कलारंग
पूजा सामंत
यावर्षीचा ट्रेंड काय? काय घालायचं यावर्षी? असे प्रश्न सोबत घेऊन तरुणाई गेले काही दिवस मार्केट पालथे घालत आहे. त्याची उत्तरं फॅशन डिझायनर मिली गडा आणि मंगेश अधिकारी देत आहेत. सोबत नवरात्रीचा पेहराव अधिक खुलवणाऱ्या काही टिप्सही त्यांनी दिल्या आहेत.
नवरात्र म्हणजे गरबा नृत्य आणि गरबा नृत्य म्हणजे विविध प्रकारचे घागरे, चनिया चोली आणि त्यावर सजणारे चांदीचे दागिने. यावर्षीच्या गरबा नृत्यामध्ये आपला लूक कसा असावा, याविषयी तरुण-तरुणी नवरात्रीच्या आधीपासूनच विचार करत असतात. अर्थातच वेगवेगळे फॅशन डिझायनरही हा विचार करत असतातच. कारण तरुणाईच्या मागणीप्रमाणे, दरवर्षी काहीतरी हटके हवे, या मूडप्रमाणे काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न डिझायनर मंडळी करत असतात. दोन फॅशन डिझायनरनी यावर्षीच्या वेगळेपणाविषयी माहिती दिली आहे.
गरबा कॉस्च्युम डिझायनर मिली परेश गडा म्हणाली, “मी गेली अनेक वर्षे माझ्या पतीसह टेक्सटाईल व्यवसायात काम करतेय. मुंबईसह अहमदाबाद येथेही आमचा स्टुडिओ आहे. नवरात्रीच्या आधी किमान तीन महिने आमचे गरबा ड्रेसेसवर काम सुरू असते. चनिया चोली, घागरा चोली, युवकांसाठी फॅन्सी कुडते, पायजमे, काठियावाडी ड्रेसेस या सगळ्याला १५-२० वर्षांपूर्वी आजच्याइतकी मागणी नव्हती. त्यावेळी गुजराती समाज राहतो त्या विभागातच गरब्यासाठीचे खास ड्रेस मिळत असत. पण अलीकडे नवरात्रीच्या गरबा नृत्याचे लोण वाढले आहे. पूर्वी गरब्याचे ड्रेस मालाडचे नटराज मार्केट, भुलेश्वर, घाटकोपर, मुलुंड याच विभागात मिळत असत. पण आता वाढती मागणी पाहून प्रत्येक उपनगरात असे गरब्याचे फॅन्सी ड्रेस मिळतात.
माझ्यासाठी या नऊ दिवसांतील फॅशन म्हणजे केवळ कलरफुल पोशाख नाही, तर ज्वेलरी, स्टायलिंग, अनुरूप मेकअप असं सगळं मिळून एक पूर्ण लूक तयार होतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे सेलिब्रेशन म्हणजे फक्त फॅशनचा उत्सव नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. नऊ दिवसांत देवीला नऊ रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. त्या रंगांप्रमाणे जर ड्रेस आणि मॅचिंग ज्वेलरी घातली तर ‘सोने पे सुहागा’. संस्कृती आणि श्रद्धा यांचं फॅशनसोबत मी बेमालूम मिश्रण करते. या क्षेत्रात अनेक वर्षं काम केल्यावर मला वाटतं की, स्त्री तिच्या पेहरावातून देखील व्यक्त झाली पाहिजे. फॅशन, संस्कृती, आपल्या संस्कृतीची पाळंमुळं या सगळ्यांचा विचार मी ड्रेस डिझाईन करताना करते. गरब्याचे जे ड्रेस तरुणी किंवा स्त्रिया घालतात ते घालून त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा. गरबा ड्रेसचे ब्राइट कलर्स त्यांना खुलून दिसतात. आपल्या देशात कायम उष्ण हवामान असल्याने असे गडद रंगांमधले कपडे एरव्ही फार वापरता येत नाहीत. पण नवरात्रात देवीचे नऊ रंग म्हणून विविध रंग वापरण्याची चंगळ करता येते. फॅशन आणि प्राचीन संस्कृती यांचा मिलाफ करणारे लेहंगा, सलवार कमीज, डिझायनर कुडते यातही वेगवेगळे प्रयोग केले जातात. सध्या गरबा ड्रेसमध्ये खूप वेगळा असा ट्रेंड नाही, पण ज्यांना आवड आहे ते पॅच वर्क केलेले ड्रेस घालू शकतात. काहींना सिक्वेन्स वर्क, मिरर वर्क आवडते. या दोन्हींचे कॉम्बिनेशन देखील खूप उठून दिसते.
यंदाच्या नवरात्रीसाठी विशेष क्राफ्ट्समनशिप असलेले ड्रेस मी डिझाईन केले आहेत. त्यात मिरर वर्क, बांधणी, गोटा पट्टी वर्क, एम्ब्रॉयडरी यांचा उपयोग करून अनेक लेहंगे, चोली-घाघरे आणले आहेत. खरं म्हणजे हे सगळे पॅटर्न गेली अनेक वर्षं लोकप्रिय आहेत, उद्याही असतील. ही कालातीत फॅशन आहे. या ड्रेसेसवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, फॅन्सी इमेटिशन ज्वेलरी अशी कुठलीही ज्वेलरी सहज वापरता येते. अशी ज्वेलरी पुढील वर्षी देखील वापरता येते. फक्त ती वापरल्यावर कॉटनने पुसून बॉक्समध्ये ठेवावी.
उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. फॅशनमध्ये ग्लॅमर असलंच पाहिजे, असं अलीकडच्या तरुणाईला वाटतं. त्यामुळे साधे, सिंपल ड्रेस आता इतिहासजमा झाले आहेत. आताच्या ट्रेंडनुसार चोलीच्या फ्रंट साइड, बॅक साइडला विविध फॅन्सी आकारातले कट्स दिले जातात आणि त्यातून त्यांना अधिक ग्लॅमरस केलं जातं. ग्लॅमरचा विचार करताना कम्फर्टही असले पाहिजे. म्हणूनच पूर्वीच्या जड, वजनदार चनिया चोलीपेक्षा लाइट वेटेड, कमी वजनाच्या चनिया चोलींना सध्या अधिक मागणी आहे. ड्रेसच्या कमी वजनामुळे गरबा खेळताना लेहंग्याच्या वजनाचा फार त्रास होत नाही. त्याचबरोबरीने अलीकडे तरुणींना घेर असलेले लेहंगे किंवा घाघरे अधिक हवे असतात. कारण हा जमाना रील बनवण्याचा आहे. त्यामुळे ज्या लेहंग्यांना घेर असतो असे लेहंगे गरब्यात फेर धरताना सुंदर दिसतात, त्याचे रील देखील कलात्मक बनते. म्हणूनच लेयर्स लेहंगा चोली ही फॅशन सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. यात पोशाखाचा फेस्टिव्ह लूक कायम आहे.
व्हायब्रंट ज्वेल स्टोन्समध्ये इमराल्ड ग्रीन, राणी पिंक, रॉयल ब्ल्यू, सन शाईन यलो हे रंग ट्रेंडिंग आहेत. ते यावर्षीही लोकप्रिय आहेत, त्यांना अधिक मागणी आहे. दोन भिन्न रंगांचं कॉम्बिनेशन केलं असता परफेक्ट फ्युजन तयार होतं. यावर्षीच्या पोशाखांमध्ये असं फ्युजन पाहायला मिळेल.
नव्या डिझाइन्समध्ये - असेमेट्रिकल कट्स, फेदर वर्क (पिसे लावलेला ड्रेस) पाहायला मिळेल. वेगवेगळी मोटिफ्सही वापरलेली दिसतील. ही मोटिफ्स आपल्या लोककला आणि लोकपरंपरेतून घेतली जातात. गेली अनेक वर्षं मोर हा पक्षी ट्रेंडमध्ये आहे. त्याचं डिझाईन ड्रेसपासून ते आभूषणांपर्यंत सर्वत्र वापरलं जातं. शिवाय मिरर वर्कचे ड्रेस हा ऑल टाइम फेव्हरिट प्रकार आहे. कारण कारागिरांना वाटतं की, हे खूप सकारात्मकता आणतात, वाईट शक्तींना दूर ठेवतात. या परंपरागत मान्यतेमुळे अशा प्रकारच्या डिझाईन्सना सुरुवात झाली. मिरर वर्कच्या पोशाखामुळे गरबा खेळताना ‘मॅजिकल इफेक्ट’ तयार होतो. त्यामुळे गरब्यासाठीच्या विविध पोशाखांमध्ये ‘मिरर वर्क’ कधीही ‘आऊट ऑफ स्टाईल’ होत नाही.”
फॅशन डिझाइनर मंगेश अधिकारी हे गेली वीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. ते सांगतात, “फॅशन करणं, विविध स्टाईल्स करणं यात महिलांचा हात कुणी धरू शकत नाही. बहुतेक स्त्रियांना ‘स्टॅन्ड आऊट’ होणं आवडतं. स्त्रियांची ही आवड तीच माझीही आवड बनली. सगळेच भारतीय सण-वार हे रंग, उत्सव यांचे प्रतीक असतात. संक्रांत असो, होळी असो किंवा नवरात्री...गडद रंगांना प्राधान्य दिलं जातं. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कॉस्च्युम्स मी तयार केलेत. त्यात फार कलरफुल पोशाख नको होते म्हणून तिथे मी पेस्टल शेड्स वापरलेत. म्हणूनच नवरात्रीसाठी खास गरबा पोशाख करणं, ही आमच्यासाठीही एक पर्वणी असते.”
नवरात्रीसाठी याही वर्षी मिरर वर्क ट्रेंडमध्ये आहे. गेली किमान २५ वर्षं हा ट्रेंड सुरू आहे. अगदी देशाबाहेरही आपल्याला मिरर वर्कच्या डिझाईन्स पाहायला मिळतात. मिरर वर्कने जो जिप्सी लूक, बोहेमियन लूक येतो तोही लोकांना आवडतो. मिरर वर्कचा पोशाख अगदी सहज लक्ष वेधून घेतो.
याखेरीज डिजिटल प्रिंट्स, देव-देवतांची छायाचित्रं, त्यांच्या डिजिटल इमेजेस कुडता किंवा ड्रेसवर असणं हे सध्या ‘इन फॅशन’ आहे. लेहंगा चोली ऑल टाइम हिट आहे. ब्लॅक आऊटफिट आणि त्यावर मल्टी कलर्ड लेहंगा, त्यावर पॅच वर्क किंवा एप्लिक वर्क यांचं कॉम्बिनेशन तरुणाईला प्रिय आहे. कॉटन ब्लेंड फॅब्रिक, फ्युजन वेअर, डेनिम क्रॉप टॉप, त्यावर जॅकेट किंवा जॅकेटवर गमथी वर्क, आभला वर्क या फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या नवरात्रीत आपल्याला हे सगळे ट्रेंड पाहायला मिळतील. पारंपरिक फॅशन आणि त्याला आधुनिकेतचा टच दिलेलं लोकांना आवडतं.
इंडोवेस्टर्न फ्युजन आऊटफिट्समध्ये हॉल्टर नेक किंवा बॅकलेस चोली हा ट्रेंड आहेच. आपल्या कॉटन कुडत्यांवर देवीच्या मुखवट्याची छायाचित्रं डिजिटली करवून घेतली जातात. गरबा खेळणाऱ्या दाम्पत्याच्या ड्रेसचं कलर को-ऑर्डिनेशन केलं जातं. हा प्रकारही ट्रेंडमध्ये आहे.
हे सगळे पोशाख टाइमलेस, ग्लॅमरस, ग्लिटरिंग आहेत. त्यांची तीच खासियत आहे. तेव्हा चला, नवरात्रीसाठी सज्ज होऊ या.
मिलीच्या टिप्स
मिक्स ॲन्ड मॅच करून कितीतरी जुन्या साड्या, ड्रेस यांच्यापासून नवा ड्रेस तयार करता येतो.
जुन्या ओढण्यांचे जॅकेट देखील करता येते.
गरब्यासाठी घेतलेले ड्रेस किंवा खास डिझाईन केलेले ड्रेस नंतर पार्टी, विवाह समारंभ आणि वेगवेगळ्या इव्हेन्ट्सना घालता येतात. त्यामुळे गरब्याच्या ड्रेसमध्ये फार पैसे खर्च झालेत, अशी खंत बाळगू नका.
नवरात्रीच्या नऊ दिवसांतील फॅशनसाठी तुम्ही पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा संगम साधू शकता. या दिवसांमध्ये नऊ रंगांचे महत्त्व असते, त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार लेहंगा, पारंपरिक डिझाइनच्या साड्या किंवा गरबा-दांडियासाठी खास बनवलेले कुर्ते-धोतर घालू शकता.
सिल्क किंवा बांधणीच्या न वापरात असलेल्या साड्यांचे देखील उत्तम ड्रेस बनू शकतात. त्यांचा लेहंगा तयार करून त्यावर बॅकलेस चोली किंवा स्लिव्हलेस ब्लाऊज ट्रेंडी ठरू शकतो.
आवड आणि किंमत
रेडी टू वेअर या प्रकारातले पोशाख ५ हजार ते ३५००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
डिझायनरकडून ‘कस्टमाईज्ड आऊटफिट्स’ करून घेतले तर ते १० ते १२ हजारांपासून ते थेट ५० ते ६० हजारांपर्यंत मिळू शकतात. किंमत महाग वाटत असली तरी हे पोशाख विवाह आणि अन्य समारंभांनाही घालता येतात. त्यामुळे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘Do it yourself’ म्हणजे कापड घेऊन आपणच करून घ्यायच्या पोषाखांची किंमत तुलनेने कमी आहे. कारण फिटिंगसाठी लागणारी शिलाई ग्राहकाला द्यावी लागते.
काही स्टायलिंग टिप्स
आपला लूक बॅलन्स करा. तो ‘अति’ वाटता कामा नये किंवा ‘डल’ही दिसू नये. जर लेहंगा हेवी वर्कचा असेल तर चोली फार हेवी वर्कमध्ये असू नये. दोघांपैकी एक ‘मिनिमल लूक’मध्ये असावं.
ॲक्सेसरी ऑक्सिडाइज्ड, सिल्व्हर किंवा कुठल्याही मेटलमध्ये असल्यास चालू शकेल. काही पोशाखांवर पेपर ज्वेलरीही उठून दिसते.
ज्वेलरीचं अति प्रदर्शन बरं दिसत नाही.
सोबत एखाद्या मॅचिंग बटव्याची निवड करा.
काही पोशाखांवर कंबरपट्टा खूप छान दिसतो, बाजूबंद देखील वापरू शकता.
पायांमध्ये रंगीत पण कम्फर्टेबल मोजडी असावी.
दुपट्टा असल्यास तो व्यवस्थित पिनअप करावा. अथवा नृत्याच्या वेळी त्रास होतो.
ड्रेसच्या रंगसंगतीला अनुसरून लिपस्टिक, आयशॅडोज वापराव्यात.
मुक्त पत्रकार आणि फॅशनच्या अभ्यासक.