हितगूज
डॉ. शुभांगी पारकर
नवरात्र म्हणजे दैवी स्त्रीशक्तीचा म्हणजेच शक्तीचा उत्सव. पण या पलिकडेही या सणाला एक गहन सांस्कृतिक अर्थ आहे. नवरात्र हे स्त्रीच्या सामर्थ्याचे, लवचिकतेचे आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. पुरुषसत्ताक रचनेची तीव्रता कमी करत स्त्रीसामर्थ्य प्रस्थापित करण्याची क्षमता या सणामध्ये आहे.
माता शैलपुत्रीच्या संगोपक रुपापासून ते माता कात्यायनीच्या संरक्षक रुपापर्यंत देवी दुर्गेच्या रुपात जसे विविध गुण समावलेले आहेत, त्याचप्रमाणे समाजातील स्त्रियाही विविध भूमिका सांभाळतात. त्या काळजीवाहू असतात, उद्योजक असतात, नेतृत्वाची भूमिका बजावतात किंवा बदलासाठी तत्पर असतात. स्त्रियांचे हे बहुआयामी रूपच नवरात्रात उजळून निघते.
नवरात्रीत गरबा नृत्य खेळणं एवढ्या पुरती स्त्रियांची भूमिका मर्यादित नसते. पूजा-विधींची कारणमीमांसा, लोककथा, परंपरा हे सर्व त्या आपुलकीने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच त्या संस्कृतीच्या वाहक असतात, राखणदार असतात.
देवी महात्म्य : स्त्रीत्वाचा साक्षात्कार
या उत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणजे दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्य नावाच्या आदरणीय ग्रंथाचे पठण. या लेखाचा उद्देश त्यातील गूढ आध्यात्मिक अर्थांचा विस्ताराने शोध घेणे नाही, परंतु महिलांच्या सक्षमीकरणाच्या कथेसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करणे आहे. देवी महात्म्य हा कदाचित जगातील सर्वात प्राचीन असा जिवंत ग्रंथ आहे, जो पूर्णपणे एका स्वतंत्र आणि अद्वितीय देवीला अर्पण केला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की तो सर्वोच्च तत्त्वाला स्त्रीलिंगी स्वरूपात प्रकट करतो. म्हणूनच, हा फक्त धार्मिक नव्हे, तर धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनातूनही वाचनीय ठरतो.
या कथेच्या केंद्रस्थानी अशी महादेवी आहे जी सर्व देवतांच्या शक्तींचे एकत्रीकरण आहे. विशेष म्हणजे, या कथेत स्त्रीत्वाचे दोन ध्रुव एकत्र येतात. आईच्या वात्सल्याचा कोमल स्पर्श आणि अदम्य योद्ध्याची कठोरता. महिषासुरमर्दिनी या नायिकेतून हे अद्वितीय मिश्रण प्रकटते. ती केवळ कोणाची पत्नी, माता, भगिनी, कन्या म्हणून मर्यादित नाही, तर स्वतःच्या सामर्थ्याने उभी राहणारी, तरीही मातृभावाने सर्वांना आधार देणारी देवी आहे.
यातून एक स्पष्ट संदेश घुमतो. जगातील सर्व स्त्रिया या त्या दैवी स्त्रीत्वाच्या प्रतिमा आहेत. ग्रंथ स्वतः म्हणतो, “स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु” जगातील सर्व स्त्रिया या त्या दैवी शक्तीचेच मूर्त स्वरूप आहेत. अशा रीतीने देवी महात्म्य केवळ दैवी गाथा सांगत नाही, तर स्त्रीत्वाला सर्वोच्च स्थान देत प्रत्येक स्त्रीला सन्मान आणि सामर्थ्याचा दर्जा बहाल करते.
सकारात्मक भावना आणि कल्याण
सण म्हणजे जीवनाचा उत्सव. या उत्सवांमध्ये आनंद असतो, सकारात्मकता असते. वैज्ञानिक संशोधनातून ताण कमी करण्यासाठी, भावनिक आधार वाढवण्यासाठी आणि एकूण मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सामाजिक संवादांचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. सण सुसंवाद वाढवतात. यातून परस्पर संबंधांना बळकटी मिळते, सामाजिक वर्तन अधिकाधिक सकारात्मक होते. नवरात्र हा सण केवळ बाह्य विधींशी जोडलेला नाही; ती एक अंतर्गत परिवर्तनाची संधी देखील आहे.
तणाव आणि चिंता कमी करणे : कोर्टिसोल हे संप्रेरक शरीरात ताण निर्माण करते. वैज्ञानिक अभ्यासानुसार ध्यानधारणेमुळे व अध्यात्मिक सहभागामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते. त्यामुळे मन अधिक शांत होते.
डोपामाइन आणि सेरोटोनिनमध्ये वाढ : भक्ती संगीत, गरबा-दांडियासारखी लयबद्ध नृत्यं आणि त्यानिमित्ताने लोकांचे एकत्र जमणे डोपामाइन आणि सेरोटोनिन या ‘आनंद संप्रेरकां’चे उत्सर्जन वाढवतात. त्यामुळे उत्साही आणि हलके वाटते. जडावलेपण दूर होते.
मानसिक लवचिकतेमध्ये वाढ : नवरात्रीतील उपवास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि स्व-नियंत्रण यामुळे इच्छाशक्ती बळकट होते. या शिस्तीतून मानसिक लवचिकता (resilience) निर्माण होते, जी जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाची ठरते.
भावनिक आधार वाढतो : नृत्य, संगीत आणि सामूहिक प्रार्थना यामुळे ताण कमी होतो, भावनिक आधार वाढतो आणि सकारात्मक संबंध दृढ होतात. नृत्याचे हे मेळावे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्याविषयीचा कलंक दूर करण्यासाठी आणि स्त्रियांच्या जीवनातील संघर्षांबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ ठरू शकतात.
आत्मविश्वास आणि अंतर्गत सामर्थ्य
नवरात्रीचे उत्सवी वातावरण महिलांना मुक्तपणे, आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करण्यासाठीचा मंच देते. या दिवसांत स्त्रियांना दैनंदिन दिनचर्येतून बाहेर पडून स्वतःच्या क्षमतांचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळते. हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सहभागाचा जिवंत अनुभव असतो.
इथे तरुणच नव्हे तर प्रौढ महिला, फक्त बोलक्या नव्हे तर अंतर्मुख स्वभावाच्या महिला, आणि केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक विचारसरणीच्या महिलाही एकत्र येतात. आपली कौशल्य, सर्जनशीलता आणि चैतन्य व्यक्त करतात. त्यामुळेच नवरात्र हा सामुदायिक भावना आणि आपलेपणाची जाणीव दृढ करणारा उत्सव ठरतो. प्रत्येक स्त्रीला आपले व्यक्तिमत्त्व अधिक विकसित करण्याची संधी मिळते.
पारंपरिक रूढींना आव्हान
नवरात्र हा असा काळ आहे जेव्हा पारंपरिक लिंगभूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि नव्याने त्यांची परिभाषा तयार केली जाते. देवी दुर्गा तिच्या योद्धा रूपात स्त्रियांना निष्क्रिय किंवा अबला मानणाऱ्या रूढींना धक्का देते. रक्षणकर्ती म्हणून तिची प्रतिमा प्रत्येक स्त्रीला सांगते, “अन्यायाविरुद्ध उभी राहा, तुझे आयुष्य स्वतः घडव.”
हा संदेश आजच्या काळातील महिलांसाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण,राजकारण, उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया येणारे अडथळे ओलांडत, नवीन वाटा चोखाळत आहेत. देवी दुर्गेच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा स्त्रियांना फक्त श्रद्धेचा आधार देते असे नाही, तर सामाजिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणाचाही महत्त्वाचा धडा देते.
एक सांस्कृतिक प्रतीक
नवरात्रीच्या सणामध्ये एक सांस्कृतिक प्रतीक बनण्याची प्रचंड क्षमता आहे. भारतामध्ये कथा सांगण्याची प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. सप्तशती सारख्या ग्रंथांमधील गुंतागुंतीची कथा आणि जिवंत प्रतिमा यातून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत जगण्याची शिकवण दिली जाते. सप्तशतीमधील कथेमधून भारतातील देवीपूजेच्या हजारो वर्षांच्या परंपरेचे एकत्रीकरण आणि संवर्धन तर होतेच, पण पितृसत्ताक रचनेला थोडे सैल, मोकळेही केले जाते. यामुळे लिंगभेदाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. लिंगभेदाच्या समीकरणांचं पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना नव्याने परिभाषित करण्यासाठी ‘देवी महात्म्य’ सहाय्यभूत ठरु शकते. या ग्रंथाच्या प्राचीन लेखकांनी कित्येक शतकांपूर्वीच आधुनिक स्त्रीसक्षमीकरणाचे मुद्दे लक्षात ठेवले होते, असे दिसते.
संस्कृतीची प्रगल्भ रचना
नवरात्रीतील गरबा नृत्य हे फक्त नृत्य नाही; तर ते भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची प्रगल्भ रचना आहे. त्यामध्ये एकता, उत्सव आणि वाईटावर चांगल्याचा विजय या भावनांचे जिवंत प्रतिबिंब आहे. गरब्याच्या लयबद्ध तालांवर चरण हलवताना, दोलायमान रंगांच्या सावल्यांमध्ये मिसळताना, तुम्ही केवळ नृत्य करत नाही, तर तुम्ही ज्योतीचा, आनंदाचा आणि स्वतंत्रतेचा उत्सव साजरा करत असता. काही वेळा या गरब्याच्या रिंगणात ती स्वतःचा साथीदार शोधते, आपले स्वातंत्र्य, निर्णय आणि पसंती मोकळेपणाने व्यक्त करते. प्रत्येक पायाच्या टप्प्यात, प्रत्येक तालाच्या धडधडीत आणि प्रत्येक नृत्याच्या लयीत, हे लक्षात ठेवा...हे नुसते नृत्य नाही; तुम्ही अशा परंपरेचा भाग आहात जी पिढ्यांना जोडते, समाजाला बळकटी देते आणि दैवी स्त्री उर्जेचा सन्मान करते.
स्पष्ट, शक्तिशाली संदेश
नवरात्रीतील संदेश स्पष्ट आणि शक्तिशाली आहे. स्त्रियांनी आपल्या सामर्थ्याला मान्यता मिळवण्यासाठी इतरांच्या मतांचे आधार शोधण्याची गरज नाही; कारण हे सामर्थ्य त्यांच्यात आधीपासूनच अस्तित्त्वात आहे. धैर्य, लवचिकता आणि करुणा या गुणांना अंगिकारून स्त्रिया केवळ स्वतःलाच नव्हे, तर आजूबाजूच्या जगालाही सक्षमीकरणाची ऊर्जा देतात.
अलीकडे या उत्सवाच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार केला जातो. यामुळे तरुण मुलींसमोर कर्तृत्वाचा, सामर्थ्याचा आदर्श उभा राहतो. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा आत्मविश्वास मिळतो.
देवींच्या कथांपासून ते बदल घडवणाऱ्या स्त्रियांच्या वास्तवातील उदाहरणांपर्यंत, हा सण पुढील पिढीच्या महिलांसाठी प्रेरणेचा एक अविरत स्रोत ठरतो. या नवरात्रीत, स्त्रीत्वाच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करणे, हीच स्त्रीसाठी सर्वात मौल्यवान अनुभूती आहे.
मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता