निरोपाच्या उंबरठ्यावर

निरोप हा केवळ विभक्त होण्याचा क्षण नसतो, तर तो माणसाच्या आत खोलवर तुटलेपण, हळवेपण आणि स्वीकाराची कसोटी घेणारा अनुभव असतो. व्यक्ती, स्थळे, आठवणी आणि अखेरीस सरतं वर्ष.. प्रत्येक निरोप आपल्याला अधिक संवेदनशीलपणे जगायला शिकवतो.
निरोपाच्या उंबरठ्यावर
Published on

शब्दभाव

अक्षय वाटवे

निरोप हा केवळ विभक्त होण्याचा क्षण नसतो, तर तो माणसाच्या आत खोलवर तुटलेपण, हळवेपण आणि स्वीकाराची कसोटी घेणारा अनुभव असतो. व्यक्ती, स्थळे, आठवणी आणि अखेरीस सरतं वर्ष.. प्रत्येक निरोप आपल्याला अधिक संवेदनशीलपणे जगायला शिकवतो.

काय तुटते आतून जेव्हा निरोपाचा क्षण येतो तेव्हा? केविलवाणी अवस्था करून जाणाऱ्या या क्षणांच्या बेड्यांची चावी शोधण्याचा अविरत असफल प्रयास अनेकांनी केला. बेभान होऊन धावत सुटावे आणि जाणाऱ्याला गाठावे, असे कोणाला वाटत नाही? पण अर्थ नसतो त्या वाटण्याला काहीही. निघण्याचा क्षण रेंगाळत राहतो नि निरोप घेणारा निमित्त काढून तोच क्षण अधिक ताणतो. क्षणांची मिनिटे होतात, मिनिटांचे तास, तासांचे दिवसही होतील कदाचित, पण निरोप देणे चुकत नाही. नको नको वाटणारी ही देवाणघेवाण पुनर्भेटीची अनिश्चितता असली की अधिकच नकोशी होते.

फक्त माणसांनाच निरोप द्यावा लागतो असे नाही. हेही तितकेच खरे की, सगळेच निरोप नकोसे असतात असेही नाही. पण जे हवेहवेसे वाटतात ते निरोप नसतात, ते असतात क्षण सुटकेचे... पण हातात घेतलेला हात ज्याचा स्पर्श ओलसर उबदार असतो; जो तुमच्या कठोर कोरडेपणाला हळूहळू विरघळवत जातो, तो हळुवारपणे सोडवणेही नको वाटते, तर झटकून निघून जाण्याची बातच सोडा. पाठ फिरवून चालू लागले की, पाठीवर खिळलेल्या नजरेचा स्पर्श अस्वस्थ करत राहतो. भेटीच्या खुणा तनापासून मनापर्यंत मुरत गेलेल्या असतात त्या सहज पुसून काढता येत नाहीत आणि काढायच्याही नसतात.

कधी स्वतःशी स्वतःची भेट घडवून आणली आहे तुम्ही? त्या ‘स्व’ गवसण्याचा आनंदही नीट अनुभवता येत नाही म्हणेपर्यंत परके होतो आपण आपल्याला. फसफसणाऱ्या लाटा किनाऱ्याच्या ओढीने, आवेगाने येताना पाहिल्या की, किनाऱ्यात मिसळू पाहणाऱ्या लाटांच्या हतबलतेबद्दल कणव दाटून येते. लाटेत शिरून ओढून जाणाऱ्या किनाऱ्यासाठी मन कळवळते. हा विरह नाही. हे तुटलेपण आहे जे सांधता येत नाही. नको जाऊ म्हणता येत नाही, जा म्हणण्यासाठी जीभ वळत नाही.

स्टेशनवर मुलाला सोडायला आलेले वडील दिसतात. पण फाटकापाशी उभी राहून निरोपाने मन जड झालेली हात हलवणारी आई त्यांच्या डोळ्यांनातून ओघळताना दिसते. लटपटणारे पाय सावरण्यासाठी बाबांच्या कणखर पण कोमल हातांचा नाही, तर ट्रेनच्या लोखंडी निर्जीव दांड्याचा आधार घेताना त्या मुलाला किंवा मुलीला मनगटात आत्मविश्वासाचे पोकळ बळ आणावे लागते.

इहलोकी भोगवाद टाळून परलोकी सुख कल्पिणारे, त्या मार्गाचे दिशादर्शन करणारेही असतील. स्वार्थ त्यागाच्या कल्पनांवर पुस्तके लिहिणारे, व्याख्याने देणारे, प्रवचने करणारे कित्येक आहेत, असतील, असोत... आत निःस्पृहता रुजवून अलिप्ततेच्या छायेत निर्विकल्प जगणाऱ्यांविषयी मनात प्रचंड आदर असूनही, निरोपाच्या क्षणी हळवे काहूर डोळ्यांत घेऊन थिजून उभे राहणाऱ्यांविषयी माझ्या मनात अपार प्रेम दाटून येते, कारण त्या कठोर क्षणाला सामोरे जाण्याची आणि तो ओलांडून पार करण्याची अपूर्व क्षमता त्यांच्यात असते. स्वीकारासारखी दुसरी सुंदर गोष्ट या जगात नाही. अर्थात, हे तितके सहज घडत नसते.

प्रिय व्यक्तीच्या निरोपानंतर; जर तो निरोप कायमचा आणि न परतण्यासाठी घेतला असेल तर, पुढे कितीतरी काळ हा निरोप अभावीतपणे तुम्हाला छळत राहतो. स्थळ, काळाचे भान पुसून टाकून त्या निरोपाच्या जागी नेऊन उभे करतो, अशावेळी गदगदून येते. शरीराला कंप सुटतो. डबडबलेल्या डोळ्यांनी खालमानेने टाळायचे म्हटले तरी टाळता येत नाही, पळायचे म्हटले तरी पळता येत नाही. भर ओसरतोच पण तुटलेपणातून सावरण्याचे बळ मिळते का? मनाला, पायांना?

किती व्यक्तिगत प्रश्न आहे हा, जो अनुत्तरित राहू नये असे वाटूनही त्याची उत्तरे मिळत नाहीत. निरोप घ्यावाच लागतो. जाणाऱ्या माणसाला अडवता येत नाही. अडवूही नये.

निरोपाच्या प्रसंगांमध्ये व्यामिश्रता तर आहेच पण त्यानंतरची गंमत तर अजूनच वेगळी आहे. म्हणजे बघा.. कालौघात आठवणी धूसर होतात. निरोपाच्या त्या क्षणाची तीव्रता सौम्य होते आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा स्वभावधर्मानुसार असे अनेक निरोपाचे क्षण आठवून किंचित विरंगुळा म्हणून आपण स्मृतिरंजनात रमतो. असं आठवणीत रमायला आवडतं आपल्याला. कित्येकदा त्या आठवणींच्या जोरावर कल्पनाविलासही आपण करतो. नाही का? म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी निरोप घेऊन वेगळी झालेली व्यक्ती किंवा मागे सोडलेले एखादे ठिकाण वगैरे आत्ता कसे असेल? किंवा असे असेल का?, तसे असेल का? वगैरे!!

खरंच जर निरोप घेऊन वेगळे झाल्यानंतर आयुष्याच्या एका वळणावर पुन्हा भेट झाली तर?, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो किंवा ठिकाण; कधी कधी अशा भेटी सुखद ठरतात... तर कधी कधी भ्रमनिरास करून वेगळंच वास्तव समोर आणतात.

असं हे निरोपाचं पुराण... तसं पाहिलं तर जीवापासचं. स्वप्नील. आता हेच पहा नं.. आजही आपण एका निरोपाच्या उंबरठ्यावर आहोत. म्हटलं तर अगदी सामान्य गोष्ट पण म्हटलं तर खूपच विशेष.

आज आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि त्याचबरोबर नवीन वर्षाचे स्वागतही करणार आहोत. खरेतर आजचा हा दिवस म्हणजे निरोपाच्या क्षणांना सामोरे कसे जावे याचे उत्तम उदाहरण..!!

वरवर पाहता आपल्याला वाटेल, की त्यात काय एवढे? पाने पलटावीत तसे वर्ष बदलते. हा हा म्हणता हे संपेल आणि दुसरे सुरू होईल त्यात काय एवढे निरोपाचा प्रसंग वगैरे! पण मित्रांनो, ही पलटणारी पाने कोरी नसतात ना..! आपण फक्त वर्षाला निरोप देत नाही तर त्या वर्षभरात घडलेल्या असंख्य घटनांच्या आठवणींचे एक जाळीदार पिंपळ पान मनाच्या घडीत घालून ठेवतो.

मला आठवतेय.. आमच्या घरी वर्ष संपले तरी त्या वर्षाची दिनदर्शिका पुढे कित्येक दिवस तशीच भिंतीवर असायची. कारण आईने बहुतेक महिन्यांच्या पानावर असलेल्या मोकळ्या जागेत काहीना काहीतरी खुणेसाठी नोंदी केलेल्या असायच्या. कसले कसले हिशोब, महत्त्वाच्या तारखा वगैरे वगैरे आणि म्हणूनच वर्ष सरले तरी त्याच्या स्मृती उरायच्याच.

आत्ता या क्षणाला गेल्या वर्षीचा एकतीस डिसेंबर आठवून पहा. मग जानेवारीपासूनचा एक-एक महिना आठवून पहा. सहजच विचारा स्वतःला कसे होते हे वर्ष? मी काय काय केले, काय अनुभव घेतले या वर्षात? कसे जगलो आपण आठवा.!! पहा किती किती आठवणी उफाळून आल्या. अगदी नवीन खरेदी केलेल्या वस्तूंपासून, घरातल्या छोट्या मोठ्या कुरबुरी, आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत घालवलेले क्षण, वाढदिवस, नकोसे वाटणारे पण अपरिहार्य असे दुःखद प्रसंग, नोकरी, घर, संसार, शाळा, कॉलेज.. निरोपाचे प्रसंग!!! काय नि किती?

आपल्या रोजच्या जगण्याच्या अनेक पैलूंशी जोडलेले असंख्य क्षण जणू एखादा चित्रपट नजरेसमोरून तरळून जावा तसे तरळून गेले.. आणि आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी मागे पाहिले तर आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवेल की, याही वर्षाने आपल्या आठवणींच्या गाठोड्यात, अनुभवाच्या शिदोरीत छान भर घातली आहे आणि या वर्षाचा निरोप घ्यायची वेळही आलेली आहे.

तेव्हा आता.. आठवणींच्या कुपीत निरोपाचा स्मृतिगंध असाच दरवळत ठेवूया आणि नव्या उमेदीने, अगदी दिलखुलासपणे या सरत्या वर्षाला निरोप देऊया आणि अधिक संवेदनशीलपणे जगण्यासाठी नव्या वर्षाचे स्वागत करूया!! कारण शेवटी जगणे महत्त्वाचे. म्हणूनच पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे- ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!’ n

लेखक, अभिवाचक

akshay.watve@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in