

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
नावडातौली हे नर्मदेच्या तीरावर वसलेले शांत सुंदर निमाडी गाव आहे, जिथे स्थानिक बायका आपल्या सांस्कृतिक परंपरा, लाजवाब खाद्यसंस्कृती आणि हस्तकला अनुभवायला मिळते.
नर्मदे हर!! तुम्हारो महिश्वरमा स्वागत छे!! अशी निमाडी भाषा बोलून महेश्वरमधल्या गोड मुलींनी माझं त्यांच्या घरी स्वागत केलं. त्यांचं घर नर्मदेच्या घाटाला अगदी लागून. घरच्या अंगणात त्यांनी मातीत बांधलेला होमस्टे सुरू केला आहे. हे घर आहे महेश्वर घाटासमोर असणाऱ्या नावडातौली या गावात. फार गजबज नसणारं, नर्मदेकाठी वसलेलं हे एक शांत सुंदर गाव आहे. नावडा म्हणजे नाविक आणि तौली म्हणजे टेकडी. नाविक असणाऱ्या केवट समाजाची इथे वस्ती आहे. इथे उत्खनन झालं होतं तेव्हा ताम्रपाषण युगातील गोष्टी सापडल्या होत्या. इतकी पुरातन पार्श्वभूमी या गावाला आहे. मध्य प्रदेश पर्यटन विभागाने टुरिझम व्हिलेज म्हणूनही गौरविले आहे.
नावडातौलीमध्ये राहून मी थोडी थोडी निमाडी भाषा शिकले, निमाडी जेवणाचा आस्वाद घेतला, शिवाय बोटीने या तीरावरून त्या तीरावर जात महेश्वरही बघितलं.
निमाड म्हणजे काय? तर निमाड हा प्रांत आहे; जो मध्य प्रदेशाच्या पश्चिम बाजूला येतो. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग या दोहोंच्या मध असलेल्या प्रांताला निमाड प्रांत म्हणतात. या प्रांतातूनही नर्मदा नदी वाहते. इथे नीमची म्हणजे कडुनिंबाची झाडे पुष्कळ म्हणून या भागाला निमाड म्हणतात, असंही वाचनात आलं. या प्रांतात बुरहानपूर, खंडवा, खरगौन, बडवाणी, धार हे जिल्हे येतात. यातील खरगौन जिल्ह्यात महेश्वर आणि नावडातौली ही गावं येतात. ही दोन्ही गावं नर्मदेच्या तीरावर वसली आहेत, ज्यांचे घाट अत्यंत विलोभनीय आहेत.
नावडातौली गावात नर्मदा परिक्रमा करणारं परिक्रमावासीही थांबतात आणि पूजा करतात.
माझी इथली दिवसाची सुरुवात शंखनाद ऐकून झाली. लवकर उठून मी घाटावर गेले. पाहते तर नर्मदामैयाचे पाणी सूर्याच्या सोनेरी प्रकाशात चमकत होतं. कोणी नर्मदेत डुबकी मारत होतं, कोणी अर्ध्य देत होतं. इथे शिवलिंग तर ठिकठिकाणी आहेत. सर्वजण या शिवपिंडीची मनोभावे पूजा करत होते. महेश्वरमधल्या आश्रमातून भजनाचे स्वर इथपर्यंत ऐकू येत होते. वातावरण अगदी मंत्रमुग्ध प्रसन्न झालं होतं.
घाटावर रेंगाळून माझी पावलं वळली या गावातील २००० वर्षं पुरातन असणाऱ्या शालिवाहन मंदिराकडे. शालिवाहन म्हणजेच सातवाहन राजाने आपल्या राज्याच्या सीमेवर नर्मदेच्या तीरी हे मंदिर बांधले, अशी माहिती समजली. मंदिर पाषाणात बांधलं आहे. छान गारवा जाणवतो मंदिरात. गर्भगृहात शिवपिंडी आहे. मंदिरावर, परिसरावर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या पण मंदिरातल्या शिवलिंगावर कोणतीच दुखापत झाली नाही, तडा गेला नाही. नंतरच्या काळात मंदिराची पुनर्निर्मिती केली.
नर्मदेच्या तीरी, झाडांच्या सावलीत विसावलेलं शालिवाहन शिवमंदिर पाहून होमस्टेवर परत आले तर काकूंनी नाश्त्याला पोहे दिले. इथली खास शेव त्यावर भुरभुरली होती. नंतर ताजे ताजे तळून कच्च्या केळीचे चिप्सही दिले. इथे केळी, पपई, पेरू, ऊस यांची शेती होते. त्यामुळे इथे घरोघरी असे केळीचे चिप्स करणं सुरूच असतं.
या गावात राहून मी दोन खास निमाडी पदार्थ खाण्याचा आस्वाद घेतला. त्यातील एक म्हणजे आमाडी की सब्जी और मके की रोटी. आमाडी म्हणजे आपली आंबाडी; पण इथे ही भाजी उन्हात सुकवून स्टोअर करतात. ही सुकवलेली भाजी इथे अगदी २००० रुपये किलो मिळते, असं काकूंनी सांगितलं. या भाजीला इथे अगदी मानाचं स्थान आहे. लग्नावेळी मांडव घालताना; त्यावेळेच्या पूजेच्या जेवणासाठी ही भाजी करतातच. कितीही महाग असू दे; ज्या ज्या वेळी कार्यक्रमांसाठी मांडव घातला जातो तेव्हा ही भाजी करतातच. मलाही ही सुकवलेली अंबाडीची भाजी खायची उत्सुकता होती. काकूंनी भाजी करायला घेतली आणि मी ती पद्धत पाहिलीही. त्यांनी सुकलेली अंबाडीची भाजी पाण्यात घालून उकडून घेतली. त्यातील पाणी निथळून घेतलं. गार पाण्याने ती दोन वेळा पुन्हा धुतली. मग तेलात कांदा, लसूण, धने पावडर, बडीशेप, सुकलेली मिरची, तमालपत्र यांची फोडणी करून भाजी परतून घेतली. ही भाजी मक्याच्या जाड भाकरीसोबत खायला दिली. भाजीत कच्चे तेल घालून ती रोटीसोबत खायची. आंबट मसालेदार वेगळीच चव लागते भाजीची. ही मक्याची रोटी इथे जाड करतात त्याला रोटा म्हणतात. ही भाजी खाताना मी म्हणत होते अंबाडी अशा रूपात खायला मिळेल याची मी कल्पनाही केली नव्हती!!
दुसरा पदार्थ म्हणजे दाल बाटी चुरमा. हा पदार्थ मी व्हिडीओत बघितला आहे, पण इथे पहिल्यांदाच चाखला. हा पदार्थ करायची पारंपरिक पद्धतही बघितली. बाटी करायला काकूंनी गव्हाचे नेहमीचं पीठ आणि थोडं जाड दळलेलं पीठ घेतलं. त्यात मक्याचं पीठही घातलं. भरपूर ओवा, हळद, मीठ, तेलाचे मोहन घालून पिठाला छान लावलं. नंतर आंबट ताक घातलं आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ मळलं. हे पीठ चांगलं आणि सैलसर होईपर्यंत मळलं. याच्या मग छोट्या चेंडूच्या आकाराच्या बाटी करून घेतल्या. या बाटी करायची पद्धतही विशिष्ट असते. पिठाच्या गोळा घेऊन त्याची वाटी करायची. मग दोन्ही कडा मुडपून गोळा करायचा म्हणजे त्यात हवा राहिली पाहिजे. त्यामुळे त्या छान फुलतात आणि चांगल्या भाजल्या जातात. त्यानंतर काकूंच्या मुलीने चुरम्यासाठी बाटा करायला घेतला. यामध्ये फक्त गव्हाचे जाड पीठ, चिमूटभर मीठ, दूध इतकेच मिश्रण घेतात आणि हे घट्ट मळतात. बाटी छोटी असते आणि बाटा मोठा असतो. हे गोळे बनवत असतानाच अंगणात त्यांनी शेणी जाळायला ठेवली. शेणी पूर्ण जळून त्याचे निखारे झाले आणि त्यावर त्यांनी बाटी आणि बाटा भाजायला ठेवला. त्या निखाऱ्यावर ते अर्धा-पाऊण तास भाजलं जात होतं. व्यवस्थित भाजलं गेलं की, केकसारखाच गंध येतो. निखाऱ्यातून काढल्यावर या सगळ्या बाटी कापडाने स्वच्छ पुसल्या. अगदी हलक्या हाताने त्या ठेचल्या आणि शुद्ध साजूक तुपात बुडवून काढल्या. बाटीसाठी आंबट-गोड-तिखट अशी तुरीच्या डाळीची आमटी केली. म्हणजेच दाल केली. चुरम्यासाठी बाटाचा खलबत्त्यात चुरा केला आणि त्यात गूळ, बेदाणे, काजू, बदाम घातले. इतक्या अस्सल पद्धतीने केलेल्या निमाडी जेवणाची मी चाहती झाले. दाल बाटीचा एक घास खाल्ला आणि तोंडून आहाहा!! असेच शब्द आले. दीर्घकाळ ती चव जीभेवर रेंगाळत राहिली. चुरमा चवीला तर आपण चपातीचा लाडू करतो, मलिदा करतो त्यासारखाच लागत होता. खरंच मी त्या जेवणाची चाहती झाले. इथे लोक दोन दोन बाटी खातात; पण माझे पोट एकाच बाटीमध्ये भरलं होतं. हे जेवण जेवून तृप्त झाले.
कुठल्याही प्रांताची ओळख माझ्या मनात ठसते ती तिथल्या खाद्यसंस्कृतीने. या भागात मी तुम्हाला निमाडी प्रांताच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली. पुढच्या भागात मी महेश्वर, तिथली बघायची खास ठिकाणं सांगणार आहे.
नावडातौली गावात पोहोचण्याचे मार्ग
पुणे बाय रोड - ५२५ किमी
मुंबई बाय रोड - अंदाजे ५३५ किमी
इंदोरकडे जाणारी ट्रॅव्हल निवडायची. तिथून धामनोदमध्ये उतरायचं. कसरावदकडे जाणारी लोकल बस मिळते. ३० ते ४० मिनिटांत कसरावद या ठिकाणी पोहोचतो. तिथून रिक्षाने १० मिनिटांत नावडातौली गावात पोहोचता येतं किंवा धामनोद ते महेश्वर प्रवास करून बोटीने नावडातौली गावात पोहोचायचं.
जवळचा एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन - इंदाैर
भेट देण्यासाठी उत्तम काळ - ऑक्टोबर ते मार्चचा मध्य.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com