नवरंगांचा जल्लोष अन् स्त्रीमनाचा कल्लोळ

नऊ दिवस, नऊ रंग आणि उत्साहाला उधाण! मुंबईच्या लोकलपासून ऑफिसपर्यंत आणि गरब्याच्या मैदानापासून सोशल मीडियापर्यंत नवरात्राचे रंग सर्वत्र खुलतात. मात्र, या रंगीबेरंगी उत्सवामागे फॅशन, मार्केटिंग, पीअर प्रेशर आणि स्वतःसाठी जगण्याची धडपड अशा स्त्रीमनाच्या अनेक छटा दडलेल्या आहेत.
नवरंगांचा जल्लोष अन् स्त्रीमनाचा कल्लोळ
नवरंगांचा जल्लोष अन् स्त्रीमनाचा कल्लोळ
Published on: 

साधक-बाधक

क्रांती गोडबोले-पाटील

नऊ दिवस, नऊ रंग आणि उत्साहाला उधाण! मुंबईच्या लोकलपासून ऑफिसपर्यंत आणि गरब्याच्या मैदानापासून सोशल मीडियापर्यंत नवरात्राचे रंग सर्वत्र खुलतात. मात्र, या रंगीबेरंगी उत्सवामागे फॅशन, मार्केटिंग, पीअर प्रेशर आणि स्वतःसाठी जगण्याची धडपड अशा स्त्रीमनाच्या अनेक छटा दडलेल्या आहेत.

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके...’ किंवा कुण्या संवेदनशील कवीच्या शब्दांत सांगायचं तर, 'ती हसते तेव्हा घर हसतं, अन् ती रुसली की आकाश झाकोळतं...' स्त्री आणि उत्सवांचं नातं शतकानुशतकांचं आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक शांत, सोशीक गृहिणी जितकी वसलेली असते, तितकीच प्रसंगी चंडिकेचं रूप धारण करणारी आद्यशक्ती दुर्गेची ताकतही दडलेली असते. पण आजच्या आधुनिक काळात, विशेषतः मुंबईसारख्या महानगराच्या धबडग्यात या नवरात्रोत्सवाचं रूप आणि रंग पार बदलून गेलेले आहे.

पूर्वी नवरात्र म्हटलं की, कडक उपवास, म्हातारकोतारांचा संथ जपाचा सूर, समईची मंद वात, चढत्या फुलांच्या माळा आणि भोंडल्याची गाणी एवढाच काय तो उत्सव असे. पण अचानक डबघाईला आलेल्या एका वृत्तपत्राच्या चाणाक्ष डोक्यातून एक कल्पना बाहेर आली आणि नऊ रंग म्हणजे नवरात्र हे समीकरणच बनून गेलं. तर झालं असं की, नवरात्रीत जे नऊ रंग हौसेने घातले जातात, ते काही देवीने ठरवले नाहीत, तर एका वृत्तपत्राने ठरवले. पुरुष वाचकांबरोबरीने महिला वाचकही जास्तीत जास्त वाढल्या पाहिजेत, मग महिलांना वृत्तपत्राकडे आकर्षित कसं करायचं? उत्तर एकदम सोपं होतं—कपडे! महिलांची सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे कपड्यांची शॉपिंग. सण-उत्सव आले की बायकांचा खरेदीचा उत्साह आपोआपच उफाळून येतो आणि खरेदीसाठी एक उत्तम निमित्तही मिळतं. मग नवरात्री हा सण बायकांसाठी विशेष बनवण्याकरिता नऊ दिवसांचे 'नऊ रंग- देवीचे' म्हणून वृत्तपत्राने जाहीर केलं. परिणामी, पेपरचा खप वाढला आणि महिला वाचकही कैक पटीने वाढल्या. त्या त्या रंगांच्या साड्या नेसलेल्या महिलांचे फोटो वर्तमानपत्रांच्या पानापानांवर झळकू लागले. श्रद्धा, उत्साह आणि मार्केटिंग यांचा उत्तम ताळमेळ साधला गेला. पुढे हा ट्रेंड सोशल मीडिया, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि इतर सर्व वृत्तपत्रांनी उचलून धरला. त्यामुळे साडी दुकानांचा खप प्रचंड वाढला आणि हळूहळू मग 'देवीचे नऊ रंग' म्हणून दरवर्षी नवरात्रात हा ट्रेंड फॉलो होऊ लागला. नऊ दिवस देवीची रूपं तीच असतात, पण रंगांची ही प्रथा मात्र अगदी बदलाची जननी बनली. सण काळानुरूप नवीन रूप घेतातच, आणि त्यात काही गैरही नाही. पण यात रंग हा काही कडक नियम नसून निखळ आनंद साजरा करण्याचं एक साधन आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर आज नवरात्रीचं रूप पूर्णपणे बदलून गेलं आहे. उपवास, रंग, गरबा आणि आनंद म्हणजे नवरात्र.

मुंबईसारख्या वेगवान शहरात तर या दिवसांत कमालच पाहायला मिळते. सकाळी कितीही लवकर निघायचे असो, घरातील सगळा स्वयंपाक उरकून, घराची आवराआवर करून, पूजा करून, मुलांचं सर्व वेळा सांभाळून तरीही तो रंग फॉलो करत छान साडी नेसून, नीट मेकअप करून सजून-धजून महिला कामावर निघतात. दिवसभर ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात राबराब राबतात आणि संध्याकाळी घरी जाताना पुन्हा मेकअपचा टचअप करून, त्याच उत्साहात घरी परततात. घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक आणि घरची कामं सुरू होतात. रात्री दांडिया किंवा गरबाही खेळायचा असतो. हे करून पार थकून गेल्या तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही, उलट तो अधिकच द्विगुणित होतो!

या काळात मुंबईची लोकल ट्रेन तर एका फिरत्या सांस्कृतिक रंगमंचाचं रूप धारण करते. लेडीज स्पेशल असो की लोकलमधील महिलांचा डबा, त्या तुफान गर्दीतही तिथला उत्साह ओसंडून वाहतो. ट्रेनमध्येच दांडियाची गाणी वाजतात, गरबे खेळले जातात, रील्स बनवले जातात आणि संपूर्ण ट्रेन गाजत-गाजत धावते. स्टेशनवर उभं राहायचं आणि या काळात लोकल पाहायची कधी लाल तर कधी हिरवी अशी कलरफुल लोकल याच काळात पाहता येते. लोकलमध्ये एकमेकींचे कौतुक केलं जातं, तर तितक्याच सहजतेने एकमेकींचे पायही खेचले जातात. समजा, एखाद्या स्त्रीने त्या दिवशीचा ठरलेला रंग परिधान केला नसेल, तर 'हिला काही उत्साहच नाही', किंवा 'ही स्वतःला काहीतरी वेगळी समजते', अशा गॉसिपच्या फैरीही झडतात. ऑफिसमध्येही सगळेच हा ट्रेंड फॉलो करत असल्यामुळे, 'उद्या मी तो रंग नाही घातला तर लोक काय म्हणतील?' या विचाराने कित्येक महिलांची आतल्या आत तगमग होते. आणि या रंगीबेरंगी चक्रातून जन्म होतो तो एका नव्याच 'पीअर प्रेशर'चा. कारण या ट्रेंडपायी ज्या महिलांना दरवर्षी नव्या साड्या किंवा मॅचिंग ज्वेलरी खरेदी करणं शक्य नसतं तेव्हा त्यांच्यावर एक वेगळाच मानसिक आणि आर्थिक ताण येतो. त्यात जुना ड्रेस किंवा साडी नेसली तर 'अगं हीच साडी गेल्यावर्षीही होती ना!' असे उद्गार बाहेर पडतात. बायका उत्साही, समजूतदार तेवढ्याच फटकळ आणि तुलना करणाऱ्या असतात. पूर्वी स्त्री सोयीनुसार किंवा श्रद्धेने कडक उपवास करायची, पण त्यात आजच्यासारखा दिखावा नसायचा. फक्त पाण्यावर नऊ दिवस असा उपवास करणाऱ्या लोकमध्ये भेटतात तेव्हा त्यांची दयाही येते आणि कींव करावीशीही वाटते. या काळात चक्कर येऊन पडणाऱ्या महिलाही अनेक असतात. रंग, उपवास ही एक प्रकारची सामाजिक सक्ती असल्यासारखं काहींना वाटतं. या काळात एक स्त्री उपवास करून तिचे फायदे सांगते, तेव्हा दुसरीही तिचेच अनुकरण करते. 'ती करतेय म्हणून मीही करणार' या हट्टापोटी नकळत एक अनामिक ताण निर्माण होतो, जो महिलांच्या लक्षातही येत नाही; पण तरीही ही जिद्द आणि स्पर्धा आवर्जून पाहायला मिळते.

अजून एक गोष्ट म्हणजे भक्तीभावाचा एक अतिरेकी आणि चुकीचा प्रवाहही पाहायला मिळतो. देवीचे उपवास म्हणून नऊ दिवस पायात चपला न घालता अनवाणी प्रवासाचा ट्रेंड काही जणी सुरू करतात. भक्तीभाव असणं ठीक आहे, पण मुंबईसारख्या शहरात जिथे पाय ठेवायला जागा नसते, तिथे अनवाणी फिरणं म्हणजे रोगराई आणि आजारपण स्वतःच्या घरात ओढून आणण्यासारखं असतं. ट्रेंड कोण आणते आणि ते कसे चुकीच्या पद्धतीने फॉलो केले जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरतं.

त्यात कहर म्हणजे लोकल ट्रेनमध्येच जेव्हा विविध प्रकारची भारी-भारी ज्वेलरी विक्रीसाठी येते, तेव्हा धावत्या ट्रेनमध्येच खरेदीचे फड रंगतात. दुकानांत तर आदल्या दिवशीच उद्याच्या रंगाचे कपडे दर्शनी भागात सजवले जातात. आजकाल तर पुरुषही हा ट्रेंड फॉलो करतात आणि लहान मुलांचेही देवीच्या रंगाचे कपडे घेऊन त्यांना या उत्सवात सामील केले जाते.

पण या संपूर्ण चकाचौंधीच्या आणि कोलाहलाच्या मागे जर आपण डोकावून पाहिलं, तर स्त्रीच्या मानसशास्त्राचा एक अतिशय सुंदर आणि गडद पैलू समोर येतो. वर्षातील ३६५ दिवस कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि घराच्या रहाटगाड्यासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षा मारून जगणाऱ्या स्त्रीला या नऊ दिवसांत मोकळा श्वास घ्यायला मिळतो. 'रंग आणि गरबा म्हणजे नवरात्र' ही आता नवी व्याख्या झाली असली, तरी या बहाण्याने स्त्रीला थोडं स्वतःसाठी जगता येतं. 'भावभक्तीपेक्षा जरा मजा करूया' असा विचार करून ती या नऊ दिवसांत स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करते.

मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहाता, लोकल ट्रेनमधील ती तुफान गर्दी, रोजची धावपळ, कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांवर मात करण्यासाठी ती या रंगांचा आणि साड्यांचा एका ढालीसारखा वापर करते. सकाळी साडी नेसून आरशात स्वतःला पाहताना तिच्या डोळ्यांत जो आत्मविश्वास चमकतो, तीच तिच्यातील खरी आद्यशक्ती असते. 'स्त्रीचं सौंदर्य आणि तिची ताकद तिच्या जीवन जगण्याच्या अनपेक्षित उत्साहात दडलेली असते.' ती केवळ वर-वर नटत नाही, तर ती तिच्या आतल्या सर्व थकव्याला आणि दुःखाला नऊ रंगांच्या मागे लपवून हसतमुखाने जगाला सामोरं जाते.

शेवटी उत्सव हे माणसाने स्वतःच्या निखळ आनंदासाठी निर्माण केले आहेत. काळ बदलतो, सणांची पद्धत बदलते, पण स्त्रीच्या मनातील अखंड वाहणारा उत्साहाचा झरा मात्र तसाच प्रवाही राहतो. या सर्व धावपळीत, पीअर प्रेशरमध्ये, खरेदीत आणि गर्दीतील गरब्यातून ती जो काही आनंद वेचते, तोच तिचा खरा विजय ठरतो. म्हणूनच, कागदावरच्या रंगांनी सुरू झालेला हा प्रवास आजही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला एक नवा ताजातवाना रंग देऊन जातो, हेच खरं!

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in