दुसरी बाजू
प्रकाश सावंत
'लोकशाही'ची जननी मानल्या जाणाऱ्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर रालोआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करण्याबाबत भाजपच्या धुरिणांकडून चालढकल केली जात होती. भाजपसोबतच्या जागावाटपात जदयुला पडती बाजू घ्यावी लागेल, अशीच चिन्हे उद्भवली होती. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना स्मृतीभ्रंश झाल्याच्या वावड्या उठविल्या जात असताना, या कठीण प्रसंगातही आपल्या शांत, संयमी व धीरोदात्त स्वभावाने ज्यांनी भाजपच्या धुरिणांनाच पाटण्यात येऊन तडजोड करण्यास भाग पाडले, ते बाजीगर म्हणजे विहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. आता त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर बिहारमध्ये 'रालोआ'चे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ताज्या निकालाने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या रूपाने 'टायगर अभी जिंदा है' हेच अधोरेखित झाले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी 'मतचोरी' च्या मुद्द्यावरून प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यांच्या पाठोपाठ रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पार्टीनेही प्रचारात उडी घेऊन चांगलीच रंगत आणली होती. त्यातच मागील निवडणुकीत ज्यांना अडगळीत टाकण्यात आले, त्याच केंद्रीयमंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला अधिक जागा देण्याचे घाटत होते. एवढेच कशाला स्वपक्षातील काही नेत्यांना 'हवा' देण्याचे प्रयत्नसुद्धा मित्र पक्षांनी आरंभिले होते. जागावाटपाच्या अत्यंत मोक्याच्या प्रसंगी अपेक्षित जागा मिळतील की नाही अशी बिकट परिस्थिती उद्भवली होती. या साऱ्या घडामोडींवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बारीक नजर होती. बिहारमधील राजकीय परिस्थितीवरील नियंत्रण आपल्या हातून सुटण्याची चिन्हे दिसताच, त्यांनी सर्वप्रथम भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाटण्यात येऊन चर्चा करण्यास भाग पाडले. या बैठकीने बिहारमधील राजकीय अस्थिरता दूर झाली. शिवाय, या बैठकीच्या माध्यमातून एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचे नाव जवळपास निश्चित झाले. या बैठकीचा परिणाम म्हणून 'रालोआ' मधील घटक पक्ष आपले रुसवेफुगवे बाजूला सारून एकवटले. या बैठकीनंतर बिहारमधील निवडणुकीचे वारे फिरले. परिणामी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील 'रालोआ सरकार' प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.
बिहारमध्ये भाजपच्या रूपाने भगवे वादळ घोंगावत असताना नितीश कुमार यांनी ओबीसी, उच्चवर्णीय, अतिमागास समाजाचीच सुयोग्य मोट बांधली असे नाही, तर मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्या बाजूने झुकवण्यात यश मिळवले आहे. हे समाज बांधव आपल्यापासून दुरावणार नाहीत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे राबविल्या आहेत. मुख्य म्हणजे राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना दिलेली दहा हजार रुपयांची रोजगाराभिमुख मदत 'रालोआ'च्या विजयाची पायाभरणी करून गेली आहे. बिहार विधानसभेचा २४३ जागांपैकी भाजपने एकूण ९० जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल नितीश कुमार यांच्या जदयुने ८५ जागा पटकावल्या आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने २० जागा जिंकल्या आहेत. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या 'हिंदुस्तानी आवामी मोर्चा'ने व माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या 'राष्ट्रीय लोकमोर्चा' ने लढवलेल्या सर्व जागा काबीज केल्या आहेत. रालोआच्या घटक पक्षांनी खांद्याला खांदा लावून एकजुटीने प्रचार केला. त्यांच्यातील समन्वय आणि सहकार्यामुळेच 'रालोआ'ने - घवघवीत यश संपादन केल्याची भावना नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.
मागील चाळीस वर्षांपासून नितीश कुमार हे राजकारणात सक्रिय आहेत. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून ते सर्वाधिक काळ कार्यरत राहिले आहेत. प्रस्थापितांविरोधात लाट येऊन सुद्धा नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत बाजी मारली असून तेच रालोआच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नितीश कुमार यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेत राहून त्यांनी त्या यशस्वी करून दाखविल्या आहेत. कधी भाजप तर कधी राजदला सोबत घेऊन त्यांनी सत्ता संपादन केली. ते ज्या बाजूला झुकले, त्या बाजूला त्यांनी मतांचे पारडे झुकवले. ही त्यांच्या आजवरच्या सत्ताकारणाची खासियत म्हणावी लागेल. त्यांनी नेहमीच बहुजनवादी, सर्वसमावेशक राजकारण केले. परिणामी सत्तेचा लोलक सदैव त्यांच्याच बाजूने झुकत राहिला, हे विशेष.
खरे तर, ७५ वर्षीय नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणात 'पलटूराम' म्हणूनच ओळखले जात होते. त्यांनी नेहमीच 'बेरजेचे राजकारण' केले. मागील २० वर्षे ते सत्तेच्या परिघात आहेत. समाजवादी विचारांच्या मुशीत घडलेल्या नितीश कुमार यांनी सर्वप्रथम शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल वाटप करून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण राज्यात दारूबंदीचा अभूतपूर्व प्रयोग यशस्वी करून दाखविला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत धडका देणाऱ्या बाहुबली गुंडांचा कायमचा बंदोबस्त करून त्यांना 'सळो की पळो' करून सोडले. त्यामुळे बिहारमध्ये आपण सुरक्षित असल्याची जाणीव महिला वर्गाला झाली. आशा, बालवाडी कर्मचारी यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीच्या योजना अंमलात आणून 'सोशल इंजिनिअरिंग' चा प्रयोगही यशस्वी केला. त्यामुळेच बिहारमधील 'नारीशक्ती'च नव्हे, तर ओबीसी, अतिमागास समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहीला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 'सुशासन बाबू' असे का म्हणतात, याचा प्रत्यय आम्हाला काही वर्षांपूर्वीच्या बिहार दौऱ्यात आला. पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे शासकीय निवासस्थान आहे. या ठिकाणी दरदिवशी विविध खात्यानुरुप जनता दरबार भरतो. या जनता दरबारात लोक आपली गाऱ्हाणी घेऊन येतात. ज्या खात्याचा दिवस आहे, त्या खात्याशी संबंधित गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जातात. या गाऱ्हाण्यांवर त्या त्या खात्याचे सचिव लागलीच निर्णय देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना देतात. या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे कायदिश विभागीय अधिकाऱ्यांना दिले जातात. त्यानुसार जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सोडवले जातात. ही त्यांची कार्यपद्धती कमालीची यशस्वी ठरली आहे. आजकाल झारीतले शुक्राचार्य बनलेल्या नोकरशहांमुळे मंत्री अथवा मुख्यमंत्री यांची भेट घेणेसुद्धा अवघड झालेले असताना, दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आपल्याला भेटतात, आपली गाऱ्हाणी ऐकून घेतात, त्यावर अंमल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतात, ही मुख्यमंत्र्यांची थेट भेट सामान्य नागरिकांना 'ग्रेटभेट' वाटते. प्रश्न सुटो अथवा न सुटो, ही भेट सामान्य नागरिकांना मनोमन सुखावते. त्यामुळेच नितीश कुमार यांची 'सुशासन बाबू' म्हणून कारकीर्द उजळली आहे.
लोकसंख्यावाढीत उत्तर प्रदेशानंतर बिहार हे राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. हे राज्य आजही उद्योगधंद्यापेक्षा शेतीवर अधिक अवलंबून आहे. राज्यात बेरोजगारी पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळे स्थलांतरितांचा प्रश्नही तितकाच गंभीर बनलेला आहे. या राज्यात गरिबी आहे. शाळा गळतीचे प्रमाण मोठे आहे. शहरीकरणाने, औद्योगिकीकरणाने म्हणावा तसा वेग अद्याप घेतलेला नाही. तथापि, नितीश कुमार यांनी संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष पुरविले आहे. दहा हजारांच्या 'रेवडी संस्कृती'ने नितीश कुमार यांच्या विजयात मोठा वाटा उचलला असला तरी आता त्यांना या तरुणांच्या राज्यात बेरोजगारीच्या व उद्योगधंदावाढीच्या प्रश्नाला चालना द्यावी लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहा हजारी 'रेवडीसंस्कृती' ने 'रालोआ'ला सहज विजय मिळवून दिला असला तरी त्याने राज्याचा विकास साधलेला आहे असे म्हणता येणार नाही.
prakashrsawant@gmail.com