडबड्या बनी अजूनही बडबडायचा, मस्तीही करायचा, पण मोबाइल पाहताना त्याला आरशातला तो भयानक चेहरा आठवायचा.
ज्येष्ठ साहित्यिक
Bip499@hotmail.com