स्त्री विश्व
प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
मातृशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांच्या प्रतिमा या नऊ रात्रींमध्ये पुजल्या जातात. स्त्रीच्या सृजनशक्तीचाही हा उत्सव असून अंकुरित धान्य देवीला अर्पण केले जाते.
नवरात्र हा सण मातृशक्तीचा आहे. जगाचा इतिहास पाहिला तर चीन, पेरू, जपान, मेसेपोटेमिया इत्यादी देशांमध्ये पूर्वापार मातृशक्तीची पूजा चालू होती. त्यांच्या देवता होत्या, मंदिरे होती. तिथे उत्सव-पूजा होत असत. भारतात हा उत्सव महाराष्ट्र, बंगाल, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असा सर्वत्र होतो.
मातृशक्ती! यातील ‘शक्ती’ या शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण होय. शक म्हणजे समर्थ होणे. यावरून ‘शक्ती’ हा शब्द तयार झाला आहे. मातृशक्तीचा हा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. एकदा चैत्र महिन्यात आणि दुसरा अश्विन महिन्यात. अश्विन महिन्यात नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा भारतात फार प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे.
या नवरात्र व्रताची एक कथा श्रीरामांशी संबंधित आहे. रावणाने सीतेला पळवून नेल्यामुळे राम शोकग्रस्त झाले होते. त्यांच्या सांत्वनासाठी तिथे नारद आले. नारद मुनींनी सीतेच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. रावणाकडून सीतेचा अपमान झाला. त्यामुळे सीतेने रावणाला शाप दिला की, ‘तुझा नाश करण्यासाठी मी पुढील जन्मी अयोनीसंभव अशी स्त्री होईन.’ ही कथा सांगून नारद म्हणाले, “म्हणून रावणाचा नाश केल्याखेरीस तू तिला परत आणू शकणार नाहीस.” तसेच त्यांनी श्रीरामांना रावणवधासाठी ‘नवरात्र व्रत’ करण्यास सांगितले. रामांनी ते केले व दशमीच्या दिवशी लंकेवर स्वारी करून रावणास ठार मारले. या गोष्टीचे तात्पर्य असे की, दुष्टांचे निर्दालन हा या सणामागील हेतू आहे. महिषासुराच्या वधामागेही हेच तत्त्व आहे. पुन्हा त्यात देवीच्या म्हणजेच स्त्रीच्या सामर्थ्याचा गौरव आहे.
हा उत्सव नऊ दिवस चालतो. यातील नऊ या अंकाला विशेष महत्त्व आहे. एक तर तो दशमानातील सर्वात मोठा अंक आहे. तसेच तो पूर्णांकही आहे. नवाची कितीही पट केली तरी येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज नऊच होते. जसे की १८, २७, ३६ इत्यादी.
नवरात्र उत्सव हा अखंड दीप प्रज्वलन, देवीचे महात्म्य पठण, देवी पूजन, उपवास, जागरण, गरबा नृत्य इत्यादी कार्यक्रम करून साजरा केला जातो. हा उत्सव वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पद्धतीने साजरा केला जातो. वैयक्तिक पद्धतीने साजरा करताना घरात एक घट ठेवला जातो. तिथे देवीचा टाक किंवा प्रतिमा ठेवली जाते. त्याखाली काळ्या मातीत सप्तधन्य पेरलं जातं. नऊ दिवस घटाशेजारी फुलांची माळ चढत्या क्रमाने लावून अखंड नंदादीप ठेवला जातो. नऊ दिवस कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन दिले जाते. सुवासिनी म्हणजे प्रगट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती होत. काही घरातून सप्तशतीचा पाठ केला जातो. घरातील स्त्री-पुरुष नऊ दिवस उपवास करतात. उप म्हणजे जवळ तर वास शब्दाचा अर्थ राहणे असा आहे. म्हणजे हा वसा देवी जवळ जाण्याचा, राहण्याचा आहे. माणसातील सत जोपासण्याचं हे व्रत आहे.
यात निसर्गदेवतेची देखील जपणूक केली जाते. धान्य अंकुरित होणं, नंतर ते देवीला अर्पण करणं, यात निसर्गाविषयी आणि सृष्टी निर्मात्याविषयी कृतज्ञता हा भाव दिसून येतो.
सार्वजनिक पातळीवर देवीच्या मंदिरात किंवा प्रांगणात घटस्थापना केली जाते. प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळी रूपं दिली जातात. ही रूपे अनुक्रमाने अशी आहेत- शैलपुत्री (शैल म्हणजे पर्वत. हिमालय कन्या म्हणून हे नाव), ब्रह्मचारिणी (ब्रह्मरूप होणे हेच जिथे आचरण आहे), चंद्र घंटा (आल्हाददायक चंद्र जिच्या द्वारा मध्ये स्थित आहे ती), कूषमांडा (विविध तापयुक्त संसार जिच्या उदरात स्थित आहेत ती), स्कंदमाता (सप्त लोकातून तरुन जाताना जिचे सहाय्य लागते ती), कात्यायनी (कात्यायन ऋषींची कन्या), काल रात्री (कळी काळाला जागृत करणारी), महागौरी (तपस्येने महान गौर म्हणजे तेज प्राप्त केलेली ती), सिद्धी दात्री (सिद्धी देणारी).
देवीच्या या विविध रूपांसंबंधी एक स्तोत्र देखील आहे.
ते असे -
“पहिली शैलपुत्री ती, दुसरी ब्रह्मचारिणी,
तिसरी चंद्रघंटा ती, चवथी साच कूषमांडा,
पाचवी स्कंदमाता ती, कात्यायनी सहावी ती,
सातवी काल रात्री ती, आठवी ती महागौरी,
नववी सिद्धीदात्री ती, प्रख्यात नवदुर्गा या,
अवतरल्या साक्षात जगत कल्याण कारणा”
ही विविध रूपे देवीची अर्थात दुर्गेचे वेगवेगळे गुण व शक्ती सांगणारी आहेत. दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे वाईटाचा नाश करणारी. दुर म्हणजे वाईट आणि ग म्हणजे गमन करणारी, याचाच अर्थ वाईटाचे गमन करणारी अशी होय.
अशा या दुर्गा मातेला वंदन करूया.
लेखिका ज्ञानेश्वरी अभ्यासक आहेत