नवीन वर्षासाठी परफेक्ट गिफ्ट गाइड

नवीन वर्ष म्हणजे केवळ पार्टी, प्रवास किंवा सेलिब्रेशन नाही, तर आपल्या माणसांना आपुलकीने आठवण्याचा आणि मनापासून काहीतरी देण्याचा खास क्षण आहे. योग्य गिफ्ट म्हणजे महाग वस्तू नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात उपयोगी पडणारी आणि नात्यांना अधिक घट्ट करणारी भेट असते.
Photo : Freepik
Photo : Freepik
Published on

नववर्ष ट्रेंड्स

ऐश्वर्या पेवाल-नेमाडे

नवीन वर्ष म्हणजे केवळ पार्टी, प्रवास किंवा सेलिब्रेशन नाही, तर आपल्या माणसांना आपुलकीने आठवण्याचा आणि मनापासून काहीतरी देण्याचा खास क्षण आहे. योग्य गिफ्ट म्हणजे महाग वस्तू नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात उपयोगी पडणारी आणि नात्यांना अधिक घट्ट करणारी भेट असते.

नवीन वर्षाचं सगळेच उत्साहात स्वागत करतात. काहीजण न्यू इयर साजरा करायला बीचवर जातात किंवा एखाद्या हिल स्टेशनची निवड करतात, तर काहीजण ऑफिसमधून सुट्टी नाही म्हणून घरच्यांसोबत छान लंच किंवा डिनर डेटवर जातात. या वेळेस सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा असते. सगळे मजेत असतात. हे वर्ष कसं गेलं आणि येणारं नवीन वर्ष कसं असेल याची चर्चा प्रत्येकाच्या तोंडून होत असते. आणखीन एक चर्चा अलीकडे रंगात आली आहे ती म्हणजे एकमेकांना गिफ्ट्स देण्याची. एक सांगू का, जे वर्किंग आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये Secret Santa आवर्जून साजरा केला जातो आणि तिथे गिफ्ट्स सुद्धा दिले जातात. हो! यासोबत गिफ्ट्स किती रुपयांच्या आत किंवा किती रुपयांपर्यंत आणायचे ते पण सांगितलं जातं. पण हे फक्त ऑफिस पुरतं का मर्यादित असावं? असं कधीतरी तुम्हाला सुद्धा वाटलं असेलच ना? पण मग नवीन वर्षात अशी कोणती वस्तू आहे जी कामी येऊ शकते? जी वस्तू देण्याजोगे असेल? जी बजेटमध्ये असेल? जी समोरच्या व्यक्तीला आवडेल? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आजच्या या लेखात मिळेल का तुम्हीच शोधा.

गिफ्ट देण्याआधी त्या व्यक्तीची गरज समजून घ्या

गिफ्ट देताना कामी येतील अशा वस्तूंची निवड करा. त्या व्यक्तीकडे काय नाही किंवा त्या व्यक्तीला कशाची गरज आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. दिलेली वस्तू खरंच कामी येणारी आहे का त्याचा अभ्यास करा. ती वस्तू वापरली जाणार का याचा विचार करा. तुम्ही गिफ्ट देणार म्हटल्यावर तुमच्या खिशातून पैसे जाणार, म्हणून ते पैसे वाया न जाता, पैसे वसूल होतील अशी वस्तू निवडा. आठवणीत राहील अशी भेटवस्तू घ्या. दिलेल्याचं कौतुक होईल, समोरच्या व्यक्तीला ती वस्तू आवडेल याचा विचार करा. फक्त घ्यायचं म्हणून घेऊ नका.

घरच्यांना, बेस्ट फ्रेंडला न्यू इयर गिफ्ट काय द्यावं?

आपण वर्षभर वेगवगेळ्या प्रसंगी आपल्या जवळच्यांना भेटवस्तू देतच असतो. न्यू इयर गिफ्ट द्यायलाच हवं का? नाही दिल तर नाही चालणार का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. न्यू इयर गिफ्ट दिलंच पाहिजे असा काही अट्टाहास नाही आहे. पण दिलेली वस्तू ही त्या-त्या वर्षाची शेवटची आठवण असते. स्पेशल असते. म्हणून द्यावी. घरच्यांना तुम्ही दिवाळीत कपडे घेताच, पण हिवाळ्यात न्यू इयर आल्याने एखादा नवीन स्वेटर किंवा शॉल घेऊन दिली तर ती पुढील वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांत जेव्हा हिवाळा असतो तेव्हा आवर्जून वापरली जाऊ शकते. घरात गृहिणींना त्यांची कामं लवकर होतील, सोपी होतील अशा काही गॅजेट्स घेऊ शकता. जसं की रोटी मेकर, आटा मेकर, इ. याशिवाय घर सजावटीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात त्याचा विचार करायला हरकत नाही. ‘आई’, ‘बाबा’, ‘सुपर मॉम’, ‘बेस्ट फ्रेंड’ किंवा इतर मराठी शुभेच्छा असलेले मग देऊ शकता. अलीकडे कस्टमाइज्ड फोटो फ्रेम ज्यामध्ये लाइट असते त्याचा फार ट्रेंड आहे. तुमची बायको किंवा नवरा ऑफिसला जाणाऱ्यापैकी असतील तर त्यांना एक नवीन बॅग किंवा वॉलेट गिफ्ट करा. त्यावर सुद्धा त्यांची नावे लिहून मिळतात. काहींना डायरी लिहायची सवय असते त्यांना डायरी द्या. तुम्ही गेट टुगेदरला किंवा न्यू इयर पार्टीला जाणार असाल तर मिठाईचा बॉक्स किंवा चॉकलेटचे कस्टमाइज्ड बॉक्स मिळतात, ते घेऊन जाऊ शकता.

ऑफिसवाल्यांसाठी बेस्ट गिफ्ट काय असेल?

ऑफिसमध्ये बऱ्याच वस्तू कामी येणाऱ्या असतात. जसं की डेस्क ॲक्सेसरिज पेन, फोन होल्डर, डायरी, कार्ड होल्डर, डेस्क ऑर्गनायझर्स, पेन स्टँड, फोटो फ्रेम, तर टेक्नॉलॉजी गॅजेट्समध्ये ब्लूटूथ स्पीकर, हेडफोन, पॉवर बँक, USB कनेक्टर, माऊस, लॅपटॉप स्टँड अशा वस्तू तुम्ही निवडू शकता. पेयपात्र ज्याला आपण Drinkware म्हणतो त्यामध्ये स्टीलच्या बाटल्या, मग्स (Mugs), थर्मास किंवा नवीन डब्बा, टिफिन बॅग अशाही वस्तू गिफ्ट दिल्यावर वापरता येत असल्याने त्या वाया जात नाहीत. आणखीन एक गोष्ट म्हणजे, दिवसभर AC मध्ये असल्याने घामाचा दुर्गंध वाढू नये, स्कीन ड्राय होऊ नये, स्कीन फ्रेश दिसावी यासाठी फेसवॉश, परफ्यूम, बॉडी मिस्ट, बॉडी लोशन, अत्तर सुद्धा देऊ शकता. त्याची कोणी मजा घेऊ नये म्हणून गिफ्टसोबत एक छानशी नोट ठेवा, ज्यावर लिहिलेलं असेल ‘स्वतःची काळजी घ्या’ किंवा ‘काळजी घ्या, काम होत राहील’. याने कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष केलेल्या व्यक्तीला स्वतःला वेळ देणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव सुद्धा होईल आणि त्याला स्पेशल सुद्धा वाटेल.

सगळ्यांसाठी गिफ्ट्स झाले पण घराचा विचार कोण करणार?

आपण प्रत्येक सणावाराला घरासाठी खरेदी करतो मग न्यू इयरला का नाही? आपण ज्या घरात राहतो, त्या घराच्या भिंतींनी गेल्या वर्षीच्या अनेक आठवणी आपल्यामध्ये सामावून घेतलेल्या आहेत. चांगले-वाईट सगळे क्षण अनुभवले. मग त्या घराला सुद्धा गिफ्ट देणं लागतं की. घरासाठी न्यू इयर गिफ्ट म्हणून हँडमेड खणाचे नेमप्लेट घेऊ शकता. सध्या त्याचा फार ट्रेंड आहे. पैठणीचे फ्रेम होम डेकॉर म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही या वर्षातील बेस्ट आठवणींचे फोटो एकत्र करून एक छान फोटो कोलाज बनवून घरातील एका भिंतीवर लावू शकता. हॅन्डमेड उशीचे कव्हर, मराठी महिन्याचं कॅलेंडर ज्याला फ्रीज मॅग्नेट म्हणून सुद्धा वापरता येतं, घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी वास्तूसंबंधी गोष्टी घेऊ शकता. जसं की, इनडोअर प्लांट्स, शुभ चिन्ह असलेली फ्रेम इ.

एक असं गिफ्ट जे प्रत्येकाला आवडेल!

आपल्या आयुष्यात खूप काय-काय घडत असतं. नेहमी आपण कामात बिझी असतो. जबाबदाऱ्या पार पाडत असतो. कधी गरजांसाठी तर कधी स्वप्नांसाठी झटत असतो. आपल्या ध्येयांसाठी किंवा इच्छांसाठी कठोर परिश्रम करत असतो, सतत प्रयत्नशील राहतो आणि हार न मानता प्रयत्न करत राहतो. या सगळ्यामध्ये कायम खंबीरपणे सोबत उभे असतात ती म्हणजे ‘आपली माणसं’, हेच आपण विसरतो. म्हणून यंदा नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुमच्या आयुष्यात या वर्षी ज्याने जे जे चांगलं केलं त्याला आवर्जून एक मेसेज करून Thank You म्हणा. ज्याने वाईट केलं त्यांना माफ करा. घरच्यांना वेळ द्या. गिफ्ट देणं हा तर वेगळाच भाग राहिला, पण आपल्यासोबत या वर्षात सगळ्या प्रसंगांमध्ये सोबत राहिलेल्या प्रत्येकाला न विसरता, नवीन वर्षातसुद्धा आपण सोबत असणार याची जाणीव करून द्या. प्रत्येकाला आवडणारं गिफ्ट म्हणजे ‘वेळ’. असं म्हणतात वेळ निघून गेली की ती परत येत नाही. या वाक्याला तुमचा मित्र बनवा आणि येणाऱ्या २०२६ मध्ये प्रत्येक क्षण आनंदात जगा, तेही आपल्या माणसांसोबत. याला पैसे लागणार नाहीत, पण आपुलकी मात्र नक्की लागेल. मग काय देताय ना आवडत्या व्यक्तींना त्यांचं आवडतं गिफ्ट?

नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणींनी, सुख-समृद्धीने आणि सुख-समाधानाने भरलेलं असो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

लाइफस्टाईल जर्नालिस्ट

aishwaryapewal@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in