भूमिकांनी व्यापलेलं आयुष्य

एखाद्या कलाकाराचं नाव घेतलं की त्याने साकारलेल्या विविध भूमिका डोळ्यासमोर उभ्या राहणं, ही बाब आता दुर्मिळ झाली आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या भूमिकांशी समरस होत त्या भूमिकांसोबत स्वत:चं नाव जोडणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे नीना कुळकर्णी.
भूमिकांनी व्यापलेलं आयुष्य
Published on

नाट्यरंग

संजय कुळकर्णी

एखाद्या कलाकाराचं नाव घेतलं की त्याने साकारलेल्या विविध भूमिका डोळ्यासमोर उभ्या राहणं, ही बाब आता दुर्मिळ झाली आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या भूमिकांशी समरस होत त्या भूमिकांसोबत स्वत:चं नाव जोडणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे नीना कुळकर्णी. अभिनय क्षेत्रातील आपल्या दीर्घ वाटचालीवर त्यांनी स्वत:चा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळेच जीवनगौरव पुरस्कार असो, की विष्णुदास भावे पुरस्कार असो, त्या पुढे नीना कुळकर्णी हे नाव शोभून दिसते.

थिएटर हा माझा श्वास आहे”, नीना कुळकर्णी.

कलाकाराला जेव्हा पारितोषिक मिळते, जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते तेव्हा आपल्या कलाजीवनाचे सार्थक झाले असे त्याला-तिला वाटते. हा कलाकार जेव्हा रंगभूमीवरचा असतो तेव्हा त्याला-तिला रंगभूमीशी असलेला ऋणानुबंध कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा वाटत असतो. नाटक-चित्रपट आणि मालिकासृष्टीत आपले अढळपद निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना ५ नोव्हेंबर रोजी विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी १४ जूनला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविले होते. आज वयाच्या ७० व्या वर्षी सुद्धा त्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका करताना दिसतात. नाटक पाहताना त्यांच्या या ऊर्जेला दाद द्यावीच लागते.

नीना कुळकर्णी यांचे आई-वडील डॉक्टर. जोशी कुटुंबातला त्यांचा जन्म. ‘गुंतता हृदय हे’ या नाटकाची जुळवाजुळव सुरू होती. अभिजात संस्थेचे अनंत काणे निर्माते, तर नंदकुमार रावते नाटकाचे दिग्दर्शक होते. डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे अशी नाटकाची तगडी स्टारकास्ट होती. आशा काळे यांच्या बालपणाची भूमिका करण्यासाठी लहान मुलगी हवी होती. डॉ. काशिनाथ घाणेकर हे नीना कुळकर्णी यांच्या वडिलांचे मित्र. त्यांनी छोट्या नीनाला पाहिलेले होते. ‘घेऊन जातो रे तुझ्या मुलीला नाटकात भूमिका करण्यासाठी’ असे त्यांनी आपल्या मित्राला सांगितले आणि चक्क त्यांनी नीनाला निर्मात्यांकडे नेले. नीनाच्या वडिलांनी सुद्धा डॉ. काशिनाथ घाणेकरांना होकार दिला आणि छोट्या नीनाचे व्यावसायिक रंगभूमीवर ‘गुंतता हृदय हे’ या नाटकाद्वारे पदार्पण झाले.

अलीकडेच नाट्य परिषदेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या मनोगतातून त्यांनी आपल्या करिअरचा आलेख रेखाटला होता. आज त्यांचे शब्द आठवतात. नीना कुळकर्णी म्हणाल्या होत्या, “नाट्य सेवेत कार्यरत असताना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराची खुमारी काही औरच असते. या वाटचालीत मिळालेले समाधान आणि भाग्य मला मोलाचे वाटते. माझे गुरू पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता तसेच मार्गदर्शक ठरलेल्या विमलताई राऊत, डॉ. काशिनाथ घाणेकर आणि नाट्यसृष्टीतील सहकलाकार यांचे आभार हे मानायलाच हवेत. आई जेव्हा अभिनेत्री असते तेव्हा मुलांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. पण माझ्या दोन्ही मुलांनी मला सांभाळून घेतले. तसेच दिलीप हा माझा नवरा माझा सहकारीही होता. तो मला म्हणाला होता, “नीना थिएटर हा आपला श्वास आहे. ते कधीही सोडू नकोस.” ते शब्द मी आजतागायत जपून ठेवलेत. अजूनही मला ते आठवताहेत.”

‘गुंतता हृदय हे’नंतरही नीनाची बालकलाकार म्हणून वाटचाल सुरू होती. विमलताई ‘चांदणे शिंपीत जा’ हे नाटक करीत होत्या. त्या नाटकातील एका कलाकाराची रिप्लेसमेंट म्हणून ‘प्रमिला’ या छोट्या भूमिकेत नीना कुळकर्णी यांनी वीस प्रयोग केले. त्यावेळी त्या ८ वीत शिकत होत्या. आपल्या मकरंद सोसायटीमधल्या आठवणी अजूनही त्यांच्या स्मरणात आहेत. त्या सांगतात. “कॉलनीत विमलताई नाटकं बसवायच्या. त्यात माझा सहभाग असायचा. वयाच्या नवव्या वर्षापासून मी कॉलनीत नाटक करीत आलेय. तेव्हाच मी नाटकाच्या प्रेमात पडले होते. कॉलनीच्या वार्षिक महोत्सवाची मी वाट बघत असे. कुठल्याही गोष्टीचा ध्यास हा असावा लागतो. मला लहानपणापासून तो ध्यास होता, असे मी निश्चितपणे सांगेन. तुमच्यात जर तो ध्यास असेल तर पुढची पायवाट ही दिसतेच. मी इथे करियर करण्यासाठी आले नव्हते. नाटक हा माझा छंद होता. मी माझ्या दिग्दर्शकांकडून शिकत गेले. दिग्दर्शक हेच माझे गुरू होते. त्याकाळी काळजी घेणारे निर्माते होते, सहकलाकार होते. ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे या लहानग्या मला इतक्या सांभाळून घेत असत की त्यांचे आणि माझे एक नाते तयार झाले. आजही त्या मला आवर्जून फोन करतात. माझी विचारपूस करतात. काशिनाथ काका तर घरी मला सोडायला यायचे.”

नीना कुळकर्णी यांनी नंतर ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकात ‘शब्बो’ ही भूमिका साकारली. त्या भूमिकेने त्यांना नाव मिळवून दिले. कलाकार म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली. नंतर ‘महासागर’, ‘ध्यानीमनी’, ‘वट वट सावित्री’, ‘देहभान’ आणि ‘असेन मी नसेन मी’ इत्यादी नाटकांबरोबर हिंदी-मराठी चित्रपटही त्यांनी केले. त्या तिथे रमल्या.

त्या म्हणतात, “मी नाटकांच्या बाबतीत अगदी चोखंदळ आहे. विचारणा झालेल्या भूमिकांच्या संहिता जर मला मनापासून आवडल्या नाहीत तर मी भूमिकेसाठी ‘नाही’ म्हणते. खरं सांगू, नाटक म्हणजे कलाकार आणि कलाकृती यांचं दीर्घकालीन नातं असतं. सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. अनेकांना फॉलोअर्स असतात. पण माझ्या भूमिका मी कधीही मनात ठेवल्या नाहीत. माझ्या दृष्टीने अभिनय हाच प्रधान असतो, तो तुमच्या कौशल्यावर आधारित असतो. भूमिका कधीही मनात ठेवायच्या नसतात असं मी म्हणते, कारण पुढच्या सादरीकरणाच्या वेळी मनातल्या व्यक्तिरेखा अडथळा ठरतात. नाटकात भूमिका करताना एक शिस्त असते. नाटकात तालमी महत्त्वाच्या असतात. हिंदी मालिका आणि सिनेमा या ठिकाणी शिस्त फारशी नसते. मालिकांमध्ये चित्रीकरणाची गती एवढी प्रचंड असते की काही वेळा कलाकार म्हणून आपण स्वतःला हरवत जातो. नाटकात मला वेगवेगळ्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं हे माझं भाग्य. काही काळ मी नाटकापासून दूर होते. खरं सांगायचं तर मला योग्य संहिता मिळत नव्हत्या. मी चोखंदळ आहे. ‘असेन मी नसेन मी’ ही संहिता वाचल्यावर वाटलं हेच ते नाटक, ज्याची आपण वाट पाहत होतो. आता या नाटकाद्वारे पुन्हा रंगभूमीवर परतायचं.”

नीना कुळकर्णी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात सुद्धा भूमिका केल्या आहेत. नाटक ते चित्रपट हा प्रवास कसा झाला हे सांगताना त्या म्हणाल्या, “आपलं आधीचं काम बघून आपल्याला नवं काम मिळतं. या क्षेत्रात शिस्तबद्ध असणं गरजेचं आहे. जुही चावलाच्या चित्रपटात आईची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री हवी होती. तिनं माझा ‘आई’ चित्रपट पाहिला होता, पण तिच्याकडे माझा नंबर नव्हता. कुठून तरी तिने तो मिळवला. त्यानंतर प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला आणि मला ती भूमिका मिळाली. आपण एखादी मागणी केली, डिमांडिंग राहिलो तर पुढचं प्रोजेक्ट मिळणार नाही, असं काहींना वाटत असतं, पण मी ते मानत नाही. हिंदी मालिकेत भूमिका करताना मी सांगत आलेय की, मला कथा ऐकवू नका. कारण जर मला ती आवडली नाही तर मग मी ती मालिका नाकारेन. हा माझा पर्स्पेक्टिव्ह होता. जसजसं वय वाढत जातं तसं आपल्याला बदलावं लागतं. माझ्यासाठी नेहमी अप्रोच हा फार महत्त्वाचा आहे. जर आपण एखाद्या मालिकेत, चित्रपटात भूमिका केली असेल आणि त्या निर्मात्याच्या येणाऱ्या चित्रपटात जर छोटीशी भूमिका असेल आणि त्याने मला विचारलं तर मी होकार देते.”

पं. सत्यदेव दुबे यांच्या नाटकात भूमिका करता करता नीना यांची दिलीप कुळकर्णी यांच्याबरोबर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघे विवाहबद्ध झाले. एक नवीन जबाबदारी आली. त्याबद्दल त्या सांगतात, “दिलीपबरोबर लग्न झाल्यानंतर आणि त्याने व्हीआरएस घेतल्यानंतर माझी जबाबदारी वाढली. मी सुखवस्तू कुटुंबातून आल्यामुळे सुरुवातीला माझ्या समोर पैसे कमवणे हे उद्दिष्ट नव्हते. अभिनय ही केवळ आवड होती. पण लग्नानंतर मी त्याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले. आता आपण जेवढं कमावतो त्याच्या दहापटीने आपला खर्च असतो. त्याकाळी तसं नव्हतं. दिलीप आजारी पडल्यानंतर मी नाकारत असलेल्या भूमिकेबद्दलच्या भावना आपोआप बंद झाल्या. दिलीप जेव्हा गेला तेव्हा माझ्याकडे खूप काम नव्हतं. दिलीप आजारी होता तेव्हा मी वर्षभर काही काम केलं नव्हतं. हिंदी चित्रपटसृष्टीला ते कळल्यावर मला कामं मिळू लागली. त्यावेळी मला स्त्री-पुरुष यातील भेदभाव समजला. खरं सांगू, रोल मिळणं हा भाग वेगळा असतो आणि तुमच्यातील माणूसपण हे वेगळं असतं.”

दिलीप यांच्या जाण्याने नीना यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. शेवटी त्या भावूक होऊन म्हणाल्या, “त्यांनीच शिकवलं की स्वतःवर विश्वास ठेव. ते गेल्यानंतर माझी दुसरी इनिंग सुरू झाली.”

शेवटी अभिनयाविषयी एक खूप मोलाची गोष्ट. आजकाल सर्वांना फक्त झटपट यश हवं असतं, पण अभिनय म्हणजे समर्पण, संयम आणि स्वतःवरचा विश्वास. कलाकार म्हणजे सतत शिकत राहणारा विद्यार्थी. वय, माध्यम, व्यासपीठ काहीही असो, आपण जेव्हा ‘मला येतं’ असं म्हणतो तेव्हा आपण संपलोय. माझं जीवन म्हणजे सततचा रंगमंच. मला अजून खूप शिकायचं आहे.”

ज्येष्ठ नाट्य समीक्षक

logo
marathi.freepressjournal.in