

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
भारतीय लोकशाहीच्या पटलावर जेव्हा सत्तेच्या मग्रुरीने आणि व्यवस्थेच्या उदासीनतेने जनसामान्यांचा आवाज दडपला, तेव्हा एका नव्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल आपल्या हातात घेऊन बलदंड व अंधःकारमय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले आहे. सध्याच्या समकालीन भारतीय राजकारणातील वैचारिक परिवर्तनाचा व नारीशक्तिचा निर्भीड आवाज म्हणजे नेहा बोरा. सध्याच्या जेन झीच्या आंदोलनाच्या काळात त्यांचे केवळ नावच पुरेसे आहे.
उत्तराखंडमधील खटीमा येथून सुरू झालेला नेहा बोरा यांचा प्रवास आज देशाच्या राजधानीतून संपूर्ण देशातील तरुणांच्या मनात अस्वस्थता आणि परिवर्तनाची नवी ऊर्जा निर्माण करत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संशोधनकार्य करत असलेल्या आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या नेहा बोरा यांच्याकडे तरुणांचे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. देशातील जनसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची अचूक जाण, त्याची मुद्देसूद मांडणी, प्रभावी वक्तृत्वशैली, वैचारिक अधिष्ठान हेच त्यांच्या नेतृत्त्वाचे बलस्थान बनले आहे. महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिक्षणाचा वसा घेणाऱ्या फातिमा शेख, लोकशाही आणि समतेचा हुंकार भरणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हसतहसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा वारसा आणि मूल्ये आजच्या काळात जिवंत ठेवत पुरोगामी विचारांच्या नेहा बोरा यांनी देशाच्या विद्यार्थी चळवळीला एक वैचारिक दिशा दिली आहे.
नेहा बोरा यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि संघर्षात जो ठामपणा आणि स्पष्टवक्ता स्वभाव दिसून येतो, त्याचे मूळ त्यांच्या जडणघडणीत आणि त्यांनी आत्मसात केलेल्या पुरोगामी विचारांमध्ये आहे. लष्करी शिस्तीच्या वातावरणात लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एकीकडे अभेद्य जिद्द आणि शिस्त रुजली, तर दुसरीकडे समाजशास्त्राच्या अभ्यासाने त्यांना जात, वर्ग, लिंगभेद आणि विषमतेच्या खोल दऱ्यांची जाणीव करून दिली आहे. त्यांची संवादशैली भारतीय घटनेच्या उद्देशिकेतील समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना थेट भिडणारी आहे. कोणताही बडेजाव न करता, थेट शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यातील अस्वस्थतेला शब्दांत मांडण्याची त्यांची विलक्षण हातोटी त्यांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली आहे.
या नेतृत्वाची खरी कसोटी जंतरमंतरवर परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या भ्रष्ट यंत्रणेविरोधात दिलेल्या ऐतिहासिक आणि संघर्षात्मक लढ्यात दिसून आली आहे. तब्बल तेवीस दिवसांचे आमरण उपोषण केल्यानंतर शरीराने कमकुवत झालेल्या असतानाही त्यांचे मनोधैर्य यत्किंचितही खचले नाही. भगतसिंग यांनी ज्या प्रकारे विचार आणि कृती यांच्यातील सुसंवादावर भर दिला आणि अन्यायाविरुद्धचा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द ठेवली, त्याचेच प्रतिबिंब नेहा बोरा यांच्या या आंदोलनातून पाहायला मिळाले आहे. परीक्षा रद्द होणे, निकालाला विलंब लागणे किंवा पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्षे वाया जाणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी नाही, तर ती एका पिढीच्या भविष्याशी खेळ आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. आजचा तरुण वर्ग आपल्या हक्कांसाठी मूकदर्शक बनून राहणार नाही; तो सत्तेच्या दरबारात जाऊन जाब विचारण्याची ताकद बाळगतो, हीच त्यांच्या आंदोलनाची खासियत राहिली आहे. झारखंडमधील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील अनियमिततेविरोधातील आंदोलनात त्यांच्यावर झालेला लाठीमार, अंगावर फेकलेली शाई किंवा पोलिसांची दडपशाही त्यांना रोखू शकलेली नाही. उलट त्यातून त्यांचे नेतृत्व अधिक तावूनसुलाखून निघाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा दिलेला मूलमंत्र आजच्या विद्यार्थी चळवळीचा प्राण बनला आहे. विद्यापीठाचे वसतिगृह, शुल्कवाढ किंवा परीक्षा, महिलांवरील अत्याचार, मॉब लिंचिंग, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांचे अधिकार, नागरिक स्वातंत्र्य आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता यासारख्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यावर त्यांनी आपली भूमिका अत्यंत परखडपणे मांडली आहे. बिल्किस बानो यांच्या न्यायाचा प्रश्न असो किंवा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न असो, त्यांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी भूमिका घेतली आहे. लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, हा विचार त्यांनी देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचवला आहे. डिजिटल युगातील आजची 'जेन-झी' पिढी केवळ पारंपारिक राजकारणाच्या चौकटीत अडकलेली नाही, तर तिची राजकीय समज अधिक व्यापक आणि माहितीपूर्ण आहे. अशा काळात रस्त्यावरील संघर्ष आणि डिजिटल नेटवर्क्स यांचा अचूक संगम साधत तरुणांच्या मनात साचलेल्या असंतोषाला नेहा बोरा यांनी संघटित आणि रचनात्मक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थी चळवळीच्या इतिहासात अनेक आक्रमक चेहरे आले आणि काळाच्या ओघात विरूनही गेले. केवळ विरोधाची भाषा न बोलता त्यांनी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि लोकशाही रक्षणासाठी ठोस पर्यायी कार्यक्रम आणि धोरणात्मक आराखडा देशासमोर ठेवला आहे. आंदोलनातून मिळणारी सहानुभूती आणि जनसमर्थन यांचे संघटित राजकीय शक्तीत आणि सामाजिक चळवळीत रूपांतर करण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. त्यामुळे सत्तेच्या विरोधात पेटवलेला हा वणवा केवळ क्षणिक असंतोषापुरता मर्यादित न राहता देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेतील विषमता आणि अन्याय दूर करणारी एक मोठी वैचारिक क्रांती ठरेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
फुले-आंबेडकरांच्या विचारांनी भारलेली, भगतसिंगांच्या धैर्याने प्रेरित झालेली आणि सर्वसामान्य जनतेच्या वेदनांशी समरस झालेली ही विद्यार्थी चळवळ देशाच्या आगामी राजकारणाला एक नवीन दिशा देण्यास सज्ज झाली आहे. देशातील जेन झी तरुणाई आता केवळ टाळ्या वा थाळ्या वाजवणारी किंवा मूकपणे अन्याय सहन करणारी राहिलेली नाही; ती आपल्या भवितव्याचा वेध घेणारी एक प्रखर शक्ती बनली आहे. विविध आंदोलनांच्या निमित्ताने पोलिसांनी नेहा बोरा यांना वारंवार ताब्यात घेतले, तरी ना त्यांचे आंदोलन थांबले, ना व्यवस्थेला प्रश्न विचारणारा नारीशक्तिचा निर्भीड आवाज.
prakashrsawant@gmail.com